March 28, 2024
Value article by Sunetra Joshi
Home » किंमत…
मुक्त संवाद

किंमत…

काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी मिळवता येत नाही हे खरे पण जे सोडणार आहोत त्याची किंमत जे मिळवणार त्या पेक्षा जास्त नाही ना एवढे तरी विचारात घ्यायला हवेच..मधेच कधी क्षणभर थांबून मागे वळून पण बघायला हवे. खूप पुढे गेल्यावर मग काहीच हातात रहात नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असतेच.

सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

किंमत म्हटले की सहज आठवते आपण कुठेही दुकानात जातो. एखादी वस्तू बघतो. आवडली की किंमत विचारतो. ती पटली आणि खिशाला परवडणारी असेल तर खरेदी करतो. कधी किंमत नाही पटली तर म्हणतो छे.. एवढे पैसे देऊन घेण्यासारखे नाही… आणि सोडून देतो. माणसाला प्रत्येक गोष्टीची किंमत करण्याची वाईट सवय असते.

आणि हीच किंमत माणूस मग माणसांची नात्याची सुध्दा करू पाहतो. जो माणूस आपल्या कामाचा असेल.. ज्याची आपल्याला गरज असेल किंबहुना ज्याच्या मुळे आपला काही फायदा होणार असेल अशा माणसाची त्याला किंमत असते. त्याला तो सांभाळून घेतो. आणि ज्याची गरज नाही त्याची किंमत वेगळ्या अर्थाने करून त्याला टाकून देतो..

पण ही किंमत कधी कधी महागात सुध्दा पडते. कारण वेळ गेल्यावर कशाची किंमत कळून काही फायदा नसतो. जसे की लहानपणी आपल्याला लवकर मोठे व्हायचे असते पण जेव्हा मोठे होतो जगात टक्के टोणपे खातो तेव्हा बालवयातील मजेची किंमत कळते. आणि मग लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा… म्हणत हळहळतो. आणि मग त्याची किंमत कळते.

तरुणपणी खूप पैसा मिळविण्यासाठी मरमर काम करतो. तेव्हा माणसांची तसेच नात्यांची किंमत नसते असे नाही पण जाणवत नाही. आज तर सर्रास पैसा फेकला की हवे ते मिळते अशी भावना सगळीकडे बघायला मिळते. अगदी आईवडीलांची सुध्दा किंमत ते पैशाने करू पाहतात. पण मग हळूहळू जसजसे वय वाढत जाते तेव्हा लक्षात येते की आपण त्या सगळ्याची किती मोठी किंमत चुकवली आहे. कधी कधी एखादे वाईट काम कुणी करत असते. क्षणभराचा आनंद त्यात मिळत असेलही पण त्यासाठी पुढे त्याची जबर किंमत मोजावी लागते. परतीचा मार्ग उरत नाही. तेव्हा चांगले कर्म करण्याची किंमत ओळखा.

काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी मिळवता येत नाही हे खरे पण जे सोडणार आहोत त्याची किंमत जे मिळवणार त्या पेक्षा जास्त नाही ना एवढे तरी विचारात घ्यायला हवेच..मधेच कधी क्षणभर थांबून मागे वळून पण बघायला हवे. खूप पुढे गेल्यावर मग काहीच हातात रहात नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असतेच. काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी सोडावे लागतेच. म्हणजे एका ठीकाणी भर करायची तर दुसरीकडे खड्डा करुनच करता येते. पण आपल्याला कशाची जास्त गरज आहे म्हणण्यापेक्षा कशाने समाधान मिळेल हे सुद्धा कळायला हवे. नाहीतर मग सगळे असून ते नसेल तर पुन्हा हळहळ शिल्लक राहते.

वेळेची किंमत सुध्दा करायलाच हवी. कारण ती एकदा निघून गेली की पुन्हा येत नाही. तसेच आयुष्य हे अनमोल आहे. असे म्हणतात की चौऱ्यांशी लक्ष योनी फिरून झाल्यावर जर पदरी काही पुण्य असेल तर मनुष्य जन्म मिळतो. मग छोट्या मोठ्या अडचणींना घाबरून आपण ते संपविणे कितपत योग्य आहे ? त्याची किंमत कमी करू नका. सुखाने जगण्यासाठी प्रयत्न करा. तसेच इतरांना सुखी करण्याचा पण प्रयत्न करा. आयुष्याची किंमत जाणा. आयुष्य असे कवडीमोल करू नका.

Related posts

नैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारू – नरेंद्र मोदी

तुळशीची काळजी कशी घ्यायची ?

उन्हाळी मिरचीमधील फुलगळ अशी रोखा…

Leave a Comment