आयुर्वेदामध्ये नोंद नसलेल्या अनेक वनस्पतींचा वापर वैदुंकडून औषधी म्हणून केला जातो. अनेक असाध्य रोगावर वैदुंकडील औषधी उपयुक्त ठरते. पण यावर संशोधन मात्र झालेले नाही. अशामुळे हे ज्ञान लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. याच वनस्पतींचा शोध घेण्याचा प्रयत्न डॉ. वाली आणि डॉ. बाचुळकर यांनी केला आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे. मोबाईल – 9011087406
भारतामध्ये अनेक पारंपारिक पद्धती प्रचलित आहेत. आर्युवेद ही त्यापैकीच एक शाखा. औषधी वनस्पती अन् त्याचे उपयोग याचे ज्ञान पिढ्यान पिढ्या भारतात जोपासणाऱ्या काही आदिवासी जमाती आहेत. या वैदुकडे असणारे ज्ञान हे निश्चितच उपयुक्त असे आहे. यामध्ये काही प्रमाणात त्रृटी असू शकतात. पण त्याचा सध्याच्या मॉडर्न विज्ञानाने अभ्यास करून त्यांच्या या ज्ञानाला उजाळा देण्याची गरज आहे, असाचा ध्यास घेऊन डॉ. अशोक वाली आणि डॉ. मधुकर बाचुळकर यांनी पश्चिमघाटासह अन्य आदिवासी भागात दौरे केले. या आदिवासींकडे, वैदुकंडे असणारे ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीस त्यांना यात फारसे यश आले नाही. पण शांत डोक्याने अन् ओठावर मधुर वाक्ये ठेवत त्यांनी हे काम केले. कारण वैदुंकडून माहिती काढून घेणे तितके सोपे नव्हते. आपले ज्ञान या तज्ज्ञांना माहीत झाले तर ते त्याचा उपयोग करतील अन् आपली ही परंपरा नष्ट होईल अशी भीती या वैदुंना होती. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन डॉ. वाली आणि डॉ. बाचुळकर यांनी हे ज्ञान त्यांच्याकडून मिळवले. या वैदुंकडे असणाऱ्या सर्व वनस्पती अन् त्याचे उपयोग त्यांनी अभ्यासले. या ज्ञानाचा उपयोग ट्रॅडिशनल हर्ब ड्रग्ज हे पुस्तक लिहितांना त्यांना झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात सुमारे २० हजारावर औषधी वनस्पतीच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी सुमारे आठ हजार वन्य वनस्पतींचा उपयोग आदिवासी आणि ग्रामीण समाजाकडून केला जातो. आयुर्वेदामध्ये सुमारे ४००० प्रजाती औषधी असल्याचे नोंदविण्यात आले आहे. पण अनेक वनस्पतींबद्दल अद्यापही संभ्रम आहे. आयुर्वेदामध्ये नोंद नसलेल्या अनेक वनस्पतींचा वापर वैदुंकडून औषधी म्हणून केला जातो. अनेक असाध्य रोगावर वैदुंकडील औषधी उपयुक्त ठरते. पण यावर संशोधन मात्र झालेले नाही. अशामुळे हे ज्ञान लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. याच वनस्पतींचा शोध घेण्याचा प्रयत्न डॉ. वाली आणि डॉ. बाचुळकर यांनी केला आहे.
या पुस्तकात डॉ. वाली आणि डॉ. बाचुळकर यांनी अशाच २५० औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. वनस्पतींच्या शास्त्रोक्त माहितीसह वैदुंकडे असलेल्या नोंदी याचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये नोंदविण्यात आलेल्या अनेक वनस्पतींच्या उपयोगावर सखोल संशोधन होण्याची गरज आहे. वैंदुंनी सांगितलेल्या माहितीवर डॉ. वाली आणि डॉ. बाचुळकर यांनी काम केले. त्याची शहानिशा करून घेऊन त्याची नोंद करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांचे हे कार्य निश्चितच भावी वनस्पती संशोधकांना, वैद्यांना, आयुर्वेदातील अभ्यासकांना, तज्ज्ञांना उपयुक्त असे आहे.
तसेच यातून निर्माण होणाऱ्या संशोधनाच्या विविध संधीसाठीही उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वनस्पतींची माहिती देताना त्यांची ओळख व्हावी या अनुशंगाने त्यांची रंगीत छायाचित्रेही या पुस्तकात देण्यात आली आहेत. त्यामुळे हे पुस्तक निश्चितच संदर्भ ग्रंथ म्हणून मार्गदर्शक ठरणारे आहे. विशेष म्हणजे लुप्त होत चाललेली वैदुंची परंपरा व त्याचे महत्त्व जोपासण्याचे काम या पुस्तकाच्या रुपाने डॉ. वाली आणि डॉ. बाचुळकर यांनी केले आहे. हे विचारात घेऊन आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संघटनेने उत्कृष्ट पुस्तकांसाठी देण्यात येणारा सिपका ग्लोबल ट्रॅडिशनल हिलिंग सिस्टिम अॅवॉर्ड देऊन या कार्याचा गौरव केला आहे. हे पुस्तक इंग्रजीमध्ये असल्याने जगभरातील संशोधकांना, तज्ज्ञांना उपयुक्त असे आहे.
पुस्तकाचे नाव – ट्रॅडिशनल हर्बल ड्रग्ज
लेखक – डॉ. अशोक वाली, डॉ. मधुकर बाचुळकर
प्रकाशक – अंकुर पब्लिकेशन, कोल्हापूर
किंमत – ८०० रुपये. पृष्ठे – २५६
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.