December 10, 2022
Management in Goat Farming Krushisamarpan article
Home » निरोगी करडांसाठी अशी घ्या शेळ्यांची काळजी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निरोगी करडांसाठी अशी घ्या शेळ्यांची काळजी

🦙 निरोगी करडांसाठी शेळ्यांचे हवे काटेकोर व्यवस्थापन 🦙

करडांची व शेळीची मरतूक शून्य ते कमीत कमी करण्यासाठी शेळीची गर्भधारणेअगोदर ते करडू जन्मल्यापर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच सुदृढ आणि निरोगी करडे जन्माला येतील. यासाठी काटेकोर व्यवस्थानाची गरज आहे. या संदर्भातील हा लेख…

सौजन्य -कृषिसमर्पण

मोबाईल – 7071777767

शेळीपालनामध्ये शेळ्यांचे उत्तम आरोग्य, निरोगी करडांची उत्पत्ती व शेळ्यांची विक्री करण्याच्या वयापर्यंतची निगा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याची सुरवात शेळी ज्या दिवशी गाभण राहते, त्या दिवसापासून सुरू होते.

*शेळीची गर्भधारणेअगोदर घ्यावयाची काळजी*

 • गर्भधारणा होण्याअगोदर शेळीचे जंतनिर्मूलन करावे. कारण गर्भधारणेनंतरच्या सुरवातीच्या काळात जंतांचा प्रादुर्भाव टाळता येतो. जंतनिर्मूलन केले नसेल, तर शेळीकडून करडाला जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
 • गाभ घालवायच्या शेळीचे लसीकरण केल्यास काही घातक आजारांची प्रतिकारशक्ती शेळीमध्ये तयार होते. ती प्रतिकारशक्ती करडांना शेळीकडून मिळते.
 • शेळीला गाभ घालविण्याअगोदर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आवश्‍यक प्रमाणात खनिजमिश्रणाची मात्रा दिल्यास करडाची वाढ चांगली होते, तसेच शेळीच्या गर्भधारणेसाठी, दूधवाढीसाठी, कासदाह आजार टाळण्यासाठी व एकूण आरोग्य सुदृढ राहण्यासाठी फायदा होतो.
 • शेळ्यांना गर्भधारणेअगोदर आणि गाभण काळात शरीरात तयार होणारी जीवनसत्व ‘क’ व ‘ड’ सोडून शरीरात आवश्यक प्रमाणात तयार न होणारी जीवनसत्व ‘अ’ (जे ओल्या चाऱ्यापासून मिळतात) तसेच जीवनसत्व ‘इ’ योग्य प्रमाणात खाद्यातून देणे गरजेचे असते. जीवनसत्व ‘अ’ व ‘इ’ ही शक्यतो पशुवैद्यकाच्या सल्ल्याने इंजेक्शनच्या स्वरूपात द्यावे. परंतु गाभण काळात इंजेक्शन देणे टाळावे.

शेळीची गाभण काळात घ्यावयाची काळजी

 • बुरशी लागलेला ओला चारा व काळपट पडलेली वाळल्या चाऱ्याची वैरण दिल्यास शेळ्यांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता वाढते.
 • गर्भावस्थेच्या पहिल्या साडेचार महिन्यांपर्यंत शेळ्यांना कॅल्शिअम रोजच्या रोज द्यावे. परंतु विण्याअगोदर १५ दिवस कॅल्शिअम देणे बंद करून विल्यानंतर पूर्ववत सुरू ठेवल्यास शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण योग्य राहते व विलेल्या शेळीला दुग्धज्वर, मलूल होणे, आडवे पडून राहणे या गोष्टी होत नाहीत.
 • गाभण काळात प्रतिदिवस २० ते २५ ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे. गर्भावस्थेच्या शेवटच्या १५ दिवसांमध्ये ओला चारा, तसेच कर्बोदके व प्रथिनयुक्त खुराक यांचा खाद्यामधला वापर कमी करून तंतुमय चाऱ्याचे (वाळलेला चारा) प्रमाण वाढविणे शेळीच्या व करड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
 • गर्भावस्थेच्या पहिल्या ४.५ महिन्यांत शरीराच्या व करडाच्या वाढीसाठी आवश्यक वाढीव खुराक देणे गरजेचे आहे.
 • गाभण शेळ्यांना वेगळ्या कप्प्यात ठेवून त्यांच्या अनावश्‍यक शारीरिक हालचाली टाळाव्यात.
 • गर्भावस्थेचा काळ पूर्ण होण्याअगोदरच एखाद्या शेळीचा गर्भपात झाल्यास शेळीवर योग्य ते उपचार करून गर्भाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. आजारी शेळीला उपचार होईपर्यंत इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवावे.

करडू जन्मल्यापासून ७२ तासांपर्यंत घ्यावयाची काळजी

 • करडू जन्मल्यानंतर त्याची नाळ शरीरापासून २.५ इंच अंतरावर दोऱ्याने घट्ट बांधून नवीन ब्लेडने कापावी. जिवाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापलेल्या नाळेचे टोक आयोडीनमध्ये बुडवावे.
 • जन्मल्यानंतर करडाला २ तासांत त्याच्या वजनाच्या साधारणतः १० टक्के चीक पाजावा.
 • विल्यानंतर करडाला शेळीने चाटून कोरडे न केल्यास गोणपाटाने स्वच्छ पुसून घ्यावे. तोंडातील व नाकपुड्यामधील चिकट द्रवपदार्थ हलक्या हाताने काढावा. करडू वेळेत कोरडे न झाल्यास शरीराचे तापमान कमी होत जाते व मरतूक वाढण्याची शक्यता असते.
 • थंडीपासून संरक्षण होण्यासाठी करडांच्या गोठ्यातील तापमान वाढविण्यासाठी बल्ब किंवा इतर बाबींचा काळजीपूर्वक वापर करावा.

विल्यानंतर ते ७२ तासांपर्यंत शेळीची व करडाची घ्यावयाची काळजी

 • विल्यानंतर शेळ्यांना कासदाह आजार होऊ शकतो. यासाठी शेळीचे दूध काढल्यानंतर किंवा करडू दूध पिल्यानंतर लगेचच शेळीला खाली (जमिनीवर) बसू देऊ नये. कारण सडाच्या छिद्रावाटे जमिनीवरील घाण सडामध्ये जाऊन कासदाह आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
 • कासदाह आजार टाळण्यासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता राखावी.
 • शेळ्यांचे दूध (चीक) एकावेळी जास्त प्रमाणात काढू नये किंवा करडांना पाजू नये, त्यामुळे शेळ्यांच्या शरीरातील कॅल्शिअमचे प्राण कमी होऊ शकते व करडांच्याही आरोग्यास धोका निर्माण होतो.
 • शेळी विल्यानंतर शक्यतो ४५ ते ६० दिवसांत परत एकदा माजावर येणे आवश्यक असते. यशस्वी गर्भधारणेसाठी (गर्भधारणेच्या काळात) आहारात प्रथिनांचे प्रमाण कमी व पिष्टमय पदार्थांचे प्रमाण वाढविल्यास परत एकदा होणारी गर्भधारणा सुलभ होते व पिष्टमय पदार्थांमुळे दूध वाढण्यास मदत होते.
 • शेळीचा झार/वार विल्यानंतर ६ ते ८ तासांत आपोआप पडणे गरजेचे असते. तसे न झाल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकाची मदत घेणे आवश्‍यक आहे.

(सौजन्य – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र )

Related posts

वणव्यापासून त्रस्त आहात मग हा उपाय करून जरुर पाहा…

मुख्यमंत्री म्हणाले आधी मुले ‘ही’ चित्रे रेखाटत होती पण आजची मुले ‘हे’ चित्र रेखाटतात..

कृषी कायदे, आंदोलन आणि माघार

Leave a Comment