ग्रंथाच्या निमित्ताने समीक्षक म्हणून बन्ने यांची नवी ओळख – डॉ. रवींद्र ठाकूर
साहित्यिक दयासागर बन्ने यांनी ‘समकालीन साहित्यास्वाद’ या ग्रंथात २०११ ते २०२१ या कालखंडात प्रकाशित झालेल्या काही लक्षणीय साहित्यकृतींचा आस्वादक परामर्श सादर केला आहे. समकालातील लिहिते सुजाण साहित्यिक कविवर्य विठ्ठल वाघ, वसंत के. पाटील, विजय चोरमारे, विशाल इंगोले, नामदेव कोळी, श्रीराम पचिंद्रे, साईनाथ पाचारणे, सुरेश सावंत, रमजान मुल्ला, मनीषा पाटील, अनिलकुमार पाटील, अभिजित पाटील, सुहास पंडित, धनाजी घोरपडे, गौतम कांबळे, आनंदहरी, महेशकुमार कोष्टी, लवकुमार मुळे, अरुण कांबळे, राजश्री पाटील, वंदना हुळबत्ते, अंजली रसाळ, मनीषा रायजादे, प्रकाश पाटील, माणिक नागावे यांच्यासह बालकवींच्या पद्य तर साहित्यिक विजय जाधव, राजीव बर्वे, वसंत खोत, सुनीता बोर्डे, राहूल कदम, दि. बा. पाटील, संजय ठिगळे, नितीन नायक, नामदेव माळी यांच्या गद्य साहित्याचा अत्यंत भावस्पर्शी काव्यमय परिचय श्री बन्ने यांनी करून दिला आहे.
सद्य जागतिकीकरणाच्या काळात उद्ध्वस्त होत चाललेले ग्रामीण – नागरी जीवन, नातेसंबंध, मूल्यहास आदींचे साहित्यातले प्रतिबिंब तसेच जाणिवांच्या, अनुभवांच्या, विचाराच्या, अभिव्यक्तीच्या पातळीवर समकालीन बदलते साहित्य यांचा वेध या ग्रंथातून घेतला आहे. कलाकृतीतील चैतन्यांश, रसवत्ता, मूल्यभान, सौंदर्यानुभव या ‘साहित्यास्वादा’तून समरसतेने घेता येईल.
श्री बन्ने यांचा कविता हा विशेष आस्थाविषय राहिला आहे आणि म्हणून निवडक महत्त्वाच्या साहित्याची आस्वादक काव्यात्म अनुभूती घेणे व देणे हा या ग्रंथाचा विषय झाला आहे. त्यांनी मराठी साहित्यात कवी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहेच. आता या ग्रंथाच्या निमित्ताने समीक्षक म्हणून दयासागर बन्ने यांची नवी ओळख प्रस्थापित होत आहे, ही बाब अभिनंदनीय आहे.
– डॉ. रवींद्र ठाकूर
पुस्तकाचे नाव – समकालीन साहित्यास्वाद
लेखक – दयासागर बन्ने
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.,
पृष्ठे : 184, किंमत – 250 रुपये.
पुस्तकासाठी संपर्क – अक्षर पुस्तकालय
संवाद : 9834032015
दयासागर बन्ने :९९६०७२४२७७
अधोरेखित आस्वादरूपे – प्रा. वैजनाथ महाजन
दयासागर बन्ने हे सांप्रतच्या मराठी साहित्यातील एक प्रथितयश प्रयोगशील कवी आहेत. तसेच बालसाहित्य, ग्रामीण साहित्य या चळवळींशी पण आपले निकटत्व दाखवून देणारे वाङ्मय चळवळीतील लक्षवेधी असे समंजस कार्यकर्ते आहेत. आपल्याबरोबर ते आपल्या सहाध्यायांना सतत लिहिते करण्याचा परोपरीने प्रयत्न करतात. ते सर्वप्रथम कवी आहेत हे लक्षात घेऊन आपण त्यांच्या या अक्षर आस्वादाकडे पाहिले पाहिजे. कारण यात सर्वाधिक आस्वादने ही काव्यसंग्रहांची आहेत आणि ते स्वाभाविक वाटावे इतकी कवी दयासागर बन्ने यांची कविप्रतिमा लखलखीत व पारदर्शक आहे. अर्थात अन्य पुस्तकांनापण ते त्या ठिकाणी जरूर भिडलेले आहेत. पुस्तकांबद्दल आपण लिहिले पाहिजे असे खऱ्याखुऱ्या आस्वादकास वाटतच असते. तसे त्यांनी विजय जाधव यांच्या ‘पाऊसकाळ’बद्दलही लिहिलेले आहे, ‘अर्थभान’ या अर्थशास्त्रावरील पुस्तकाबद्दलही लिहिलेले आहे, ‘भुईभिंगरी’सारख्या एका शिक्षकांच्या जगण्याचा आलेख मांडणेपण त्यांना आशयाचे वाटते तसेच मनीष शिसोदिया यांच्या शिक्षणावरील सुरेख अनुवादावरपण लिहिलेले आहे. अर्थात ही सारी त्यांच्या मनःपटलावर उमटलेली अशी या लिखितांची आस्वादरूपे आहेत. हे मोकळ्या मनाने केलेले असे मोकळ्या आकाशासारखे लेखन आहे. दयासागर बन्ने यांची प्रवृत्तीच मुळी टीपकागदासारखी प्रसन्न ते टिपणारी आहे. ही समीक्षा नाही, हे अक्षरांच्या आस्वादाचे मनोरम असे लेखन आहे. जे निर्देश करायला हवेत ते करीत भावले ते लिहिले, अशा प्रकारची अधोरेखित अशी ही आस्वादरूपे आहेत.
कवितांच्या आस्वादाबाबत कवी दयासागर बन्ने विशेष सजग आहेत. मनीषा पाटील, रमजान मुल्ला ते विजय चोरमारे अशा भिन्न भिन्न कवी कवयित्रींच्या काव्यरचनेबद्दल त्यांनी उत्कटपणे लिहिलेले आहे. कवीच्या मनातील दडलेला त्या त्या कवितेमागील आशय शोधून तो आपल्यासमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न हा विशेषत्वाने आपणास भिडणारा असा वाटतो. म्हणून असे वाटते की या आस्वादमातीला कवितांचा आस्वाद हा कवी दयासागर बन्ने यांचा आहे आणि अन्य पुस्तकांबाबतचे प्रांजळ लेखन त्यांच्यातील शिक्षकाचे आहे. त्यांच्या अशा अधोरेखित आस्वादरूपांना भविष्यात आणखीन वाङ्मयीन वजन लाभेल असे वाटते.
– प्रा. वैजनाथ महाजन
साहित्याचा कालस्वर टिपणारी – मनस्वी परीक्षणे
– प्रा. अविनाश सप्रे
बन्ने यांच्या ‘समकालीन साहित्यास्वाद’ या पुस्तकास छोटीशी प्रस्तावना लिहिताना मला अतिशय आनंद होत आहे. ‘समकालीन’ या शब्दाचा ‘आत्ताचे’ असा वाच्यार्थ्य आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे या आत्ताच्या जगातला कालस्वर किती प्रमाणात आपल्या सर्जनशील निर्मितीकडून लेखक कवींना पकडता आला आहे, या अर्थाने हा शब्द मूल्यात्मक आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये श्री. दयासागर बन्ने यांनी आपल्या अवतीभोवतीच्या लेखक कवींच्या लेखनातील असा कालस्वर दाखवून देण्याचा मनस्वी प्रयत्न केला आहे, हे महत्त्वाचे आहे.
श्री. बन्ने हे स्वतः एक कवी आहेत आणि १९९९ पासून काव्यसाधना अत्यंत मनःपूर्वक आणि निष्ठेने करीत आले आहेत. या त्यांच्या साधनेचा प्रत्यय त्यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या ५ कवितासंग्रहांतून पुन्हा पुन्हा येत राहतो. याबरोबरच बन्ने यांचा एक महत्त्वाचा विशेष मला इथे आवर्जून नोंदवावासा वाटतो तो असा. सर्वसाधारणपणे स्वतःला कवी म्हणवणारे आत्ममग्न असतात. स्वतःच्याच प्रेमात पडलेले असतात. आपल्यापलीकडे जाऊन आपल्यासारखेच लेखकमित्र कवी काय लिहीत आहेत, कसे लिहीत आहेत, त्यांच्या शोधाचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यामध्ये काहीएक वेगळी प्रयोगशीलता आहे का आणि असल्यास तिचे स्वरूप कसे आहे, याची दखल स्वतःच्याच प्रेमात पडलेल्या अशा कवींना घ्यावीशी वाटत नाही. त्यामुळे आपली कवी म्हणून असलेली वाढ आणि ओळखही त्यांना देता येत नाही. बन्ने यांचे मी म्हणतो ते वेगळेपण असे आहे की, स्वतः निर्मितीशील असूनही स्वतःच्या पलीकडे जाऊन अशा लेखनाचा आस्वाद ते अत्यंत सहृदयतेने आणि आस्थेने सदैव घेत आले आहेत. ‘समकालीन साहित्यास्वाद’ मधील त्यांचे लेखन याचा पानोपानी प्रत्यय घडवते.
प्रस्तुत पुस्तकात एकूण ३५ लेख असून त्यातले ८ लेख गद्य लेखनावरचे आहेत आणि उर्वरित सर्व लेख कवी आणि कवितेवरचे आहेत. समुचित वाचनातून श्री. दयासागर बन्ने यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ओतप्रोत असलेले काव्यभान प्रकट होताना दिसते. हे सर्व लेखन आशयवादी असून त्यातील त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ‘सौंदर्यस्थळे व सामर्थ्य’ यांचा आस्वादभूमिकेतून शोध घेतला आहे. आस्वादक समीक्षा ही साहित्य समीक्षेतील एक महत्त्वाची पद्धती आहे. आपण जे साहित्य वाचतो, त्याचा आस्वाद नेमकेपणाने कसा घ्यावा, तो कशात-हेने व्यक्त करावा आणि आपला वाचनानंद द्विगुणित कसा करावा, याचे दर्शन प्रस्तुत पुस्तकातून अचूकपणे घडते.
चांगली कविता सर्जनशील असते आणि सर्जनशीलता म्हणजे गोष्टींकडे नव्याने पाहायला आणि विचार करायला लावणे. त्याचप्रमाणे चांगली कविता ही वाचकांमध्ये बदल (ट्रान्सफॉर्म) घडवून आणत असते. अशी कविता निव्वळ विधाने किंवा भाष्य करीत नाही किंवा गद्याचे पद्यीकरणही असत नाही. कवितेचे कवितापण नेमके कशात असते हा जरी जटिल प्रश्न असला, तरी तो कवीला काव्यनिर्मिती करीत असताना पडायला हवा. अन्यथा लिहिलेली कविता सपाट होते. तिच्यामध्ये अनेकार्थसूचकता येत नाही. प्रस्तुत पुस्तकातील श्री. दयासागर बन्ने यांनी जो आशयवेध घेतला आहे, त्याचे महत्त्व आहेच पण त्यामधून असे काही मूलभूत प्रश्नही निर्माण होतात. आशयाबरोबरच कवितेची आविष्कारशैली आणि वैशिष्ट्ये हीही महत्त्वाची असतात आणि कवितेला कवितापण देण्याचे काम करत असतात. याचाही श्री. बन्ने यांनी वेध घ्यावा असे आवर्जून सुचवावेसे वाटते.
प्रस्तुत पुस्तकातील काव्यातिरिक्त वैचारिक, व्यक्तिचित्रे, अनुवाद, ललित, आत्मपर आणि कादंबरी यासंबंधीचे श्री. दयासागर बन्ने यांनी केलेले आस्वादक विवेचनही अर्थपूर्ण आहे. आताच्या दशकाचे आणि एकूणच काळाचे जे एक अस्वस्थ, सैरभैर करणारे.संभ्रमित करणारे वर्तमान आपणा सर्वांनाच घडोघडी अनभवायला मिळते आहे, त्याचे प्रतिबिंब या पुस्तकात पडलेले दिसते. आजकाल समाजमाध्यमांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे. या माध्यमांचा खूपसा गैरवापर होतो हेही खरे आहे. पण याच माध्यमांचा चांगला वापर करून मराठी वाचकांची काव्याभिरुची संपन्न करण्याचे कामही करता येते, हेही बन्ने यांनी या लेखनातून कोरोनाकाळात दाखवून दिले. त्याचबरोबर आता या पुस्तकाच्या माध्यमातून समकालीन साहित्याबद्दलची आस्था आणि आस्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करण्यात ते महत्त्वाचे योगदान देत आहेत. समकालीन साहित्यिकांना समजून घेण्यात तसेच अभिव्यक्तीचा आस्वाद घेत सर्जक भाषेच्या अभिरुचीची रुजवणूक करण्यात हे पुस्तक मोलाची भर टाकेल, असे वाटते.
– प्रा. अविनाश सप्रे