February 22, 2024
Salvation of the world in the development of self
Home » ‘स्व”च्या विकासात जगाचा उद्धार
विश्वाचे आर्त

‘स्व”च्या विकासात जगाचा उद्धार

परी वत्साचेनि वोरसे । दुभते होय घरोद्देशे ।
जाले पांडवाचेनि मिषे । जगदुद्धरण ।। १४६७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – परंतु वासराच्या प्रेमाने लागणारे गायीचे दुभते, जसे घरातील सर्व माणसांच्या उपयोगास येते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला.

बागायतदार शेतकरी स्वतःच्या शेतीसाठी पाण्याची सोय करतो. शेततळे किंवा विहीर खोदतो. त्यातील पाण्यावर बागायतदाराची शेती फुलते पण त्या बरोबरच त्या विहीरीच्या पाण्याचा लाभ गावातील इतरांनाही होतो. पाणी टंचाईच्या काळात ही विहीरच गावाचा आधार बनते. शेतीसाठी खोदलेली विहीर केवळ त्या बागायतदारापूरती मर्यादित न राहाता ती समस्त गावाची तहान भागवते. कृती एकासाठी होते पण त्याचा लाभ मात्र सर्वांना होतो. कोणतीही गोष्ट करताना याचा विचार जरूर करावा. ती कृती सर्वांच्या फायद्याची ठरेल. सर्वांचा उद्धार करेल असे नियोजन त्यात असावे म्हणजे ती कृती अमरत्व प्राप्त करून देईल.

लढण्याचा आत्मविश्वास गमावून बसलेल्या अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली. त्याचा आत्मविश्वास वाढावा अन् तो लढण्यासाठी तयार व्हावा हा त्या मागचा उद्देश होता. पण हे गीतेचे तत्त्वज्ञान एकट्या अर्जुना पुरते मर्यादित नाही तर समस्त मानवाला ते उपयुक्त असे आहे. स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलेल्या, जीवनात नैराश्य आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते उपयुक्त आहे. याचा लाभ त्यांनीही घ्यायला हवा. या तत्त्वज्ञानाने समस्त मानवजातीचा उद्धार करण्याचा विचार भगवंतांनी ठेवला आहे. विश्वाच्या कल्यानाचे हे तत्त्वज्ञान आहे. अर्जुन येथे केवळ निमित्तमात्र आहे. भगवंतांना जगाचा उद्धार करायचा आहे यासाठी त्यांनी हे गीतेचे तत्त्वज्ञान सांगितले आहे.

मधमाशी स्वतःसाठी मध गोळा करते. स्वतःसाठी ते मधाचे पोळे बांधते. यावर तिचे कुंटुबही उपजिविका करते. या मधाच्या पोळाचा लाभ मात्र इतर सर्वांनाचा होतो. आपली विचारसरणी ही अशा प्रकारची असावी. कोणतीही गोष्ट स्वतःसाठी करत असताना त्याचा लाभ सर्वांना होईल असे पाहावे. यातून सर्वांचेच कल्याण होईल. उद्धार होईल.

यंदाच्यावर्षी भात जनुक बँकेचे संरक्षक सत्यनारायण बेलेरी यांना पद्मश्रीने सन्मानित केले. दक्षिण कन्नडपासून पाच किलोमीटर अंतरावर केरळमधील कासारगोड येथील नेट्टानिगे गावातील हे शेतकरी आहेत. त्यांनी भाताच्या विविध ६५० जातींचे संवर्धन केले आहे. २००८ मध्ये त्यांनी स्वतःच्या शेतीसाठी पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन सुरु केले. सत्यनारायण यांनी 100 ग्रॅम बियाण्यांपासून मिशनची सुरुवात केली. प्रथम त्यांनी केरळमधून आणि नंतर देशभरातून विविध भाताच्या जातींच्या बिया गोळा केल्या. सर्वप्रथम राजकायमे या भाताच्या जातीचे संवर्धन करण्याचा प्रयोग सत्यनारायण यांनी केला. हे बियाणे छोट्या जागेवर वाढविण्याची आवड त्यांना लागली. केरळमधील विविध ठिकाणांहून भाताच्या विविध जातीची अशी बियाणे गोळी केली. वेगवेगळ्या रंगाच्या, वेगळ्या चवीच्या, बटू आणि लांब गवताच्या, कमी आणि दीर्घ कालावधीच्या आणि विविध हवामानाच्या परिस्थितीत वाढणाऱ्या या भाताच्या जातींची ही बियाणे होती. सध्या अशा सुमारे ६५० हून अधिक जातींचे संवर्धन त्यांनी केले आहे. आता या त्यांच्या कृतीचा लाभ देशभरातील कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांना होत आहे. अवघ्या २५ सेंट जमिनीवर त्यांचा हा प्रयोग आहे पण याचा लाभ आता अनेकांना होतो आहे. औषधी गुणधर्म असणाऱ्या काही भाताच्या जातींचे संवर्धनही सत्यनारायण यांनी केले आहे. संवर्धित केलेल्या जातीमधील इडिकुणी ही जात पुरामध्ये तग धरू शकते तर क्षारपड जमिनीमध्ये येऊ शकणाऱ्या मनिला या जातीचे संवर्धनही त्यांनी केले आहे. विशिष्ट चवीच्या, सुगंधीत भाताच्या जातींच्या लागवडीचे संवर्धनही त्यांनी केले आहे. शिवम आणि त्रिनेत्रा या भाताच्या जातीही सत्यनारायण यांनी विकसित केल्या आहेत. आता ही त्यांची कृती इतरांनाही लाभदायक ठरत आहे. असा उद्देश ठेवून आपण कार्य करायला हवे.

स्वतःसाठी केलेली कृती इतरांनाही लाभदायक ठरेल असा विचार ठेवून कार्यरत राहायला हवे. या कृतीत आपण फक्त निमित्त मात्र आहोत हेही विसरता कामा नये. स्वच्या विकासात जगाचा उद्धार आहे हे लक्षात घ्यायला हवे.

Related posts

Videos : श्री अंबाबाईची विविध रुपातील पुजा

युवकांना सक्षम करण्यासाठी भगवान बुद्धांची शिकवण : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ओव्हरस्पीडींग प्राणघातकच …

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More