December 7, 2023
sixteen-year-old-twitter-thread-hanging
Home » षोडश वर्षीय ट्विटरला थ्रेड चा गळफास ?
संशोधन आणि तंत्रज्ञान

षोडश वर्षीय ट्विटरला थ्रेड चा गळफास ?

सामाजिक माध्यम किंवा ज्याला सोशल मीडिया म्हणून संबोधले जाते त्यात फेसबुक, ,ट्विटर, व्हॉटस्अप, इन्स्टाग्राम यासारख्या अनेक  सुविधा जगभर सर्रास वापरल्या जातात. या सुविधा देणाऱ्या बहुराष्टीय कंपन्यांचे मालक आत्तापर्यंत  एकमेकांशी थेट स्पर्धा करण्याच्या फंदात  पडलेले नव्हते. परंतु अलीकडेच एलन मस्क या ट्विटरच्या निर्मात्याला फेसबुकचा ( मेटाव्हर्स) मालक मार्क झुकेरबर्ग याने थेट  शिंगावर घेतले असून “ट्विटरला” नवोदित “थ्रेडचा” गळफास  बसण्याची दाट शक्यता आहे.  सोशल मीडियाच्या पिंजऱ्यात अलीकडेच सुरु झालेल्या स्पर्धात्मक  साठमारीचा हा वेध.

प्रा. नंदकुमार काकिर्डे,
ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार

सामाजिक माध्यमांवर फेसबुक, ट्विटर, व्हॉटसट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या विविध माध्यमांचे वापरकर्ते जगभरात लाखोंच्या संख्येने वाढत आहेत. फक्त वेगवेगळी उत्पादने किंवा सेवा सुविधा निर्माण करून त्यांचे  मालक ग्राहकाला केंद्रबिंदू मानून बक्कळ पैसा कमवत आहेत. आजवर ही मालक मंडळी एकमेकांशी थेट स्पर्धा करत नव्हती. परंतु आता व्यवसायाचे सर्व विधी निषेध बाजूला ठेवून एकमेकांची सोशल मीडियाच्या पिंजऱ्यातील स्पर्धा सुरू झाली आहे. 

2006 मध्ये जॅक डोरसे, नोहा  ग्लास, बिझ स्टोन व एव्हान विल्यम्स या तंत्रज्ञानींनी टिट्वटर चा प्रारंभ केला. ऑक्टोबर 2022 मध्ये अमेरिकेतील टेसला कंपनीचा मालक व ख्यातनाम  श्रीमंत उद्योजक एलान मस्क यांनी तब्बल  44 बिलियन डॉलर फेकून  करून ट्विटरची खरेदी केली.  हा प्लॅटफॉर्म निर्माण  करण्यामागे एखाद्या छोट्या समूहामध्ये एकमेकांना सहजपणे संदेश पाठवणे शक्य व्हावे ही संकल्पना होती.  ट्विटर हे अमेरिका स्थित सोशल नेटवर्किंग व मायक्रो ब्लॉगिंग संकेत स्थळ आहे. ट्विटरच्या सहाय्याने अगदी कमी शब्दात म्हणजे 280 शब्दांपर्यंत प्रतिक्रिया व्यक्त करता येते किंवा संवाद साधता येतो. त्याला ” ट्वीट “असे .म्हणतात. त्यामुळे त्याला ट्विटर हे नाव देण्यात आले. लिखित स्वरूपात त्यावर आपले म्हणणे मांडता येते.  कोणताही लेखक किंवा व्यक्ती त्याला जे काही वाटते ते त्याच्या स्वतंत्र पानावर प्रकाशित करू शकतो आणि जगातील कोणतीही व्यक्ती ते सहजगत्या वाचू शकते. या ट्विटरच्या माध्यमातून केवळ मजकूरच नाही तर व्हिडिओ फोटो किंवा कोणतीही लिंक त्यातून देता येऊ शकते.

आजच्या घडीला सोशल मीडिया क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय असलेला प्लॅटफॉर्म म्हणून या ट्विटरचा उल्लेख केला जातो. सध्या  त्याचा वापर करणारे दहा कोटी ग्राहक जगभरात पसरलेले असून या माध्यमातून किमान 50 कोटी ट्विट दररोज केल्या जातात. अगदी थोडक्यात सांगायचे तर त्याच्या माध्यमातून अनेक उच्च पदस्थ बड्या व्यक्ती म्हणजे राजकीय नेते, खेळाडू, नट -नट्या,  लेखक अशा व्यक्ति ट्विटरच्या माध्यमातून  लाखो लोकांशी संवाद साधतात. ट्विटरचे सगळ्यात मोठे यश म्हणजे ते वापरण्यास अत्यंत सुलभ आणि सोयीस्कर आहे. आजही ट्विटरच्या माध्यमातून कोणतीही माहिती जगभरात बातम्या सारखी पाठवता येते. एकंदरीत या ट्विटरची क्षमता अफाट आहे.  शेजारच्या व्यक्तीशी जसा सहज संपर्क साधता येतो  तसं जगभरातील कोणत्याही व्यक्तीशी या माध्यमातून संवाद, संभाषण करता येते. 

अनेक व्यावसायिक,  बातम्यांसाठीच्या साईट्स, मित्रमंडळी किंवा कलाकार यांच्यासाठी हा  प्रसिद्धीचा स्वस्त महामार्ग सापडलेला आहे.अगदी जगभरातील जेष्ठ पत्रकारही बातम्या देण्यासाठी  ट्विटरचा सर्वाधिक वापर करतात असे आढळले आहे.अर्थात ही सेवा मोफत नसली तरी दरमहा केवळ 566 रुपयात किंवा  6800 रुपये वार्षिक वर्गणीत किंवा त्यापेक्षाही कमी खर्चात त्याचा मनमुराद लाभ, अनुभव घेता येतो.

खरे तर या ट्विटरला आजवर कोणी स्पर्धक निर्माण झाला नाही असे नाही. आजही मस्टोडॉन, हाईव्ह सोशल,ब्लू स्काय असे नगण्य स्पर्धक अस्तित्वात आहेत. परंतु झुकेरबर्गचा “थ्रेड” नक्कीच त्यांचे साम्राज्य हादरवणारा आहे.  या षोडशवर्षीय ट्विटर समोर  नवे आव्हान ” थ्रेड” च्या रुपाने उभे केले आहे ते फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअँप ची मालकी असलेल्या  मेटा कंपनीच्या मार्क झुकेरबर्ग याने.  इंस्टाग्राम च्या माध्यमातून फोटोंची छायाचित्रांची देवाण-घेवाण करता येते. त्याच मंडळींनी “थ्रेड” नावाचे मजकुराच्या माध्यमातून संवाद साधणारे नवे “ॲप ” जुलैच्या पहिल्या सप्ताहात बाजारात सादर केले.  इंस्टाग्राम चे खाते ज्यांच्याकडे आहे त्यांना सहजरित्या थ्रेडला लॉग-इन ‘ करता येते व 500 शब्दांपर्यंतचे संदेश माहिती, फोटो, पाच मिनिटांचे व्हिडिओ एकमेकांना पाठवता येतात. नजीकच्या भविष्यात इंटरनेटचा संपूर्ण चेहरा मोहरा क्षमता बदलून टाकण्याची क्षमता या थ्रेडमध्ये आहे.

लवकरच थ्रेड हा प्लॅटफॉर्म संपूर्ण जगामध्ये खुल्या पद्धतीने उपलब्ध होण्याची घोषणा झुकेरबर्ग यांनी केलेली आहे. इंस्टाग्राम च्या  पुढचा टप्पा म्हणजे थ्रेडच्या माध्यमातून मजकूर छायाचित्रे व व्हिडिओ यांची सहजरित्या देवाण-घेवाण करणे आणखी सुलभ होत आहे. त्याच्या वापरामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला असून ट्विटरच्या तुलनेत जास्त सुविधा या थ्रेडमध्ये देण्यात  आल्या  आहेत.  मेटा कंपनीचे मालक असलेल्या  मार्क झुकेरबर्ग यांनी थ्रेडच्या विकासासाठी सोळा बिलियन डॉलर इतकी मोठी रक्कम गुंतवलेली आहे. भारतासह जगभरातील  शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये एका आठवड्यात हे या थ्रेडने शिरकाव केला असून गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर मधून ते सहजगत्या मोफत डाऊनलोड करून वापरता येते. इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्या ग्राहकांना “थ्रेड” चा सहज वापर करता येतो.

पाच जुलैला “थ्रेड  ” सादर करण्यात आल्यानंतर  केवळ एका आठवड्यात त्याने दहा कोटी ग्राहक संख्येचा आकड पार  केला आहे. एका अर्थाने थ्रेडने एक नवीन तगडा प्रतिस्पर्धी ट्विटरच्या समोर उभा करून त्यांच्या भोवती स्पर्धेचा मजबूत फास टाकलेला आहे. चॅट जीपीटी या ॲपला दोन महिन्यात दहा कोटी वापर कर्ते लाभले होते. इंस्टाग्राम चे सध्या जगभरात 160 कोटी वापर करते आहेत. याच्यातील 50 टक्के ग्राहक थ्रेडकडे वळले तर ही संख्या ट्विटरच्या कितीतरी पट ” थ्रेड” चा ग्राहकवर्ग  निर्माण करू होऊ शकेल.  या थ्रेडची मुसंडी अशीच सुरु राहिली तर ट्विटरच्या साम्राज्याला नक्की धक्का बसू शकतो. ट्विटर  व थ्रेड यांच्यात खूप साम्य आहे आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे फरकही आहेत. जी मंडळी इंस्टाग्राम वापरतात त्यांना वेगळे खाते न उघडता सहजपणे थ्रेड वापरता येईल आणि त्यात खूप प्रायव्हसी देण्यात आलेली आहे.  त्यातील माहितीची सुरक्षितता म्हणजे ज्याला डेटा प्रोटेक्शन म्हणतात ते जास्त चांगले असल्याचा थ्रेडचा दावा आहे.

अगदी स्पष्टपणे सांगायचं तर  एलन मस्कने ही कंपनी वर्षभरापूर्वी विकत घेतली. खुद्द त्याच्या पासूनच  या कंपनीला मोठा धोका आहे. त्याते वर्षभरात वादग्रस्त बदल केले. निर्णय घेतले.  अत्यंत लहरी आणि अफाट संपत्ती  व कर्जे यात डुबलेला हा मालक आहे. त्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही पदार्पण जाहीर केले आहे.” एक ना धड भाराभर चिंध्या” अशी  एलन मस्कची स्थिती आहे. मार्क  झुकेरबर्ग याने जगभरातील ग्राहकांचा कल लक्षात घेऊन तरुणाईला जवळ केले तर ट्विटरचा अंत फार दूर राहणार नाही. त्यामुळेच ट्विटर विरुद्ध उभ्या टाकलेल्या थ्रेडच्या यशाबरोबरच त्यांच्यातील अस्तित्वाचे  “युद्ध “बघणे  आगामी काळात मनोरंजक ठरणार आहे.

Related posts

इको जीवनपध्दती अंगीकारण्याची गरज

मानवी कृत्रिम जगण्याचे आभासी सटायर:काळमेकर लाइव्ह

वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More