कोल्हापूर : डॉ. अपर्णा पाटील लिखित कावेरी या इंग्रजी भाषेतील कादंबरीचे प्रकाशन शनिवारी (ता. १६ सप्टेंबर ) रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. पी. थोरात, डॉ. उषा थोरात, डॉ. मिलिंद एच. पटवर्धन, प्रसिद्ध लेखिका डॉ. माया पंडित उपस्थित राहाणार आहेत. शनिवारी (ता. १६) सायंकाळी साडेचार वाजता दसरा चौक येथील शाहू स्मारकमध्ये प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे.
डॉ. पाटील यांचे हे पाचवे पुस्तक असून यापूर्वी लहान मुलांच्या लघुकथा असणाऱ्या दियाज बागफुल ऑफ स्टोरीजचे दोन भाग, कोल्हापुरातील चौदा उद्योजक महिलांच्या यशोगाथेवर आधारित स्मॉल इज द न्यु बीग, स्वतःच्या जीवनातील अनुभवावर आधारित लघुकथा एन एंगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच डॉ. पाटील यांच्या स्मॉल इज द न्यु बीग या पुस्तकाचे मराठी भाषांतर स्वप्ने लहान अन् उंच भरारी हे सुद्धा प्रकाशित झाले आहे.
प्रकाशन होणाऱ्या कावेरी या इंग्रजी कादंबरीबद्दल बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या की इतर लोकांना काय वाटते या प्रमाणे आपण स्वतःला घडवत असतो. पण प्रत्यक्षात आपण स्वतःला स्वतःच्या ध्येयाप्रमाणे घडवायला हवे. सर्वांना आवडेल असे आपण कधीच होऊ शकत नाही. पण यासाठी आपण संघर्ष करत राहतो. यातच आपण स्वतःला हरवून घेतो. या ऐवजी आपण स्वतःला नित्य आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपले जीवन अधिक सुसह्य होऊ शकते. आपण पाहीलेली स्वप्ने जरी गाठता आली नाहीत, तरी आपण खचून जातो. आपणासाठी देवाने काही स्वप्न पाहीले आहे यावर विश्वास ठेऊन आपण चालत राहायला हवे असा कावेरी या कादंबरीचा आशय आहे. कावेरी नावाच्या मुलीची ही जीवनगाथा असून त्यातून हा आशय उलघडत जातो.