April 14, 2024
science-fiction-that-tells-a-coherent-story-based-on-science
Home » विज्ञानाचा आधार घेत संगतपणे कथन करणाऱ्या विज्ञान कथा
संशोधन आणि तंत्रज्ञान

विज्ञानाचा आधार घेत संगतपणे कथन करणाऱ्या विज्ञान कथा

अमळनेर येथे 2 ते 4 फेब्रु. दरम्यान होणार्‍या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ रंजन गर्गे यांना “मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल” या परिसंवादात निमंत्रित करण्यात आले आहे. याच सत्रात त्यांच्या “अनुबंध” या चौथ्या कथा संग्रहाचे विमोचन होणार आहे. या पुस्तकास विज्ञान कथा व कादंबरीकार डॉ. संजय ढोले यांची प्रस्तावना आहे. त्याचा हा संपादित अंश….

          डॉक्टर रंजन गर्गे मराठी सारस्वतातील व एकूणच विज्ञान साहित्यातील आघाडीचे नाव आहे. विज्ञान कथाकार म्हणूनच प्रचलित आहेत. ते स्वतः सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्याने व विज्ञानाची पार्श्वभूमी भक्कम असल्याने त्याच्या विज्ञान कथांना मूलभूत व आधुनिक विज्ञानाचा मोठा आधार आहे. शिवाय त्यांच्या विज्ञानकथा या विज्ञानाची कास धरणाऱ्या असून, त्यातील कमी अधिक विज्ञानाची नोंद घेतली गेली आहे हे विशेष. महत्वाचे म्हणजे त्यांच्या विज्ञानकथा या कथेच्या बांधणीतून मजबूत असून, विज्ञानाचा प्रवाह त्यात सहजपणे सरमिसळून गेला आहे. ‘राजहंस हसला’ हा त्यांचा चौथा विज्ञान कथासंग्रह त्याच पठडीतला असून, यापूर्वी त्यांचे ‘मंगळ कुजबुजला’, ‘डी. एन. ए. चा आक्रोश’ व ‘बिजांकुर’ हे तीन विज्ञान कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. आणि वाचकांनी त्याचे चांगले स्वागतही केले आहे. तसे पाहता डॉ. रंजन गर्गे हे जुन्या पिढीतील विज्ञान कथाकार. त्यानंतर एक मधली आणि आता नव्याने एक पिढी निर्माण होते आहे. मला वाटतं त्या काळात त्यांची दखल फारशी घेतली गेली नाही. पण आज ते जुने व नवीन अशा पिढीतील मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. खऱ्या अर्थाने आता एकविसाव्या शतकात विज्ञान कथा या तीन चार प्रकारात मोडल्या जात आहे. हार्डकोर, सॉफ्ट, विज्ञानाचा फक्त स्पर्श असणाऱ्या आणि चौथ्या म्हणजे विज्ञानाची फक्त पार्श्वभूमी असणाऱ्या कथा. यामध्ये डॉ. रंजन गर्गे यांच्या कथा मला हार्डकोअर सदरातल्या दिसतात. कारण त्यांचा विज्ञानकथेमध्ये विज्ञान ठासून भरलेले असते व त्याचा सांगोपांग ऊह:पोहही केलेला असतो. पण एक मात्र निश्चित. ते कथानकात कुठेही धक्का पोहोचू देत नाहीत. हल्लीचे हार्डकोर विज्ञान कथा लिहिणारे बोटावर मोजण्याइतपत लेखक असून, त्यातील एक ठळक नाव म्हणजे डॉक्टर रंजन गर्गे. मुख्य म्हणजे मराठी विज्ञान कथेला चांगला शंभर वर्षाहून मोठी परंपरा आहे. आज एकविसाव्या शतकात विज्ञानाचे विविध विषय घेऊन व त्यांच्या परिणामांची चर्चा करून विज्ञान कथा हिरीरीने लिहिल्या जात आहेत ही मंडळी स्वयंस्फूर्तीने लिहिताना दिसत आहे; ही निश्चितच जमेची बाजू असून, तेवढीच आवश्यकही आहे. फक्त हार्डकोर विज्ञान कथा लिहिणाऱ्यांची संख्या रोडावत चाललेली आहे की काय अशी शंका येते. पण विज्ञान कथा कुठल्याही प्रकारातली असो ती मात्र लिहिली गेली पाहिजे. तरुण पिढीने जुने आदर्श जरूर घ्यावेत. पण स्वतंत्रपणे विचार करून आपला मार्ग चोखाळावा. कारण तरुण पिढी लिहित राहिली तर मराठी विज्ञानकथा एकविसाव्या शतकात नुसतीच जिवंत राहणार नसून, आपला ठसाही उमटवणार आहे… आणि हे कार्य तरुण व प्रवाहित लेखकांना करायचे आहे. या सर्वांना डॉक्टर रंजन गर्गे यांच्या कथा निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहेत. तरुण विज्ञान कथाकारांनी जुन्या विज्ञान कथाकारांचे संदर्भ व आदर्श जरूर घ्यावेत, पण त्याच वेळी स्वतःचे अस्तित्व, मार्ग व प्रवाहही निर्माण करावा. म्हणूनच डॉ. रंजन गर्गेंच्या कथा वाड्मयीन दृष्ट्या प्रगल्भ असून, त्या येत्या काळात चिरकाल टिकणाऱ्या आहेत असे मला वाटते. राजहंस जन्मला या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत आणि त्या सक्षमपणे विज्ञानाच्या पायावर उभ्या आहेत. प्रत्येकाचे विश्लेषण असे…

राजहंस जन्मला

राजहंस जन्मला ही विज्ञान कथा जेनेटिक क्रिस्पर या तंत्रज्ञानावर आधारित असून, अंतराळवीर असणाऱ्या अपर्णाला आई होण्याची आंतरिक इच्छा होते आणि तशा भावना आपली मैत्रीण डॉ. आर्यांना बोलून दाखवते. कारण अपर्णाचे गर्भाशय एका अपघातात बाद झालेले असते डॉ. आर्या अतिशय सहानुभूतीने विचार करून बेबी पॉडचा मार्ग सुचवतात आणि क्लोनिंगच्या साह्याने अपर्णाच्या विविध पेशी घेऊन पॉड तयार केले जाते आणि त्यात गर्भ वाढविण्याचा प्रयत्न होतो. कालांतराने गर्भात काहीतरी जनुकीय दोष आढळतो. आर्या बायोब्रिक्सच्या मार्गाने अतिशय यशस्वीपणे त्यावर प्रयोग करून मुलाचा जन्म होतो. तोच राजहंस. कथेचा भाग चांगला असून आर्या, अपर्णा, निहार व महत्त्वाचे म्हणजे अपर्णा सारखीच दिसणारी व पॉडची देखभाल करणारी दाया अपर्णाइड ५००० यांच्या संवादातून पुढे जाते. अपर्णाइडची निर्मिती ही एक खरंच वेगळी कल्पना डॉ. गर्गे यांनी कथेत आणली आहे. अंतराळात असणाऱ्या अपर्णाची हुबेहूब छाया पॉड शेजारी असणाऱ्या बाळाला आईचं उबदारपणही मिळालं. ही संकल्पना खरच डॉ. गर्गे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडली आहे. कथेचा शेवट आनंददायी झाल्याने वाचकाला ती भावते.

‘बी स्मार्ट’

‘बी स्मार्ट’ ही विज्ञान कथा आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरणारी असून, अँटी एजिंग थेरपी, कृत्रिम मधमाशा, कृत्रिम बुद्धिमत्ता या महत्त्वाच्या संशोधनाचा आधारभूत त्याला आहे. मानव मानवाच्या सुखी जीवनासाठी संशोधन करतो. यातूनच कोरफड सारख्या वनस्पतींच्या उत्परीवर्तनातून रस निर्माण करून मानवी आयुष्य वाढविण्याचा प्रयत्न आयुष हा शास्त्रज्ञ करतो. त्यात यशस्वी होऊन, मुख्य म्हणजे यातून वेगळी समस्या निर्माण होते. आयुर्मान वाढल्याने लोकसंख्या वाढते. त्यामुळे पृथ्वीवरील संसाधने अपूर्ण पडायला लागून उपासमारी सारखे गंभीर प्रश्न उद्भवू लागतात. त्यावर मुकाबला करण्यासाठी शास्त्रज्ञ परागीभवन निर्मिती करणारी कृत्रिम मधमाशी निर्माण करतात आणि उत्पन्न वाढीस लागते व मानव भूक भागवण्याचा प्रयत्न करतो. पण यातून गंभीर समस्या निर्माण होते. मधमाशीच्या विशिष्ट गंधकांना पशुपक्षी आकर्षित होतात आणि ते त्यांना खायला जातात. पण स्वयं संरक्षण करण्यासाठी कृत्रिम मधमाशी विषारी रसायने सोडून, पक्षी मृत्यू पावतात आणि हे निसर्गासाठी घातक ठरते. पण यावरही उपाय काढून शास्त्रज्ञ निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करतात. कथेचा बाज सक्षमपणे तांत्रिक आधारावर आहे आणि शिवाय ओघवताही आहे.

‘ब्रह्म’

‘ब्रह्म’ ही विज्ञान कथा ह्यूमन अँड्रॉइड, रोबोनॉट अँड्रॉइड यासारख्या व तंत्रज्ञानाची सरमिसळ असणारी व मानवी मनाचा वेध घेणारी कथा आहे. हबलपेक्षाही सक्षम ब्रम्ह नावाची दुर्बिणीची निर्मिती करून, तिला पृथ्वीपासून २५ लाख किलोमीटर अंतरावर प्रतिरोपण करून तिच्याद्वारे विश्वाचे अवलोकन तर करायचेच पण शिवाय या विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचाही वेध घ्यायचा प्रयत्न या कथेत झाला आहे. दूरवर असणाऱ्या अशा दुर्बिणी नादुरुस्त झाल्यावर त्यांना दुरुस्त करणे तसे अवघड असते. त्यामुळे ह्युमन अँड्रॉइडची नाविन्यपूर्ण कल्पना या कथेत डॉ. गर्गे यांनी राबवून, त्याद्वारे फारसे परिश्रम न घेता व मानवाचा व आर्थिक ऱ्हास न करता मैत्रीहॉड नावाचा अँड्रॉइड तयार करून तो अवकाशात पाठवण्याची किमया केली आहे. या कथेत लीलावती, डॉ. हरिहर हे तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ जोडपं की जे अवकाश मोहिमेशी निगडित असून, जनुकिय व डेटासायन्समध्ये त्यांचा हातखंडा आहे. अशा दांपत्याच्या पोटी आपत्य नसल्याने जनुकिय व हाडांमासाचा मैत्री नावाचा ह्यूमन अँड्रॉइड तयार केला व पुत्रवत प्रेम केले. या कथेत डॉ. गर्गे बरीच पात्रे ओघाने आणली आहेत… आणि शेवटी यशस्वीपणे ब्रह्मदुर्बीण दुरुस्त मैत्रीऑइड करतो आणि ती दुर्बीण दूरवर असणाऱ्या एका आकाशगंगेतील पृथ्वी सदृश्य असणाऱ्या ग्रहाचे छायाचित्र पाठवतो की जिथे प्रतिजीव सृष्टी उभी राहू शकेल. डॉ. गर्गे यांनी ही कथा शास्त्रीय विश्लेषणासोबतच कथेत उत्सुकता आणली आहे.

‘सरोगसी’

‘सरोगसी’ ही कथा विज्ञानासोबतच मानवी भावभावना व कायद्याची गुंतागुंत दर्शविणारी आहे. डॉ. गर्गे यांनी या कथेत त्या निमित्ताने बरेच प्रश्न उदृत तर केलेच आहे. पण समाज जीवनाशी निगडित असे भाष्यही केले आहे. म्हणूनच ही कथा प्रवाहित झाली आहे.विजय व विजया हे आपापल्या गुणदोषांसोबत असणारं दांपत्य तर सनी व मोना हे कॉस्मोनॉट लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे दांपत्य. विजय व विजया हे स्वतःच जनुकीय अपत्य असावं म्हणून आग्रही. पण विजयच्या स्पर्ममध्ये दोष असल्याने ते त्यांना शक्य नाही आणि सनी व मोना मध्ये मोनाची आई होण्याची आंतरिक इच्छा होती. पण अपघातात तिचे गर्भाशय काढून टाकलेले. अशात स्वभावानुसार विजया व विजयाचा घटस्फोट होतो आणि ती एकटीच सरोगसीचा पर्याय निवडते. त्याचवेळी मोनाही दुसऱ्याचे अंडबीज व शुक्राणू घेऊन तिसऱ्याच्या उदरात गर्भाश विकत घेऊन अपत्य प्राप्तीचे प्रयत्नशील. यासाठी डॉ. पुनावाला त्यांना मदत करतात आणि करारही करून घेतात. पण तसे पाहता जेव्हा जन्म झालेल्या अपत्त्यावर हक्काची वेळ येते तेव्हा विजया व मोना दोघीही हक्क सांगतात आणि प्रकरण न्यायालयाकडे जाते. तेथे युक्तिवाद होऊन, नैसर्गिक न्याय होतो. हे अतिशय छानपणे डॉक्टर गर्गे यांनी कथेमध्ये आणले आहे. नात्यातील गुंतागुंत व व कायद्याची मर्यादा हे या कथेतून स्पष्टपणे डॉ. गर्गे यांनी दाखवले आहे.

‘मी तो नव्हेच’

          ‘मी तो नव्हेच’ ही कथा मानवी मेंदूतील उत्सर्जित होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक विचारांवर आधारलेली आहे. मानवी मेंदू हा आगाध आहे. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये तो प्रगल्भ व विक्रांत आहे. पण याच मेंदूचा वापर करून, मानवाने स्वतःचा उत्क्रांत तर करून घेतलाच पण त्याचवेळी निसर्गाला आव्हान देणारे सक्षम व सूक्ष्म तंत्रज्ञानही निर्माण केले आहे. मानवी मेंदू दोन भागात विभागलेला आहे आणि त्याचे विविध क्षेत्रस्थळेही आहेत. डॉ. गर्गे यांनी कथेत मेंदूतील लिम्बिक सिस्टीम या मेंदूतील भावभावनांचे नियंत्रण करणाऱ्या क्षेत्रावर विवेचन केले आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने ब्रेनस्विच नावाची संकल्पना राबवली आहे. यामध्ये सकारात्मक विचार नकारात्मक होऊ शकतात तर नकारात्मक विचार सकारात्मक होऊ शकतात आणि एखादी बाह्य संस्था ती नियंत्रणामध्ये हवी तशी करू शकते. डॉ. गर्गे यांनी हीच कल्पना घेऊन इतिहास तज्ञ डॉ. अपस्तंभ यांचे विचार प्रवण घडवून आणले आहे. एक वेगळी वैज्ञानिक संकल्पना गर्गे यांनी रुजवली असून, भविष्यात कदाचित मानवी विचारांवर असे नियंत्रण करणे शक्य होणार आहे हेच या कथेतून दर्शविण्याचा प्रयत्न आहे.

     ‘मुक्ती’

          ‘मुक्ती’ ही विज्ञानाचा परिस्पर्श करणारी कथा आहे. दहशतवाद, पाक व्याप्त काश्मीर यांची पार्श्वभूमी लाभणारी ही कथा डॉक्टर गर्गे यांनी वेगळ्या धाटणीने लिहिली आहे. युद्धामध्ये पूर्वीही मृतदेहांचा उपयोग केला गेला आहे.  या कथेत एअरमार्शल ग्यानचंद विधी यांची कन्या हिना हिला दुर्दैवाने विमानाचे प्रात्यक्षिक करताना अपघात होतो आणि ती गंभीर जखमी होऊन, बेशुद्ध होते. शिवाय ती दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठीच्या मोहिमेची प्रमुखही असते. तिची इच्छाही यात सहभागी होण्याची असते. म्हणून माझा मृतदेह या मोहिमेत वापरण्यात यावा अशी इच्छा व्यक्त करत ती प्राण सोडते. डॉ. गर्गे यांनी एक वेगळी कल्पना यात मांडली आहे. मृतदेहाचा वापर अणुबॉम्ब वाहक म्हणून करण्यात येतो आणि पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेतले जाते. ही कथा उत्साहवर्धक आहे एवढे मात्र निश्चित.

‘अवनीश’

‘अवनीश’ ही कथा पृथ्वीसदृश्य ग्रहाच्या शोधाची जननी आहे. खरे तर पृथ्वीवरील आजचे वातावरण पाहिले तर लोकसंख्येचा पराकोटीच्या उद्रेकासोबतच पृथ्वीवरील नैसर्गिक साधन संपत्तीचे लोपन हे भविष्यातील पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्टीसाठी हानिकारक व अस्तित्वासाठी आव्हान ठरणार. असंख्य मानवनिर्मित प्रश्नांमुळे पृथ्वीचा मोठ्या प्रमाणात ह्रास होताना दिसतो आहे. सामान्य जनतेला याच्याशी काही एक घेणेदेणे नाही. पण शास्त्रज्ञ उद्या उठून पृथ्वी असक्षम झालीतर मानवी जीवसृष्टी टिकविण्यासाठी पर्यायी ग्रह हाताशी असावा असा विचार करून गेले शंभर वर्ष अंतराळात वेध घेत आहेत. कित्येक हजारो प्रकाश वर्ष दूर असणारे पृथ्वीसदृश्य ग्रह शोधलेही गेले आहेत. पण अशा दूरवर असणाऱ्या ग्रहांवर मानवाचे स्थलांतर कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न डॉ. गर्गे यांनी त्यांच्या अवनीश या दीर्घ कथेमध्ये मांडला आहे. वेगवान ट्रान्सपोर्टेशन किंवा दळणवळणासाठी त्यांनी कृष्णविवर व श्वेतवीवर यांच्या संयुगातून बनलेल्या वर्महोलचा उपयोग मानवी स्थलांतरासाठी केल्याचे दाखविले आहे. ही नाविन्यपूर्ण कल्पना आहे. पण वर्महोलचा एक बोगदा म्हणून वापर करताना तो मानव किंवा व्यक्ती समांतर विश्वाची दालने उघडू शकतात किंवा प्रवेश करू शकतो. कारण समांतर विश्वात प्रवेश करायचा असेल तर कृष्णविवर व त्याला लागून असलेल्या श्वेत विवर यांचा उपयोग होतो हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. पण तरीही डॉ. गर्गे यांनी छानपणे वर्महोलचा उपयोग सचित्र पद्धतीने दळणवळणासाठी दाखवला आहे. कथा दूरवर असलेल्या अवनी ग्रहापासून सुरुवात होते. विशिष्ट वयाचे मानव वास्तव्य करणारे त्यांचे शशी व शशांक उपग्रह त्यावरचे मंत्रिमंडळ अधिकारी आणि प्रजा. याकथेत डॉ. गर्गे यांनी अवनी कथेतील पात्रे विशिष्ट नावासोबतच स्वभावानेही छानपणे कंपनी चित्रित केले आहे. शिवाय पृथ्वीवरील पात्रे व घटनांशी जुळवणूक करून, एक परिपूर्ण विज्ञान कथा देण्याचा प्रयत्न केला आहे. अवनी ग्रहावर पृथ्वीवरील दांपत्याने जन्म दिलेला बाळ म्हणजेच अवनीश हे सर्वच संवादत सुसूत्रतेने डॉ. गर्गे यांनी मांडणी केली आहे. कथा निश्चितच अंतराळ शास्त्राचा वेध घेणारी असून, समाधान देऊन जाते.

‘त्रिशिका’

‘त्रिशिका’ विज्ञान कथा मानवी जनुकीय आराखडा व तंत्रज्ञानावर आधारित आहे. डॉ. गर्गे यांनी ही कथा लिहिताना विज्ञानाचे बरेच संदर्भ घेतले आहेत आणि वेणी गुंफावीत तसे हे विषय शेवटपर्यंत नेले आहे कथेत एकसूत्र आहे हे निश्चित. पृथ्वीतलावर आजही काही गर्भ अ‍ॅबनॉर्मल असे जन्म घेत असतात. त्याचं मूळ कारण म्हणजे स्त्री-बीजांडाच्या जनुकातील बिघाड आणि याच बिघाडामुळे सयामी, डुप्लिकेट, सयामी ट्रीप्लिकेट किंवा ट्रायसोमी सारखे गर्भ जन्मास येतात आणि त्यांचे यथा सांग संगोपनही झालेले आहे. पण आजच्या आशा सयामींना यशस्वीपणे वेगळे करण्यात आपण आजवर तरी यशस्वी झालेलो नाही. डॉ. गर्गे यांनी हा विषय अतिशय संयमपणे या कथेत हाताळला आहे. याशिवाय कथेच्या ओघात जशी लोकसंख्या वाढीचे संकट आहे तसे काही देशांना लोकसंख्या घटण्याचे  संकटही जाणवू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे आत्ताचे तरुण तरुणी स्वतंत्र असून लग्नासारख्या बंधनात न अडकता आपत्यहीन राहण्याचा त्यांचा प्रयत्न असून आत्मकेंद्रीत होत चालले आहेत. अशाच एका पोक्त पण अतिमहत्वकांक्षी असलेल्या व नंतरच्या काळात महत्त्वाची इच्छा बाळगणाऱ्या स्त्रीची ही कथा आहे. डॉ. गर्गे यांनी विविध पात्रांच्या आधारे कथा पुढे नेत त्यातील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्रिशिका म्हणजे तीन डोकी असणारे अपत्य अनुच्या पोटी जन्म घेते आणि पृथ्वीतलावर निश्चितच ती वेगळी असली तरी या विश्वाचे रहस्य शोधणारी बुद्धिमत्ता ती घेऊन आलेली आहे. सर्वांसारखीच ती आयुष्य जगत पुढे तिच्याच सारखी असणारी एक वेगळी प्रगत सृष्टी ती या विश्वात शोधून काढते आणि त्यात समरस होऊन जाते. डॉ. गर्गे यांनी या कथेत जनुकीय सोबतच फर्टीलिटी, अनुउत्पात, ट्रिपल एक्स, डबल एक्स, अंतराळ सारख्या विषयांची सांगड घालत आश्वासक कथेचा शेवट केला आहे.

            डॉक्टर गर्गे यांच्या या सर्वच कथांमध्ये विज्ञानाचा मुलाधार आहे. वेगवेगळ्या विज्ञान व संशोधनाची त्यांनी चर्चा केली आहे. संदर्भ दिले आहे. अगदी अद्भुततेकडे जाणारंही विज्ञान त्यांनी या कथेतून अतिशय सक्षमपणे मांडले आहे. अँटी एजिंग थेरपी, ह्यूमनाईड, एंडोक्राइनोलॉजी, स्पेस ट्रायलेशन , लिम्बिक सिस्टीम, न्यूरोट्रान्समीटर, अंतराळ, कृष्णविवर, श्वेतविवर, वर्महोल, ट्रिपल एक्स सारखे विविध विज्ञानाचे विषय आलेले आहेत. हे विषय हाताळताना मात्र त्यांनी कथेच्या प्रवाहात कुठेही अतिरेक केलेला नाही हे विशेष.  डॉ. गर्गे यांच्या कथा वाचताना वाचक एका वेगळ्या विश्वात जातोच जातो पण त्यावेळी विज्ञानाची व त्यातील प्रवाहांची वेगळी दालनेही ते वाचकांसाठी खुले करतात वाचकांच्या ज्ञानात भर टाकतात. त्यांचं मनोरंजन कुठे होईल याकडेही त्यांची विज्ञान कथा लक्ष वेधतात. डॉ. गर्गे हे स्वतः सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्याने जैव प्रक्रियेशी त्यांचा जिव्हाळ्याचा सबंध येत असल्याने, बहुसंख्य कथांमध्ये तो संशोधक मात्र डोकावत राहतो. वाचकांच्या दृष्टीने हे महत्त्वाचेच आहे की त्यांना इत्यंभूत विज्ञानाची माहिती तर मिळतेच पण कथेतही समरस व्हायला मिळते. तसे पाहता डॉ. गर्गे यांच्या या विज्ञानकथा या खऱ्या अर्थाने विज्ञानाशी नातं जोडणाऱ्या असून, जनमानसात प्रसाराचही काम तेवढ्याच ताकदीने करतात. म्हणून माझ्या दृष्टीने त्या प्रवाहित हार्डकोअर विज्ञान कथा आहेत असे मी मानतो. आणि हे काम मला वाटतं डॉ. गर्गे यांनी मुळीच सोडू नये. कथा लिहिताना कथाही महत्त्वाची आहेच पण त्याबरोबर विज्ञानही तेवढेच किंबहुना काकणभर महत्त्वाचे आहे आणि ते वाचकांच्या मनामध्ये रुजवणे हे महत्त्वाचं कार्य डॉ. गर्गे यांच्या कथा करतात. डॉ. गर्गे यांचे बरेच विज्ञान कथासंग्रह, कादंबरी प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी अशाच उत्तरोत्तर विज्ञानाचा पायाभूत सशक्तपणे हाती घेऊन, प्रवाहित विज्ञान कथा वाचकांसाठी लिहाव्यात एवढी अपेक्षा करत त्यांच्या पुढील कथासंग्रहाची वाट पाहतो आणि सदिच्छा व्यक्त करतो.

पुस्तकाचे नाव – अनुबंध ( विज्ञान कथा संग्रह )
लेखक – डॉ. रंजन गर्गे
प्रकाशक – आनंदघन प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर 9423396881

Related posts

तुकाराम बीजः आनंदडोह (व्हिडिओ)

शिव छत्रपतींच्या रायगडाचे दर्शन…

असा हा रंगिला खैर !

Leave a Comment