December 13, 2024
The Guru expresses himself only by the devotion of the devotee
Home » भक्ताच्या भक्तीपोटीच व्यक्त होतात गुरू
विश्वाचे आर्त

भक्ताच्या भक्तीपोटीच व्यक्त होतात गुरू

म्हणौनि जिव्हारीचे गुज । सांगतसें जीवासि तुज ।
हें अनन्यगतीचे मज । आथी व्यसन ।। १३४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – म्हणून जिव्हाळ्याची गुप्त गोष्ट तू जो माझा जीव, त्या तुला मी सांगत आहे. अनन्य असणाऱ्या भक्ताचे हें मला वेड आहे.

आयुष्यात अनेक गोष्टी आपण गुप्त ठेवत असतो. सर्वच गोष्टींचा उलघडा आपण करत नसतो. या गोष्टी काही चांगल्या असतात, तर काही वाईट असतात. काही गोष्टी आपण आपल्या पत्नीलाही सांगत नाही. किंवा पत्नीही आपल्या काही गोष्टी त्याच्या पतीला सांगत नाही. काही गोष्टी आपण आपल्या मुलांपासूनही लपवून ठेवतो. आपले कितीही प्रेम असले, तरीही आपण अशा गुप्त गोष्टी लपवून ठेवतोच. असे आपण का करतो ? आपल्या इतक्या जवळच्या व्यक्तीवरही आपला विश्वास नसतो का ? पण असे घडत असते. हे प्रत्येकाच्या आयुष्यात असते.

आपण व्यक्त झालो तर आपले काय नुकसान होते हेच समजत नाही. उलट प्रेमामध्ये सर्व काही एकमेकांशी सांगितले जाते. दोघांतील सर्व गोष्टी दोघांनाही माहीत असतात. अशाने या दोघातील विश्वास, प्रेम अधिक दृढ होत असतो. उलट आपल्या मनाला सलणारी एखादी गोष्ट आपण व्यक्त केली तर आपलेच मन हलके होते. आपणाला होणारा त्रास कमी होतो. यातूनच विश्वासाचे, प्रेमाचे नाते अधिक घट्ट होते. मैत्रीमध्ये असेच नाते असते. तीच खरी मैत्री असते.

आई सुद्धा मुलांना सर्वच गोष्टी सांगते असे नाही. काही गोष्टी या नात्यातही गुप्त ठेवल्या जातात. यामागे अनेक कारणे असू शकतात. सुरक्षेचा, मुलांच्या प्रगतीचा विचार असू शकतो. पण अशा गुप्ततेमुळेही संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच मन मोकळे ठेवून गुप्त गोष्टी विश्वासू व्यक्तीसमोर व्यक्त केल्या जाव्यात. यातून प्रेम, विश्वासाचे नाते दृढ होत असते. हं पण शोषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

गुरु-शिष्याचे नाते हे भक्तीचे, प्रेमाचे, विश्वासाचे नाते असते. यामुळे शिष्य गुरुंच्या जवळ व्यक्त होत असतो. या व्यक्त होण्यातून शिष्याच्या मनातील दुःख हलके होत असते. जेंव्हा मन हलके होते तेव्हा मनाची प्रगती होते, विकास होतो. गुरुजवळ व्यक्त होताना समर्पणाचा भाव असतो. तसे गुरू सर्व गोष्टी आत्मज्ञानाने जाणतही असतात. शिष्याच्या व्यक्त होण्यात शिष्याचीच प्रगती होत असते. मनोविकासासाठी याची गरज असते.

शिष्य जसा गुरुजवळ व्यक्त होत असतो. याच विश्वासाच्या, भक्तीच्या नात्यातून गुरूही शिष्याजवळ व्यक्त होत असतो. शिष्याच्या भक्तीपोटी, प्रेमापोटी गुरुही जिव्हाळ्याच्या गुप्त गोष्टीचे ज्ञान शिष्याला करून देत असतो. घरातील पत्नी, मुलगा, आईवडील हे आपल्या सर्वात जवळचे असतात. यांच्याजवळही गुरू व्यक्त होत नाही. असे हे ज्ञान केवळ अन् केवळ भक्ताच्या भक्तीपोटी गुरु शिष्याला सांगत असतो. शिष्याजवळ व्यक्त करत असतो. यासाठीच भक्ती महत्त्वाची आहे.

गुरु अशा भक्ताच्या, शिष्याच्या शोधात असतात. हे गुह्य ज्ञान देण्यासाठी ते शिष्याचा शोध घेत असतात. हे ज्ञान केवळ भक्तीने प्राप्त होते. शिष्याच्या भक्तीपोटी गुरु त्याच्याजवळ व्यक्त होत असतात. अशी भक्ती करणाऱ्या शिष्याचा शोध गुरु घेत असतात. त्यासाठीच त्यांची भटकंती सुरू असते. असा शिष्य शोधण्याचे त्यांना वेड असते. गुरुंनाही शिष्य शोधावा लागतो. खरा भक्त शोधण्याचे वेड गुरूंना लागलेले असते. असे हे गुरु-शिष्याचे नाते केवळ भक्ती अन् प्रेमाने वृद्धींगत होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading