इजिप्तमधील संशोधकांनी यावर संशोधन केले आणि दुधाचे हे टाकावू पदार्थ उत्तम खत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुधाच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रीय घटक असतात. जमिनीत गाढल्यानंतर त्याचे विघटन होते. वनस्पतीच्या वाढीसाठी हे घटक उपयुक्त अन्नद्रव्ये देतात. यामुळे वनस्पतीची वाढ जोमदार होते
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
जेंव्हा द्राक्षीं दूध घातलें । तेव्हां वायां गेलें गमलें ।
परी फळपाकीं दुणावलें । देखिजे जेवीं ।। ५९१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – ज्यावेळी खत म्हणून् द्राक्षाच्या वेलास दूध घातले, त्यावेळी त्याचा तत्काळ उपयोग दिसून न आल्याने ते व्यर्थ नासल, असा समज होतो. परंतु त्या खताचा परिणाम होऊन, ज्या वेळेस द्राक्षांचे पीक तयार होते, त्यावेळेस वाया गेल्यासारखें वाटलेले दुध दुप्पट फायद्याचें झालें असा ज्याप्रमाणे अनुभव येतो.
दुधाचा वापर पूर्वीच्याकाळी खत म्हणून केला जात होता असे या ओवीतून स्पष्ट होते. दुधाचा खत म्हणून वापर यावर विविध पातळ्यावर संशोधन झालेले आहे अन् केलेही जात आहे. काही संशोधक शेतकऱ्यांनी दुधाच्या अशा वापरावर प्रयोगही केले आहेत. या शेतकऱ्यांच्या मते दुधाचा वापर खत म्हणून केला जाऊ शकतो, पण आजच्या वाढत्या महागाईच्या काळात यातून मिळणारा नफा हा फारच नगण्य आहे. दुधाच्या अशा पद्धतीच्या वापराबाबत योग्य ती पद्धती विकसित होणे तितकेच गरजेचे आहे. तसेच हे संशोधन अधिक फायदेशीर कसे ठरेल यावर भर देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वाढत्या प्रदुषणाचा विचार करता भावी काळात या नैसर्गिक अन् सेंद्रीय पद्धतीचा विचार होऊ शकतो.
पण एक स्पष्ट आहे. दुधाचा वापर खत म्हणून केला जाऊ शकतो. याचाच अर्थ पूर्वीच्या काळी आपले शेतकरी हा प्रयोग करत होते. पण वाढत्या उत्पादनाच्या हव्यासा पोटी आपण या आरोग्यदायी उत्पादन पद्धतीचा वापर टाळत आलो. साहजिकच हे तंत्र मागे पडत गेले. पूर्वीच्या काळी अशा विविध तंत्राचा देशात होत असलेला वापर शोधण्याची गरज आहे. कारण या पद्धती प्रदुषण मुक्त होत्या. यात पर्यावरण संवर्धनाचा विचार जोपासला जात होता. आरोग्यासाठी लाभदायक अशा या पद्धती नव्याने विकसित करण्याचीही तितकीच गरज आता आहे. देशी वाणांच्या संवर्धनाबरोबरच अशा देशी तंत्रांचाही शोध घेतला जावा.
पंचगव्यमध्ये दुधाचा वापर होतो. पण केवळ दुधच त्यामध्ये नाही तर गोमुत्र, देशी गायीचे शेण, तूप यांचाही वापर करून पंचगव्य तयार केले जाते. हे पंचगव्य जमिनीवर खत म्हणून फवारले जाते. सेंद्रीय खत असणारे बीजामृत तयार करतानाही त्यामध्ये दुधाचा वापर करण्यात येतो. पण हे प्रमाण खूपच कमी असते. घरातील परसबागेसाठी किंवा छोट्या छोट्या बागेतील झाडांसाठी हे उपयुक्त असे हे तंत्र आहे. दुधाचा थेट वापरही खत म्हणून केला जातो. नैसर्गिक दुधात लिंबू पिळून हे मिश्रण एक दिवस ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून घेऊन त्यामध्ये तितक्याच प्रमाणात पाणी मिसळून रोपट्याला किंवा बागेतील झाडांना दिल्यास झाडाची, रोपट्याची वाढ जोमदार होते. दुध हे कॅल्शियम, पोटॅशियम आदी मुलद्रव्यांचे उत्तम स्त्रोत्र आहे. पण रोपट्याची झालेली वाढ ही पटकण दिसून येत नाही. काही कालावधीनंतर, काही दिवसांनंतर ही वाढ जोमदार झाल्याचे पाहायला मिळते.
दुधामध्ये मोठ्या प्रमाणात अॅमिनो अॅसिड, प्रोटीन्स, संप्रेरके आणि नैसर्गिक साखर असते. जमिनीत खत म्हणून दिल्यानंतर या घटकांमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच पावडरी मिलड्यु आदी वनस्पती बुरशीजन्य रोगावरही दुधाचा वापर फायदेशीर असल्याचे दावे काही संशोधकांनी केले आहेत. यावर सखोल संशोधनाची गरज निश्चितच आहे.
दुधाच्या पदार्थांना कालमर्यादा असते. कालमर्यादेनंतर हे पदार्थ खाण्यायोग्य राहात नाहीत. अशावेळी ते फेकून देणेच योग्य ठरते. पण आता या दुधाच्या पदार्थांची विल्हेवाट कशी लावायची हे एक मोठे आव्हान आहे. परदेशात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारे हे पदार्थ नष्ट करणे तितके सोपे नाही. हे विचारात घेऊन इजिप्तमधील संशोधकांनी यावर संशोधन केले आणि दुधाचे हे टाकावू पदार्थ उत्तम खत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुधाच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रीय घटक असतात. जमिनीत गाढल्यानंतर त्याचे विघटन होते. वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त अन्नद्रव्ये यातून मिळतात. यामुळे वनस्पतीची वाढ जोमदार होते असा दावा या संशोधकांनी केला आहे. इजिप्त मधील या संशोधकांनी गव्हामध्ये हा प्रयोग केला. त्यांना गव्हाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे आढळले. हे सेंद्रीय खत असल्याने त्याचे अन्य तोटे नाहीत. यासाठी पर्यावरण संवर्धानाच्या दृष्टीने या खताचा विचार होणे गरजेचे आहे. दुध पावडर दर नाही म्हणून टाकूण देण्याची वेळ बऱ्याचदा दुध संस्थांवर येते. अशा वेळी त्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास पर्यावरणीय धोकेही उद्भवू शकतात. हे विचारात घेऊन यावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
योग्य प्रकारे मार्गदर्शन