पुणे: ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मरणार्थ कार्यरत असलेल्या येथील मृत्युंजय प्रतिष्ठानमार्फत यंदाचा साहित्यविषयक पुरस्कार ज्येष्ठ संपादक , लेखक अरविंद व्यं. गोखले यांना, तर समाजकार्य पुरस्कार मुंबईसह कोकण विभागात कार्यरत असलेल्या विद्याधर निमकर यांच्या चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेस देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक-कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे व श्रीमती मृणालिनी सावंत यांनी ही माहिती दिली.
पुरस्कारांचे हे 17 वे वर्ष असून सावंत यांच्या 21 व्या स्मृतीदिनी 18 सप्टेंबरला (सोमवार) हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. एस. एम. जोशी फाऊंडेशनच्या सभागृहात संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
मृत्युंजय प्रतिष्ठानमार्फत आत्तापर्यंत डॉ. आनंद यादव, जगदीश खेबुडकर, डॉ. यु. म. पठाण, ना. धों महानोर, बाबा कदम, भा. द. खेर, वीणा गवाणकर, उत्तम बंडू तुपे, प्रवीण दवणे, डॉ. द. ता. भोसले, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रवींद्र शोभणे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, राजेंद्र खेर, आसावरी काकडे या साहित्यिकांना साहित्यविषयक पुरस्कार देण्यात आले आहेत. तर समाजकार्यविषयक पुरस्कार लोकसाधना प्रकल्प, चिखलगाव-दापोली, डॉ. जे. पी. नाईक महाविद्यालय उत्तूर – आजरा, जीवरक्षक दिनकर कांबळे – कोल्हापूर, बाळासाहेब कोळेकर – कोयनानगर, स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ लिमये – पुणे, सुरेश हुंदरे – बेळगाव, कांचनताई परुळेकर – कोल्हापूर, डॉ. भीमराव गस्ती – बेळगाव, गिरीश प्रभुणे – चिंचवड, अशोक रोकडे – व्हाईट आर्मी – कोल्हापूर, रेणू गावस्कर, पुणे, डॉ. संजीवनी केळकर, सोलापूर यांना देण्यात आले आहेत.
मराठवाड्यातील दुष्काळाच्या वेळी कार्यक्रम रद्द करून एक वर्ष ही सर्व रक्कम नाम फाऊंडेशनला देण्यात आली. तर कोल्हापुरातील महापुराच्या वेळी अनेक जणांचे प्राण वाचवलेल्या व्हाईट आर्मीचे आदम मुल्लाणी यांचे अपघाती निधन झाल्यावर मृत्युंजय प्रतिष्ठानने त्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांचे अर्थ साहाय्य दिल्याचेही डॉ. देशपांडे यांनी नमूद केले.
जन्मगावी आजरा येथे सभागृह
दरम्यान मृत्युंजय प्रतिष्ठान, निर्धार-कोल्हापूर आणि समीर देशपांडे यांनी पुढाकार घेऊन शिवाजीरावांच्या जन्मगावी आजरा येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत एक भव्य सभागृह उभारले असून त्याला ‘मृत्युंजय’कारांचे नाव देण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यासाठी जिल्हा परिषदेला सुमारे 50 लाख रु. निधी उपलब्ध करून दिला होता. या सभागृहासाठी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी विशेष पुढाकार घेतला होता. सध्या सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचेही डॉ. देशपांडे म्हणाले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.