October 8, 2024
Admirable movement of Marathi words Facebook group
Home » Privacy Policy » मराठी शब्दांची प्रशंसनीय चळवळ…
विशेष संपादकीय

मराठी शब्दांची प्रशंसनीय चळवळ…

मराठी भाषेवर चर्चा होते. यातून महाराष्ट्राच्या विविध भागातील मराठीही समजते. मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुशंगाने विचार केला तर हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे. अशा अनेक मराठी शब्दातील गमतीजमती या समूहात पाहायला मिळतात. ही फक्त एक झलक आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

मराठीसह आपण शाळेत हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषा शिकतो. पण महाविद्यालयात गेल्यानंतर आपल्याच भाषा असणाऱ्या मराठी आणि हिंदीचा कधी आपला संबंध राहात नाही. ऐच्छिक विषय म्हणून आपण त्याकडे पाहातो. अशाने आपल्याच बोली असणाऱ्या या भाषा आता नष्ट होतील की काय अशी भिती वाटू लागली आहे. तसे हे स्वाभाविक आहे. बोलताना सुद्धा आपण मराठीमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर किती करतो हे आपणच आपणाला विचारून पाहावे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा मावळतो असे कवी कुसुमाग्रज यांनी म्हटले आहे. अशावेळी आपण मराठी भाषेच्या संवर्धनाचे कार्य करायला हवे. यासाठी थोडातरी वेळ आपण द्यायला हवा. काही उपक्रम सुरु करायला हवेत असे वाटणारे अनेक मराठीजण आहेत. काहींनी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून नवे उपक्रमही सुरु केले आहेत. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. पण त्यांच्या या उपक्रमांची योग्य दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याची तितकीच गरजही आहे.

मराठी शब्द हा असाच एक फेसबुक समूह आहे. अमित गोडबोले, हर्षद अभ्यंकर, स्मिता नेने, प्राजक्ता महाजन हे या समूहाचे प्रमुख आहेत. इंग्रजीमधील शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे यावर या गटामध्ये चर्चा घडते. मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे काम निश्चितच प्रशंसनीय आहे. मराठी प्रेमापोटी ते हे काम करतात. या गटामध्ये अनेक मराठी शब्दाबद्दल चर्चा होते. काही शब्द इतके जुने झाले आहेत की नव्यापिढीला हे शब्द माहीतही असणे शक्य नाही. अशा मराठी शब्दावरही येथे चर्चा रंगते. एकंदरीत नवे पर्यायी मराठी शब्द इथे तयार होत आहेत. ते रुळले नाहीत तरी प्रतिशब्द शोधावेत हा या समूहाचा मुख्य आणि प्राथमिक उद्देश आहे. मराठी शब्द संपत्ती वाढवा तसेच वापर कमी झालेले शब्दांची माहिती व्हावी व त्याचा वापर पुन्हा वाढावा. शब्दांच्या छटा अर्थांचे बारकावे माहीत व्हावेत. असे अनेक उद्देश ठेवून हा समूह काम करतो आहे.

कामाच्याबाबतील आऊटसोअर्सिंग या इंग्रजी शब्दाचा वापर आजकाल सऱ्हास होतो. बाहेरून काम करून घेणे अशा याचा अर्थ आहे. अशा नव्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द शोधणे महत्त्वाचे आहे. काहींनी या शब्दाला ठेकापद्धत हा शब्द सुचवला. तर उक्तपद्धती, उक्तकरण, प्रभारीकरण, अन्यत्रीकरण असे पर्याय सुचवले. काही भागापुरती कामाची जबाबदारी दुसऱ्याला देणे अशा अर्थी परदायित्व, बाह्ययंत्रणा, बाह्यसूत्रकार्यपद्धती, बाह्यार्जन, बाह्यनिर्मिती असा शब्दही सुचविण्यात आला. मोल देऊन काम करून घेणे यावरून मोलकाम असाही शब्द सुचविण्यात आला. असे विविध अर्थ मराठी शब्द समूहामध्ये सुचवलेले पाहायला मिळतात.

एकच कृती असेल पण महाराष्ट्रात त्या कृतीला विविध भागात विविध शब्द पाहायला मिळतात. सण-समारंभात जेवणावळी असत. पूर्वीच्याकाळी ताट-वाट्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. त्यामुळे जेवण पत्रावळीत वाढले जायचे आणि आमटी द्रोणात. या द्रोणातून आमटी सांडू नये यासाठी हे द्रोण एकतर भातात रोवायचे किंवा त्याला वटकण लावयची. पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर भागात याला वटकण लावणे म्हणतात. तर विदर्भात वडगन असा शब्द आहे. विदर्भात पातळ भाजी सांडू नये म्हणून एक बाजूने काडेपेटी, एखाद खापर, गवरीचे खांड लावत. विदर्भात वडगन तर खानदेशात ( भुसावळ, रावेर जळगाव) येथे आडकन् हा शब्द आहे. जुन्नर भागात वटकवणं हा शब्द वापरात आहे. म्हणजे मराठीचे विविध बोलीतील शब्दही या समूहामध्ये समजतात.

लहान मुलांना शाळेत activity book मध्ये activity करायला सांगतात. जसे की रंगवणे, चिकटवणे, कोडी सोडवणे इत्यादी. ह्या दोन शब्दांना मराठीत काय म्हणतात ? आपणास माहीत आहे. असे प्रश्न येथे विचारले जातात. यावर अनेकजण व्यक्त होतात. आपल्या तोडांत इंग्रजी शब्द इतके पक्के बसले आहेत की आपणास त्याला मराठी पर्यायी शब्द पटकण आठवत नाही. काहींनी याला कार्यानुभव व कार्यानुभव पुस्तिका किंवा वही असे शब्द सुचवले तर काहींनी उपक्रमवही/ उपक्रमपुस्तिका असा शब्द सुचविला. आता मराठीवर चर्चा होत म्हटल्यावर पुणेरी कसे गप्प बसतील. एका पुणेरी व्यक्तीने पुण्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळा मध्ये कृतीपत्रिका हा शब्द प्रचलित असल्याचे म्हटले. असे सर्व ठिकाणचे विविध शब्दार्थही या समूहामध्ये व्यक्त झालेले पाहायला मिळतात.

मराठीत शब्दांची मोडतोड तर नेहमीच पाहायला मिळते. मग यावर या समूहात चर्चा होणार नाही असे कसे घडेल. एकाला शेवटी हा समर्पक शब्द असताना शेवटाकडे हा शब्द का वापरला जातो हेच समजत नव्हते. त्याने यावर प्रश्न केला चित्रपटाचा शेवट जवळ आला आहे असे साधे सोपे म्हणण्या ऐवजी चित्रपट शेवटाकडे आलाय. असे म्हटले जाते. तसे शेवटाकडे हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो. शेवटीशेवटी हा शब्दप्रयोगही केला जाऊ शकतो. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय असेही म्हटले जाते. असे का म्हटले जाते यावर अनेकजण व्यक्त झाले. काहीजण म्हणाले वेगवेगळे शब्द वापरणे लेखकाला आवडते. लेखनातला तोचतोचपणा घालवण्यासाठी असे शब्दप्रयोग केले जातात. एकजण म्हणाला, शेवटाकडे म्हणजे शेवटी नाही. शेवट थोडा दूर असेल तेव्हा शेवटाकडे हा शब्द वापरतात. पण शेवट जवळ आला होता असा साधा शब्दप्रयोग तो करू शकत होता ना ! यावर आणखी एकजण म्हणाला, शेवटी व शेवटाकडे या वेगवेगळ्या छटा आहेत.

असे अनेकजण या समूहात व्यक्त होत असतात. मराठी भाषेवर चर्चा होते. यातून महाराष्ट्राच्या विविध भागातील मराठीही समजते. मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुशंगाने विचार केला तर हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे. अशा अनेक मराठी शब्दातील गमतीजमती या समूहात पाहायला मिळतात. ही फक्त एक झलक आहे. मराठी म्हणी, वाक्यप्रचार यावरही अनेकजण व्यक्त होतात. एकंदरीत मराठीचा शब्द संग्रह वाढवून मराठीला संजिवनी देण्यासाठी अशा समूहांची, अशा उपक्रमांची गरज मात्र निश्चितच वाटते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 comment

Gurav April 22, 2023 at 7:24 PM

Changla aahe praytna

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading