डिजिटल माध्यमांविषयी चांगले चित्र रंगवले जात असतानाच गेल्या काही महिन्यात जागतिक मंदीचे कारण पुढे करत जगभरातील महत्त्वाच्या डिजिटल मीडिया कंपन्यांमध्ये कामगार कपात सुरू आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्या एक ते दीड वर्षापासून मंदीचे ढग गडद झाले आहेत. याची झळ डिजिटल माध्यमांनाही बसत आहे.
शिवाजी जाधव
देशातील महत्त्वाच्या दहा माध्यम समूहांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोशिएशन सध्या मोबाईल ट्रॉफिक कमी झाल्याने हैराण आहे. या माध्यमांच्या न्यूज वेबसाईटवर 70 ते 90 टक्के ट्रॉफिक मोबाईलद्वारे येते. मात्र गेल्या काही महिन्यांत या ट्रॉफिकमध्ये 20 ते 40 टक्के घट झाली आहे. स्मार्टफोन विक्रीतील कमी आणि इंटरनेट ग्राहकांची झालेली घट याचबरोबच बातमी सर्च करणार्यांचे प्रमाणही खालावले असल्याने डिजिटल न्यूज पब्लिशर्सची चिंता आणखी वाढली आहे.
डिजिटल माध्यमांविषयी चांगले चित्र रंगवले जात असतानाच गेल्या काही महिन्यात जागतिक मंदीचे कारण पुढे करत जगभरातील महत्त्वाच्या डिजिटल मीडिया कंपन्यांमध्ये कामगार कपात सुरू आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्या एक ते दीड वर्षापासून मंदीचे ढग गडद झाले आहेत. याची झळ डिजिटल माध्यमांनाही बसत आहे. जगभर मंदीची चाहूल लागली असली तरी भारतात मात्र अद्याप खुलेपणाने हे स्वीकारायला कोणच पुढे येईना. लोकांच्या नोकर्या जाणे सुरू आहे आणि परदेशातील कंपन्यांनी अजूनही वर्क फ्रॉम होम बंद केलेले नाही. अनेक कंपन्यांनी कार्यालयामध्ये रोटेशनने कामगार बोलावणे सुरू केले आहे. भारताची स्थिती मजबूत आहे असे सांगितले जात असले तरी नोकर्या गमावणारे भारतीयच आहेत. नोकरी जाण्याने केवळ एका व्यक्तीचे नाही तर देशाचेही तितकेच नुकसान आहे. यातच आणखी भर म्हणून डिजिटल माध्यमांना मोबाईलद्वारे येणार्या ट्राफिकमध्येही लक्षणीय घट नोंदली आहे. परिणामी, देशातील डिजिटल न्यूज पब्लिशर्स हैराण आहेत. सध्या डिजिटल माध्यमांतच नोकरीच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. या क्षेत्रालाही धक्के बसणार असतील तर ते काळजी वाढवणारे ठरेल.
डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोशिएशन या नावाने देशातील अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच बलाढ्य असे दहा माध्यम समूह एकत्र आले. या संस्थेच्या संस्थापक सदस्यांमध्ये दैनिक भास्कर, इंडिया टुडे, एनडीटीव्ही, हिंदुस्तान टाईम्स, इंडियन एक्स्प्रेस, टाईम्स ऑफ इंडिया, अमर उजाला, दैनिक जागरण, मल्याळम मनोरमा आणि इनाडू आदी माध्यमांचा समावेश आहे. ही सर्वच माध्यमे देशातील प्रभावी आणि शक्तीशाली आहेत. डिजिटल विश्वातील एकूण युजर्सपैकी या दहा माध्यमांकडे तब्बल 70 टक्के युजर्स आहेत. डिजिटल माध्यमांच्या ग्राहकांनी अत्यंत विश्वासार्ह माहिती देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे या संस्थेने स्थापनेवेळी जाहीर केले होते. या सर्वांचा ग्राहक एकत्रित केला तर देशाच्या कोणत्याही धोरणावर ही माध्यमे सहज प्रभाव टाकू शकतील, एवढी त्यांची क्षमता आहे. डिजिटल आशय अधिक दर्जेदार, तटस्थपणे देण्याबरोबरच या क्षेत्रातील नवीन बदलांचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या ग्राहकांना करून देण्याचा या संस्थेचा मानस आहे. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून या सर्वच माध्यमांच्या मोबाईलवरून येणार्या ट्रॉफिकमध्ये घट होताना दिसत आहे. ही घट साधारणतः वीस ते चाळीस टक्के इतकी मोठी आहे. परिणामी, डिजिटल न्यूज पब्लिशर्स अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे.
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात जगभर अनेक प्रयोग होत आहेत. ओपन एआयने आणलेला चॅटबॉट डिजिटल माध्यमांच्या चेहरा उतरवून ठेवेल, अशी भीती आहे. अद्याप त्याचा प्रसार आणि वापर प्रत्यक्षात पूर्ण क्षमतेने झाला नाही. किंवा त्याच्याकडे अजून तितके ट्राफिक गेलेले नाही. तोवरच न्यूज वेबसाईटवरील मोबाईल ट्रॉफिक घटू पाहत आहे. यासाठी आणखीही काही कारणे आहेत. इंटरनॅशनल डेटा कार्पोरेशन (आयडीसी) च्या अहवालानुसार, भारतात मोबाईल फोनच्या विक्रीत सातत्याने घट नोंदवली जात आहे. वाढती महागाई याचे कारण आहे. महागाईने लोकांचे जगणे जिकीरीचे करून टाकले आहे. परिणामी मोबाईलच्या मागणीवर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडला आहे. सन 2022 मध्ये 20 कोटीपेक्षा जास्त मोबाईलची विक्री झाली. आधीच्या तुलनेत ही घट वार्षिक सरासरी 12 टक्के आहे. यातील आणखी गंभीर बाब म्हणजे 2022 च्या चौथ्या तिमाहीमध्ये (आक्टोबर ते डिसेंबर) ही घट 27 टक्के इतकी मोठी आहे. यामध्ये अजून एक नोंद घेण्याची गोष्ट म्हणजे, साडेबारा हजार रूपये किमतीपर्यंतचा मोबाईल खरेदी करणार्या ग्राहकांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. या वर्गाला महागाईची झळ बसली असून कमी किमतीच्या मोबाईल विक्रीत सर्वाधिक घट नोंदवली आहे. दुसर्या बाजूला महागडे स्मार्टफोन खरेदी करणार्यांची संख्या मात्र वाढत आहे. भारतात मोबाईल फोनची विक्री मंदावली असल्याने जगभरातील सर्वच कंपन्या अस्वस्थ आहेत. याचा थेट परिणाम डिजिटल न्यूज पब्लिशर्सकडे येणार्या मोबाईल ट्राफिकवर होत आहे.
देशात इंटरनेटचे ग्राहकही वाढताना दिसत नाहीत. ‘ट्राय’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, इंटरनेटचे युजर्स वाढण्याऐवजी कमी होत आहेत. ही संख्या 82.53 कोटींवरून 82.48 कोटींवर घसरली आहे. ब्रॉडबॅन्ड युजर्स संख्याही अत्यंत संथ गतीने म्हणजे 77.8 कोटीवरून 78.8 कोटीवर पोहोचली आहे. म्हणजे येथेही वाढीची गती फारच मंद आहे. मोबाईल सिग्नल न मिळणे आणि इंटरनेटची गती धीमी असणे यातून देशातील तब्बल 77 टक्के लोकांनी मोबाईल नंबर पोर्ट केले आहेत. या सर्व बाबींचा परिणाम डिजिटल न्यूज पब्लिशर्सकडे येणार्या मोबाईल ट्राफिकवर झालेला आहे. गेल्या काही वर्षात पावणे चार कोटी मोबाईल नंबर डिअॅक्टीव्ह झालेले आहेत, याचीही याठिकाणी नोंद घ्यायला हवी. एका बाजूला स्मार्टफोन विक्रीत सतत नोेंदवली जात असलेली घट आणि दुसर्या बाजूला इंटरनेट आणि ब्रॉडबॅन्ड एका पातळीवर स्थिर झाल्याने भारतात या क्षेत्रात आता लगेचच विकासाला आणि विस्ताराला खूप मोठा वाव राहणार नाही, असे संकेत आहेत. या सर्वांचा परिणाम बातम्यांच्या ग्राहकांवरही होत आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन यावरच वेब माध्यमांचा सर्वात मोठा ग्राहक अवलंबून आहे. डिजिटल न्यूज पब्लिशर्सकडे येणारे ट्राफिक मुख्यतः या दोन कारणांनी कमी झाले आहे.
देशातील सर्वच माध्यमांना कोविड काळात खूप मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. कोविडनंतर स्थिती चांगलीच सुधारत असली तरी अद्याप ती पूर्ववत झालेली नाही. मुद्रीत माध्यमांनी डिजिटल विश्वातील अनेक संधी विचारात घेऊन अलिकडे इंटरनेटच्या ग्राहकांना आकर्षित केले आहे. त्यांच्या विश्वासार्हतमुळे बहुतेक ग्राहक मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या वेब पोर्टल्स किंवा न्यूज पोर्टल्सकडे आकर्षित झाले. या न्यूज वेबसाईट्सकडे येणारे ट्रॉफिक मोबाईलद्वारेच येते. म्हणजे यात 70 ते 90 टक्के ट्राफिक मोबाईलकडून येते. मात्र गेल्या काही महिन्यांत यात होत असलेली घट डिजिटल न्यूज पब्लिशर्सची चिंता वाढवणारी ठरू पाहत आहे.
डिजिटल न्यूज रिपोर्ट 2022 च्या अहवालातही भारतात बातमीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वाधिक जास्त स्मार्टफोनचा वापर होतो, यावर शिक्कामोर्तब केले आहे. डेस्कटॉपच्या तुलनेने तिप्पट किंवा चौपट वापर स्मार्टफोनचा होतो. भारतातील 58 टक्क्यांपेक्षा जास्त लोक बातम्या वाचतात तर 17 टक्क्यांच्या आसपास लोक बातम्या पाहतात, हा डिजिटल न्यूज रिपोर्टमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अलिकडच्या काही महिन्यांमध्ये बातम्या पाहण्याचे आणि वाचण्याचे प्रमाणही कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हेगारी आणि घृणास्पद वक्तव्यांच्या बातम्या करण्याची माध्यमांत स्पर्धा लागलेली आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यमांतील बातम्यांचे बटबटीत रूप पाहून वाचक आणि दर्शक आता कंटाळला आहे. म्हणून त्याने आता बातम्या सर्च करणे कमी केले आहे. बातम्यांमधून मनोरंजन करण्याचा आणखी एक वाईट पायंडा पडत आहे. घटनांचे रंजक पद्धतीने सादरीकरण करण्याचे फॅड वाढत आहे. परंतु बातम्यांचा ग्राहक वेगळा आहे. त्याला तटस्थ बातमी हवी असते. मनोरंजनाची इतर अनेक माध्यमे आणि प्लॅटफॉर्म त्याच्याकडे उपलब्ध आहेत. बातम्यातून मनोरंजन व्हावे, म्हणून तो न्यूज वेबसाईटकडे येत नाही, हेही न्यूज पब्लिशर्सनी समजून घ्यायला हवे.
देशातील खूप मोठा ग्राहक सोशल मीडियातून येणार्या फेक न्यूज, अवास्तव घटना आणि तुकड्या तुकड्याने येणारे मनोरंजन याच्या नादी लागला आहे. शिवाय ओटीटी, गेमिंग आदीमध्ये तो आपला वेळ घालवत आहे. परिणामी बातम्यांकडे तो दुर्लक्ष करत आहे. यातून बातम्यांचे ट्राफिक कमी होत आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, गुगलने स्थानिक भाषांमध्ये विविध सेवा सुरू केल्याने या भाषेतील ट्राफिकही गुगलवर अडकून पडते. माहितीची गरज हे ग्राहक गुगलवरच भागवतात. बातम्यांसाठी त्यांना मूळ न्यूज वेबसाईटकडे जाण्याची तितकीशी निकड वाटत नाही. या पार्श्वभूमीवर डिजिटल न्यूज पब्लिशर्स आशय, सादरीकरण आणि ट्राफिक एंगेजमेंटसाठी नेमकी कोणती पावले उचलतात, हे पहावे लागेल.