September 17, 2024
Maharashtra Bhushan BJP Leader Ram Naik Birthday Special
Home » जनसामान्यांचे ‘महाराष्ट्र भूषण’
सत्ता संघर्ष

जनसामान्यांचे ‘महाराष्ट्र भूषण’

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महानगरातून सलग पाच वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून जाण्याचा विक्रम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते राम नाईक यांचा आज १६ एप्रिल हा जन्मदिन. आज त्यांच्या वयाला ९० वर्षे पूर्ण होत आहेत.

डॉ. सुकृत खांडेकर

वयाच्या पन्नाशीतील उत्साह आजही त्यांच्यात आहे. गेल्याच आठवड्यात मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. संसदेत किंवा विधिमंडळात ज्या उत्साहाने व अभ्यासपूर्ण ते बोलत असत, तोच उत्साह व जनतेविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ यावेळी त्यांच्या बोलण्यातून सर्वांना जाणवली.

राजकारणात असूनही साधी राहणी व उच्च विचारसरणी असे हे व्यक्तिमत्त्व आहेत. नगरसेवक, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्यपाल अशी अनेक सन्मानाची व अधिकाराची पदे त्यांच्या वाट्याला आली. पण त्यांच्या सात दशकांच्या सार्वजनिक जीवनात त्यांच्यात कधीच अहंकार दिसला नाही. गळ्यात सोन्याचे लॉकेट, हातात महागडे मोबाइल कधी दिसले नाहीत. राम नाईक केंद्रात मंत्री व नंतर उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या राज्याचे राज्यपाल झाले. पण त्यांच्या पुढे-मागे सुरक्षा रक्षकांचा वा कमांडोंचा गराडा कधी दिसला नाही. पत्रकार म्हणून त्यांची राज्य विधिमंडळातील व संसदेतील कारकीर्द प्रत्यक्ष पाहण्याची मला संधी मिळाली म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

राम नाईक हे लक्षावधी जनतेचे रामभाऊ झाले. त्यांचे पालक झाले. सर्वसामान्य जनता हाच त्यांच्या कार्याचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावर बालपणापासून संस्कार आहेत म्हणून त्यांनी मर्यादांचे भान ठेऊन देश हिताला व समाज हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन सदैव काम केले. सांगलीत शालेय व पुण्यात महाविद्यालयीन (बीएमसीसी) शिक्षण पूर्ण करून ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा राहण्याचा मोठा प्रश्नच होता. पण मुंबईत येणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांसाठी चर्चगेट समोर असलेल्या एका खोलीत त्यांनी काही काळ मुक्काम केला. त्या खोलीत संडास-बाथरूम काहीच नव्हते. तेव्हा रोज सकाळी चर्चगेट रेल्वे स्थानकावरील स्वच्छता गृहाचा वापर करून त्यांनी मुंबईत सुरुवातीचे दिवस काढले. दुपारी दक्षिण मुंबईत नोकरी, रात्री आझाद मैदानावर भरणाऱ्या संघाच्या रात्र शाखेवर शिक्षक म्हणून काम केले.

सांगली-पुणे करीत राम नाईकांचा मुंबईकडे प्रवास झाला व नंतर त्यांनी दिल्ली गाठली तरी मनाने ते नेहमी अस्सल मुंबईकर राहिले. आज सर्वत्र राजकारणाचा चिखल झालेला दिसतो. निवडून दिलेला आमदार, खासदार नंतर कोणत्या पक्षात जातो याची आज शाश्वती नाही. राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वागण्या-बोलण्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. सत्ता आणि पैसा या भोवती राजकारणी धावताना दिसतात. जनसेवक म्हणून किती जण काम करतात आणि स्वत:चे साम्राज्य वाढविण्यासाठी किती कसे गुंतलेले असतात, हे पाहताना सर्वसामान्य जनतेची मती गुंग होते. कार्यकर्त्यांच्या टोळ्या पोसणे हे सुद्धा नेत्यांना त्यांच्या राजकारणासाठी आवश्यक झाले आहे. हे सर्व पाहिल्यावर राम नाईक कसे वेगळे आहेत व त्यांनी सात दशके कसे नि:स्वार्थ मनाने काम केले, हे लक्षात येते. म्हणून सध्याच्या राजकारणाच्या गलबल्यात, तोडफोडीच्या राजकारणात, सर्व काही सत्तेसाठी एवढेच ध्येय ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या भाऊगर्दीत राम नाईक यांच्यासारखे स्वच्छ, निष्ठावान, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न व शिस्तप्रिय नेते शोधावे लागतात. राम नाईक हे आदर्श लोकप्रतिनिधी आहेत. राजकारणात सत्तेची पदे व पैसा खूप कमावता येईल पण राम नाईक यांच्यासारखे काम आणि वैचारीक बैठक सांभाळणे व जोपासणे हे खूप कठीण आहे.

राम नाईक यांनी वयाची नव्वदी पूर्ण केली असली तरी ते थकलेत असे कोणी म्हणणार नाही. कर्करोगावर मात करून त्यांनी पुन्हा दुप्पट जोमाने कामाला सुरुवात केली तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मुंबईत येऊन रामभाऊंच्या जबर इच्छाशक्तीचे व त्यांच्या अविरत कामाचे कौतुक केले होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या सहवासातून व संघाच्या संस्कारातून राम नाईकांच्या जीवनाची जडण-घडण झाली म्हणूनच त्यांचे राजकीय शत्रूही त्यांचा सदैव आदर करतात.

राम नाईक विधिमंडळात किंवा संसदेत असताना पत्रकारांचे मोठे आधार होते. मुंबई किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नावर आपण कसा पाठपुरावा करीत आहोत, हे ते आवर्जून सांगत. केंद्रात रेल्वेचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर दिल्लीतील मराठी पत्रकार राम नाईकांकडे हमखास जात असत. कारण रेल्वेच्या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राला व मुंबईला काय दिले याचा अभ्यास करून, त्यांची टिपणे काढून पत्रकारांना ते समजावून सांगत असत. उपनगरी रेल्वे सेवा ही मुंबई महानगराची रक्तवाहिनी आहे. रोज ८० लाख लोक या महानगरात उपनगरी रेल्वेने प्रवास करीत असतात. म्हणून लोकलप्रवास हा रामभाऊंच्या नेहमीच जिव्हाळ्याचा विषय आहे.

१९६४ मध्ये गोरेगाव रेल्वे प्रवासी संघ स्थापन करणारे राम नाईक हे केंद्रात रेल्वे राज्यमंत्री झाले व मुंबई रेल्वे विकास महामंडळ त्यांच्या कारकिर्दीतच स्थापन झाले. आज लोकल डब्यांच्या एका बाजूला खाली जिन्याच्या पायऱ्या दिसतात, त्याचे श्रेय राम नाईकांनाच आहे. लोकल गाड्या मध्येच थांबतात, पावसाळ्यात तर असे प्रसंग अनेकदा येतात, अशा वेळी विशेषत: महिला प्रवाशांनी डब्यातून खाली कसे उतरायचे हा प्रश्न अनेक वर्षे भेडसावत होता. राम नाईकांनी त्यावर पाठपुरावा करून लोकलच्या डब्यांना पायऱ्या मिळवून दिल्या. मुंबईत पंधरा डब्यांच्या लोकल्स धावतात. त्याचेही श्रेय राम नाईकांनाच आहे. रेल्वे फलाटांची उंची वाढवणे, संगणकीकृत आरक्षण केंद्र, चर्चगेट ते डहाणू लोकलचा विस्तार ही राम नाईकांनीच मुंबईकरांना दिलेली देणगी आहे.

देशात मद्रासचे चेन्नई, त्रिवेंद्रमचे तिरुअनंतपुरम, कलकत्ताचे कोलकता, बंगलोरचे बंगळूरु असे नामकरण करायला तेथील जनतेला आंदोलने करावी लागली नाहीत. पण बॉम्बेचे मुंबई करण्यासाठी मराठी जनतेला कित्येक वर्षे संघर्ष करावा लागला. राम नाईकांनी विधिमंडळात व संसदेमध्ये वैधानिक व प्रशासकीय पातळीवर जो जिद्दीने पाठपुरावा केला त्याला खरोखरच तोड नव्हती. बॉम्बे किंवा बम्बई या शब्दाला काहीच अर्थ नाही हे त्यांनी केंद्राला पटवून दिले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल असतानाही त्यांनी अहलाबादचे प्रयागराज व फैजाबादचे अयोध्या असे नामकरण करण्यात यश मिळवले, तेही त्या राज्यात अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना व समाजवादी पक्षाची सत्ता असताना.

राम नाईक हे उत्तम वाचक आहेत आणि विश्लेषक आहेत. जेव्हा ते कार्यक्रमांना पाहुणे म्हणून जातात तेव्हा त्या विषयावर ते अभ्यास करून, चांगला गृहपाठ करून व उत्तम टिपणे काढून जातात. दैनिक प्रहारच्या कार्यालयात ते संवाद साधण्यासाठी आले होते, तेव्हाही त्यांनी आपल्याला काय सांगायचे याची टिपणे काढून आणली होती. वेळेच्या बाबतीतही ते काटेकोर आहेत. दिलेल्या वेळेला ते अचूक येणार ही त्यांची पद्धत आहे. विधानसभेत किंवा संसदेत राम नाईक नाहीत, ही पत्रकारांच्या दृष्टीने व मुंबईकरांच्या दृष्टीने मोठी पोकळी आहे. राम नाईक हे मुंबईकरांचा विधानसभेतील किंवा संसदेतील आवाज होते. एखादी मागणी केल्यावर ती सरकारला मुद्देसूद पटवून देण्याचे व त्या मागणीचा ती मंजूर होईपर्यंत पाठपुरावा करण्याचे कौशल्य व जिद्द त्यांच्याकडे आहे. राम नाईकांना याच वर्षी केंद्राने पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. पण त्याचबरोबर जनतेच्या मनातील ते महाराष्ट्र भूषण आहेत.

डॉ. सुकृत खांडेकर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ओळखा पाहू ? हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे ?

प्रामाणिक, निडर पोलिस अधिकारी महिलेची विलक्षण जीवनकहाणी

सांग सांग भोलानाथ, यंदा शाळा सुरु होईल का ?…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading