September 24, 2023
Home » स्त्रीचे प्रेम
विश्वाचे आर्त

स्त्रीचे प्रेम

स्त्री जसे आपले माहेर प्रेम विसरत नाही. तसे आपण सो ऽ हमचे स्वर विसरता कामा नये. त्यावर आपण आपले प्रेम ठेवायला हवे. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406 

नाना गाय चरे डोंगरी । परि चित्त बांधिले वत्सें घरीं । 

तैसें प्रेम एथिचें करी । स्थानपती ।। 635।। अध्याय 11 वा 

ओवीचा अर्थ ः अथवां गाय डोंगरात चरत असते परंतु तिचें सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहीलेले असते त्याप्रमाणे या विश्वरुप ठिकाणाचे तू आपले प्रेम मालक कर. 

स्त्री लग्नानंतर सासरी जाते, पण तेथे माहेरच्याच गोष्टींचे गोडवे गात राहाते. माझ्या माहेरात हे आहे. माझ्या माहेरात ते चांगले आहे. जरी अठराविश्व दारिद्य माहेरात असले तरी तिच्या मनात माहेर विषयी आपुलकी असते. तिच्या मनात माहेर कायमचे घर करून राहीलेले असते. हे मातृप्रेम आहे. ही मायेची ओढ आहे. हा जिव्हाळा आहे. माहेरची माया ती कधीही विसरू शकत नाही. सासरी ऐश्वर्य जरी असले तरी माहेरच्या प्रेमातच त्या स्त्रीचे मन गुंतलेले असते. हे प्रेम का असते ? ही ओढ का असते ? प्रेमाच्या ठिकाणी, मायेच्या ठिकाणी आपले मन ओढले जात असते. ते आपण कधीही विसरू शकत नाही. पैसा, संपत्ती अमाप मिळाली, ऐश्वर्य ओसंडून जरी वाहत असले तरी प्रेमाने मिळालेली चादर, आधार  केव्हाही आपल्या मनातून दूर जात नाही. ती आठवण कायमची स्मरणात असते. म्हणूनच स्त्री कधीही माहेर विसरू शकत नाही. कारण त्या प्रेमात ती गुंफलेली असते.

आजकाल स्त्रिया सुद्धा पुरूष्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कामानिमित्त त्या कोठेही असल्यातरी त्यांचे लक्ष घरातील तान्हुल्याकडे कायम असते. पाळणाघरात तिचे संगोपन योग्यप्रकारे होत असले तरीही त्या मायेच्या मनात मात्र त्या तान्हुल्याची ओढ असते. इतकेच काय बाहेर बाजारात खरेदीसाठी गेल्या तरी त्यांच्या मनात घरास कुलुप निट लावले आहे का? घरातील गॅस बंद केला आहे का ? असे विविध प्रश्न सुरु असतात. इतक्‍या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांच्या मनात घर करून राहीलेल्या असतात. त्यांची घराची ओढ ही कायम असते. गाय चरायला डोंगरावर गेली तरी तिचे लक्ष चरतानाही गोठ्यातील वासराकडे असते. हे मातृप्रेम आहे.

पक्षी सुद्धा तिच्या पिलाला खाद्य आणण्यासाठी बाहेर गेला तरी पंख न फुटलेल्या घरट्यातील पिलाकडेच मन असते. ही ओढ कायम असते. हे प्रेम कायम असते. अध्यात्मात सद्‌गुरुंना अशाच प्रेमाची अपेक्षा आहे. कुठेही बाहेर गेलात तरी भगवंताचे स्मरण नित्य असायला हवे. त्याच्याकडे अशी ओढ असायला हवी. येणाऱ्या अनुभुतीकडे अवधान असायला हवे. मन सतत भगवंताकडे ओढलेले असावे. मनात साधनेचा विचार असायला हवा. कारण साधना ही नित्य सुरु असते. फक्त आपले लक्ष त्याकडे नसते. मन सदैव त्यामध्ये गुतलेले असावे.

सो ऽ हमचा स्वर नित्य सुरु असतो. पण आपले लक्ष त्याकडे नसते. त्यामध्ये मन गुंतवायला हवे. सो ऽ हमचा स्वर सतत स्मरणात असायला हवा. त्याचे ध्यान सतत सुरू असायला हवे. तो ऐकायला हवा. तरच आपण आत्मज्ञानाकडे ओढले जाऊ. सद्‌गुरुंच्या कृपेने आपणास आत्मज्ञानी होता येते. यासाठी तशी ओढ साधनेत कायम असायला हवी. स्त्री जसे आपले माहेर प्रेम विसरत नाही. तसे आपण सो ऽ हमचे स्वर विसरता कामा नये. त्यावर आपण आपले प्रेम ठेवायला हवे. स्त्रीची ओढ माहेरी जशी असते तशी अध्यात्माकडे आपली ओढ असायला हवी. 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

माैनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरु…वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.freewebs.com/mounimaharaj/

Related posts

विश्वरुपाकडे असे पाहावे…( एकतरी ओवी अनुभवावी)

तवं नवल म्हणौनि बिहालें । चित्त माझे ।।

कुरुक्षेत्रावरील आत्मज्ञानी विजय

Leave a Comment