- ‘माझी बोली माझी कथा’ या ५७ बोलीतील कथासंग्रहात सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील कथेचाही समावेश
- राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न.
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राजभवन येथे झाले
आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली बोलल्या जातात, ज्या आज नामशेष होत चालल्या आहेत. या बाबतचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने तसेच वाचकांना ते रंजक वाटावे या उद्देशाने आणि आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणार्या बोली याचे ज्ञान जनसामान्य, महाविद्यालय व विद्यालय स्तरावरही विद्यार्थ्यांना मिळावे, बोलींच्या अभ्यासाकडे कल वाढावा या हेतूने महाराष्ट्रातील विविध बोलीतील कथा संकलित करून सोबतच त्याचा कथासार, कठीण शब्दांचे अर्थ, त्या-त्या बोली विषयी अभ्यासपूर्ण माहिती तसेच लेखकांचा थोडक्यात परिचय अशा धाटणीचा हा ग्रंथ आहे. सदर ग्रंथात ५७ बोलीतील ५७ कथा असून प्रत्येक कथा त्या-त्या बोलीतील अभ्यासक लेखकांनी लिहिल्या आहेत. दिग्गज लेखक मंडळींनी या ग्रंथाला आपले योगदान देऊन समृद्ध केले आहे. या पुस्तकात सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील ‘झटाझोंब्या’ कथेचाही समावेश आहे.
बोलीविषयक असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच या ग्रंथाच्या रूपाने झाला आहे. माझी बोली, माझी कथा’ असे या ग्रंथाचे नाव असून, या ग्रंथाचे प्रकाशन लोकायन प्रकाशन संस्था यांनी केले आहे.आजवर संशोधनात्मक लेखन आणि संपादन केलेल्या १२ ग्रंथांचा अनुभव पाठीशी घेऊन महाराष्ट्रातील विविध बोलीतील सदर अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संकलन, संपादन आणि समन्वयाची भूमिका डॉ. मोनिका ठक्कर यांनी सांभाळली आहे.
बैस यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल डॉ. मोनिका ठक्कर यांचे विशेष कौतुक केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.