April 20, 2024
Ramdas Phutane speech in Joshi Bedekar College Thane
Home » रामदास फुटाणे यांनी राजकारणावरून विद्यार्थ्यांना दिला हा सल्ला
काय चाललयं अवतीभवती

रामदास फुटाणे यांनी राजकारणावरून विद्यार्थ्यांना दिला हा सल्ला

  • विद्यार्थ्यांनी राजकारणाच्या वाटेला जाऊ नये अशी कवी रामदास फुटाणे यांचे युवा वर्गाला कळकळीचे आवाहन
  • जोशी बेडेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

ठाणे – “ सध्या राजकारणात येणारे लोक समाजसेवेसाठी किंवा देशसेवेसाठी राजकारणात येत नसून स्वतःच्या सात पिढ्यांचे कल्याण करण्यासाठी येत आहेत. देशसेवेऐवजी स्वतःचे कल्याण हा एकमेव उद्देश ठेऊन सध्याचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करून नोकरी अथवा स्वतःचा व्यवसाय सुरु होत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेऊ नये. तरुण वयात विद्यार्थ्यांनी राजकीय विचारांनी प्रभावित न होता सर्वप्रथम स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यास प्राधान्य दिले पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात वाचनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. वाचनाने आपली निर्णय क्षमता वाढते त्यातही मातृभाषेत केलेले वाचन आपल्याला जगण्याचे बळ देते”, असे उद्गार ख्यातनाम मराठी कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी काढले.

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), या महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.

शनिवारी थोरले बाजीराव पेशवे या सभागृहात पार पडलेल्या या समारंभात ख्यातनाम कवी रामदास फुटाणे यांच्यासह जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, तसेच नवरंग कमिटी प्रमुख प्रा. योगेश प्रसादे हे व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रामदास फुटाणे यांनी आपल्या आपल्या जडणघडणीचा प्रवास आणि विद्यार्थी जीवनात येणाऱ्या अडीअडचणी बद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी आपल्या काही कवितांचा संदर्भ दिला. जोशी- बेडेकर महाविद्यालय आणि प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांच्या कार्याचा गौरव कवी फुटाणे यांनी केला. फुटाणे म्हणाले, पूर्वी खेड्यातील कॉलेजमध्ये मळीचा वास यायचा पण असे प्राचार्य आणि संस्थाचालक पाहिले की तळमळीचा सुगंध येतो. विद्यार्थ्यांचा विकास आणि प्रगती हा एकमेव अजेंडा असणारे हे महाविद्यालय कौतुकास पात्र आहे. विद्यार्थी घडविणारे शिक्षक ,प्राचार्य आणि संस्थांचालक असा त्रिवेणी संगम इथे आढळतो. म्हणूनच ज्ञानद्विप हे बिरूद खऱ्या अर्थाने सार्थकी ठरते.

जोशी -बेडेकर सारखी ध्येयाने झपाटलेली महाविद्यालये मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला हवीत. अशी महाविद्यालये नव्या पिढीची आशास्थाने आहेत.”

प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकवर्गाचे विशेष कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा,’ ही अर्थपूर्ण कविता सादर करून विद्यार्थी आणि पालकांना सावध केले. जीवनात अंध:काराचे सावट आल्यावर ज्ञानाची, नात्यांची आणि आत्मविश्वासाची पणती जपून ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या शैक्षणिक वर्षात आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी
केलेल्या विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. महाविद्यालयाला मिळालेल्या पारितोषिकांत मोलाचे योगदान असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर नृत्य, संगीत, अभिनय आणि खेळ अशा विविध क्षेत्रांत जिल्हा तसेच राज्यस्तरीय स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना देखील बक्षिसे देण्यात आली.

सूत्रसंचालन प्रा. मानसी जंगम, प्रा. अंजली पुरंदरे, डॉ. अर्चना नायर , गार्गी गोरेगावकर यांनी केले. या सोहळ्याला उपप्राचार्य सुभाष शिंदे, उपप्राचार्या प्रियंवदा टोकेकर, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नारायण बारसे उपस्थित होते.

Related posts

आपटे वाचन मंदिराचे साहित्य पुरस्कार जाहीर

शरीराच्या गावात आत्मानंद नित्य नांदण्यासाठी….

पुस्तकांनी काय शिकवलं ?

Leave a Comment