March 19, 2024
Need of Conservation of Tulsi for Biodiversity
Home » तुळसीचे संवर्धन फायद्यासाठी नव्हे तर जैवविविधता जोपासण्यासाठी व्हावे
विश्वाचे आर्त

तुळसीचे संवर्धन फायद्यासाठी नव्हे तर जैवविविधता जोपासण्यासाठी व्हावे

तुळस ही विष्णूप्रिय समजली जाते. सृष्टीचा निर्माता विष्णू हा शेषशायी नागावर आरूढ होऊन समुद्रात वास्तव्य करतो. यामुळे त्याला थंडी व सर्दीचा त्रास होतो. तो त्रास घालविण्यासाठी सर्दीहारक, कफहारक तुळशी त्याला लागते म्हणून विष्णूस तुळस प्रिय आहे असेही म्हटले जाते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

प्रतिपाळु तरी पाटाचा। झाडीं कीजे तुळसीचा ।
परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाहीं ।।183 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा

ओवीचा अर्थ – तुळशीच्या झाडाचे तर उत्तम प्रकारचें संरक्षण करावे, परंतु त्या संरक्षण करण्यात फळांचा, फुलांचा अथवा छायेच्या हेतूचा संबंध नसावा.

भारतीय संस्कृतीत तुळशीला अमृत संजीवनी म्हटले आहे. वारकरी स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन वारी करतात. कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे. ती लक्ष्मी समजली जाते. वारीमध्ये भक्तीबरोबरच लक्ष्मी आणि ऐश्वर्य लाभते. यासाठीच वारीत तुळस नेहमी बरोबर ठेवण्याची प्रथा आहे. संत तुकाराम महाराज यांनी यासाठीच म्हटले आहे जयाच्या अंगणी तुळस । त्याचा यात्रेचा कळस ।। अध्यात्मात तुळशीला असे महत्त्व आहे. बेल हे शंकरास प्रिय आहे. फळ आणि कमल हे लक्ष्मीप्रिय आहे. तर तुळस ही विष्णूप्रिय समजली जाते. सृष्टीचा निर्माता विष्णू हा शेषशायी नागावर आरूढ होऊन समुद्रात वास्तव्य करतो. यामुळे त्याला थंडी व सर्दीचा त्रास होतो. तो त्रास घालविण्यासाठी सर्दीहारक, कफहारक तुळशी त्याला लागते म्हणून विष्णूस तुळस प्रिय आहे असेही म्हटले जाते.

अध्यात्माचा अभ्यास करताना त्यात दडलेले शास्त्रही समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती ही शास्त्रावर आधारित आहे. तुळसीमागेही असेच शास्त्र आहे. विविध गुणधर्मावरूनही तुळशीस विविध नावे पडली आहेत. रस उपयोगी असल्याने किंवा देवदेवतांना अर्पण करीत असल्याने तुळशीला सुरसा असेही म्हटले जाते. जंतुनाशक असल्याने अपेतराक्षसी, भूतघ्नी असे म्हटले जाते. दुंदुभिप्रमाणे लांब मंजिरी असल्याने बहुमंजरी, देवदुंदुभि असेही नाव आहे. घराघरात लावली जात असल्याने सुलभा, ग्राम्या असेही संबोधले जाते.

भारतात तुळशीच्या विविध जाती आढळतात. त्यात पवित्र तुळस, काळी तुळस, रामतुळस, कर्पुरतुळस, सब्जातुळस, दहिंद्र तुळस, लवंगी तुळस, मरवा तुळस अशा जाती आढळतात. सध्या रसायनांच्या फवारण्या करून कीटकांचा, डासांचा नाश केला जातो. पण डास आता अशा फवारण्यांना प्रतिसाद देत नाहीत. डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशावर तुळशीची लागवड ही उपयुक्त ठरू शकते. तुळस ही जंतुहीन आहे. डास व इतर कीटकांचा ती नाश करते. तुळशीजवळ डास फिरकू शकत नाहीत. तुळशीचे अस्तित्व असते तेथे डासांचे अस्तित्व नष्ट होते. झोपताना पाने व मंजिरीचा रस अंगाला लावून झोपल्यास डासांचा त्रास होत नाही.

तुळशीच्या रसाने त्वचाविकारही दूर होतात. साबणाऐवजी तुळशीचा रस लावून अंघोळ केल्यास त्वचाविकार दूर होतात. या रसात लिंबाचा रस घातला तर ते मिश्रण अधिक फायदेशीर ठरते. काहींना गोड, थंड पदार्थ खाताना वेदना होतात. दातांना थंड पाणी लागले तरीही वेदना होतात. अशी व्यक्तींनी तुळशीची पाने व मिरे एकत्र करून तो गोळा दातात ठेवावा. यामुळे दंतशूल कमी होते. गांधीलमाशी किंवा इतर किड्यांनी दंश केला असता तुळशीची पाने व झेंडूचा रस लावावा यामुळे आग कमी होऊन शांत वाटते.

बऱ्याचदा जखमा बऱ्या होत नाहीत. अशा व्रणावर तुळशीची पाने वाटून तयार केलेले चूर्ण लावावे. व्रण सुकून बरा होतो. तोंडावर काळे डाग पडले असतील तर रोज रात्री तुळशीची पाने दुधाबरोबर बारीक वाटून ते मिश्रण तोंडास लावावे काळे डाग नष्ट होतात. ज्यांना सारखा दम लागतो. चालतानासुद्धा त्रास होतो. चढ चढताना किंवा जिना चढतानादेखील त्रास होतो त्यांनी तुळशीचा रस एक चमचा, माक्याचा रस पाव चमचा व आल्याचा रस एक चमचा घेऊन एकत्र करावा त्यामध्ये मध, साखर घालून हे मिश्रण रोज घेतल्यास थकवा दूर होतो.

ज्या तापाच्या प्रकारामध्ये कडकडून थंडी वाजून ताप येतो. अशावेळी तुळशीचा उपयोग होतो. लहान मुलांना दात येताना त्रास होतो, त्यासाठी डाळिंबाच्या रसासोबत तुळशीचा रस व मध एकत्र घ्यावा यामुळे दात येण्याच्यावेळी त्रास होत नाही. कर्करोगावरही आता तुळस उपयुक्त ठरत आहे. असे संशोधकांचे मत आहे. असे अनेक औषधी उपयोग आहेत. अमृत संजीवनी असणाऱ्या अशा या वनस्पतीची लागवड करणे गरजेचे आहे. सध्या बदलत्या शेतीच्या पद्धतीत औषधी वनस्पतींची लागवडही केली जात आहे. तुळशीच्या पानात 0.5 ते 0.7 टक्के पिवळे जर्द, किंचित लवंगेसारख्या वासाचे बाष्पनशील तेल असते. कृष्ण तुळशीच्या तेलात प्रामुख्याने युजेनॉल हे रासायनिक घटक द्रव्य असते. यासाठी तुळशीची लागवड केली जाते.

तुळस ही वर्षभर उत्पन्न देते. मध्यम काळ्या किंवा पोयट्याच्या जमीन तुळशीस उपयुक्त असते. हेक्टरी अंदाजे 75 ते 250 ग्रॅम बियाणे लागते. साधारण तीन कापण्या या पिकाच्या मिळतात. पीक फुलोऱ्यावर असताना जमिनीच्या वर 20 ते 25 सेंटिमीटर अंतर सोडून पहिली कापणी करावी. नंतरच्या दोन कापण्या 75 ते 90 दिवसाच्या अंतराने कराव्यात. कापलेले संपूर्ण ओले पीक सावलीत वाळवावे म्हणजे तेलाचे प्रमाण वाढते. हेक्टरी साधारणपणे 15 ते 25 टन ओला पाला मिळतो. तर 100 ते 110 किलो तेल मिळते. बदलत्या शेती पद्धतीत शेतकऱ्यांनी तुळशीची लागवड करणे उपयुक्त ठरू शकते.

तुळस ही औषधी आहे. उपयुक्त आहे. केवळ याचकारणासाठी तुळस लावली जाऊ नये. फायदा मिळतो म्हणूनच तिचे संरक्षण करावे असा विचार कधीही करू नये. जैवविविधता जोपासण्यासाठी तिचे संरक्षण, संवर्धन होणे गरजेचे आहे. फक्त तुळसच नव्हे तर प्रत्येक वनस्पतीबाबत हा विचार करायला हवा. केवळ फायदे विचारात घेऊनच आपण त्याचे संवर्धन करत आहोत. फायद्याच्या गोष्टी नसतील तर त्याचा विचार करत नाही. फुल, फळ, पाने यातील गुणधर्म विचारात घेऊन अनेक वनौषधींची लुट वनातून केली जात आहे. अशाने वनातून या वनौषधी दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. यासाठीच फळाशा ठेवून कोणतेही कार्य करू नये. फायदे लक्षात आल्यानेच अशी परिस्थिती आली आहे अन्यथा त्या वनस्पती वनात तशाच असत्या. वनांचे, वनौषधींचे संवर्धन, संरक्षण हे व्हायला हवे. केवळ फायदे विचारात घेऊन संवर्धन नको तर जैवविविधता जोपासण्यासाठी संवर्धन व्हायला हवे. सृष्टीचे चक्र सदोदीत राहावे यासाठी संवर्धन व्हावे.

Related posts

नव्या जगाची वाट : सारीपाट

पश्चिम घाटास भूस्खलनाचा वाढता धोका

गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment