पुस्तक परिचय –
सोप्या पद्धतीने लेखकांनी ऊस उत्पादन वाढीची गुरूकिल्लीच वाचकांकडे सोपवली आहे. ऊस शेतीचा सर्वंकष कोश असे पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यातील प्रकरणांची नावे बोलकी आहेत.
– आनंद श्री. केतकर, ज्येष्ठ पत्रकार, जयसिंगपूर
ऊस उत्पादकांसाठी मार्गदर्शक असे माझा ऊसाचा मळा हे पुस्तक तेजस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ऊस शेतीतील किमयागार म्हटले जाते, अशा डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, प्रा. अरूण मराठे, डॉ. बी. पी. पाटील आणि कृषिरत्न डॉ. संजीव माने या तज्ज्ञांनी ते लिहिले आहे. उसाचे पीक घेणाऱ्यांना जास्त उत्पन्न म्हणजे अधिक आर्थिक फायदा हे गणित माहित झालेले आहे. किमान ठराविक भावाचीही हमी मिळत असल्याने शेती बेभरवश्याची राहिलेली नाही. इथेनाल निर्मितीला महत्त्व आल्याने ऊस पिकाचे मोलही वाढले आहे. शेतकरी ऊस मळ्यातून जास्तीत जास्त एकरी उत्पादन करण्याचा घ्यास घेताहेत. डॉ. माने यांच्या ऊस संजीवनी गटाच्या सदस्यांनी ऊस संजीवनी अॅपव्दारे एकरी शंभर टन वा त्याहीपेक्षा जास्त उत्पादन घेण्यात यश मिळाले आहे. त्यामुळेच या गटाच्या सदस्यांप्रमाणे इतरांनाही आपले उत्पन्न वाढवावे म्हणून पुस्तक लिहिले आहे.
सोप्या पद्धतीने लेखकांनी ऊस उत्पादन वाढीची गुरूकिल्लीच वाचकांकडे सोपवली आहे. ऊस शेतीचा सर्वंकष कोश असे पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यातील प्रकरणांची नावे बोलकी आहेत. उसाच्या विक्रमी उत्पादनाची गुरूकिल्ली, सुपरकेन नर्सरी, ऊस व आंतरपिके, खोडवा उसाची पंचसुत्री, ठिबक सिंचन-फर्टिगेशन, उसावीरल पाण्याच्या ताणांचे निवारण, महापूर-पाणबुड ऊस पिकाचे व्यवस्थापन, पोषणद्रव्यांतील आंतरक्रिया, खत व्यवस्थापन, हवामान बदल आणि ऊशशेती, दर्जेदार गूळ उत्पादन, सेंद्रीय ऊसशेती, ऊस संजीवनीची किमया ही प्रकरणे. परिशिष्टांत ऊस संजीवनीच्या यशस्वी उपक्रमांची माहिती आहे.
ऊस उत्पादनाची कुंडली (मॉडेल) ही विषय समजण्यास, उसाच्या लागवडीचे प्रकार, सरीच्या रूंदीचे महत्व, उत्तम बेण्यासाठी सुपरकेन नर्सरी कशी तयार करावी. सेंद्रीय, जिवाणू खते, जैविक संरक्षण, किडी, त्यांच्या नियंत्रणासाठी करायची उपाययोजना, पाणी व्यवस्थापन, संजीवकांची उपयुक्तता, खोडव्याचे उत्पादन कसे वाढवता येते, हे सोप्या भाषेत सांगितले आहे. विक्रमी एकरी 168 टन घेणाऱ्या अशोक खोत यांनी तंत्रज्ञ अजिंक्य माने यांच्या साथीने हे कसे साध्य केले, याबरोबर गुजरातमध्येही या गटाच्या कामाने कशी वाखाणणी मिळवली आहे, डोंगराळ, निकस, मुरमाड जमिनीवर पायरी पद्धतीने प्लाट करून मिळवलेल्या यशोगाथाही वाचनीय आहेत.
माझा उसाचा मळा
लेखक – डा. बाळकृष्ण जमदग्नि, प्रा. अरूण मराठे, डा. बी. पी. पाटील आणि कृषिरत्न डा. संजीव माने.
प्रकाशक – तेजस प्रकाशन, कोल्हापूर
पाने – 184 (मासिकाचा आकार), किंमत – 400 रूपये