September 25, 2023
Home » तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साज ।। (एक तरी ओवी अनुभवावी)
विश्वाचे आर्त

तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साज ।। (एक तरी ओवी अनुभवावी)

पाऊस हा नैसर्गिक स्त्रोत आहे. कृत्रिमरित्या मानवाने समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी मिळवण्याचे प्रयोग केले आहेत. पण त्याला मर्यादा आहेत. म्हणजेच नैसर्गिक स्त्रोत हा गरजेचा आहे. कृत्रिमरित्या पाऊस पाडता येतो. पण त्यासाठीही आकाशात ढग असावे लागतात. 

– राजेंद्र कृष्णराव घोरपडे,  ९०११०८७४०६

म्हणोनि भाग्य जैं सानकुळ । जालिया केले उद्यम सदां सफळ । 

तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साज ।। 168 ।। अध्याय 10 वा

ओवीचा अर्थ – म्हणून ज्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असते, त्या वेळेला हातांत घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात, त्याप्रमाणें गुरूंची कृपा झाली म्हणजे ऐकलेलें व पढलेलें सर्व ज्ञान आपले काम करतें. 

पाऊस हा पिक-पाण्यासाठी आवश्यक आहे. यावरच सर्व अवलंबून आहे. कारण पावसाचे पाणी शुद्ध असते. पाणी हेच जीवन आहे. पूर्वीच्याकाळी वसाहतीसुद्धा बारमाही पाण्याचा स्त्रोत पाहून वसवल्या जात. पाणी नसेल तर आपण जगू शकत नाही. जंगलात जरी भटकंतीला गेला तरी त्याला संध्याकाळपर्यंत पाणी असणारी जागा राहण्यासाठी शोधावी लागते. कारण तो पाण्याशिवाय काहीच करू शकत नाही. म्हणजे आपण पाण्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही. पाणी हेच आपले जीवन आहे.

समुद्रात पाणीच पाणी आहे. पण ते आपल्यासाठी उपयुक्त आहे का ?, नाही. म्हणजे आपणास शुद्ध पाण्याची गरज आहे. यासाठी पाऊस चांगला होण्याची गरज आहे. पिकासाठीच नव्हेतर आपल्या दैनंदिन गरजांसाठीही त्याची गरज आहे. शहरातल्या लोकांना पाऊस नको असतो. पण पाणीच नसेल तर शहरात तरी राहणार कसे ? 

पाऊस हा नैसर्गिक स्त्रोत आहे. कृत्रिमरित्या मानवाने समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी मिळवण्याचे प्रयोग केले आहेत. पण त्याला मर्यादा आहेत. म्हणजेच नैसर्गिक स्त्रोत हा गरजेचा आहे. कृत्रिमरित्या पाऊस पाडता येतो. पण त्यासाठीही आकाशात ढग असावे लागतात. तशी स्थिती असावी लागते. हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणजे निसर्गापुढे आपले काहीच चालत नाही. निसर्गाचे नियम हे आपणास पाळावेच लागतात. निसर्ग देवतेची कृपा असेल तर जीवनात अनेक गोष्टी सुसह्य होऊन जातात. 

सदगुरूंची कृपी ही अशीच नैसर्गिक आहे. ज्याला सदगुरुंची कृपा झाली त्याचे जीवन फलद्रुप होते. पाऊस चांगला झाला. योग्यवेळी झाला. पिकाच्या आवश्यकेनुसार झाला, तर उत्पन्न भरघोस मिळते. यासाठी निसर्गाची कृपा ही गरजेची आहे. समजा पिक चांगले आले आहे. फुलोराही त्याला उत्तम आहे. किटकांचाही प्रादुर्भाव नाही. सर्व काही जोमदार वाढले आहे. पण ऐन काढणीच्यावेळी पावसाने हजेरी लावली. काय होते ? पिकाचे नुकसान होते. म्हणजे निसर्गाची कृपा ही यासाठीच गरजेची आहे. 

तसेच अद्यात्मात आहे. सदगुरुंची कृपा ही असावीच लागते. साधना केली. चांगली साधना होते. सर्वकाही उत्तम जमते. पण गुरुकृपा नाही तर मग ज्ञान प्राप्ती कशी होणार ? आत्मज्ञानप्राप्तीसाठी गुरुंची कृपा होणे हे गरजेचे आहे. तरच ती साधना फलद्रुप होते. त्यांच्याच कृपेने आपण केलेला अध्यात्माचा अभ्यास, चिंतन, मनन, श्रवण हे फलद्रुप होते.

ज्ञानेश्वरी ही गुरुंच्या कृपेने आपल्यात उतरते. तिचा बोध त्यांच्या कृपेनेच होतो. गुरुंच्या इच्छेनुसार त्यांच्या आर्शिवादानेच मग ही साधना फलद्रुप होते. यासाठी गुरुंची कृपा व्हावी, हीच माऊलीच्या चरणी विनम्र प्रार्थना. गुरुकृपा होऊन आत्मज्ञानाचे फळ मिळावे. सर्व काही साध्य व्हावे, हीच सद् गुरुंच्या चरणी प्रार्थना. 

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy

Related posts

एकजुटीने तोडा आमिषाचे जाळे

अमरत्वाची अनुभुती देणारे अक्षर

लोकराजा राजर्षी शाहू यांना आदरांजली

Leave a Comment