July 21, 2024
Regarding the new powerful coalition in the media Nandkumar Kakirde article
Home » प्रसार माध्यमातील नव्या बलाढ्य युती बाबत
विशेष संपादकीय

प्रसार माध्यमातील नव्या बलाढ्य युती बाबत

नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने ( एनसीएलटी) गेल्याच सप्ताहामध्ये सोनी कॉर्प व झी एंटरटेनमेंट या प्रसार माध्यमातील  दोन दिग्गज किंवा बलाढ्य कंपन्यांच्या विलीनीकरण प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला.  प्रसार माध्यम क्षेत्रात आगामी  काळात मोठी क्रांती घडण्याच्या प्रक्रियेला यामुळे चालना मिळणार आहे.   या नव्या बदलांचा घेतलेला हा वेध.

प्रा. नंदकुमार काकिर्डे
पुणे स्थित ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार

अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित सोनी कॉर्प या जागतिक पातळीवरील अग्रगण्य प्रसार माध्यम कंपनीने डिसेंबर २०२१ मध्ये  भारतातील झी एंटरटेनमेंट बरोबर विलीनीकरणाची घोषणा केली. त्यानंतर गेली दीड दोन वर्षे या विलीनीकरणाबाबत सातत्याने उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत राहिल्या. याबाबत न्यायालयीन लढाई तसेच विविध नियामकांनी त्यात  दिलेले निर्णय या विलीनीकरण  प्रक्रियेत सतत खो घालत होते. अखेरीस कंपनी कायद्याच्या क्षेत्रातील अंतिम अधिकार असलेल्या कंपनीला लवादाने (एनसीएलटी) त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या बलाढ्य युतीला मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजार यांची मंजुरी असून कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ( सीसीआय) म्हणजे भारतीय स्पर्धा आयोग  यांनीही त्यांचा मार्ग खुला केलेला आहे. यामुळे येत्या काही महिन्यातच भारताच्या प्रसार माध्यम क्षेत्रात एक नवीन संयुक्त शक्ती किंवा ताकद निर्माण होणार आहे. त्याचा परिणाम या क्षेत्रातील अन्य स्पर्धकांवर कशा प्रकारे होणार आहे हे पाहणे अभ्यासपूर्ण ठरेल.

भारतातील प्रसार माध्यमे  व मनोरंजन (मीडिया अँड एंटरटेनमेंट) क्षेत्र 2022 मध्ये तब्बल वीस टक्क्यांनी वाढलेले असून . त्याचा महसूल 2.1 लाख कोटी (2.1 ट्रिलियन) रुपयाच्या घरात गेलेला आहे. गेल्या सलग तीन वर्षात त्यात जवळजवळ 19 ते 20 टक्के इतकी मोठी वाढ होत आहे.यामध्ये टेलिव्हिजन,डिजिटल मीडिया मुद्रित म्हणजे प्रिंट मीडिया,चित्रपटीय मनोरंजन, ऑन लाईन गेमिंग,  ॲनिमेशन व व्हीएफएक्स,आऊट ऑफ होम इव्हेंट्स, म्युझिक म्हणजे संगीत व  रेडिओ यांचा समावेश होतो. या मध्ये टेलिव्हिजनचा सर्वाधिक वाटा असून त्या खालोखाल डिजिटल मीडिया व त्यानंतर मुद्रित माध्यम म्हणजे वृत्तपत्रांचा समावेश आहे. पुढील दोन वर्षात त्यात दहा ते बारा टक्के वाढ होत राहील अशी अपेक्षा आहे. या विविध माध्यमांमधील जाहिरातींचा वाटा एक लाख कोटीच्या घरात गेलेला आहे.एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत तो 0.4 टक्के आहे. अमेरिका जपान व चीन यांच्या तुलनेत तो खूप कमी आहे. जाहिरातींवरील खर्चाचा विचार करता आपण जागतिक क्रमवारीत  आठव्या क्रमांकावर आहोत.चालू वर्षात म्हणजे 2023 मध्येभारतातील जाहिरात क्षेत्र हे अत्यंत वेगाने वाढणारे ठरले आहे.यामध्ये डिजिटल मीडियातील जाहिरातींची वाढ लक्षणीय आहे. 2022 मध्ये भारतात १६०० पेका जारत चित्रपट प्रसिद्ध झाले. त्यातील 335 भारतीय चित्रपट परदेशातही प्रसिद्ध करण्यात आले होते.

सध्या सोनी आणि झी एंटरटेनमेंट यांचा संयुक्त विचार करता त्यांच्याकडे साधारणपणे 80 चॅनेल्स म्हणजे वाहिन्या आहेत व दूरचित्रवाणीच्या एकूण प्रेक्षकांच्या पैकी त्यांचा वाटा 27 टक्क्यांच्या घरात आहे. 2022 या वर्षात सर्व ब्रॉडकास्टर्स मंडळींनी जाहिरातीपोटी 70 हजार 900 कोटी रुपये उत्पन्न मिळवले होते. यामध्ये सोनी पेक्षा झी एंटरटेनमेंट चा विविध भारतीय भाषांमध्ये लक्षणीय वाट आहे.त्यात हिंदी मराठी तेलगू तामिळ व अन्य भाषांचाही समावेश आहे.जगभरातील 170 देशांमध्ये 41 विविध चॅनेलच्या माध्यमातून झी एंटरटेनमेंट कार्यरत आहे.त्यांच्या तुलनेत सोनी कॉर्पचा विचार करता त्यांच्याकडे 26 चॅनेल असून  त्यात क्रीडा व लहान मुलांच्या कार्यक्रमांचा लक्षणीय वाटा आहे. याशिवाय सोनीचे प्राबल्य शहरी भागात जास्त बळकट आहे. या दोन्ही कंपन्यांनी चित्रपट व्यवसायामध्ये उत्तम कामगिरी केली आहे.  वानगीदाखल उदाहरणे घायची झाली तर पिकू, गदर, राजी याबरोबरच स्कॅम 1992,रॉकेट बॉईज व सिर्फ एक बंदा काफी है अशा चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. या दोघांचा एकत्र व्यवसाय साधारणपणे 64 हजार कोटींच्या घरात आहे.

जागतिक पातळीवरील जाहिरात  प्रकाशनाचा विचार करता गुगल व मेटा या दोघांकडे जवळजवळ डिजिटल जाहिरातीपैकी 50 ते 70 टक्के वाटा आहे.त्यातही ॲपल म्युझिक ॲमेझॉन म्युझिक व स्पॉटिफाय त्यांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त जाहिराती मिळतात असे आकडेवारीवरून दिसते.

साधारणपणे दहा वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या गुगलच्या मालकीच्या “नेटफ्लिक्स” सारख्या माध्यमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे.  विविध प्रकारची वर्गणी  नेटफ्लिवस गोळा करतात. त्यावर अनेक चित्रपट, मालिका व अन्य शो थेट प्रदर्शित केले जातात.त्यांच्यातही दरवर्षी चांगली वाढ होताना दिसत आहे.सध्या त्यांचा महसूल 3200 कोटी रुपयांच्या घरापासून घरात असून 23 कोटीच्या घरात वर्गणी देणारा प्रेक्षक आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात या इंटरनेट किंवा त्याच्या माध्यमातून विविध गोष्टींनी अमुलाग्र बदल घडवलेले आहेत. ज्याला थेट प्रक्षेपण म्हणतो त्यामध्ये सोशल मीडिया असेल किंवा छोटे व्हिडिओ असतील किंवा ऑनलाईन यंत्रणेचा वापर करून आपल्या आयुष्यात त्याचा व्याप वाढताना दिसत आहे. अगदी व्हाट्सअप वरचे चॅटिंग किंवा एकमेकांना ऑनलाइन भेटणे, ऑनलाइन गेमिंग, संगीत वाचन किंवा अन्य प्रार्थना सभा वगैरे यांना उपस्थित राहणे याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. अगदी  थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या दैनंदिन जीवनातील फार कमी गोष्टी आता ऑनलाईन घडत नाहीत. परंतु जास्तीत जास्त गोष्टींचा घडामोडींचा आपल्याला आता ऑनलाईन अनुभव घेण्याकडे कल वाढलेला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये इंटरनेट म्हणजे ऑनलाइन गोष्टींचा वापर किंवा लाभ घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय रित्या वाढत आहे. त्यामुळेच गुगल सारख्या बहुराष्ट्रीय  कंपनीचा महसुल २१ लाख कोटी रुपयांच्या घरात पोचलेला असून त्या पेक्षा जास्त म्हणजे 29 लाख कोटी रुपयाचा महसूल अँपलचा आहे. मात्र या दोन मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत पारंपारिक प्रसार माध्यम कंपन्यांचा महसूल खूपच कमी आहे.

जागतिक पातळीचा विचार करावयाचा झाला तर आज प्रसार माध्यम क्षेत्रात गुगल, मेटा व डिस्ने स्टार या तीन अग्रगण्य कंपन्या असून त्या खालोखाल चवथा क्रमांक सोनी- झी एंटरटेनमेंट या बलाढ्य युतीचा लागतो. विलीनीकरणा नंतर त्यांचे संयुक्त नाव काय असेल हे अद्याप ठरलेले नाही. गेल्या सात-आठ वर्षात जागतिक पातळीवर मोठ मोठ्या प्रसार माध्यमिक कंपन्या एकत्र येऊन काम करण्याची प्रक्रिया वेगाने वाढत आहे. 2017 मध्ये रुपर्ट मर्डोक यांनी फॉवस कंपनीची मनोरंजन क्षेत्रातील मालमत्ता डिस्नेला विकून त्याचा प्रारंभ केला होता.  भारतात त्याचे पडसाद उमटले.  यातील स्टार कंपनी डिस्नेचा भाग झाली. त्यात मुकेश अंबानी समूहाने व अन्य काही बड्या गुंतवणूकदारांनीही उडी घेतली. अंबानींनी व्हायकॉम18 विकत घेतली.  आयनॉक्सचे पीव्हीआर सिनेमाज् यांच्याबरोबरचे विलीनीकरण हा अशा प्रक्रियेचाच एक भाग होता. रिलायन्स समूहाच्या मालकीची जिओ ही मोठी टेलिकॉम सेवा आहे. त्यांच्या जिओ सिनेमा  यांनी प्रसार माध्यम  क्षेत्रात पदार्पण करून आपले प्राबल्य दाखवण्यास प्रारंभ केलेला आहे. देशातील प्रत्येक घडामोडी, घटना, चित्रपट,  विविध  खेळांच्या स्पर्धा यामध्ये जिओ सिनेमाचा वाटा सातत्याने वाढताना दिसत आहे. भारतातील डिस्ने व हॉटस्टार ही सध्या अग्रगण्य “टीव्ही” कंपनी आहे. अलीकडेच त्यांचे १.२५ कोटी ग्राहक त्यांना सोडून गेल्याची धक्कादायक बातमी बरबँक यांनी दिली होती. देशातील महत्वाच्या क्रिडा स्पर्धेचे हक्क दुसऱ्या स्पर्धक कंपनीकडे गेल्यामुळे ही प्रेक्षक संख्या कमी झाली.

अर्थात सोनी- झी यांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाची  परवानगी मिळणे  आवश्यक आहे. तसेच या दोघांनी रजिस्टर ऑफ कंपनीकडे नवीन कंपनीची नोंद तीस दिवसांमध्ये  करणे आवश्यक आहे. दरम्यान सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी यांनी चार दिवसांपूर्वीच झी एंटरटेनमेंटचे मुख्य प्रवर्तक  सुभाष चंद्रा व त्यांचे चिरंजीव विनीत गोयंका यांच्यावर चार वर्षाची बंदी घातली आहे. केवळ दोन दिवसात 13 कंपन्यांच्या माध्यमातून पैशाची मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. झी उद्योग समूहातील प्रमुख कंपन्यांमध्ये कोणतेही महत्त्वाचे पद किंवा संचालक पद त्यांना स्वीकारता येणार नाही असा निर्णय सेबीने दिला आहे. आणि त्याच वेळी त्यांच्या उद्योग समूहाचे विलीनीकरण सोनी मध्ये करण्याला एनसीएलटीने मंजूरी दिली आहे.

या सर्वांमध्ये भर म्हणून की काय गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ने  धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे प्रसार माध्यमाच्या क्षेत्रातही या एआयपोटी आणखी काही नवनव्या घडामोडी घडणे अपरिहार्य आहे. तंत्रज्ञान विस्तार व प्रसार माध्यमातील  तीव्र जागतिक  स्पर्धेचे मोठे आव्हान या नवीन बलाढ्य कंपनीसमोर राहील यात शंका नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कृषि सल्लाः उन्हाळ्यात पिकांची आणि पशूंची अशी घ्या काळजी..

स्व:च्या ओळखीतूनच विश्वाचे ज्ञान

ट्रायच्या नावाने फसवणूक

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading