गो. पु.च्या नाटकांतील आशयस्वरूप, पात्रसृष्टी, रूपविशेष, स्वगते, प्रतीकात्मकता, संदर्भसंपृक्तता, रंगसूचना व सुनियोजित घाटाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गो. पु.च्या नाटकांतील स्वायत्त आणि समग्रतेच्या अनुभवविश्वाचा वेध घेण्यात रमेश साळुखे एका अर्थाने यशस्वी झाले आहेत.
रणधीर शिंदे
गो. पु. देशपांडे हे भारतीय पातळीवरील महत्त्वाचे नाटककार आहेत. राजकीय विचारांचे चर्चानाट्य लिहिणारे नाटककार म्हणून गो. पु. देशपांडे यांच्या नाट्यलेखनास असाधारण असे महत्त्व आहे. त्यांच्या विचारांवर आणि नाट्यदृष्टीवर समाजवादी – मार्क्सवादी दृष्टीचा खोलवर प्रभाव आहे.
महाराष्ट्राच्या अधोगतीशी आणि शतखंडिततेशी गो. पु. च्या नाटकांतील आशयस्वरूपाचा जवळचा संबंध आहे. प्रबोधनकाळाची उतरती कळा, विविध विचारदंद्वे, समाज अंतर्विरोध, समाजपरात्मता ते भाषाऱ्हासाची आशयसुत्रे त्यांच्या नाटकांतून अभिव्यक्त झाली आहेत. एकमय समाज घडवू पाहणाऱ्या काळानंतरच्या ऱ्हासपर्वाचे चित्र त्यांच्या नाटकांत आहे. भारतीय समाज, इतिहास, तत्त्वपरंपरेचे खोलवरचे भान आणि भाषारूपाची सूक्ष्म जाण त्यांच्या नाट्यलेखनातून अभिव्यक्त झाली आहे. त्यामुळे विचारनाट्य आणि राजकीय ‘चर्चानाट्य घडविण्याचे श्रेय गो.पु.देशपांडे यांच्याकडे जाते.
या ग्रंथात रमेश साळंखे यांनी गो. पु. देशपांडे यांच्या नाट्यसृष्टीचा साक्षेपी असा वेध घेतला आहे. देशपांडे यांच्या नाट्यलेखनाची चिकित्सक मांडणी त्यांनी केली आहे. रमेश यांचा हा अभ्यास संहिताकेंद्री व वाङ्गयीन वैशिष्ट्यांना महत्त्व देणारा आहे. गो.पु.च्या नाटकांमधील गुणविशेषांची चर्चा करून त्यांच्या नाट्यकामगिरीचे स्वरूप त्यांनी नोंदविले आहे. लेखकाभ्यासाचा हा उत्तम असा नमुना-अभ्यास आहे. अर्थनिर्णयनाची अन्वेषक दृष्टी त्यामध्ये आहे. गो. पु.च्या नाटकांतील आशयस्वरूप, पात्रसृष्टी, रूपविशेष, स्वगते, प्रतीकात्मकता, संदर्भसंपृक्तता, रंगसूचना व सुनियोजित घाटाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गो. पु.च्या नाटकांतील स्वायत्त आणि समग्रतेच्या अनुभवविश्वाचा वेध घेण्यात रमेश एका अर्थाने यशस्वी झाले आहेत. ‘समग्रतेचा विचार आणि संकल्पनांची मांडणी असलेल्या बुद्धिवादी नाटकांची देशपांडे यांनी निर्मिती केली. या परिदृश्यात रमेश साळुखे यांनी गो.पु. च्या नाट्य कामगिरीचा घेतलेला परामर्श महत्त्वाचा ठरतो.