मराठी भाषेतील अशाप्रकारचे जिल्हास्तरीय कातळशिल्पांचा अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पहिलेच पुस्तक असून पुस्तकाच्या एकंदरीत मांडणीतून सिंधुदुर्गातील कातळशिल्पांचा उलगडत जाणारा प्रवास व त्यांचे महत्त्व लक्षात येते.
स्मिता गीध
कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती बघता तेथील जीवनशैली आणि प्राचीन इतिहासाबद्दल आपल्याला कायमच कुतूहल वाटत आले आहे. गेल्या काही वर्षांत तेथे सापडलेल्या अतिप्राचीन अशा कातळशिल्पांचेही असेच आहे. आपल्याला आत्तापर्यंत माहित असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास अश्मयुगापर्यंत मागे नेऊन ठेवण्याचे कार्य ही कातळशिल्पे करतात. केवळ कुतूहलातून निर्माण झालेली ही आवड त्यात कातळशिल्पे शोधण्यापासून त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यापर्यंतचा कौतुकास्पद प्रवास सतीश लळीत यांनी ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ या पुस्तकात सविस्तर मांडलेला दिसतो.
हा अखंड शोध मांडताना पुस्तक सात प्रकरणात विभागलेले दिसते. पहिल्या प्रकरणात लळीत यांच्या या प्रवासाची सुरुवात व त्या अनुषंगाने पुरातत्वशास्त्राची ओळख का व कशी झाली हे सांगितलेले आहे. अगदी सामान्य वाचकाला समजेल अशा भाषेत असलेल्या ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात लेखकाला उमगलेल्या भाषेत प्रागैतिहासिक पुरातत्त्वशास्त्राची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. पाषाणकला वा रॉक आर्ट या वर्गात कातळशिल्पांचा समावेश होतो हे सांगत असतांना लेखकाने जागतिक व भारतीय स्तरांवरील उदाहरणे देऊन अश्मयुगातील समाजरचना, मानवी जीवनाचा उलगडा तिसऱ्या प्रकरणात केलेला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दोन प्रकरणात अनुक्रमे सिंधुदुर्गातील सापडलेल्या पहिल्या हिवाळे येथील सड्यावरील, कुडोपी येथील बाहुल्यांचे टेंब येथील समूह व देवगड, मालवण तालुक्यात सापडलेल्या कातळशिल्पांचा सविस्तर आढावा मांडलेला आहे.
सहाव्या प्रकरणात सिंधुदुर्गातील या सर्व कातळशिल्पांचा उद्देश व अर्थ समजून घेतांना या शिल्पांचे तत्कालीन मानवी आयुष्याशी निगडीत असलेले सामाजिक, वैयक्तिक व धार्मिक संबध उलगडण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला दिसतो. हे करत असताना या शिल्पांच्या निर्मिती नवाश्मयुगात झाल्याचा लेखकाने अंदाज बांधलेला आहे. सातव्या व शेवटच्या प्रकरणात शास्त्रीयदृष्ट्या ह्या कातळशिल्पांचा अजून खोलवर जाऊन संशोधनाची गरज आहे हे सांगताना भविष्यात जतन व संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविलेल्या आहेत. पुस्तकांत शेवटी दिलेल्या दहा परिशिष्टांमध्ये लेखकाची कातळशिल्पांवर आतापर्यंत झालेली प्रकाशने तसेच त्यांच्या ह्या प्रयासाची इतरांनी घेतलेली दखल असे लेख दिलेले आहेत. यावरून लेखकाचा आत्तापर्यंत कातळशिल्पांबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नही लक्षात येतो.
मराठी भाषेतील अशाप्रकारचे जिल्हास्तरीय कातळशिल्पांचा अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पहिलेच पुस्तक असून पुस्तकाच्या एकंदरीत मांडणीतून सिंधुदुर्गातील कातळशिल्पांचा उलगडत जाणारा प्रवास व त्यांचे महत्त्व लक्षात येते. फक्त सामान्य वाचकच नव्हे तर पुरातत्वशास्त्र, पाषाण कला, कातळशिल्पे या विषयात अभ्यास व संशोधन करणाऱ्यांसाठी हे पुस्तक महत्त्वाचा संदर्भ ठरू शकते.
पुस्तकाचे नाव – सिंधुदुर्गातील कातळशिल्पे
लेखक – सतीश लळीत
पृष्ठे – 156, किंमत- 300 रुपये. (टपालखर्चासह. 300 रुपयात टपालाने घरपोच.)
पुस्तकासाठी संपर्क – 9422413800 या क्रमांकावर व्हॉटस्अपवर आपला पूर्ण पत्ता पिनकोडसह पाठवा