कोल्हापूर – येथे शनिवारी ( ता. ११) व ( रविवारी ता. १२) वर्डप्रेसच्या कोल्हापूर वर्डकॅम्प २०२५ डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये होणार आहे. या कॅम्पमध्ये विविध ठिकाणाहून २४ तज्ज्ञ मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये शनिवारी ( ता. ११ ) सकाळी साडेसात वाजता जुना राजवाडा येथून सांस्कृतिक पदभ्रमंतीने प्रारंभ होणार आहे.
कोल्हापूर कॅम्पचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ वेब डेव्हलपर, डिझायनर, अनुवादक, लेखक किंवा फक्त वर्डप्रेस फॅनच नव्हे तर मराठीप्रेमी, इतिहासप्रेमी, फोटोग्राफी प्रेमींसाठीही हा कार्यक्रम होत आहे. हे केवळ तांत्रिक माहितीचे शिबिर नसून यात इतिहास, संस्कृती, मराठी भाषा संवर्धनासही प्राधान्य देण्यात आले आहे. कोल्हापूरच्या वारशात महत्त्वाची भूमिका बजावणारी ऐतिहासिक वास्तू भवानी मंडपातून या पदभ्रमंतीला सुरुवात होईल. शहराच्या अरूंद गल्ल्या अन् बाजारपेठेतील रस्त्यावरून इतिहास जाणून घेत हा प्रवास जुना राजवाडा, नगरखाना, मेन राजाराम कॉलेज, करवीर नगर वाचन मंदिर, घुडणपीर दर्गा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महापालिका इमारत, शनिवार पेठ, टाऊन हॉल संग्रहालय, सत्यसुधारक हॉटेल स्मारक, नर्सरी बाग, छत्रपती शाहू महाराज समाधी छत्रपती चिमासाहेब पुतळा ते दसरा चौक असा असणार आहे.
मराठीप्रेमींसाठी संधी
मराठी बोला, वाचा, लिहा याची जबरदस्ती करून मराठी भाषेचे संवर्धन होत नाही तर मराठी भाषेचा वापर नव्या तंत्रज्ञानातही व्हायला हवा तेव्हांच खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे संवर्धन होईल. हा उद्देश ठेऊन मराठी प्रेमी वर्डप्रेस व्यावसायिकांनी वर्डप्रेस मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाने वर्डप्रेसच्या ४.७ पासून ६.८ पर्यंत मराठी व्हर्जन विकसित झाले आहे. याच्या वापरात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि अधिक मराठी शब्दांची अचूकता साधण्यासाठी नेहमीच प्रयत्न होत आहेत. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर वर्डकॅम्पमध्ये मराठी प्रेमींची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये WordPress.org, प्लगिन्स आणि थीम्सचे मराठीत भाषांतर पूर्ण करणे, वर्डप्रेस मराठी संघामध्ये नवीन योगदानकर्त्यांना जोडणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे, विद्यमान भाषांतरांसाठी अधिक सुसंगतता आणण्यासाठी शब्दकोशाचा विकास करणे व सुधारणा करणे यावर चर्चा केली जाणार आहे. तरी या सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
वर्डप्रेसमध्ये करिअरच्या संधी
वर्डप्रेसमध्ये करिअर कसे करू शकता ? कोणत्या संधी आहेत ? यावर विशेष पॅनेल चर्चा आयोजित केली आहे. यामध्ये एलव्हिना गोवेस (बारदेस्कर), गौतम नावडा, मेहेर बाला, तरुण परसवानी, हर्षवर्धन खोलापूरकर हे सहभागी होणार आहेत.
या व्यतिरिक्त ऑनलाइन फसवणुकीचा मुकाबला करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक सुरक्षा उपाय यावर जिनेंद्र खोबरे, डिजिटल साधने व संसाधनांचा वापर यावर प्रीतम सोनोने, डिमांड जनरल 2.0: हायपर-लक्ष्यित बाजारपेठेत वाढीव वाढ आणत आहे यावर राहुल डी सरकार, पायथन वापरून Woo Commerce वेबहुक प्रभावीपणे कसे लागू केले जाऊ शकतात यावर श्रीशैल विटकर, वर्डप्रेस आणि लिंक्डइनसह मास्टरिंग सामग्री निर्मिती आणि वैयक्तिक ब्रँडिंग यावर सिद्धांत वाधवानी, डिझाइनमध्ये एआय यावर उत्कर्ष गुप्ता, वर्डप्रेस प्लगइन डेव्हलपमेंट : आयडिया ते मार्केटप्लेस यावर प्रेम तिवारी, ब्लॉक एडिटरचा वापर करून आकर्षक ब्लॉक थीम यावर अरुण आर शेनॉय, वर्डप्रेसमध्ये आपले कौशल्य वाढवण्यासाठी एआय टूल्स कसे वापरावे यावर अभिष डोक्रस, ई-कॉमर्ससाठी वर्डप्रेस सुरक्षा : तुमची गुंतवणूक, महसूल आणि प्रतिष्ठेचे संरक्षण यावर शिवानंद शर्मा, वर्डप्रेस वेबसाइटसाठी योग्य लेआउट निवड यावर मौलिक व्होरा, परिणामकारक कंटेटसाठीच्या उपयुक्त टिप्स यावर निकिता सावरकर, फिडबॅक संदर्भातील प्रभावी टिप्स यावर अक्षरा राणे, वेबसाइट ऍक्सेसिबिलिटी यावर मयंक कुमार, वर्डकॅम्पमधील अनुभव यावर अरविंद बारसकर, सुरक्षित वर्डप्रेस प्लगइन तयार करण्यासाठी 5 टिपा सांगणार आहेत ब्रिजेश कोठारी असे विविध २० तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.