मुळचे गिर्ये (देवगड)येथील असणारे अॕड.उदय उमेश लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली आहे. यानिमित्त त्यांचा परिचय…
डाॕ. बाळकृष्ण लळीत
विजयदुर्ग जवळ गिर्ये हे गाव सर्व लळीत कुटुंबीयांचे मूळ गाव…! येथे कुलदेवता नृसिंहलक्ष्मी देवतेचे मंदिर आहे. आजही ८/१०लळीत कुटुंबे या गावी वास्तव्य करतात. सुमारे दोनशे वर्षापूर्वी अनेक कारणाने काही लळीत उपनामधारी मंडळी कुंभवडे, पेंढरी, हरचेली, चुना कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोह्या जवळ ‘आपटे’या गावी स्थलांतरित झाली. पुढे तेथून एक शाखा सोलापूर येथे पुन्हा स्थलांतरित झाली.
माझे आजोबा स्व.धोंडदेव बाळकृष्ण लळीत (कुंभवडे – राजापूर) यांचा व या सोलापूरकर लळीत मंडळींचा घनिष्ठ संबंध होता. १९५० दरम्यान माझे आजोबा अनेकदा सोलापूरला जात असत.अशी नोंद सापडते. सोलापूर लळीत मंडळीनी वकिली व्यवसायात खूपच महत्त्वाची कामगिरी केली आहे.
त्यापैकी उमेश लळीत हे वकिली व्यवसाय करत-करत न्यायाधीश पदावर पोचले. जयप्रकाश नारायण व अन्य अनेक थोरांशी त्यांच्या घनिष्ठ संबंध होता. त्यांचे चिरंजीव म्हणजेच उदय उमेश लळीत हे सद्धा दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. आम्हा सर्व लळीत कुटुंबीयांना याचा नेहमीच अभिमान वाटतो. या क्षेत्रातील काही बंधनांमुळे त्यांना समाजात वावरता येत नसले, तरी लळीत कुटुंबाबद्दल व आडनावाबद्दल त्यांना अभिमान वाटतो.
याच सोलापूर लळीत घराण्यातील श्रीमती सविता लळीत यांनी बॕकिंग व सार्वजनिक क्षेत्रात मोलाचे काम केले. सोलापूर जिल्हा जनता सहकारी बॕकेत त्या सोळा वर्षे संचालिका होत्या. दोन वेळा अध्यक्षही होत्या. त्या सद्या सोलापूर येथे असतात. नुकताच सोलापूर येथील सेवासदन सोलापूर या शिक्षण संस्थेने त्यांचा जाहीर सत्कार केला. उदय लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली आहे. यानिमित्त त्यांचा परिचय…
“सुमारे १.७० लाख कोटी रुपयांच्या २-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याशी संबंधित अभियोग चालविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२ अन्वये विशेष अधिकार वापरून ज्येष्ठ वकील उदय उमेश लळीत यांची विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केली, ही महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबईच्या वकिली नैपुण्याची आणखी एक चोख पोचपावती म्हणावी लागेल. माजी केंद्रीय दळणवळणमंत्री ए. राजा यांच्यासह अनेक बड्या आसामी आरोपी असलेला २-जी स्पेक्ट्रम घोटाळा खटला दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुरु होणार असून त्यात केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन तपासी यंत्रणांच्या वतीने अभियोग चालविण्याची जबाबदारी, केंद्र सरकारने घेतलेले आक्षेप झुगारून, सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या विश्वासाने यू. यू. लळीत यांच्यावर टाकली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढल्यानंतर लळित यांनी केलेली माझ्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी माझ्या पूर्ण क्षमतेनिशी प्रयत्न करीन’ ही प्रतिक्रिया खरे तर लळीत यांच्या विनयशील आत्मविश्वासाचे द्योतक आहे.
उदय लळीत यांचे मूळ गाव गिर्ये विजयदुर्ग असले तरी हे कुंटुब नंतर रायगड जिल्हयातील आपटे (रोहा) येथे गेले. वकिली घराण्यात पिढीजात चालत आलेली आहे. उदय लळीत यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपट्याहून सोलापूर येथे जाऊन स्थायिक झाले. त्यांची आजी त्या काळी भारतात डॉक्टर झालेल्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक एलसीपीएस डॉक्टर होत्या. त्यामुळे बुद्धिमत्ता, व्यवसाय चातुर्य व अभ्यासू वृत्ती रक्तातूनच आलेली. उदय लळीत यांचे वडील अॕड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते १९७४ ते ७६ या काळात उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत शिक्षण पूर्ण करून उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे वकिली केली. नंतर ते दिल्लीत गेले व तब्बल सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांचे निकटचे सहकारी म्हणून काम केले.
गेली अनेक वर्षे लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करीत आहेत. २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले. लळीत यांनी देशभर असंख्य महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आपल्या वकिली कौशल्याचा ठसा उमटवला आहे. देशभरातील बहुतांश उच्च न्यायालयांमध्ये त्यांनी जाऊन अभ्यासपूर्ण युक्तिवाद केलेले आहेत. गेली सात वर्षे ते महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात पॅनेलवरील ज्येष्ठ वकील आहेत. आजवर त्यांनी देशातील सुमारे १४ राज्य सरकारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे चालविली आहेत. मितभाषी, निगर्वी आणि सदा हसतमुख असणारे लळीत गेल्या काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयात ‘हाय प्रोफाईल’ प्रकरणे चालवूनही प्रसिद्धीपासून पूर्णपणे अलिप्त राहणारे म्हणूनच वेगळेपणा जपणारे ठरतात. ८० हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत. लळीत यांना २-जी स्पेक्ट्रम हा देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार खटला चालवला.
हे शिवधनुष्य लळीत यांच्यासारखा स्थितप्रज्ञ लीलया पेलेल याविषयी वकिलमंडळींना तीळमात्र शंका नाही.अशी अपेक्षा दै. लोकसत्ताने तेव्हा वर्तवली होती. पुढे ती त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. आज एक नामवंत अभ्यासू न्यायमूर्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. सद्या ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत.