April 16, 2024
Spiritual Development through Moun article by Rajendra Ghorpade
Home » मौनातून आत्मज्ञान विकास
विश्वाचे आर्त

मौनातून आत्मज्ञान विकास

मौनाचे अनेक फायदे आहेत, पण हे व्रत सर्वसामान्यांना जीवन जगताना पाळता येणे कठीणच आहे. तरीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. प्रयत्नांनी सर्व काही साध्य होते. सांसारिक जीवनात या मौन व्रताचा निश्‍चितच फायदा होतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तात्री कें बांधों हाव ।
दिससी तेतुली भाव । भजों काई ।। 15 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ – महाराज, मौन हे आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नांव आहे. असे असल्याकारणानें मी स्तुति करण्याची उत्कृट इच्छा कोठें बाळगू ? जें तुझें स्वरूप मला दृश्‍यत्त्वेकरून दिसत आहे. तें सर्व मिथ्या आहे तर मग मी भजन कशाचे करावें ?

पाटगावचे मौनी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. ते नेहमी मौन धारण करून असत. फक्त समर्थ रामदास स्वामी यांच्याशीच ते संभाषण करत. त्यांच्यासमोरच ते हे मौन व्रत सोडत. अशा या महान गुरूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना 1676 मध्ये अनुग्रह दिला. कर्नाटक दौऱ्यांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाटगावच्या मौनी महाराज यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अनुग्रहाचा लाभ झाला. गुरूंचा अनुग्रह होण्यासाठी मोठे भाग्य लागते. छत्रपती शिवाजी महाराज आणि पाटगावचे मौनी महाराज यांच्या भेटीच्या प्रसंगाचे वर्णन बखरीमध्ये आढळते, पण मौनी महाराजांच्या विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते कोणत्या जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे होते, याचीही माहिती नाही. त्यांचे गुरू कोण? याचेही पुरावे उपलब्ध नाहीत.

प्रसिद्धीपराडमुख असणारे संतच महान होतात. माहिती उपलब्ध नसणारे, असे अनेक थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. त्यांचा भक्त परिवार आजही मोठा आहे. त्यांच्या महान कार्यानेच, भक्तांना अनुभव देण्याच्या सामर्थामुळेच ते महान झाले आहेत. समाधिस्थ झाले तरीही ते आपल्या भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांची प्रगती साधत राहतात. अनुभूतीतून भौतिक, आध्यात्मिक प्रगती साधतात. यासाठीच त्यांची समाधी, मंदिरे ही संजीवन समजली जातात. सध्याच्या युगात मौन व्रत पाळणारे भेटणेच अशक्‍य आहे. हं, पण संसदेत मौनी खासदार म्हणून ओळखणारे अनेक जण आहेत. विशेष म्हणजे हे मौनी खासदार प्रत्येक निवडणुकीत निवडून येतात. 30-40 वर्षे तरी सलग सत्ता त्यांच्याच हातात असते. त्यांच्यावर मौनी खासदार म्हणून टीकाही होते, पण तरीही ते निवडून येतात. लोकमत त्यांच्या बाजूने असते. हे कसे? यावर संशोधन होणे गरजेचे आहे.

काय खरंच त्यांना मौनाचा फायदा होतो का? कारण सध्या दंगेखोर नेत्यांपेक्षा असले मौनी नेतेच परवडले, असे जनतेला म्हणायचे तर नाही ना? सतत त्रस्त करणाऱ्या नेत्यांना जनता धडा शिकवते. ते फार काळ टिकत नाहीत. पण न बोलता कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे जनता उभी राहाते. हेच यातून दिसते. सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्‍वासने देणारे नेत सत्तेत येऊन काहीच करत नाहीत. सत्ता मिळाल्यानंतर ती उपभोगण्याकडेच त्यांचा कल असतो. अशा सत्ताधिशांची सत्ता फारकाळ टिकत नाही. चिरंतन सत्ता टिकण्यासाठी आपण काय केले? याची वाच्यता न करणे हेच योग्य आहे. याचा फायदा निश्‍चितच होतो. स्वकिर्ती कानी न ऐकावी । स्वकिर्ती मुखे न बोलावी । हाच खरा नियम आहे.यासाठीच मौनाचे महत्त्व आहे. समाजकार्य करत राहायचे. पण त्याचा डांगोरा पिटाळायचा नाही. यातच खरा विकास दडला आहे.

मौनाचे अनेक फायदे आहेत, पण हे व्रत सर्वसामान्यांना जीवन जगताना पाळता येणे कठीणच आहे. तरीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. प्रयत्नांनी सर्व काही साध्य होते. सांसारिक जीवनात या मौन व्रताचा निश्‍चितच फायदा होतो. घरातील वादाच्या प्रसंगी,भांडण तंट्यामध्ये मौन धारण केल्यास हे वाद निवळू शकतात. मौनामुळे सहनशीलता येते. वयोवृद्ध, ज्येष्ठांना घरात उगाचच बडबड करून इतरांना त्रास देण्याची सवय असते. तसे ते मुद्दाम करत नसतात. ही त्यांची सवयच असते. याचा त्रास इतरांना होतो. हे त्यांच्या कधीही लक्षात येत नाही. तसे ही गोष्ट प्रत्येक कुटुंबात आढळतेच. यावरून वाद हे होतच असतात. ही प्रत्येक कुटुंबातील समस्या आहे.

वयोवृद्धांच्या अशा वागण्यामुळेच वृद्धाश्रमांची गरज वाढत चालली आहे. शांत बसणे त्यांना कधी जमतच नाही. तारुण्यातही इतका उत्साह त्यांनी कधी दाखवलेला नसतो, पण म्हातारपणी त्यांना कामाचा मोठा उत्साह असतो. अशा गोष्टींचा कुटुंबातील घटकांना त्रास होतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तरी अध्यात्मातील या मौनव्रताचा अवलंब करावा, असे त्यांना वाटत नाही. आध्यात्मिक वाचन जरूर करतात, पण मौन व्रताचे पालन ते कधीही करत नाहीत किंवा करावे असे त्यांना कधी वाटतही नाही, पण त्यांनी या उतार वयात हे व्रत पाळले तर त्यांच्या इतरांना मोठा फायदा होईल, यात शंकाच नाही. मनाला आनंदी ठेवण्यासाठी, घरातील शांती कायम ठेवण्यासाठी हे मौन व्रत निश्‍चितच लाभदायक आहे.

मौनव्रतातून अनेक लाभ होतात. तसे मौनी संतही भक्तांना अनेक अनुभव देत राहातात. अध्यात्म हे अनुभुतीतून शिकण्याचे शास्त्र आहे. संत समाधीस्थ झाले किंवा मौनव्रतात गेले तरी ते भक्तांना मार्गदर्शन करत असतात. संत शिष्याची प्रगती व्हावी यासाठी झटत असतात. मौनातून मार्गदर्शन किंवा समाधीतून अनुभुती ते देत राहातात यामुळेत त्यांची समाधी ही संजिवन अन् सामर्थ्यवान समजली जाते. यातूनच अध्यात्मिक ज्ञानाची प्रगती साधली जाते.

Related posts

वारी एक अनुभव ….

देशात 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रे लवकरच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

षटकार आणि फटकार

Leave a Comment