लंडनच्या रस्त्यावर फिरताना मात्र माधुरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. स्त्रीची सुंदरता साडीमध्ये कशी बहरते याचा अनुभव तिने लंडनच्या या दौऱ्यात घेतला व इतरांनाही दिला. रस्त्यावर फिरताना सगळी माणसं, लहान मुले माधुरीकडे प्रेमाने, कुतूहलाने आणि कौतुकाने बघत होती. इतकेच काय तर काहींनी चक्क तिच्या सोबत सेल्फीही काढून घेतला.
राजेंद्र कृष्णऱाव घोरपडे, मोबाईल – 9011087406
परदेशात जायचे प्रत्येकाचे स्वप्न असते. अभिनय क्षेत्रातील व्यक्ती तर याची वाटच पाहात असतात. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम केलेली महाराष्ट्राची अप्सरा माधुरी पवार हीने सुद्धा लंडनवारीचे स्वप्न पाहीले होते. कलेतून तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. काही दिवसापूर्वीच ती लंडनवारीला गेली आहे. लंडनमधील तिचे अनुभव ती फेसबुकपेजवर शेअर करत आहे. मराठी माणुस कोठेही गेला तरी तो आपल्या देशाला, महाराष्ट्राला विसरत नाही. येथील मातीच्या सुगंध सदैव त्यांच्या मनात घर करून असतो. मग माधुरीही त्याला अपवाद कशी असेल. लंडनमध्ये जाऊन मराठीचा झेंडा लावला नाही तर ती महाराष्ट्राची दुर्गकन्या कसली ? लंडनमध्ये जाऊन माधुरीने तेथील सात-आठ अंश सेल्सिअस तापमानात चक्क साडीत फिरण्याची हौस पुर्ण केली आहे. परदेशात जायचे अन् तेथे साडीत हिंडायचे हे आधुनिक स्त्रीला थोडे अवघडल्यासारखेच वाटणारे आहे. पण न लाजता, न भीता, निडरपणा दाखवत माधुरीने चक्क लंडनच्या रस्त्यावर भारतीय स्त्रीचा पहेराव असणारी साडी नेसून तेथील नागरिकांना घायाळ केले आहे.
अनेक कलाकार त्यांच्या विविध छंदासाठी प्रसिद्ध असतात. पण माधुरीने तिचे साडी प्रेम, तिचा हा छंद लंडनमध्ये जाऊनही सोडला नाही. हटके करून प्रसिद्धी मिळवण्याची, चर्चेत राहाण्याची अनेक कलाकरांची सवय असते. विशेषतः परदेशात गेल्यानंतर तेथील आधुनिक विचारसरणीने प्रभावित होऊन आधुनिक पहेराव करण्याची संधी प्रत्येक कलाकार साधत असतो. हटके लुक करून प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. पुरुष कलाकारही यात मागे नसतात. केसांचे हटके लुक करून परदेशात परदेशीलुक करून स्वतःची हौस भागवत असतात. तेथील हटके कपडे घालूनही आपले वेगळेपण दाखवण्याची संधी साधत असतात. सहकलाकारांची सोबत असल्याने असा लुक करणे तेवढे सोपेही जाते. नेहमीच पारंपारिक वेशात फिरणारे हे कलाकार हटके लुक करण्यासाठीही परदेशीवारीची संधी सोडत नाहीत. अशामुळे अभिनयाच्या संधीही मिळू शकतात. स्त्री कलाकारांना तर आधुनिक पहेराव करून चित्रपट पदरात पाडून घेण्याची ही तर नामी संधी असते. कारण एकतर परदेशात खुले वातावरण असते. कोणाचे बंधनही नसते. अशा खुल्या वातावरणात आधुनिक पहेराव करण्यात अवघडल्यासारखेही वाटत नाही. आपण आधुनिक स्त्री आहोत ही दाखवण्याची संधी आयती मिळते. अशा या संधीची वाट प्रत्येक कलाकार पाहात असतो. पण माधुरीने लंडनच्या रस्त्यावर साडीत फिरून लंडनवासीयांना भारतीय स्त्रीच्या पहेरावाची ओळख करून दिली. यातील सौंदर्याचीही जाण त्याच्यात भरली आहे.
माधुरी महाराष्ट्रात अनेक सभा-समारंभाना जाते. पण ती नेहमीच साडीतच पाहायला मिळते. साडी आणि माधुरी यांचे एक वेगळे नाते आहे. साडीतील माधुरी सोबत सेल्फी काढण्याचा मोह ग्रामीण भागातील महिलांनांही आवरता येत नाही. अनेक सभा-समारंभात साडीतील माधुरी सोबतचे सेल्फी काढण्याचे व्हिडिओही व्हायरल झालेले पाहायला मिळतात. सध्या ती तिच्या या साडीतील लुकवरच अधिक भर देताना पाहायला मिळते. पण लंडनवारीत ती आपले साडीप्रेम विसरेल असे वाटत असतानाच ती लंडनमध्ये साडीत फिरून साडीतील सौंदर्य किती प्रभावी असल्याचे दाखवताना दिसून येत आहे. भारतीय साडी संस्कृतीचा एकप्रकारे ती प्रसारच करत आहे.
लंडनमधील साडीतील अनुभव तिने नुकताच तिच्या फेसबुक पोस्टमध्ये शेअर केला आहे. त्यात माधुरी म्हणते, साडी हा तिचा आवडता पहेराव आहे. यासाठी तिने लंडन दौऱ्यात घरून येतानाच साड्या नेल्या होत्या. आवडीचा पोशाख घालून लंडनमध्ये फिरण्याचे तिचे स्वप्न होते. पण इतक्या थंडीत तिला ते जमेल का नाही याबद्दल तिच्यामनात शंका होती. एक दिवस तिला कामातून सुट्टी मिळाली आणि लंडन फिरण्याची संधी मिळाली. थंडीमुळे येथे लोक गुडघ्यापर्यंत बुट, जॅकेट, ओव्हर कोट, स्कार्फ, कॅप असा अंगाचा कोणताही भाग खुला न सोडता फिरताना पाहायला मिळतात. थंडीमुळे हे सर्व करणे भाग आहे. पण माधुरीने चक्क साडी घालूनच फिरण्याचे ठरवलं अन् सुट्टीच्या दिवशी ती सहकलाकारांसोबत साडीतच बाहेर पडली. सुरवातीला तिला अवघडल्यासारखे वाटले. येथील लोकांना काय वाटेल ? हा प्रश्न तिच्या मनात घोळत होता. येथील लोकांना काय वाटते यापेक्षा आपणास छान वाटते ना ! मग झाले तर. सहकलाकारांसोबत ती बाहेर पडली पण तिचे सहकारी थोडे गडबडले. काय तु साडी घातलीयेस ? असे म्हणत तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पण माधुरीने आपला निर्णय बदलला नाही.
लंडनच्या रस्त्यावर फिरताना मात्र माधुरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. स्त्रीची सुंदरता साडीमध्ये कशी बहरते याचा अनुभव तिने लंडनच्या या दौऱ्यात घेतला व इतरांनाही दिला. रस्त्यावर फिरताना सगळी माणसं, लहान मुले माधुरीकडे प्रेमाने, कुतूहलाने आणि कौतुकाने बघत होती. इतकेच काय तर काहींनी चक्क तिच्या सोबत सेल्फीही काढून घेतला. तिला मिळालेला हा प्रतिसाद पाहून माधुरी भारावून गेली आहे. महाराष्ट्राच्या अप्सरेने साडीतील सौंदर्यांने लंडनवासीयांनाही साडीची भुरळ पाडली आहे.
लयभारी माधुरी..!!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.