February 6, 2023
Suvarna Naik Nimbalkar book on Indumati Rani Sarkar
Home » राजर्षींच्या कृतीशुर सुनबाई करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब
मुक्त संवाद

राजर्षींच्या कृतीशुर सुनबाई करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब

करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब

छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सुनेला लिहिलेले पत्र मी तीन-चार वर्षांपूर्वी वाचले. तेव्हापासून इंदुमती राणीसाहेबांविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यातूनच ‘करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब’ हा चरित्रग्रंथ साकारला आहे. मेहता प्रकाशनतर्फे प्रकाशित या पुस्तकाचे प्रकाशन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सासवड येथे बुधवारी ( 30 नोव्हेंबर) होत आहे. त्यानिमित्ताने…

लेखिका सुवर्णा नाईक-निंबाळकर

छत्रपती शाहू महाराजांच्या सहवासात वाढलेल्या सुनेविषयीही कुतूहल होते. संस्थानिक, जहागीरदार घराणे सोडून इनामदार घराण्यातील मुलगी सून म्हणून निवडली म्हणजे, त्यांच्यात काही विशेष गुण असणारच. त्या काळातील रूढी संकेत झुगारून महाराजांनी राणीसाहेबांना सून म्हणून पसंत केले.

ज्या काळात स्त्रियांचे आयुष्य सर्वच बाजूंनी बंदिस्त होते. कित्येक शतकांच्या परंपरेने महिलांना शिक्षण नाकारले होते. त्यांना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी येण्याचे स्वातंत्र्य नव्हते. मग अर्थार्जनाचे स्वातंत्र्य तर दूरच. त्याकाळी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती, यामुळे निर्णयस्वातंत्र्य फक्त पुरुषालाच होते. खानदानी कुटुंबातील स्त्रीचे ही दृष्टीस पडत नव्हते. स्त्रीच्या चारित्र्याचे, कुलीनतेचे रिवाज तर फार कडक होते. या सर्व कुलप्रतिष्ठेला धक्का लागला तर समाजात टीकेची झोड उठत होती. या सर्व पार्श्वभूमीवर राजर्षी शाहूंचे व त्यांच्या सूनबाई इंदुमती राणीसाहेब या दोघांचेही कर्तृत्व आणि व्यक्तित्व काळाच्या मर्यादा ओलांडणारे होते, हे माझ्या लक्षात आले.

राजर्षी शाहू महाराजांनी जमना आक्कांची निवड फक्त बाह्य व्यक्तिमत्त्व पाहून न करता बुद्धीच्या निकषांवर केली होती. ती राणीसाहेबांनी पुढील आयुष्यात सार्थ करून दाखवली. राणीसाहेबांचे ६५ वर्षाचे आयुष्य बघता थोडा आनंद आणि थोडी हळहळही वाटते. आनंद यासाठी की, राणीसाहेबांनी प्रतिकूलतेवर मात करत आणि वैफल्याला दूर सारत जीवन सार्थकी लावले. चांगले छंद जोपासले. कोणाविरुद्ध राग व्यक्त केला नाही की, स्वत:ला दुःखात बुडवून घेतले नाही. मर्यादेविरुद्ध हाकाटी केली नाही की, आक्रोश करून न्याय मागितला नाही. कुटुंबाला समाजाला वा दैवाला दोष दिला नाही. त्यांनी जिद्दीने स्वत:चा विकास करून घेतला व इतरांनाही मदतीचा हात दिला. तरीही हळहळ वाटते. हळहळ अशासाठीच वाटते की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणखी काही वर्षे जगले असते तर राणी साहेबांची अधिक विस्तारलेली त्यांच्या कर्तृत्वाची क्षितिजे आपल्याला बघायला मिळाली असती. त्यांच्या सामर्थ्याचे आणि गुणसंपदेचे एक विलोभनीय झळाळते रूप आपल्याला आणखी विशाल अशा पार्श्वभूमीवर पाहायला मिळाले असते.

सासवडच्या जगताप घराण्यातील या लेकीला छत्रपतींची सून होण्याचे भाग्य लाभले. दुर्दैव असे की, लग्नानंतर थोड्याच दिवसांत त्यांचे प्रिय पती धाडशी, बद्धिमान म्हणून लोकप्रिय झालेले राजपुत्र प्रिन्स शिवाजी महाराज यांचे शिकारीत अपघाती निधन झाले. यानंतर राजर्षी शाहू चार-पाच वर्षांतच निधन पावले. राजर्षीची शारीरिक ठेवण विचारात घेतली तर ते एवढ्या कमी वयात जगाचा निरोप घेतील असे कोणालाच वाटले नव्हते. मध्यंतरी जी काही तीन-चार वर्षे मिळाली त्या अवधीत आपले दु:ख बाजूला सारून इंदुमती राणीसाहेब यांना चांगले शिक्षण मिळावे, वाचनाची गोडी लागून त्या सुविचारसंपन्न बनाव्या व वैधव्याचे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त व्हावे, इतकेच नव्हे तर त्यांचे भावी आयुष्यही त्यामुळे सुखी व्हावे अशी व्यवस्था राजर्षीींनी केली.

आपले सासरे राजर्षी यांच्या आत्म्याला समाधान व आनंद वाटावा असेच इंदुमती राणी साहेब जगल्या. त्या इतक्या व्रतस्थ राहिल्या की भारत स्वतंत्र झाल्यावर राणीसाहेबांनी राजकारणाचा मोह कटाक्षाने टाळला. राणीसाहेब स्थितप्रज्ञाचे जीवन जगल्या. शेवटी शेवटी तर त्यांनी आपले जीवन महिलांच्या शैक्षणिक कार्यासाठी खर्ची घातले व यामुळे अनेक मुलींचे जीवन समृद्ध केले.

स्त्रियांच्या, मुलींच्या शिक्षणाची अतोनात तळमळ, जे स्वत:ला मिळाले नाही ते इतरांना मिळावे ही सदिच्छा. पण फक्त इच्छा असणे वेगळे व ती कृतीत आणणे वेगळे. राणीसाहेब कृतिशूर होत्या. त्यांच्या ज्ञानलालसेची शौर्यगाथा प्रगतिपथावर होती व त्याचा अनेकांना फायदा झाला. राणीसाहेबांचे जीवन- चरित्र पाहता ते एक आदर्श, शिस्तबद्ध व स्फूर्तिदायक असेच आयुष्य होते. जुने संस्कार, अद्ययावत विचार व जीवन मूल्ये यांची सांगड कशी असावी, समाजाची खरी गरज ओळखून त्यासाठी नि:स्पृह व अव्याहत कार्य कसे करावे हे गुणही त्यांच्यात होते. हे व्रत त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत जपले. राणीसाहेब अंत:करणानेही श्रीमंत व दयाळू होत्या. लहान-थोर, श्रीमंत-गरीब सर्वांशी त्या समतेने वागत.

Related posts

Saloni Art : टाकावू कार्डबोर्डपासून नेमप्लेट…

चंदगड बोलीभाषा, माती अन् माणसाचं मार्मिक चित्रण करणारे पुस्तकः उंबळट

मानवतेच्या मूळ भूमीतून उफाळलेला लाव्हा ” अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त “

Leave a Comment