July 27, 2024
rajendra-ghorpade-article-on-bramhdnyan-on-dnyneshwari
Home » ब्रह्म हेच आहे कर्म
विश्वाचे आर्त

ब्रह्म हेच आहे कर्म

आत्मज्ञान प्राप्तीसाठीही कर्म करावेच लागते. पण येथे ब्रह्म हेच कर्म आहे. सो ऽ हमची अखंड साधना हेच कर्म आहे. संसारात राहूनही हे कर्म करता येते. फक्त मनाची स्थिती बदलायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

म्हणौनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम ।
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा।।121।। अध्याय 4 था

ओवीचा अर्थ – म्हणून कर्म ब्रह्मच आहे, असे साम्य ज्याच्या प्रतीतीला आले. त्याने कर्तव्यकर्म जरी केले तरी अर्जुना, ते नैष्कर्म्यच होय.

प्रपंच म्हटला की कर्तव्यकर्मे आली. घर चालवायचे म्हटले की पैसा हा कमवावा लागणार. संसार करावा लागतो. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपणास खरेदी करावे लागणार. खरेदीसाठी पैसा हा लागणारच. पैसा हा काहीतरी कर्म केल्याशिवाय येणेच शक्य नाही. देवाचे भजन करून कायमस्वरूपी पैसा तर मिळणे शक्य नाही. रोज रोज कोण पैसे देणार. पुर्वीच्याकाळी भिक्षा मागून देवधर्म केला जायचा. लोक श्रद्धेपोटी भिक्षा द्यायचे. तसे आजही देतात. पण रोज रोज कोण भिक्षा देणार.?

बदलत्या काळात गरजा वाढल्या आहेत. तसा एकमेकातील विश्वासही कमी झाला आहे. देवधर्म करतो म्हणून कोणी फुकटचे पोसेल असे सध्याच्या जगात तरी शक्य वाटत नाही. पूर्वीच्या काळीही अशीच स्थिती होती, पण त्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे कर्म केल्याशिवाय जीवन जगता येणे कठीण आहे. जमीन आहे तर ती कसली पाहिजे. पीक घेतले पाहिजे काही ना काही उत्पन्न त्यातून मिळाले पाहिजे. म्हणजे कष्ट हे करावेच लागतात. कर्म हे करावेच लागते.

कर्म न करता फळाची आशा धरणे म्हणजे स्वप्न पाहण्याचा प्रकार आहे. अशी स्वप्ने ही कधीही पूर्ण होत नाहीत. स्वप्नातून बाहेर पडून सत्याची कास धरली पाहिजे, तरच जीवनात यशस्वी होता येईल. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही कर्म करावेच लागते. पण येथे ब्रह्म हेच कर्म आहे. सो ऽ हमची अखंड साधना हेच कर्म आहे. संसारात राहूनही हे कर्म करता येते. फक्त मनाची स्थिती बदलायला हवी.

हे मी केले, हे माझ्यामुळे झाले असे न म्हणता समर्पनाची भावना ठेवून कर्म करायला हवे. हे भगवंतामुळे झाले. हे भगवंतामुळे घडते. चांगले घडले तरीही भगवंतामुळेच घडते. वाईट घडले तरीही भगवंतामुळे घडते. चांगले घडले म्हणून आनंदाने हरखून जायचे नाही व वाईट घडले म्हणून दुःखही करत बसायचे नाही. चांगले व वाईट असा भेदभाव न करता मनाची स्थिरता राखून कर्म करत राहायचे.

हर्ष-शोक या दोन्ही ठिकाणी मनाची साम्यावस्था ठेवायला हवी. म्हणजे याचा शरीराला त्रास होणार नाही. वाईट गोष्टीचा शरीरावर पटकन परिणाम घडतो. दुःखामध्ये माणूस खचून जातो. काहीजण तर दुःखाला कंटाळून आत्महत्या करतात. इतकी त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली असते. यासाठी मनाची स्थिरता ही जीवनात महत्त्वाची आहे. कोणत्याही कर्मामध्ये साम्यावस्था ही महत्त्वाची आहे. कर्म करूनही तो नैष्कर्मी होतो. कारण त्याच्या मनाची तयारी झाली आहे.

त्यामध्ये मीपणा नाही. त्यामुळे सुखही नाही अन् दुःख नाही. काही कमवल्याचा आनंदही नाही व गमवल्याचे दुःखही नाही. अशी मनाची स्थिरता ठेवायला हवी. ब्रह्म हेच कर्म म्हणून कर्म करत राहायला हवे. अशी अवस्था प्राप्त होईल तेव्हा आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सुकर होईल. ब्रह्मसंपन्नता येईल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

आभाळाच्या निळ्या डोळ्याचे गाणे : निळे निळे आभाळाचे डोळे

इको – फ्रेंन्डली होम स्टे…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading