December 11, 2024
when-will-the-goal-of-zero-accidents-on-highways-be-achieved
Home » महामार्गावर शुन्य अपघाताचे ध्येय कधी साध्य होणार ?
विशेष संपादकीय

महामार्गावर शुन्य अपघाताचे ध्येय कधी साध्य होणार ?

      
११ डिसेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये समृद्धी महामार्गावर एकंदरीत नोंदणी युक्त ३५८ अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये एकंदरीत ३९ मृत्यू झालेले आहेत. ३० जून २०२३ चा अपघात समृद्धी महामार्गावरचा सर्वात मोठा, भीषण व अंगावर शहारे आणणारा ठरला आहे त्यामध्ये एकाच वेळी २५ प्रवाशांचा अंत झालेला आहे.

महादेव ई पंडित
लेखक मुंबई येथे स्थापत्य सल्लागार आहेत

आजमितीला अन्न, वस्त्र ,निवारा या मुलभूत गरजांचा त्रिकोण पूर्ण करण्यासाठी शिक्षण, वाहतूक, आरोग्य व इंटरनेट या अतिरिक्त चौकोनाची गरज भासते, पण या व्यतिरिक्त पर्यटन, स्वयंशिस्त व सुरक्षा या दुसऱ्या त्रिकोणी गरजेने मानवी जीवनाचा दशभुजाकोन पूर्ण होतो आणि पृथ्वी वरील सर्वश्रेष्ठ अशा मानवी जीवनाचा आनंद लुटण्यासाठी मानवाची दाही दिशेला धावपळ सुरू होते.

सेवांसाठी सहा प्रकारचे रस्ते

सर्व सामान्य माणसांची धावपळ ही बहुतांशी रस्त्या मार्फत होते कारण रस्ते ही अशी सेवा आहे की त्यासाठी आगाऊ आरक्षणाची गरज नसते. त्याप्रमाणे रस्त्यावरून कधीही ,केव्हाही व कोठेही आपला प्रवास सुरू होऊ शकतो. रेल्वे व विमानसेवा फक्त ठराविक शहरातच उपलब्ध असतात. पोटा पाण्यासाठी, शिक्षणासाठी, चांगल्या आरोग्य सेवेसाठी, व्यावसायिक चर्चासत्रासाठी, सणा सुदीसाठी, लग्न समारंभासाठी, विविध नोकरीच्या मुलाखतीसाठी सर्वसामान्य लोक भारत भर विविध रस्त्यावरून दाही दिशांना धावत असतात. अचानक कामांसाठी रात्री अपरात्री सुध्दा रस्त्यांची सेवा उपलब्ध होते. सुवर्ण चतुर्भज सुपर हायवे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते, इतर रस्ते आणि सिमा रस्ते असे सहा प्रकारचे रस्ते माणूस आपल्या सर्व सेवांसाठी वापरू शकतो. बहुतांशी रस्त्यावर दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी आणि सहा चाकी वाहने रस्त्यावर नमूद केलेल्या वेगासह धावत असतात. अधूनमधून जास्त चाके असणारे मोठमोठाले कंटेनर सुद्धा ये-जा करत असतात.

प्रवाशांची सुरक्षा अति महत्वाची

मानवाच्या दहा गरजांपैकी सुरक्षा ही गरज खूप महत्त्वाची आहे. कारखान्यात व विविध प्रकल्प स्थळावर कामगारांची, अभियंत्यांची व इतर कार्यकारी स्टाफची सुरक्षा मानांकित सुरक्षा सल्लागारा मार्फत विविध उपाय योजना कार्यान्वित करून घेतली जाते. पण काही सुरक्षा उपाय योजनां अभावी तसेच मानवी चुकांमुळे प्रवासा दरम्यान अपघातात सामान्य माणसाला हकनाक जीव गमवावा लागतो. अपघातामध्ये पैशाचे, वस्तूंचे, रस्त्याचे, औैषधांचे, अन्न धान्याचे, वाहनांचे, कपड्याचे, घरांचे, अनेक उपकरणांचे तसेच विविध साधन सामुग्रीचे झालेले नुकसान अन्य मार्गानी भविष्यात भरून काढता येते पण मानवी जीवनाचे नुकसान व हानी अद्याप कोणाला भरून काढता आलेली नाही आणि भविष्यातसुद्धा गेलेला मानवी जीव पुन्हा आणता येणे शक्य नाही आणि म्हणूनच महामार्गावर विविध वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा अति महत्वाची आहे.

अपघातांची मालिकाच…

१४ ऑॅगस्ट २०२२ रोजी रात्री मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिव संग्राम सेनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या कारचा अपघात झाला आणि तासा भरात ते श्री चे कै झाले आणि असंख्य मराठा तरूणांना एका आदर्श मार्गदर्शकाला कायमचे मुकावे लागले. भविष्यातील त्यांच्या उपयुक्त मार्गदर्शनाची मोजदाद करणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. ०४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी अहमदाबाद-मुंबई या रस्त्यावरील सूर्या नदीवरील पुलाच्या जवळील दुभाजकावर अत्यंत सुरक्षित मर्सिडीज मोटारीचा अपघात होऊन सायरस मिस्त्री व त्यांचे एक मित्र जागेवरच मृत्युमुखी पडले आणि पूर्ण भारत देश एका अतिमहत्वाच्या तरूण उमद्या उद्योजकाला कायमचा मुकला. ही तर खुपच अपरिमित हानी आहे. सायरस मिस्त्रीच्या निधनामुळे भारत देश उद्योग जगतात एक पाय मागे गेला असे संबोधने येथे सार्थ ठरेल. ३० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ऋषभ पंत या प्रसिद्ध क्रिेकेटपटूच्या अलिशान मोटारीचा अपघात दिल्ली- रूरकी या महामार्गावर झाला पण सुदैवाने ऋषभ पंत वाचला पण निदान वर्ष भर तरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यानंतर ०९ मार्च २०२३ ला सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर प्रसिद्ध अँकर व इव्हेंट मॅनेजर दिपेश मोरे यांच्या मोटारीचा अपघात होऊन ते जागच्या जागीच ठार झाले आणि ठाणेकर एका नवोदित उमद्या कलाकाराला कायमचा मुकला. ३० जून २०२३ रोजी रात्री विदर्भ ट्रॅव्हल्सच्या आरामदायी बसला सिंधखेडचा राजा जवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात एकूण २५ माणसे होरपळून खाक झाली आणि ८ जण गंभीर जखमी झाली. खूपच भीषण आणि मन विषन्न करणारा हा अपघात होता. मृतांमध्ये अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध पालक व नव तरूणाचा समावेश होता. ११ डिसेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये समृद्धी महामार्गावर एकंदरीत नोंदणी युक्त ३५८ अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये एकंदरीत ३९ मृत्यू झालेले आहेत. ३० जून २०२३ चा अपघात समृद्धी महामार्गावरचा सर्वात मोठा, भीषण व अंगावर शहारे आणणारा ठरला आहे त्यामध्ये एकाच वेळी २५ प्रवाशांचा अंत झालेला आहे.

अपघाताची काही कारणे

महामार्गावरील सर्व अपघात हे टायर फुटणे, डुलकी लागणे, वाहनातील तांत्रिक बिघाड, अति वेग, वन्य जीव प्राणी आडवे येणे, वाहने रस्त्यावर उभी करणे आणि ब्रेक डाऊन, प्रवाशांनी सीट बेल्ट न लावणे, एकट्यानेच वाहन चालक बनून लांबचा प्रवास करणे,रस्त्यावरील मोठ मोठाले खड्डे, रस्त्यावरील दिशा दर्शक व सूचना फलकांची कमतरता इत्यादी कारणांमुळे झालेले आहेत. तर काही अपघात घाटातील संरक्षक कठडा तसेच बॅरिकेडींग मजबूत नसल्यामुळे झालेले आहेत. त्याच प्रमाणे डोंगर द-यातील रस्त्यावर काही अपघात रस्त्याच्या बाजूची दरड कोसळून झालेले आहेत.

रस्त्याचे वार्षिक स्ट्रक्चरल ऑडीट गरजेचे

महाराष्ट्रात सन २०२१ मध्ये आणि जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ मध्ये रस्ते अपघातात २७०८४ मृत्यू आणि ४७७९३ जखमी झाल्याची नोंद सरकार दरबारी झालेली आहे. सन २०२१ मध्ये एकूण २९,४७७ अपघातात १३५२८ मृत्यू झालेले असून सन २०२२ मध्ये ३०१२० अपघातामध्ये १३५५६ जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. गेल्या सात महिन्यात समृध्दी महामार्गावर एकूण ६४ मृत्यूंची नोंद झालेली आहे. रस्ते अपघातामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्यामुळे आपण अनेक व्यावसायिक, कलाकार, खेळाडू, शिक्षणतज्ञ, डॉक्टर्स, अभियंते, कारागीर, राजकीय कार्यकर्ते इत्यादी विविध कौशल्य तज्ञाना कायमचे गमावून बसलो आहोत. विकासाच्या वेगासाठी आपण वेगवान रस्ते बनवले पण भविष्यात विकासास अनेक उपयुक्त अश्या तज्ञ मंडळींना तसेच कारागीरांच्या हातभाराला आपण रस्त्याच्या अपघातामध्ये कायमचे गमावून बसलो आहोत आणि वेगवान विकासा मधील जीवितहानी कित्येक कुटुंबाचे संसार जर उघडे करत असेल तर हा विकास आपणास उपयोगी आहे का? हा गहन प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आपणास इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी जीवितहानी टाळायची असेल तर प्रत्येक प्रमुख रस्त्याचे वार्षिक स्ट्रक्चरल ऑडीट रस्ते तज्ञाकडून करणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्याच्या स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये निष्णात अभियंते रस्त्यावरील खड्डे, घाटातील संरक्षक भिंती, महामार्गावरील बॅरिकेडींग, घाटातील दरडीचे सर्वेक्षण, दिशा दर्शक फलक तसेच चालकास उपयुक्त असे सूचना फलक, रस्त्याच्या कडेला रेडीयमचे दिशा दर्शक पट्टे इत्यादी बाबी मापदंडानुसार चेक करून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे जमा करतील आणि त्याची त्वरित कार्यवाही भविष्यातील जीवितहानी कमी करण्यास नक्कीच हातभार लावील.

उद्घाटनाची घाई करणे चुकीचे

समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी आहे त्यातील ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजे नागपूर-शिर्डी या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले त्यानंतर २७ मे २०२३ रोजी दुसऱ्या ८० किमी लांबीच्या शिर्डी ते भरवीर ह्या टप्प्याचे लोकार्पण झाले. आता नागपूर ते भरवीर हा एकंदरीत ६०० किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत एवढ्या मोठ्या लांबीचा एकसंध सरळ महामार्ग अद्याप अस्तित्वात नव्हता त्यामुळे अश्या नवीन तंत्रज्ञानाच्या वेगवान काँक्रीट महामार्गाची पहिल्यांदा तांत्रिक चाचणी घेऊन त्याचा स्ट्रक्चरल दृष्ट्या अहवाल बनवून नंतरच सामान्य वाहतुकीला खुला केला पाहिजे होता. पण पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्याच्या उद्घाटनासाठी तारखा मिळत नाहीत म्हणून महामार्ग तयार झाला रे झाला की लगेचच त्यांच्या हस्ते महामार्गांचे लोकार्पण करणे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे वाटते. वेगवान महामार्ग लोकांच्या सोईसाठीच बनवतो त्यामुळे लोकार्पणात थोडा विलंब झाला तरी चालण्यासारखे आहे पण भविष्यात महामार्गावर जीवितहानी होणे अपेक्षित नाही, याचा प्रमुख नेत्यांनी सुद्धा विचार करून तश्या सूचना अभियांत्रिकी विभागाला दिल्या पाहिजेत.

कमीत कमी १० ते १२ ट्रायल रण होणे अपेक्षित

रेल्वेची, मेट्रोची त्याच प्रमाणे नवीन मोटार गाड्यांची ज्याप्रमाणे चाचणी घेऊन नंतरच ती लोकांच्या सेवेसाठी अदा केली जाते अगदी त्याच प्रमाणे समृद्धी महामार्गाची सुद्धा चाचणी घेणे अपेक्षित होते. समृद्धी महामार्ग हा काँक्रीट पेव्हमेंट मध्ये संकल्पित केलेला आहे त्यामुळे मोटारीचा रबरी टायर व टणक मजबूत क्राँक्रीटमध्ये घर्षण होऊन टायर फुटण्याचे प्रमाण जास्त आहे. वेगवान महामार्गाच्या चाचणी कमिटी मध्ये रोड डिझाइनमधील दोन तज्ञ अभियंते, सुरक्षा यंत्रणेतील तज्ञ, आरटीओे कार्यालयाचा प्रमुख, टायर कंपनीचे तज्ञ, तज्ञ वाहनचालक, परिवहन मंत्रालयातील प्रमुख, अग्निशामक दलाचा प्रमुख तसेच पोलीस दलाचा प्रमुख इत्यादी तज्ञ किंवा सल्लागारांचा समावेश असला पाहिजेत. कोणताही महामार्ग लोकांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी त्या लांबलचक सरळ वेगवान महामार्गाचे वेगवेगळ्या वेळी कमीत कमी १० ते १२ ट्रायल रण होणे अपेक्षित होते. चाचणी परिक्षणामध्ये महामार्गाच्या लांबीप्रमाणे त्यावरील पेट्रोलपंप, उपहारगृहे, स्वच्छता गृहे, प्रथमोपचार केंद्रे , वैद्यकिय मदत केंद्रे ,टायर चेकींग केंद्रे मापदंडानुसार नियोजित केलेली आहेत का? याची चाचपणी केली पाहिजेत त्याचप्रमाणे दिशा दर्शक फलक, सूचना फलक व्यवस्थित लावले आहेत का? संरक्षित कठडे कसे व गॅलव्हनाईजड बॅरिकेडींग प्रस्तावित केले आहेत का? तसेच पोलीस गस्ती पथकाची सोय आहे का? इत्यादी बाबी त्या चाचणी परिक्षणामध्ये विचारात घेतल्या पाहिजेत. चाचणी परिक्षणामध्ये कारपासून ते ट्रेलरपर्यंत सर्व वाहनांचे चाचणी अहवाल घेतले पाहिजेत व या सर्व चाचणी अहवालांची तांत्रिक पडताळणी करून त्यातील त्रुटीची पूर्तता केल्यानंतरच तो महामार्ग लोकांसाठी खुला केला पाहिजेत.

अपघात टाळता येणे शक्य

जुन्या महामार्गावरील तसेच समृध्दी महा मार्गावरील झालेल्या सर्व अपघात स्थळांचे जाणकार अभियंते व पोलीस यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करून त्याचा तांत्रिक अहवाल केंद्रीय रस्ते संशोधन केंद्रातून पद्धतशीर पडताळणी करून त्यामधील त्रुटीची अंमल बजावणी केली तर भविष्यात महामार्गाच्या सदोष बांधकामामुळे होणारे अपघात नक्कीच टाळता येतील आणि त्यामुळे जीवितहानी रोखण्यासाठी हातभार लागेल.

परिवहन मंत्रालयाने दक्षता घेण्याची गरज

महामार्गावर अपघातात जीवितहानी झाल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री प्रसिद्धीसाठी भेट देतात, मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करतात आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख मृतांच्या नातेवाईकांना देण्याची घोषणा करतात पण पुन्हा अश्या घटना घडू नयेत यावर सखोल विचार करताना दिसत नाहीत. वर्षा काठी महाराष्ट्रात सर्वसाधारण रस्ते अपघातात १३००० लोक मृत्यूमुखी पडतात त्यांना प्रत्येकी पाच लाखप्रमाणे मदत केली तर वर्षाला जवळ-जवळ ६५० कोटीचा बोजा सरकारी तिजोरीवर तसेच विमा कंपनीवर पडतो त्याच प्रमाणे कधीही भरुण न येणाऱ्या जीवितहानीसह इतर नुकसान होते ते वेगळेच म्हणूनच महामार्ग व रस्त्यावर शून्य अपघाताचे ध्येय ठेवून रस्ते विभागाने तसेच परिवहन मंत्रालयाने भविष्यातील नव्या रस्त्यांचे नियोजन केले पाहिजेत. आज जसे न्यायालयीन प्रणालीमध्ये शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका सुध्दा निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये याच धर्तीवर महामार्ग सुरक्षेसाठी कितीही कोटी रूपये खर्च झाले तरी चालतील पण एकाही प्रवाश्याचा मृत्यू होता कामा नये हे मुख्यत्वे लक्षात ठेवले पाहिजेत. परिवहन मंत्रालय हजारो कोटी रूपये वेगवान विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी खर्च करते पण महामार्गाच्या सुरक्षेवर शत प्रतिशत लक्ष दिले जात नाही आणि अपेक्षित सुरक्षे अभावी शून्य अपघात प्रणाली अमलात येत नाही आणि त्यामुळे रस्ते अपघातात कित्येक तरूणांना आपला अमुल्य जीव गमवावा लागतो, त्याचे गोड स्वप्न धुळीस मिळते त्याच प्रमाणे त्याच्या संपूर्ण कुटुंबाची आयुष्यभर वाताहत होत राहते यासाठी रस्ते सुरक्षेवर दुर्लक्ष होता कामा नये याची दक्षता परिवहन मंत्रालयाने घेतली पाहिजेत.

महामार्ग प्राधिकरणाने जीआयएस तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे

राज्यात दररोज शेकडो प्राणघातक अपघात होत असतात तेव्हा या समस्येचा अधिक मुळातून आणि अधिक गंभीर विचार घेण्याची अत्यंत गरज आहे. अपघातात विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी मृत्यू पावत आहेत आणि त्यामुळे देशाचे तसेच राज्याचे शैक्षणिक, राजकीय, उद्योग ,क्रीडा, कलाक्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात अतोनात नुकसान होत आहे त्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) प्रणालीच्या धर्तीवर महामार्गावर अत्याधुनिक वहातूक व्यवस्थापन प्रणाली (ATMS) लवकरात लवकर कार्यान्वित करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे महामार्गावरील सुरक्षा समस्या ओेळखण्याच्या दृष्टीने ड्रोनच्या माध्यमातून घेतलेल्या चित्रफिती आणि नेटवर्क सर्वेक्षण संवाहक माहितीचे विश्लेषण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जीआयएस तंत्रज्ञानाचा लवकरात लवकर लाभ घेतला पाहिजेत.

महामार्गावरील काही अपघात चालकाच्या अज्ञानामुळे तसेच नजर दोष असल्यामुळे सुद्धा होतात त्यासाठी वाहन चालक परवाना देण्याची पद्धत सुद्धा काही अंशी सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी रस्ते सुरक्षा मोहिमे अंतर्गत सर्व प्रकारच्या वाहन चालकांना आयआयटी व केंद्रीय रस्ते संशोधन केंद्रातून मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देण्याची आज अत्यंत गरज आहे. आता सर्व रस्ते मोठे असतात आणि नको तितके मैलोनमैल सरळ असतात त्यामुळे चालकाच्या डोक्यात वेगाची हवा शिरते आणि चालक भरधाव वेगात वाहने हाकतात आणि क्षणार्धात वाहनाचा ताबा सुटतो आणि मोठ्या अपघाताची नोंद होते. अपघात रोखण्यासाठी सर्व वाहन चालकांना प्रशिक्षण देणे तसेच त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे.

एका अपघातात जरी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाची प्रगती किमान पाच ते दहा वर्षे मागे जाते. महामार्गावर काही वेळा वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही तर त्याला मृत्यूला सामोरे जावे लागते त्यासाठी हवाई रुग्नवाहिकांचे नियोजन करणे क्रम प्राप्त झाले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधितून पाच लाखाची मदत मिळते पण त्या आर्थिक मदतीमुळे त्याचे चालू आनंदी जीवन तसेच त्याच्या स्वप्नातले जीवनमान परत येत नाही त्यामुळे महामार्गावर शून्य अपघात प्रणाली राबवण्याचे नियोजन व तशी अद्ययावत यंत्रणा उभारणे याला काही पर्याय नाही. समृद्धी महामार्ग उभारण्यासाठी जवळ जवळ राज्य सरकारने ५५००० कोटी रुपये खर्च केलेला आहे तसेच त्या महामार्गावर होत असलेल्या अपघातात विविध प्रकारचे नुकसान होते ते वेगळेच त्याचा हिशोब कोणीच करतच नाही. महामार्गावरील वारंवार होणा-या अपघातातील मानवी जीवनाचा हिशोब कधीही मांडता येणार नाही तसेच ते कोणत्याही रक्कमेला तो भरून काढता येणार नाही त्यासाठी लवकरात लवकर अपघात रोखण्यासाठी महामार्ग सुरक्षा यंत्रणेवर कितीही खर्च झाला तरी चालेल पण एकाही प्रवाश्याचा मृत्यू होणार नाही यासाठी शून्य अपघात प्रणाली सर्वत्र राबवणे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. राज्यातील इतर मुख्य महामार्गावर तसेच समृध्दी महामार्गावर अद्यावत वहातूक व्यवस्थापन प्रणाली अमंलात आणली नाहीतर समृध्दी महामार्गाचे नाव महा मृत्यूचा सापळा महामार्ग असे प्रचलित होईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading