आत्महत्त्या म्हणणे चूक आहे. मरणारे सगळे शेतकरी सरकारच्या धोरणाचे बळी आहेत. या आत्महत्त्या नसून खून आहेत व त्याला थेट सरकार जबाबदार आहे. सगळ्याच राजकिय पक्षांची सरकारे जबाबदार आहेत. शेतकरीविरोधी कायद्यांच्या बेड्यात जखडल्या गेल्यामुळे त्यांनी मरण पत्करले आहे. हे वास्तव समजावून घेतले तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचा तिढा सुटू शकेल.
अमर हबीब,
अंबाजोगाई मोबाईल – ८४११९०९९०९
हे खरे आहे की, १९९० नंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या फार मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. काही लोकांचा असा समाज आहे की खुलीकरण आणि जागतिकीकरणामुळे शेतकरी आत्महत्त्या करू लागले. ते साफ चूक आहे. कारण हे धोरण स्वीकारण्याआधी देखील शेतकरी आत्महत्त्या करीत होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. इंग्रजांच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होत होत्या. इंग्रज गेल्यानंतरही अव्याहतपणे होत आल्या आहेत. त्याकाळी शेतकरी आत्महत्यांची वेगळी नोंद केली जात नव्हती.
इंडिया सरकारने खुलीकरणाचे धोरण ९० नंतर स्वीकारले. त्या पूर्वी १९८६ साली यवतमाळ जिल्ह्यातील चील गव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने पवनार आश्रमाजवळ दत्तपूरला जाऊन आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्त्या केली होती. मरताना एक चिठ्ठी लिहून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे भीषण वास्तव जगासमोर आले. १९ मार्च १९८६ साली झालेली ही पहिली जाहीर व साऱ्या देशाला हदरवून टाकणारी आत्महत्त्या होती.
भारत व इंडियाच्या विकासातील दरी
सरकारने निर्णय केला म्हणून नव्हे तर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला सर्वप्रथम शेतकरी आत्महत्त्यांचा अहवाल देण्यास सांगितले. त्यानंतर केंद्राच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने शेतकरी आत्महत्त्यांची वेगळी नोंद करण्यास सुरुवात केली. नोंद उशिरा सुरू झाल्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला की आत्महत्या खुलीकरणाच्या नंतर सुरू झाल्या. सरकारने खुलीकरण, जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारले व ते संपूर्ण देशात लागू केले. पण देशातील अनेक राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होताना दिसत नाहीत. तुलनेने अधिक विकसित असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या घडत आहेत, याचा अर्थ असा की, जेथे अवतीभोवती विकास झाला आहे व त्या विकासाचे ताण पेलण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये येऊ शकली नाही (खरे तर येऊ दिली गेली नाही), त्या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हताश झाले. ‘इंडिया’मध्ये खुलीकरण आले, ‘भारता’त आलेच नाही भारता’वर ‘इंडिया’च्या विकासांचा ताण मात्र पडत गेला, तो ताण सहन न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्त्या करणे भाग पडले.
स्वातंत्र्य हिरावून घेणारे कायदे
अनेक लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत घटनेचे ‘निमित्त’ आणि घटने मागचे ‘कारण’ यात गफलत करतात. ते निमित्तालाच कारण समजून बरळतात. ‘निमित्त’ काहीही असू शकते, ‘कारण’ त्याच्या मागे दडलेले असते. निमित्ताच्या मागे जाऊन कारणांची श्रृंखला पकडली तर त्याच्या तळाशी केवळ ‘शेतकरीविरोधी कायदे’ दिसतात. ‘इंडिया’त खुलीकरण आले. (खरे तर तेथेही पूर्णपणे आलेले नाही. अनेक क्षेत्रात आजही लायसन्स, परमीट, कोटा राज चालू आहे) ‘भारता’त म्हणजेच शेतीक्षेत्रात अजिबातच खुलीकरण आले नाही. १) कमाल शेतजमीन धारणा कायदा २) आवश्यक वस्तूंचा कायदा आणि ३) जमीन अधिग्रहण कायदा. कोणत्याही खुलीकरणात हे कायदे बसणारे नाहीत. तसेच ते शेतकऱ्यांच्या मुलभुत व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणारे आहे.
खुलीकरण म्हणजे सरकारी हस्तक्षेप कमी कमी होत जाणे, हे कायदे सरकारी हस्तक्षेपापुरतेच नव्हे तर सरकारी निर्बंधांचे पुरावे आहेत. खुलीकरण आल्यानंतर हे कायदे तेंव्हाच रद्द व्हायला हवे होते. ते रद्द करण्यात आले नाहीत. हे कायदे अस्तित्वात असताना कोण म्हणेल की, शेतीक्षेत्रात खुलीकरण किंवा जागतिकीकरण आले आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांच्या कारणांच्या तळाशी कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा हे आहेत, हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या खुलीकरणामुळे होत नसून खुलीकरण नाकारल्यामुळे होतात, हेच यावरून दिसून येते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
2 comments
🙏👍😊 खूपच मौल्यवान, उपयुक्त, शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांवर अतिशय उदबोधक माहिती व अचूक मार्गदर्शन !!!! सरकारने लेखात अंतर्भूत असलेल्या सर्व घटनात्मक गुंतागुंतीचा गांभीर्याने विचार विनिमय करून आवश्यक तो शोध व बोध घेऊन शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा शोधून काढावा. हीच एक किसान पुत्र या नात्याने माफक अपेक्षा !!!! धन्यवाद अमर जी.👌👍🙏💐😊
🙏👍😊 खूपच मौल्यवान, उपयुक्त, शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांवर अतिशय उदबोधक माहिती व अचूक मार्गदर्शन !!!! सरकारने गांभीर्याने विचार विनिमय करून आवश्यक तो शोध व बोध घेऊन शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा शोधून काढावा. हीच एक किसान पुत्र या नात्याने माफक अपेक्षा !!!! धन्यवाद अमर जी.👌👍🙏💐😊