नवसंकल्पना राबविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे धोरण शाहू महाराजांनी स्वीकारले होते. ऊस गाळण्याच्या लोखंडी घाण्यात अडकून शेतकऱ्यांची बोटे तुटतात म्हणून लाकडी घाणा तयार करणाऱ्यास त्यांनी बक्षीस जाहीर केले आणि लाकडी घाणा वापरणाऱ्यांचा सत्कारही केला. संस्थानात कॉफी, चहाच्या लागवडीचे प्रयोग यशस्वी केले. त्याचप्रमाणे साबुदाणा झाडांसह नवनवीन पिके काढण्यासही प्रोत्साहन दिले.
डॉ. रमेश जाधव
कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे पहिले जनक होत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शाहू संशोधक डॉ. रमेश जाधव यांनी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातर्फे शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने डॉ. जाधव यांचे ‘शाहू छत्रपती: एक चिंतन’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
शेतीविषयक कार्यावर विशेष प्रकाशझोत
डॉ. रमेश जाधव यांनी आपल्या व्याख्यानामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या शेतीविषयक कार्यावर विशेष प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, शाहू महाराज यांनी त्यांच्या अवघ्या ४८ वर्षांच्या आयुष्यामध्ये काम केले नाही, असे एकही क्षेत्र उरलेले नाही. प्रत्येक क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. राजर्षींचे शेतीच्या क्षेत्रातील कार्यही त्याला अपवाद नाही. शाहू महाराजांवर महात्मा फुले यांच्या विचारकार्याचा प्रभाव असल्याचे जाणवते. त्यांचे सहकारी भास्करराव जाधव हे फुले यांच्या सामाजिक चळवळीतून पुढे आले होते. त्यामुळे महाराजांनी फुले यांचे साहित्य वाचले. फुले आणि शाहू हे एक प्रकारचे वैचारिक अद्वैत होते. फुले यांच्या शेतकरी सुखी तर जग सुखी, या वचनाचा प्रभाव महाराजांवर होता. महाराजांना राजर्षी पदवी देण्यात आली, त्या भाषणातही त्यांनी शेतकऱ्यांविषयी कळकळ व्यक्त केली होती. आपल्या मुलाला शेतकी शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठविल्याचे त्यांनी सांगितले. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज असल्याची जाणीव त्यांना होती. संशोधन वाढले, तरच उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांत संपन्नता येईल, अशी त्यांची धारणा होती.
शेतकऱ्यांना अनेक सवलती जाहीर
नवसंकल्पना राबविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे धोरण शाहू महाराजांनी स्वीकारल्याचे सांगून डॉ. जाधव म्हणाले, ऊस गाळण्याच्या लोखंडी घाण्यात अडकून शेतकऱ्यांची बोटे तुटतात म्हणून लाकडी घाणा तयार करणाऱ्यास त्यांनी बक्षीस जाहीर केले आणि लाकडी घाणा वापरणाऱ्यांचा सत्कारही केला. संस्थानात कॉफी, चहाच्या लागवडीचे प्रयोग यशस्वी केले. त्याचप्रमाणे साबुदाणा झाडांसह नवनवीन पिके काढण्यासही प्रोत्साहन दिले. इंग्लंड दौऱ्यामध्ये तेथील शेती आणि शेतीपूरक व्यवसायांत चाललेले प्रयोग, तेथील उद्योग यांची त्यांनी पाहणी केली आणि येथे परतल्यावर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना व्याजदर कमी केले. पाणी योजना राबविण्यावर भर दिला. धरण, बंधारे बांधले. शेतकऱ्यांना अनेक सवलती जाहीर केल्या. रामचंद्र शेटे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांना शेतीचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला पाठविले. पहिल्या महायुद्धाच्या प्रसंगी लोखंडाअभावी शेतकऱ्यांना बाजारात नांगर मिळत नव्हते. त्यावेळी किल्ल्यांवरील तोफा किर्लोस्कर कारखान्यात वितळवून त्यापासून नांगर तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध केले. शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी पालकांवर १ रुपया दंड बसविला. इतक्या मोठ्या दंडाच्या भीतीपोटी पालक मुलांना शाळेत पाठवित असत. अशी अनेक शेतकरी हिताची कामे त्यांनी केली.
शेतकी प्रदर्शने भरविण्यास प्रारंभ
कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, शाहू महाराजांचे द्रष्टेपण हे काळाच्या शंभर वर्षे पुढे होते. आजच्या पिढीने त्यांच्याविषयी वाचन करावे आणि त्यांचे विचार अंगीकृत करण्याचा प्रयत्न करावा. महाराजांनी त्यांच्या काळातच शेतकी प्रदर्शने भरविण्यास सुरवात केली. सहकार ही संकल्पनाही त्यांनी संस्थानात अंमलात आणली. शाहू महाराजांच्या पाऊलखुणा कोल्हापुरात पदोपदी आहेत. त्या वाचण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.
समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत केले. डॉ. प्रल्हाद माने यांनी परिचय करून दिला, डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.