June 19, 2024
Shivaji Satpute Poem Tumacha Aamach
Home » तुमचं आमचं…
कविता

तुमचं आमचं…

तुमचं आमचं

तुमचं आमचं आता पटायचं न्हाय
दचकुन झोपेतुन उठायचं न्हाय

लबाड तुमचं थोबाड
मारत असते बाता ,
त्याच त्याच उखळात
तोच तोच बत्ता
कोळशानं गिरवता
तुमचाच कित्ता ,
धर्म बांधुन वेशीला
भोगुन घेता सत्ता
खादीघालून तुम्ही नटायचं न्हाय
तुमचं आमचं आता पटायचं न्हाय

दरिद्री नेते
कुबेराचे बाप झाले,
आपआपल्या बिळात
विखारी साप झाले
माणुसकीचा कळवळा
पुरे झाला देखावा,
आम्ही सुध्दा करु आता
गनिमी कावा
अंधारल्या राती भेटायचं न्हाय
तुमचं आमचं आता पटायचं न्हाय

आम्ही असे कलंदर
नका समजु साधे ,
पोटासाठी आम्ही
करीत नसतो वादे
धारदार लेखणीवर
खुर्ची आम्ही फिरवु ,
मस्तीची नशा
झटक्यात जिरवु
आमच्यावर तुम्ही पेटायचं न्हाय
तुमचं आमचं आता पटायचं न्हाय

काळ्या काळ्या मातीचे
आम्ही आहोत मालक,
पोटाच्या भट्टीचे
आम्ही आहोत चालक
आमच्याच घामाचं
तेज तुमच्या चेहर्‍यावर,
आम्ही नाही पेरलं तर
जाल तुम्ही वार्‍यावर
शेजेवर बांडगुळ रेटायचं न्हाय
तुमचं आंमचं आता पटायचं न्हाय

शेतकरी देव आमचा
करु त्याची पुजा,
पालखित मिरवुन
वाजवु आम्ही बाजा !
धुळ त्याच्या पायाची
मस्तकी लावु ,
चारवेळा आरती आम्ही
शेतकर्‍याची गावु
शेतकर्‍याला तुम्ही खेटायचं न्हाय
तुमचं आमचं आता पटायचं न्हाय
दचकुन झोपेतुन उठायचं न्हाय

कवी – शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९

Related posts

जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

Navratri Biodiversity Theme : जैवविविधतेची नारंगी छटा…

माझ्या जगण्याचे पुस्तक – प्रांजळ आत्मकथन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406