May 30, 2024
why we read Bhagwat Gita or Dnyneshwari
Home » भगवत गीता किंवा ज्ञानेश्वरी का वाचायची ?
विश्वाचे आर्त

भगवत गीता किंवा ज्ञानेश्वरी का वाचायची ?

गीतेचे तत्त्वज्ञान नव्या पिढीला किती आवश्यक वाटणार, हा अभ्यासाचाच विषय होणार आहे. तरीही व्यक्तीची इच्छा-आकांक्षा याकडे ओढतेच. मोहाने ग्रस्त समाजास गीता हाच एक आधार आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानात मोह घालविण्याचे सामर्थ्य आहे. यासाठी गीता समजावून घ्यायला हवी. ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी तरी अनुभवायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया ।
परी आत्मज्ञानें आपणपयां । मिळिजे येथ ।। 584 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें ही गीता जाणली असतां, मोह नाहीसा होतो यांत आश्चर्य काय आहे ? मोह तर जाईलच पण त्या गीतेच्या योगाने आत्मज्ञान होऊन आत्मस्वरुपी मिळता येते.

भगवत गीता किंवा ज्ञानेश्वरी का वाचायची? त्यातील तत्त्वज्ञान जाणून घेण्याची गरज का आहे? हे तत्त्वज्ञान आपणास काय सांगते? काय देते? असे प्रश्न नव्या पिढीला पडणे स्वाभाविक आहे. कारण हे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी प्रथम त्या मार्गावर जावे लागते. तशी मनाची मानसिक तयारी असावी लागते. हे तत्त्वज्ञान अनुभवातून शिकावे लागते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे तत्त्वज्ञान आत्मसात होते.

सध्याच्या वेगवान जगात अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे महत्त्व सांगणे मूर्खपणाचेच ठरणारे आहे. झटपट निकाल मागणारी मंडळी या मार्गावर येणार तरी कशी हा मुळात मोठा प्रश्न आहे. नियोजनबद्ध, साचेबद्ध विचारसरणीमुळे अनेकांच्या जीवनात पैसा अमाप आला आहे. या पैशाने त्यांचे आयुष्य सुखकारक झाले आहे. आज इतके कमाविले, उद्या तितके मिळतील नाही मिळाले तरी दुसऱ्या कामातून पैसा कसा मिळवता येतो याचे गणित तयार असते. कधी कमी कधी जास्त असा हा प्रवास फारशी मनाला निराशा देत नाही. पण एकदा का यामध्ये निराशा शिरली की मग आत्महत्येचा मार्ग स्वीकारणारेही वाढत आहेत. अशा बदलत्या जीवनपद्धतीत थेट टोकाची भूमिका घेण्याचे प्रकारही वाढत आहेत.

झटपट जीवनपद्धती जितकी चांगली आहे तितकीच ती धोकादायकही आहे. अशाने नैराश्यातून आत्महत्या या प्रकारात वाढ होत आहे. अध्यात्मात झटपट समाधान मिळत नसल्याने हा मार्ग स्वीकारण्यातही त्यांची मानसिकता नसते. असे मार्ग स्वीकारणे म्हणजे लाचारी पत्करणे अशी मानसिकताही झाली आहे. त्यातच आजकाल भोंदू साधूंचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या समस्यांचा फायदा उठवत त्यांना फसविणारेही अनेक भोंदू असल्याने विश्वास कोणावर ठेवावा हासुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आत्मज्ञानी म्हणणारी मंडळीही गैरप्रकार करताना दिसत आहेत. राजकीय पाठबळाच्या जोरावर त्यांचे अनेक गैर उद्योग सुरू आहेत. अशा परिस्थितीत गीतेचे तत्त्वज्ञान नव्या पिढीला किती आवश्यक वाटणार, हा अभ्यासाचाच विषय होणार आहे. तरीही व्यक्तीची इच्छा-आकांक्षा याकडे ओढतेच. मोहाने ग्रस्त समाजास गीता हाच एक आधार आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानात मोह घालविण्याचे सामर्थ्य आहे. यासाठी गीता समजावून घ्यायला हवी. ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी तरी अनुभवायला हवी. यासाठीच या ग्रंथांची पारायणे करायची असतात. यातून आत्मज्ञानाचा सहज लाभ होऊ शकतो. त्याच्या प्राप्तीचा हा सोपा मार्ग आहे.

Related posts

पुन्हा नव्याने…

शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच

कोल्हापूर जिल्ह्याची ‘दौलत’ ठरलेले जिल्हाधिकारी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406