चिपळूण येथील डी बी जे महाविद्यालय आणि कोळकेवाडीतील प्रयोगभूमी शिक्षण केंद्राच्यावतीने विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष भातशेतीचा अनुभव देणारा कार्यक्रम झाला.
शेती हा अन्नाचा प्रमुख स्त्रोत, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. आधुनिक शिक्षण आणि पारंपरिक शेती याची सांगड घालावी, विद्यार्थ्यांना शेतीचे प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान मिळावे, भारतीय शेती आणि शेतकर्यांच्या समस्या समजून घेता याव्यात या उद्देशाने विद्यापीठाने अभ्यासक्रमात कृषी भूगोल यासारखे अभ्यास पेपर समाविष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना अनुभवनिष्ठ ज्ञान मिळावे या हेतूने चिपळूण येथील डी.बी.जे. महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील विद्यार्थी श्रमिक सहयोग संस्थेच्या प्रयोगभूमी या शिक्षण केंद्राच्या कोळकेवाडी येथील शेतात आयोजित भात लावणी उपक्रमात सहभागी झाले.
यावेळी प्रयोगभूमीचे शिक्षक मंगेश मोहिते यांनी बियाणे, शेतीची मशागत, शेती औजारे, शेतीत करत असलेले प्रयोग याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. प्रयोग भूमीतील विद्यार्थी आणि डी बी जे महाविद्यालयातील विदर्थ्यांनी शेतात रोप काढणी, नांगरणी, भात लावणी अशा उपक्रमात प्रत्यक्ष भाग घेतला. शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यानी पहिल्यांदाच शेतातील अनुभव घेतला असे यावेळी संगितले. दुपारी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र सहभोजन केले.
त्यानंतर श्रमिक सहयोग संस्थेचे कार्यवाह राजन इंदुलकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक शेती याविषयावर सखोल चर्चा घडवून आणली. प्रा. राहुल पवार यांनी शेतीचे महत्त्व, कोरोना काळात शेतीकडे लोकांचा बदलेला दृष्टीकोण या विषयी माहिती सांगितली. प्रयोगभूमीतील विद्यार्थ्यांनी कृषिगीते गायली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी त्यावर ठेका धरला. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरित केले. विद्यार्थ्यांच्या या देवाण घेवाणीमुळे शहरी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाची ओळख झाली तर ग्रामीण विद्यार्थांना उच्च शिक्षणाविषयी ओढ निर्माण करण्यात मदत झाली.
या कार्यक्रमासाठी श्री राजन इंदुलकर प्रा. राहुल पवार, डॉ राजू झोरे, प्रा. प्रशांत चव्हाण प्रा. राम साळवी, प्रयोगभूमीचे शिक्षक मंगेश मोहिते, श्रीमती रेखा मोहिते यांनी विशेष मेहनत घेतली. दोन्ही शिक्षण संस्थेचे ४३ विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. असे उपक्रम पुन्हा राबवण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.