March 23, 2023
hobbies form of Devotion article by Rajendra Ghorpade
Home » छंद हा भक्तीचाच एक प्रकार
विश्वाचे आर्त

छंद हा भक्तीचाच एक प्रकार

छंद ही आपली आवड असते. यामध्ये त्या आवडीच्या गोष्टीसाठी त्याग करण्याची भावना असते. समर्पणाची भावना असते. निःस्वार्थी भावनेने केलेले ते कार्य असते. त्यात नफा-तोटा याचा विचार नसतो. यामुळे छंद हा भक्तीचाच एक प्रकार आहे. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

गायत्रीछंद जें म्हणिजे । तें सकळां छंदांमाजि माझे ।
स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ।। 282 ।। ज्ञानेश्वरी अध्याय दहावा

ओवीचा अर्थ – ज्यास गायत्री छंद असे म्हणतात, तो सर्व छंदामध्ये माझे स्वरूप आहे. असे तू निःसंशय समज.

प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद असतो. कोणाला गाण्याचा असतो? कोणाला वस्तूंचा संग्रह करण्याचा असतो? कोणाला सतत वाचन करण्याचा छंद असतो? कोणाला चित्रकलेचा छंद असतो? छंद ही आपली आवड असते. यामध्ये त्या आवडीच्या गोष्टीसाठी त्याग करण्याची भावना असते. समर्पणाची भावना असते. निःस्वार्थी भावनेने केलेले ते कार्य असते. त्यात नफा-तोटा याचा विचार नसतो. यामुळे छंद हा भक्तीचाच एक प्रकार आहे.

भगवंताची भक्ती हा सुद्धा एक छंदच आहे. आपण यामध्ये किती वेळ घालवला याची मोजदाद करत बसत नाही. यातून आपणाला काय मिळाले, याचाही हिशोब करत नाही? यामध्ये समर्पणाची, त्यागाची भावना असते. नामस्मरण, गुरूंनी दिलेल्या मंत्राची साधना, ध्यान या नित्य नेमाने करावयाच्या गोष्टी आहेत. साधनेत मन रमावे यासाठी ज्ञानेश्वरीचे पारायण आवश्यक आहे. पारायणे करण्याचा अनेकांना छंद असतो. वाणीने भगवंताची केलेली ती सेवाच आहे.

गायत्रीछंद हा वाणीचे रक्षण करणारा छंद आहे. या छंदाचे तीन चरण असतात. म्हणून तिला त्रिपदा गायत्री असे म्हटले आहे. प्रत्येक चरणात आठ अक्षरे असतात. म्हणून तिला अष्टाक्षरा गायत्री म्हटले आहे. कधी कधी गायत्रीच्या उच्चारापूर्वी प्रणवाचा उच्चार होतो म्हणून तिला नवाक्षरा असेही म्हणतात. सात छंदामध्ये हा पहिला छंद आहे. हा छंद हा भगवंताचे स्वरूप आहे. यामुळेच कीर्तन, भजन, प्रवचन ही वाणीने केलेली भगवंताची सेवाच आहे. भगवंत प्राप्तीचा, आत्मज्ञानप्राप्तीचा तो सुद्धा एक मार्ग आहे.

या छंदातच भगवंत आहेत. जे काही भाव कीर्तन, भजन, प्रवचनात उमटतात ते भगवंताचे स्वरूप असतात. भगवंत, सद्गुरू ते कार्य करवून घेत असतात. या कार्यातून भक्तामध्ये सद्गुरू भाव प्रकट व्हावा. भक्त आत्मज्ञानी व्हावा, हाच सद्गुरूंचा उद्देश असतो. यासाठी हा छंद मनाला लागावा. छंदामुळे मनाला प्रसन्नता वाटते. मन आनंदी होते. यासाठी सत्संगाचा छंद असावा, संगत असावी. संगतीतूनच अनेक संस्कार घडत असतात. मुलांनासुद्धा असे छंद असावेत यासाठी प्रयत्न हे करायला हवेत. छंदातून मुलांवर चांगले संस्कार घडतात. त्याच्या मनाला अभ्यासाची गोडी लागत असते. खेळाच्या छंदातून त्याचे आरोग्यही सुधारते. यासाठीच प्रत्येकाला कोणता तरी छंद जरूर असावा.

Related posts

Photos : श्री सद्गुरु दादा माधनवाथ महाराज समाधी पुजा

सद्गुरु हे आनंदाचा अखंड झरा

नैसर्गिक प्रेमातून अमरत्वाची प्राप्ती

Leave a Comment