March 30, 2023
Madhya Pradesh Marathi Sahitya Academy award
Home » मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमीच्या पुरस्कारांचे वितरण
काय चाललयं अवतीभवती

मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमीच्या पुरस्कारांचे वितरण

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. महाराष्ट्राबाहेरही मराठीचा गौरव केला जातो. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये मराठी साहित्य अकादमीतर्फे या निमित्ताने भा. रा. तांबे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पैठण येथील संदीप शिवाजीराव जगदाळे यांचा कवितासंग्रह असो आता चाड, परभणी येथील बा, बा. कोटंबे यांच्या कदाचित या कादंबरीस, नाट्य लेखन सुपारी डॉटकॉम साठी पुणे येथील योगेश सोमण, मराठी कथा संग्रह खुरपंसाठी सुचिता घोरपडे यांना सन्मानित करण्यात आले.

मध्यप्रदेश राज्य, संस्कृती विभागाच्या मराठी अकादमीद्वारे हा गौरव करण्यात आला. 51,000 रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून जनसाहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र जामदार तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात मुंबईचे प्रसिद्ध गायक निनाद आजगावकर आणि साथीदार यांनी फुलोरा अंतर्गत मराठीतील बाबुजींची गाणी आणि अभंग रचना सादर केल्या. अकादमी के संचालक उदय परांजपे यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सुपारी.com

योगेश सोमण लिखित हे नाटक वर्तमान न्यूज मीडियावर व्यंग-ताशेरे ओढणारे आहे. आज समाचार माध्यमांवर लोकांचा विश्वास कमी होत चाललेला आहे. पत्रकारिता एक व्यवसायाचे रुप होत चालले आहे. न्यूज चॅनल्स वार्ता दाखवण्या ऐवजी मनोरंजन करू लागले आहेत. अश्याच एका पत्रकाराची कथा या नाटकात दाखवली आहे. टी. आर. पी. साठी तो पत्रकार एक भयावह कथानक निर्मित करतो आणि स्वतःची सुख-शांती गमावून बसतो. इतपत की आपले आयुष्य देखील पणाला लावून देतो. नाटकात आयुष्यातील वास्तविक राजकारण आणि कॉर्पोरेट विश्वाची वास्तविकता दाखवली आहे.

कदाचित

बा.बा. कोटंबे यांची कदाचित ही कादंबरी २०१९ मध्ये प्रकाशित झाली. स्त्री संघर्षाचा परिपाक ‘कदाचित’ समाजात नववधूला सासरकडून होणान्या जाचाच्या मूळावर भाष्य करणारी ही प्रातिनिधिक परंतु वास्तव कथा आहे. माहेर, सासर सोडून परांगदा झालेल्या नायिका ‘राधा’ या तरुणीच्या संघर्षमय, नाट्यमय घटनांची श्रृंखला ह्यात चित्रित केलेली आहे. स्त्रीयांच्या एकटेपणाची सल नि समाजातील विकृतीचा तरुण व एकट्या बाईकडे पाहण्याचा दृष्टीकोन यावर व्यवस्थेला दिलेली चपराक आहे. अबलेचं सबलीकरण या मूलाधारावर कादंबरीचा ईमला बांधला आहे. स्त्री म्हणून शक्यता असणाऱ्या अडचणींचा करकचून बांधलेल्या मोळीचा भारा असलेली. उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला समर्थपणे दिलेली एकाकी यशस्वी झुंज हे कादंबरीचे बलस्थान आहे.

असो आता चाड

संदीप शिवाजीराव जगदाळे यांची कविता माती, नाती आणि भवतालाविषयीची वेगळी जाण निर्माण करणारी आहे. पहिल्याच कवितासंग्रहरूपात जाणिवा आणि आविष्काराच्या अंगाने वेगवेगळ्या शक्यता शोधल्या आहेत. धरणग्रस्त विस्थापितांचे एक वेगळे अनुभवविश्व मराठी कवितेत यानिमित्ताने आले आहे. स्थलांतर आणि विस्थापित होणाऱ्या समूहाची सामूहिक वेदना त्यात आहे. हे विस्थापन केवळ जागा बदलाचे नाहीतर परंपरा, पर्यावरणीय भोवताल व संस्कृती संक्रमणाचे व नंतरच्या पिढीवर झालेला परिणाम व्यक्त करणारे आहे. त्याची धग वर्तमानाकडून भूतकाळाकडे येऊन जाणारी आहे. पाण्याखाली जाणारे गाव, त्या गावाच्या परंपरा, त्यांनी जपलेली कृषीजन संस्कृती यांचे या कवितेला संदर्भ आहेत. अगोदरच्या पिढीने विस्थापनाचे रुद्ररूप अनुभवले आहे. त्याच्या अनेक विविध छटा संदीप जगदाळे यांच्या कवितेत येतात. त्यात व्यवस्थेची मग्रुरी, शासकीय अनास्था व सामाजिक संकोच याविषयीच्या मर्यादा माणूसपणाच्या आड येत असल्याची भावना ही कविता व्यक्त करते. तिला समकालीन सामाजिक, सांस्कृतीक परिप्रेक्ष्याचे अनेक संदर्भ आहेत. हद्दपार झालेल्या व्यक्तीने, समाजाने जे भोगले आहे त्याच्या विषयीचे हे तटस्थ चिंतन आहे. गाव, कुटुंब, शिक्षण व व्यवस्थेच्या संक्रमणाचा हा लेखाजोखा आहे.

खुरपं

शेतीसंस्कृतीचे व ग्रामजीवनाचे चित्रण करणारी सुचिता घोरपडे यांची कथा वैशिष्टपूर्ण आहे. शेतीसमाज स्त्री जगत आणि लोकसमजुती या निबंधातून ती आकाराला आली आहे. गावगाड्यातील विविध प्रकारच्या जीवनानुभवाबरोबर निसर्ग आणि मानवनिर्मित दुश्यानुभवाचे चित्रण या कथेत आहे. भारतीय साहित्यात समाजाचे स्त्री लिखितवाचन क्वचितच पाहावयाला मिळते. या पार्श्वभूमीवर या कवेतील विपुलतादर्शक स्त्रीचित्रणात ग्रामीण समाजातील स्त्री व पाकेपणाच्या शोकान्तकथांची पाश्वभूमी आहे. पितृ सावलीला पारख्या झालेल्या आणि मायपणाच्या उरेच्या व्याकुळ चिताकांनी ती आकाराला आली आहे. ‘पदराला टुक बांधून उंबरा ओलांडलेल्या मायलेकीच्या वनवासकांनी या समाजविणास वेगळी परिमाणे लाभतात. तसेच गावगाड्यातील लोकसमजुतीचा वैशिष्ट्यपूर्ण कल्पनाविष्कार देखील या कवेत आहे. व्यक्तिचित्रणात्म कथावकाशातून ग्रामीण जीवन न्याहळण्याची त्यांची पद्धत आहे. या कक्षेतील पात्रे धनस्वरूपाची आहेत. मात्र स्त्रीपात्रांना नकारात्मक स्वरुपात बांधून ठेवले आहेत पुरुषपात्रांनी.

हिरव्या रंगानं चितारलेले गाव, राजन मेरीच्या डोंगरमाथ्याचा स्थळावकाश तारेच मराठीकन्नड सीमासानिध्य परिसराने या कथावकाशाला वेगळे रंगरूप प्राप्त करून दिले आहे. कथावकाशातील जिज्ञासापूर्ण उत्कंठावर्धक वाणनाट्य व वातावरणनिर्मितीच्या कुशलतेने या कथेत कथनरंगत आणली आहे. अनोखी कथनशैली, प्रादेशिक बोली उच्चारातील वाकवळणे मूलरूप तसेच तीन चार शब्दांच्या आटीव वाक्यसरणीच्या वाहत्या गद्यकथनशैलीने तिला आकार प्राप्त झाला आहे. ‘माळी’ रोहताक’ चडूंत डबरणी’, ‘किनळा’ अशा प्रदेशासमाज शब्दघडणीचा समाजसंस्कृतिलिंगभावाचा भाषावकाश या कथेत आहे. तसेच सत्तरीच्या दशकातील ग्रामीण कथावकाशाची काहीएक सावलीदेखील या कथारूपावर आहे. भूमीची ओढ, त्यातली अभावग्रस्तता, सुखदुःखे लोकधारणा तसेच स्त्रीजीवनाकडे पाहण्याच्या अनोख्या दृष्टीमुळे सुचिता घोरपडे यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

Related posts

पुण्यभूषण फाउंडेशन देणार दिवाळी अंकांना पुरस्कार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पुजा…(व्हिडिओ)

मातृमंदिरचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

Leave a Comment