December 10, 2022
Study with Confidence article by Rajendra Ghorpade
Home » दृढ निश्चयाने अभ्यास हवा
विश्वाचे आर्त

दृढ निश्चयाने अभ्यास हवा

अध्यात्मातही तेच आहे. अध्यात्माचा अभ्यास करायला हवा. ते ज्ञान काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासूवृत्ती आपल्याकडे असायला हवी. ज्ञान समजून घेण्याचा समजूतदारपणा आपल्या अंगी असायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्व येती ।
हे सांगतियाचि रीती । कळले मज ।।330।। ज्ञानेश्वरी अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ – याचा दृढ निश्चयाने जे अभ्यास करतात, ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात, हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले.

यशस्वी होण्यासाठी झोकून देऊन कार्य करण्याची वृत्ती हवी. त्या गोष्टीचा, त्या कार्याचा ध्यास लागायला हवा. त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटावर, अडथळ्यांवर मात करण्याची वृत्ती अंगात असायला हवी. तशी मनाची तयारी असायला हवी. इतक्या दृढ निश्चयाने ते कार्य करायला हवे तरच त्यात यश निश्चित मिळते. स्पर्धा परीक्षा असो किंवा खेळाचे मैदान असो. मन लावून अभ्यास केला तर परीक्षेची भीती राहात नाही. कोणताही प्रश्न विचारला जाऊ दे. त्याचे उत्तर देण्याची मनाची तयारी व्हायला हवी. खेळामध्ये कोणताही डाव प्रतिस्पर्ध्याने टाकला तरी त्यावर मात करण्याची जिद्द असायला हवी. ही जिद्द, ही मनाची तयारी अभ्यासाने येते. त्यासाठी दृढ निश्चयाने अभ्यास करायला हवा.

अध्यात्मातही तेच आहे. अध्यात्माचा अभ्यास करायला हवा. ते ज्ञान काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासूवृत्ती आपल्याकडे असायला हवी. ज्ञान समजून घेण्याचा समजूतदारपणा आपल्या अंगी असायला हवा. भक्ती कशी करायची ? आत्मज्ञान कसे प्राप्त होते. ? त्यासाठी काय करावे लागते. ? साधना कशी करायची ? साधनेसाठी काय आवश्यक आहे ? सद्गुरू कोणास म्हणावे ? ते कसे असावेत ? गुरू करणे म्हणजे काय ? या सर्व गोष्टींचा अभ्यास करायला हवा. त्याची उत्तरे शोधायला हवीत.

या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अभ्यासायला हवा. त्यात सांगितलेल्या ओव्यांचा अभ्यास करायला हवा. त्या जाणून घेऊन त्याची अनुभूती घ्यायला हवी. त्या ज्ञानाच्या ओढीने स्वतःला त्यात झोकून द्यायला हवे. अभ्यास केला तर नापास होण्याची भीती नसते. प्रश्न कसाही आडवा, तिडवा विचारला जाऊ दे. तो सोडविण्याची मनाची तयारी असेल तर उत्तर सापडायला वेळ लागत नाही. उत्तर मिळणार नाही याची भीती राहात नाही.

अध्यात्माचा अभ्यास असेल तर त्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत कधीच नापास होण्याची भीती नसते. आत्मज्ञानी होऊ असा दृढ विश्वास त्या भक्तामध्ये निर्माण होतो. साक्षात सद्गुरूच मार्गदर्शन करत असल्यानंतर नापास कसे होऊ ? हा आधार असतो. अभ्यास करताना येणाऱ्या अनुभवांच्या जोरावर अध्यात्माची प्रगती साधायची असते. हळूहळू प्रगती होत राहाते. होणाऱ्या चुका लक्षात येऊन त्या दुरुस्त केल्या जातात. अशा दृढनिश्चयाने भक्तीचा अभ्यास केला तर निश्चितच आत्मज्ञान प्राप्त होते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Related posts

भारतीय संस्कृती म्हणजे कमळ

संत माहेर माझें…

प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा…

Leave a Comment