April 17, 2024
Shivaji Maharaj Jayanti Special article
Home » शिवरायांच्या स्वराज्याची गौरवगाधा !
विशेष संपादकीय

शिवरायांच्या स्वराज्याची गौरवगाधा !

प्रजा सुखी तर राजा सुखी’ या सूत्रानुसार शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राजव्यवस्था निर्माण केल्याचे दिसते. हिंदवी स्वराज्यात काटेकोर जलव्यवस्थापण, शेतसारा माफी, सवलती समृद्ध कृषी व्यवस्थापनातून रयतेचे सर्वाधिक कल्याण साध्यण्याबरोबरच लोककल्याणाची हमी दिली. काळ्या आईची सेवा करणार्‍या शेतकर्‍याना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबून शेती व पूरक व्यवसायांना बाजारपेठा उभारून शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले.
          

डॉ नितीन बाबर,
अर्थशास्त्राचे अभ्यासक,
सहायक प्राध्यापक सांगोला महाविद्यालय, सांगोला

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा, भविष्यवेधी द्रष्टेपणा आणि सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून अद्वितीय कार्य केले आहे. शिवाजी महाराज यांनी जगाला केवळ स्वराज्याच राजकीय तत्त्वज्ञान दिलं नाही, तर खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत करून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला कि जो अखंड रयतेला कल्याणाकडे नेणारा सुखी व संपन्‍न करणारा  ठरला. परंतू आज जागतिकीकरण, बाजारीकरण , सत्तास्पर्धा यातून वाढलेली संपत्तीची लालसा व  पराकोटीची विषमता अशा गुतांगुतीच्या व गंभीर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शिवाजी महाराज यांच्या ध्येयधोरणचे मार्गदर्शक ठरतात.         

शेती, प्रजा, पर्यावरण  याविषयी उदात्त दृष्टीकोन

बखरकार कृष्णाजी अनंत सभासद यांनी म्हटल्याप्रमाणे ,या जातीचा मागे कोणी झाला नाही, पुढे कोणी होणार नाही.’ याची सत्यता आता पदोपदी जाणवू लागली आहे. शिवरायांनी भक्कम अशा लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी  करून त्यांचे आचार-विचार व राष्ट्राच्या जडघडणीतील भूमिका, शासन न्याय व्यवस्था,सामाजिक धोरण त्याचबरोबर लोककल्यानकारी ध्येय धोरणांची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी करत असताना  शेती, प्रजा, पर्यावरण  याविषयी नेहमीच  उदात्त दृष्टीकोन ठेवला. परंतू आज बदलत्या जीवनशैलीमुळे  जागतिकीकरण, बाजारीकरण , सत्तास्पर्धा यातून वाढलेली संपत्तीची लालसा स्वार्थी सामाजिक जीवन, चंगळवादास,  भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे तंत्र पर्यावरणीय साधन संपत्तीची उधळपट्टी बरोबरच पराकोटीच्या विषमतेस कारक ठरतेय. तसेच समाजविघातक विकृती फोफावत असून  नीतिमूल्याचा कमालीचा ह्रास होताना दिसतो. स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्यउत्तर कालखंडात देशातील जनता आपल्या मार्गापासून आज कोसो दूर गेली आहे.       

शिवरायांचे कृषी विषयक धोरण आजही मार्गदर्शक

प्रजा सुखी तर राजा सुखी’ या सूत्रानुसार शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राजव्यवस्था निर्माण केल्याचे दिसते. हिंदवी स्वराज्यात काटेकोर जलव्यवस्थापण, शेतसारा माफी, सवलती समृद्ध कृषी व्यवस्थापनातून रयतेचे सर्वाधिक कल्याण साध्यण्याबरोबरच लोककल्याणाची हमी दिली. काळ्या आईची सेवा करणार्‍या शेतकर्‍याना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबून शेती व पूरक व्यवसायांना बाजारपेठा उभारून शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. कृषी विषयक धोरण हे विविध जाती-धर्माच्या लोकांना रोजगार देणारे, समाज व्यवस्था अबाधित ठेवणारे व शेतकऱ्यांचे कल्याण वाढीबरोबरच  सुखी व संपन्‍न करणारे ठरले. कारण त्यांनी भाजीच्या एका देठावरही मन न दाखविता रास्तपणे व योग्यपणे वागावे. असा शिकस्त घालून दिला. परंतू आजची परीस्थिती पाहीली तर यामध्ये मोठी विसंगती दृष्टीस पडते. एकीकडे बोगस बी -बियाणे , खते औषधे , कृषी खात्यातील सावळा गोंधळ तसेच पीक विमा कर्जमाफी अनूदान वाटप यासारख्या गैरव्यवहार वाढतायेत तर दुसरीकडे  नफा केंद्रीत भांडवल धार्जिणी एकाधिकारी शहरकेंद्रीत स्मार्ट विकासाच्या नादात ग्रामीण भागाकडे अक्षम्य दूर्लक्ष होतेय. विषमता वाढतेय आणि याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना शेतीच चांगली करता येत नाही अशी हाकाटी पिटून मोठ्या भांडवलदारांनी आता शेती केली पाहीजे असा नवमतप्रवाह प्रसृत केला जातोय. ही खेदाची बाब  ठरते. म्हणून शिवरायांच्या कृषी विषयक धोरणाचा फेरविचार आज कालसुसंगत ठरतो.   

स्वंयनिर्भर स्वराज्यांचा विचार आजच्या आत्मनिर्भरतेशी सुसंगत

शिवाजी महाराजांनी  उद्योगांच्या संरक्षणाबरोबरच  व्यापाराच्या वाढीसाठीही  त्यांना तितकीच काळजी होती.  आर्थिक सुबत्तेकरिता हस्तोद्योग  कुटीरदयोग पुरक धोरण स्विकारून  कारागिर कास्तकार व शिलेदार यांना मध्यबिंदू मानून स्वयंनिर्भर अर्थकारणावर भर दिला. राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाय योजना केल्या. त्यामुळे देशी व परदेशी व्यापाऱ्यांनाही  उत्तेजन मिळाले. शिवरायांच्या प्रयत्नांमुळे स्वराज्याचा व्यापार जवळजवळ २५ देशातील व्यापाऱ्यांसोबत सुरु होता. राज्याचा कोषागार जर संपन्न व भरलेला असेल तर त्या राज्याची प्रगती निश्चितच होते. राज्याची व रयतेची आर्थिक स्थिती सुधारते. लढाईमध्ये गनिमाचे हस्तगत केलेला सर्व मुद्देमाल कोषागारात जमा करणे हा मराठी फौजांचा शिरस्ता होता आणि म्हणूनच शिवकालीन  मरगठ्ठा हा प्रगतीवर होता. स्वदेशी वस्तू वापरणे, त्यातून रोजगार निर्माण होणे आणि त्यातूनच सकल राष्ट्राची  आर्थिक उन्नती होते इतके सरळ साधे त्यांचे गणित. पण सध्याच्या काळात वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे देशाची वाढत्या आयातीमुळे व्यापार तूट आणि परदेशी चलनांच्या तुलनेत रुपयाचे घटते मूल्य यासर्व बाबी विचारात घेतल्या तर  एकंदरितच त्यांचे तत्कांलिन स्वंयनिर्भर स्वराज्यांचा विचार आजच्या आत्मनिर्भरतेशी  किती सुसंगत होता लक्षात येते.

स्वराज्यात पर्यावरणपूरक विचार

 छत्रपती शिवरायांनी पर्यावरण आणि माणूस ह्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व ओळखले होते. ‘गड तेथे आमराई, गाव तेथे वनराई’ ! हा नारा आपल्या आज्ञापत्रातून देवून त्याकाळी जंगल संपत्तीचे मोठेपण समजून घेतले. आणि म्हणूनच स्वराज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास त्यांनी होऊ दिला नाही. उलट मुलुखात असलेल्या वनराईची कायम काळजी घेतली. गडकोटांच्या परिसरात वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा ह्या वृक्षांची लागवड करुन आरमार बांधण्यासाठी साग आणि शिसवीचा वापर करीत स्वराज्य हे पर्यावरणपूरक कसे राहील ह्याची सर्वतोपरी काळजी घेतली होती. यावरुन त्यांचा पर्यावरणाविषयीचा उदात्त हेतू स्पष्टपणे दिसून येतो. परंतू आज विकासाच्या नावाखाली वारेमाप वृक्षांच्या कत्तलीमुळे माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे वरदान ठरलेली जंगले नष्ट होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे चक्र बदलले असून कृषी आधारीत उपजीवीका धोक्यात आली असून त्याची किंमत अल्पभूधारक सीमांत शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन मजुर, महिलांना मोजावी लागत आहे.

गड किल्ल्यांचे पर्यावरणपूरक संवर्धन गरजेचे

त्याचबरोबर त्यांच्या गौरवशाली प्रयत्नांची आणि विचारांची एकमेव साक्ष असणाऱ्या गड-किल्ल्यांसारख्या वास्तू लयास जात आहेत. स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिलेल्या  मराठी अस्मितेच्या प्रेरणादायी वारशाचे किंबहुना या गड-किल्ल्यांचे मूळ स्वरूपात जतन करणे, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखणे तसेच या किल्ल्यांची दुरुस्ती, देखभाल तसेच पर्यावरणाचे संरक्षण-संवर्धन  करण्यासाठी सामूहीक प्रयत्नाची गरज आहे.  

लोककल्याणकारी राज्यांची महुर्तमेढ

छत्रपती शिवाजी महाराजांचे राजेपण  हे कोणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही आणि कोणाच्या मेहेरबानीनेही ते त्यांना मिळालेले नव्हते. शिवाजी महाराजांनी  स्वराज्यामध्ये  स्वराज्य म्हणजे स्व:ताचे राज्य !  असा नवा स्वराज्यवाद जागृत करून सर्वच बाबतीत विभिन्न असलेल्या समाजात सर्वांना  सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेच्या समान संधी देणाऱ्या एका आदर्शवत आणि आधुनिक रयतेच्या लोककल्याणकारी राज्यांची महुर्तमेढ त्यांनी रोवली.

एकंदरीतच  त्यांच्या तेजस्वी कार्य कौशल्यावर नेहमीच चर्चा  होताना दिसते. तथापि, त्यांनी जे क्रांतिकारी धोरण राबविले ते अमलात आणण्याबाबत फारशी चर्चा होताना दिसत नाही.  म्हणून त्यांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचे रूपांतर खऱ्या अर्थाने सुराज्यात करावयाचे असेल, तर उपभोगी लालसेस, हव्यासास पायबंद घालून  किमान वाद , स्वराज्य विश्वस्थवृत्ती  वाढविण्यासाठी शिवछत्रपतींच्या हिंदवी विकासाच्या स्वराज्याचा मार्ग  ‘सबका का साथ सबका विकास करणारा ठरतो. त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाबरोबरच खंबीर कृतिशीलतेची गरज आहे.

Related posts

सावध रे सावध…

‘अर्जिया शरदचंद्रजी’ चा शोध लावणाऱ्या संशोधकांचा गौरव

विचाराने विषयांना मारण्यासाठीच शास्त्रीय नियम

Leave a Comment