September 15, 2024
Interview of Javed Akhatra in International Film Festival
Home » आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे आणि दोन-चार लोकांमुळे संपू शकत नाही – जावेद अख्तर
काय चाललयं अवतीभवती

आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे आणि दोन-चार लोकांमुळे संपू शकत नाही – जावेद अख्तर

आपल्या देशाचा जिवंत असलेला आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान – जावेद अख्तर

सेल्फ सेंसरशिपमुळे स्वतःची मूल्ये बदलली जायला नको – जावेद अख्तर

छत्रपती संभाजीनगर : आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे आणि दोन-चार लोकांमुळे संपू शकत नाही. ती चालत आहे आणि कायम चालत राहील. या देशाचा एक आत्मा आहे, ज्याला कोणीही मारू शकत नाही. आणि हाच जिवंत असलेला आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार व संवादलेखक पद्मभूषण जावेद अख्तर यांनी नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केले.

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या महोत्सवात जावेद अख्तर यांची तरुण निर्माता-दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी प्रकट मुलाखत घेतली, त्यावेळी अख्तर बोलत होते. प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक अशोक राणे, कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी, संयोजक नीलेश राऊत, कवी गीतकार दासू वैद्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लोकांनी प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहायला हवं

अख्तर पुढे म्हणाले, आपला समाज सध्या एका वळणावर उभा आहे आणि तिथून पुढे काय असणार आहे हे नीट दिसत नाही आहे. समाजवादी काळात सामान्य लोकांचं भलं करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. ते काही प्रमाणात पूर्ण झालं, काही नाही झालं. त्यानंतर आर्थिक उदारमतवाद आला. तिथेही लोकांचं भलं करण्यासाठी काही योजना आणण्यात आल्या. सामान्य लोकांचं भलं करण्याचा आव त्यात आणला गेला असला तरी त्यात हाव आणि व्यक्तीवादच बोकाळला गेला. प्रत्येकजण आपला स्वार्थ शोधतोय. मला हे समजत नाही की मी स्वतःसाठी कितपत जगतोय, माझ्या माणसांसाठी किती जगतोय? समाजासाठी, देशासाठी किती जगतोय? यातून समाज गोंधळला आहे. जेव्हा आम्ही ते दाखवण्याचा, जगण्याचा प्रयत्न करतो, जे आम्ही प्रत्यक्षात नाही आहोत, तेव्हा आम्ही अतिशयोक्ती करत असतो. आम्ही स्वार्थी झालो आहोत, पण आम्हाला दाखवायचं आहे की आम्हाला देशाची खूप पर्वा आहे. मग ती गोष्ट आम्ही वाढवून सांगतो. लोकांना पूर्वीही आपल्या देशावर प्रेम होतं, पण तेव्हा कोणी आजच्यासारखं देशभक्तीचं नाटक करत नव्हते. आता एकीकडे देशभक्तीचं प्रदर्शन मांडलं जात आहे आणि दुसरीकडे स्वार्थाचा बाजारही मांडला जातोय. आता ज्या लोकांनी प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहायला हवं तेच जराशी संधी मिळताच त्यांनाच सामील होत आहेत. पण काही थोडे लोक असेही आहेत जे विरोध करतात, त्रास सहन करतात. पण त्यांना काही करता येत नाहीये कारण सोशल मीडियावर दिवसरात्र जो प्रचार सुरू आहे, जे सांगितलं जात आहे, दाखवलं जात आहे, त्यांत लोकांना काही चुकीचं वाटत नाहीये. उलट ते मान्य करून आपला झाला तर फायदाच होईल असं लोकांना वाटतं. तर अशी ही विचित्र परिस्थिती सध्या सुरू आहे, पण त्यामुळे निराश होण्याचं काही कारण नाही. कारण काळ ही मोठी वस्तू आहे. त्याचा आवाका मोठा असतो. आम्हाला हे सारं महत्त्वाचं वाटतं, कारण आपण आज जीवंत आहोत आणि आपल्यासाठी आपण महत्त्वाचे असतो. पण हे दिवस देखील जातील. देशाच्या इतिहासात काही दशकांचा अवधीदेखील फार मोठा नसतो. लोक जेव्हा माझ्यासमोर देशाची चिंता करतात तेव्हा मी त्यांना सांगतो की, या देशावर औरंगजेबानं एक्कावन वर्षं राज्य केलं पण तोही या देशाचं काही बिघडवू शकला नाही, हा देश हिंदुस्थानच राहिला. त्यामुळे अशा गोष्टी होत राहतील.

आजचे चित्रपट आजच्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात

भारतीय चित्रपट जगताविषयी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, पन्नास-साठ-सत्तरच्या दशकातील चित्रपट कोणत्याही दर्जाचे असोत, पण त्यांचे हिरो हे सामान्य कामकरी लोकच होते. सध्याच्या चित्रपटातील हिरो हे श्रीमंत कुटुंबातील असतात आणि त्यांना समाजातील, देशातील प्रश्नांशी काही देणंघेणं नसतं. त्यांचे फक्त वैयक्तिक प्रश्न असतात. आजचे चित्रपट हे श्रीमंतांचे असतात, श्रीमंतांसाठीच बनवले जातात. त्यात गरीब माणसाला स्थान नसतं. हिंसात्मक चित्रपट चालतात कारण समाजातच हिंसाचार आहे. हिंदी चित्रपट हे समाजाच्या एकत्रित स्वप्नांतून तयार होतात. आजचे चित्रपट आजच्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आजच्या सिनेमातील खलनायक हा स्पष्ट नाही, कारण नायकच क्लियर नाही. समाजातच चांगला कंटेंट नसेल तर चित्रपटातही तो येणार नाही. अनुभव सिन्हा यांचा ‘आर्टीकल १५’ हा मागील तीन-चार दशकांतील सर्वोत्तम चित्रपट आहे, असं कौतुकही त्यांनी यावेळी केलं.

भाषेवर जे राजकारण सुरू आहे ते बोगस

देशातील सध्याच्या वातावरणाविषयी बोलताना अख्तर म्हणाले की, आजच्या वातावरणासाठी फक्त सरकारलाच दोषी ठरवणे चुकीचे राहील. यामागे समाजातील, देशातील अनेक गोष्टी एकाचवेळी जबाबदार असतात. भाषेची शुद्धता करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. भाषेचं काम आहे की, मी काही तरी म्हटलं ते तुम्हाला समजायला हवं आणि तुम्ही काही म्हटलं ते मला समजायला हवं. तेच जर होत नसेल तर अडचण होईल. भाषेची शुद्धता ही फक्त एक मिथ आहे. भाषेला शुद्ध करण्यासाठी तुम्ही सर्व शब्द काढले तर ती भाषाच उरणार नाही. कोणतीही भाषा शब्द बाहेर काढून वाढत नाही, तर शब्द स्वीकारून मोठी होत असते. त्यामुळे भाषेवर जे राजकारण सुरू आहे ते बोगस आहे.

भाषा ही पाण्यासारखी असते, ज्या भांड्यात टाकू तसाच आकार ती धारण करते. गरीबांची भाषा कडू आणि हिंस्त्र असते, कारण त्यांच्या आयुष्यातही कडवटपणा आणि हिंस्त्रताच असते. भाषा ही अशी खाली खाली उतरत आहे. भाषेतच आपली संस्कृती, आपली वारसा असतो. भाषेपासून दुरावणं म्हणजे आपल्या मूळांपासून दुरावणं असतं. ज्या गोष्टीवर आपलं प्रेम नसतं त्या गोष्टी वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. तुम्ही कोणत्या भाषेत विचार करता हे खूप महत्त्वाचं असतं, असेही ते पुढे म्हणाले.

सेल्फ सेंसरशिपमुळे स्वतःची मूल्ये बदलली जायला नको

सेंसरशिपविषयी बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक विचारी गीतकार, लेखक हा सेल्फ सेंसरशिप करत असतोच. ती असायला हवीच. पण सरकार नाराज होईल, कोणी धर्मांध व्यक्ती माझ्यावर नाराज होईल म्हणून जर कोणी काही लिहित नसेल तर ते योग्य नाही. सेल्फ सेंसरशिपमुळे स्वतःची मूल्ये बदलली जायला नको. आपलं म्हणणं मांडायलाच हवं, मग ते शब्द कसे हवेत त्याचा प्रत्येकानं विचार करायला पाहिजे.

या जगात जे काही होते त्या पाठीमागे अर्थशास्त्र असते. हिंदुस्थान हा श्रीमंत देश असून त्याने खूप प्रगती केली आहे असे आपल्याला सांगितले जाते. आणि त्याबरोबर आपल्याला हेही सांगितले जाते की, या देशातील ८० कोटी नागरिकांना ५ किलो अन्नधान्य द्यावे लागते. ही कसली प्रगती आहे, विकास आहे, असा प्रश्न अख्तर यांनी यावेळी उपस्थित केला.

वेरुळला मी आज पहिल्यांदा गेलो. हे सगळे वैभव पाहून मी मनापासून भारावलो. हा अनुभव खूप वेगळा होता. मला विचार पडला की, हे काम कोणी केलं असेल? हे काम पैसे घेऊन, वेठबिगारीनं झालेलं नसेल. याच्यामागे एक जिद्द असेल की, हा पर्वत कापून आपण इथं काहीतरी उभारूयात. हे ज्यांनी बनवले आहे, त्यांच्या अनेक पिढ्यांनी यासाठी काम केलेले असून प्रेम, संस्कार, संस्कृती आणि एका वचनबद्धतेतून याची निर्मिती झाली आहे. यातला एक हजारावा अंश जरी आपल्यामध्ये असेल तर हा देश आपण अतिशय सुंदर करू शकतो, असेही जावेद अख्तर शेवटी म्हणाले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ट्रॅडिशनल हर्बल ड्रग्ज पुस्तकातून आदिवासी वैदुंच्या ज्ञानाचे संवर्धन

एम. एस. वाडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे शतक

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading