स्मार्ट फोनचे स्फोट !
सर्वप्रथम या स्मार्ट फोनच्या स्फोटाची कारणे समजून घ्यायला हवीत. मोबाईल फोन ही अत्यावश्यक गरज बनल्याने प्रत्येकाला चांगल्या फिचरचा फोन हवा असतो. असे फोन तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये सुरक्षेची सर्व प्रकारची काळजी न घेणाऱ्या कंपनीचे फोन खरेदी केल्यास आणि त्यामध्ये उत्पादनावेळीच काही दोष राहिला असल्यास, अशा मोबाईलचे स्फोट होण्याची शक्यता असते.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
मागील काही वर्षांत स्मार्ट फोनच्या किंवा अत्याधुनिक भ्रमणध्वनीच्या स्फोटांचे प्रमाण वाढले आहे. मागील पंधरवाड्यात विदर्भातील एका शिक्षकाच्या खिशातील भ्रमणध्वनीचा स्फोट होऊन त्यात त्याचा जीव गेला. अशा घटना वारंवार घडतात, बातम्या येतात आणि आपण त्या विसरून जातो. मोबाईल आज अत्यावश्यक साधन झाले आहे. मोबाईल जवळ नसेल तर अनेकांचा जीव कासावीस होतो. फोन म्हणजेच मोबाईल बिघडला तरी घरचे कोणी आजारी पडल्यासारखे अस्वस्थ होतात. अलिकडे अशा स्फोटांच्या घटना वारंवार ऐकिवात येत आहेत. या स्मार्ट फोनचे स्फोट का होतात, हे समजून घेणे आणि त्यानुसार आवश्यक काळजी घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.
त्यासाठी सर्वप्रथम या स्मार्ट फोनच्या स्फोटाची कारणे समजून घ्यायला हवीत. मोबाईल फोन ही अत्यावश्यक गरज बनल्याने प्रत्येकाला चांगल्या फिचरचा फोन हवा असतो. असे फोन तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये सुरक्षेची सर्व प्रकारची काळजी न घेणाऱ्या कंपनीचे फोन खरेदी केल्यास आणि त्यामध्ये उत्पादनावेळीच काही दोष राहिला असल्यास, अशा मोबाईलचे स्फोट होण्याची शक्यता असते. मात्र मोबाईलचे स्फोट हे एका विशिष्ट कंपनीच्या फोनचेच स्फोट होत नाहीत. त्यामुळे फोनचा निष्काळजी वापर हेच महत्त्वाचे कारण दिसून येते. तरीही अपवादात्मक उत्पादनाच्यावेळी एखाद्या उपकरणामध्ये एखादा दोष राहिला आणि दर्जा पडताळणी करताना तो लक्षात आला नाही तर अशा उपकरणामध्ये स्फोट होण्याची शक्यता असते. असा स्फोट झाल्यानंतर संबंधित कंपनी त्याची पडताळणी करते आणि उत्पादन दोष असल्यास असे सर्व मोबाईल मार्केटमधून परत घेते. अगदी सुरुवातीच्या काळात नोकिया कंपनीने लाखो फोन बाजारातून परत घेतले होते.
मोबाईलचा स्फोट होण्याचे दुसरे कारण म्हणजे बॅटरीच्या तापमानामध्ये वाढ होणे. बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ लागली तर ग्राहक बॅटरी बदलतो. ही बॅटरी बदलताना त्याच कंपनीची, फोनला योग्य असणारी बॅटरी असायला हवी. मात्र पैसे वाचवण्यासाठी हलक्या दर्जाची बॅटरी अनेकदा घातली जाते. अशी बॅटरी शॉर्टसर्किट होऊन स्फोट होतात हे लक्षात आल्यानंतर अनेक कंपन्यांनी बॅटरी बदलता येणार नाही, असेच मोबाईल संच बनवण्यास सुरुवात केली आहे.
अनेकांना मोबाईल थोडा डिस्चार्ज झाला तरी अस्वस्थ होते. आपला मोबाईल कायम फुल चार्ज असला पाहिजे, असे वाटते. त्यासाठी ते मिळेल त्या चार्जरचा वापर करून चार्जिंग केले जाते. मोबाईल असा कोणत्याही चार्जरने चार्ज करण्याचा प्रयत्न केल्यास मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता असते. मोबाईल संचाच्यासोबत आलेल्या चार्जरखेरीज अन्य कोणत्याही उपकरणाचा चार्जिंगसाठी वापर करणे, घातक ठरते. त्यामुळे अनेक कंपन्यांनी विचारपूर्वक चार्जर उत्पादनामध्येही एकजिनसीपणा आणलेला आहे. मात्र केबल वापरताना कंपनीने पुरवलेलीच वापरली जाईल, याची दक्षता घेणे खूप गरजचे आहे.
दुसरी एक चूकीची सवय अनेकांना असते ती म्हणजे रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावणे. रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावतात आणि झोपतात. त्यामुळे फोनमधील बॅटरी जास्त गरम होणे आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते. खरंतर, अति चार्जिंगमुळे तापमान वाढून शॉर्ट सर्किट होते. ही सवय लक्षात घेऊन काही कंपन्यानी मोबाईलमध्ये आणखी एक प्रणाली बसवली. ही प्रणाली मोबाईलची बॅटरी प्रभारीत होण्याची पातळी १०० टक्के होते, मोबाईल चार्जिंग आपोआप थांबते. मात्र ही प्रणाली सर्वच मोबाईलमध्ये नाही. त्यामुळे ही प्रणाली नसणाऱ्या मोबाईलचे चार्जिंग १०० टक्के करू नये. फोन रात्रभर चार्जिंग करणे तर, टाळलेच पाहिजे.
दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे वॉटरप्रुफ अशी अनेक मोबाईल फोनची जाहिरात केली जाते. मात्र १०० टक्के वॉटरप्रुफ असे कोणतेच उपकरण असत नाही. मोबाईलची केस तशी बनवता येऊ शकते, मात्र स्पीकर, चार्जिंगचा जोडणीचा भाग, माईक अशा अनेक ठिकाणी पाण्याचे अंश जातात. पाणी विद्युत सुवाहक असल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता राहते. ज्यावेळी फोनचा पाण्याशी संपर्क येतो, तेव्हा तत्काळ सर्व्हिसिंग सेंटरमध्ये जाऊन, तो सुकवून घेणे आवश्यक असते. पूर्वी फोन वॉटरप्रुफ नव्हते. त्या काळात तर मोबाईल फुटण्याच्या अनेक घटना घडत. फोनचा स्फोट नाही झाला तरी किमान उपकरण खराब होत असे. आताच्या फोनच्या अंतर्गत भागापर्यंत, प्रोसेसरपर्यंत पाणी पोहोचत नाही. तरीही फोन पाण्यात पडला किंवा फोनचा पाण्याशी संपर्क आला तर योग्य काळजी घेऊनच तो चार्जिंगसाठी लावणे योग्य.
आणखी महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे अनेकदा मोबाईल संचामध्ये अनेक ॲप्लिकेशन्स एकाचवेळी सुरू असतात. ही सर्व ॲप्लिकेशन्स वेळोवेळी बंद करणे आणि ज्याची गरज आहे, ते एकच ॲप सुरू राहिल, यांची दक्षता घेणे. मात्र आपण नवे ॲप उघडत जातो आणि पूर्वीची ॲप मागे तशीच चालू असतात. याचे दोन परिणाम होत असतात. पहिला भाग म्हणजे ही ॲप पाठीमागे सुरुच असल्याने बॅटरी वापरली जाते, ती डिस्चार्ज वेगाने होत जाते. जितका काळ बॅटरी टिकायला हवी तेवढा वेळ ती टिकत नाही. दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे अनेक ॲप एकाचवेळी सुरू असल्याने मोबाईलचा प्रोसेसर वेगाने चालत राहतो. याचा परिणाम म्हणून मोबाईलचे तापमान वाढत राहते. पब्जीसारखे खेळ मोबाईलवर खेळत असताना अनेक मोबाईल संचांमध्ये अशा समस्या आढळून आल्या आहेत. तसेच आपला मोबाईल सावलीमध्ये ठेवणे आवश्यक असते. बहुतांश मोबाईल काळ्या किंवा गडद रंगाचे असतात. ते सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि तापमान वाढल्याने बॅटरीमध्ये कार्बन डायऑक्साईडसारख्या वायुंची निर्मिती होते आणि यातूनही बॅटरी फुगणे आणि स्फोट घडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला मोबाईल उन्हात दिर्घकाळ ठेवणे धोकादायक आणि बॅटरीचे आयुष्य कमी करण्याचे आणि त्यातून स्फोटाचे कारण बनू शकते.
मोबाईलचा वापर आवश्यक असला तरी तो काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. मोबाईलचे अती चार्जिंग, मोबाईलमधील अनेक ॲप्लिकेशन्स एकाचवेळी सुरू ठेवणे, मोबाईल उन्हात ठेवणे, अशास्त्रिय पद्धतीने चार्जिंग करणे, हे टाळायला हवे. कोणतेही उपकरण वापरताना त्याची योग्य माहिती समजून घेऊन मगच वापरायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.