February 3, 2025
Ardha Koyata Book Review by Madhuri Choudhari
Home » ग्रामीण वेदनांचा लेखाजोखा म्हणजे अर्धा कोयता..
मुक्त संवाद

ग्रामीण वेदनांचा लेखाजोखा म्हणजे अर्धा कोयता..

‘अर्धा कोयता’ कथासंग्रहामधील संवादाची भाषा, शब्द, मांडणी, कथेतील पात्रांच्या भावना जशा आहेत तशाच पोहचवतात. लेखिका अगदी सुक्ष्मपणे सामाजिक, कौटुंबिक, ग्रामीण व्यवस्थेकडे बघते, व स्वतः अनुभवल्या सारखी मांडते. म्हणूनच ते काळजाला भिडते. अगदी साधी सोपी भाषा, सरळ मांडणी, परिचयाचे संवाद यामुळे लिखाण थेट भिडते. समजून घ्यायला अगदी सामान्य माणसाला पण सोपे जाते. म्हणूनच या कथा वाचकांच्या मनावर राज्य करताहेत.

माधुरी चौधरी, वाघुळदे, संभाजीनगर

ऊसतोड कामगारांशी संबंधीत अर्धा कोयता हा शब्द अलकनंदा घुगे यांचा ‘अर्धा कोयता’ हा कथासंग्रह वाचतांना खऱ्या अर्थाने उमजत जातो. परिस प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या संग्रहात एकूण १८ लघुकथा असून सर्वच कथा ह्या कष्टकरी, मजूर, ऊसतोड कामगार अशा आर्थिक परिस्थितीने गांजलेल्यांच्या आहेत. या कथांची मांडणी व संवादासाठी वापरलेली ग्रामीण भाषा, कथेचा गाभा, कथेतील प्रसंग वर्णन या सर्वच गोष्टींनी कथा परिणामकारक झालेल्या आहेत. या कथांमधील पात्र सर्पदंश मधील सर्जा, अफवेच पीक मधील अंक्या, शिक्षा कथेतील धुरी, आळ मधील संपत कथा संपते, पुस्तक वाचून संपते तरी आपल्या मनावर, सद्सदविवेक बुध्दीवर घणाघाती घाव घालत असतात. या कथांमधील वातावरण निर्मिती, संवाद, भाषा, मतितार्थ सारेच सखोल, सहज व सुंदर तसेच समजण्यास सोपे. प्रसंग उभारणी अगदी परिणामकारक आहे. या संग्रहातील कथांचे विषयही सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत आहेत. त्यामुळे ह्या कथा वाचताना आपण आपल्याच माणसांबद्दल वाचतोय ही भावना बळावत जाते आणि वाचक कथानकाशी एकरूप होत जातो.

छेड या कथेतील विषयही तसाच. गंभीर पण सवयीने अंगवळणी पडलेला. आजही खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही हे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. पिन्या, दसऱ्या, बाल्या सारखी मुले वळणा वळणावर उभी राहून मुलींचीच नाही तर स्रियांची पण छेड काढत असतात. मग काही जणी रस्ता बदलतात, काही घरचे सोबत आणतात. खूपच कमी जणी त्यांना वठणीवर आणतात पण आजही खेड्यांमध्ये साधासरळ मार्ग अवलंबला जातो. दुर्गा, सीता, मिना, तारा, सुनिता यां सारख्या मुली कोवळ्या वयात बोहल्यावर चढविल्या जातात. ही कथा वाचताना असे कितीतरी चेहरे डोळ्यासमोर तरळून जातात. हीच लेखिकेच्या लेखणीची ताकद आहे. यातील अशा अनेक कथांचे कथानक आपल्या आसपास घडत असल्याचे आपल्याला जाणवते. लेखिकेचा भवताल तिच्या लेखणीतून उतरलेला आहे. ही पात्र आपल्यातीलच आहेत. ग्रामीण भाषेचा लहेजा संवादाची गोडी वाढवतो. शहरातील झगमगाटात जगणारे आपण कधीतरी या ग्रामीण जीवनाशी जोडलेलो असतो. तेथील शेतकरी, शेतमजूर, भरकटलेले तरूण तसेच ध्येयवेडे तरूणही आपण जवळून पाहिलेले असतात. या कथा वाचताना त्या अनुभवांची पुन्हा एकदा उजळणी होते.

आळ या कथेतील संगी व मंदी या मैत्रिणींमधली इर्षा संगीच्या कुंकवाचा संपतचा जीव घेऊन जाते. तर यशोदा या कथेतील यशोदा हीची ममता पैशांच्या चकाचोंद मध्ये भरडली जाते. पैशांना महत्व देणारी मुले व सुना यांना वाटणीनंतर आई नकोशी होते व शेवटी आयुष्यभर ऐशोआरामात राहिलेली यशोदा आयुष्याच्या संध्याकाळी वृध्दाश्रम जवळ करते. नकोशी या कथा मात्र नकारात्मकते कडून सकारात्मकतेकडे प्रवास करते. तुळसा शेवटी नकुशी या आपल्या सावत्र मुलीचा मुलगी म्हणून स्वीकार करते. नकुशीची नक्षत्रा होते.

यातील प्रत्येक कथा आपला भवताल प्रतिबिंबित करते. सकारात्मक व नकारात्मक अशी दोन्ही कथाबिज या कथांमध्ये येतात. त्यामुळे पारंपरिक व्यवस्थेने पिचलेली ही समाजव्यवस्था नकुशी या कथानकात सकारात्मकेने आधुनिकीकरणाकडे वळतांना दिसते. या कथांमधील संवादाची भाषा, शब्द, मांडणी, कथेतील पात्रांच्या भावना जशा आहेत तशाच पोहचवतात. लेखिका अगदी सुक्ष्मपणे सामाजिक, कौटुंबिक, ग्रामीण व्यवस्थेकडे बघते, व स्वतः अनुभवल्या सारखी मांडते. म्हणूनच ते काळजाला भिडते. अगदी साधी सोपी भाषा, सरळ मांडणी, परिचयाचे संवाद यामुळे लिखाण थेट भिडते. समजून घ्यायला अगदी सामान्य माणसाला पण सोपे जाते. म्हणूनच या कथा वाचकांच्या मनावर राज्य करताहेत.

या संग्रहाची ओळख असलेली कथा अर्धा कोयता वाचतांना ते प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभी राहतात. उसाच्या मोळ्या वाहून वाहून कांताचा नवरा लक्ष्मणच्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी नस फाटते व त्याचा एक हात निकामी होतो. घरातील कर्ता पुरुषच असा अधू झाल्यावर कांता अर्धा कोयता घेऊन इतर कुटुंबांसोबत ऊस तोडणीला जाते. शेवटी एकटी बाई मुकादमाच्या नजरेत भरते. पण आपली अब्रू वाचवताना कांताने घेतलेले दुर्गेचे रूप इतर कोप्यातील बायकांचे पण धैर्य वाढवते. हे प्रसंग वाचताना अंगावर येणारे शहारे मन सुन्न करतात. हे साधण्यात लेखिका अलकनंदा या यशस्वी झाल्या आहेत.

मंगळसूत्र कथेतील आप्रुगी, चंद्रा व माणिक असा त्रिकोण बऱ्याचदा बघायला मिळतो. पण जेव्हा सवत प्रेमातील वाटेकरी होताहोता कष्टाच्या मोबदल्यातही वाटेकरी होते तेव्हा होणाऱ्या मानसिक वेदना, आप्रुगीचे भावविश्व लेखिका खूप सुंदर रितीने संयमित पणे मांडते. कुठेही नात्यातील बिभित्सता उमटून येत नाही. असा संयमीपणा या कथांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. या संग्रहातील प्रत्येक कथा अशी उंची गाठते. या कथा माणसातील माणुसकीला झिंझाडून ठेवतात. माणसाचे मेंदू, मन व ज्ञानेंद्रिये यांच्यावर कुठे आधुनिकतेची तर कुठे अंधश्रद्धेची किंवा समाजव्यवस्थेची झापडे बसलेली आहेत. त्यामुळे नाती कमकुवत व कुटुंब व्यवस्था डळमळीत होत चालली आहे. हे सार या कथांमध्ये ठासून भरलेले आहे. या संग्रहातील १८ ही कथा या शेतकरी, कष्टकरी, गरीब, मजूर, स्त्रीपुरूष यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकतात. पैशांचा अभाव, शैक्षणिक कमतरता, व्यसनाधीनता, अज्ञान, शंकेखोरपणा, आर्थिक विषमता, कौटुंबिक वादविवाद या घटकांचा ग्रामीण जीवनावरती किती दाहक दुष्परिणाम होतात हे या कथा सांगण्यात यशस्वी झाल्या आहेत.

परिस प्रकाशनने प्रकाशित केलेला हा संग्रह खूपच सुंदर व वाचनिय झाला आहे. अरविंद शेलार यांचे समर्पक मुखपृष्ठ, कथाकार बाबाराव मुसळे यांची समर्पक प्रस्तावना या संग्रहाच्या सौंदर्यात भर घालतात.

कथा संग्रह – अर्धा कोयता
लेखिका – अलकनंदा घुगे आंधळे
पृष्ठे – १६०
प्रकाशन – परिस प्रकाशन
किंमत- ३५०

मनाला अंतर्मुख करणारा कथासंग्रह

अर्धा कोयता हा कथासंग्रह हृदयाला भिडणारा, विवेक जागवणारा व अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करणारा असा आहे. हा कथासंग्रह वाचत असताना ग्रामीण लोकजीवन खास करून मराठवाडा, त्यांच्या सामाजिक वेदना क्षणाक्षणाला जाणवत होत्या. अर्धा कोयता या कथासंग्रहातील बरेचशी पात्रे हे माझ्या गत आयुष्यामध्ये माझे जन्मगाव जव्हार वाडी जिल्हा. बीड येथे वास्तव्यास असताना माझ्या सहवासातील वाटतात. परिचयाची वाटतात. ह्या व्यथा अनुभवलेल्या वाटतात.

अर्धा कोयता कथासंग्रह मधून तुमचे सूक्ष्म निरीक्षण, सदृहृदय व सद विवेक बुद्धी, कुठल्याही पात्राची री न ओढता अगदी निरपेक्षपणे मांडलेली परिस्थिती यामधून सामाजिक बांधिलकी व्यक्त होत आहे. ऊसतोड मजूर, शेतकरी, कामगार वर्गाची आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या व सामाजिक परिस्थितीने भरडलेल्या समाजाची करुण वेदनेला आपण स्पर्श केला आहे.

ह्या कथासंग्रहामधील सर्व अठरा कथा दर्जेदार असून खास करून ऊसतोड समाजाविषयी त्यांच्या विविध प्रश्नाविषयी आपली तळमळ दिसून येते. सर्जाला सर्पदंश झाल्यानंतर शारदीचे उर्वरित आयुष्य, नवऱ्याला अर्धांग वायू आजार झाल्यानंतर कांता पुढील आयुष्य व तिचा संघर्ष, ऊसतोड मजुरांचा मुलगा वैजिनाथ त्याचे भाव विश्व या सर्व कथा मधून तुम्ही ऊसतोड मजूर, त्यांचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयी अनेक प्रश्नाला एकाच वेळी वाचा फोडली आहे असं वाटतं.

बगीच्या कथा मधील नानाचा आडमुठेपणा, स्वाभिमानी यशोदाची वार्धक्य काळामध्ये ओढवलेली परिस्थिती, व्हळयी मधील आप्पा, विम्याचे पैसे मधील एका व्यसनांद्य मुलाच्या आई वडलाची मनो व्यथा, आळ मधून मंदीची असूया संपतच्या संसाराची वाट लागणे, प्रौंगाड अवस्थेमधील स्वाभिमानी अंक्या या सर्व कथानकामधून लेखिकेने ग्रामीण समाज जीवनाला स्पर्श केलेला आहे.

कथासंग्रहामधील शारदी, अप्रुगी, यशोदा, शेवंता, जना, कांता, संगीता, मंदा, दुर्गा, या पात्रामधून ग्रामीण व शिक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या ग्रामीण “स्त्री” वर्गाची करुण वेदना प्रतिबिंबित झालेल्या आहेत. ईद का चांद मधून सामाजिक सलोखा राहावा याविषयी तुमची संवेदना, व नकोशी मधून सकारात्मकता दिसून येते. कथा वाचत असताना पुष्कळ वेळा कंठ दाटून आला, अनेक कथा स्वतःच्या वैयक्तिक भाव विश्वामध्ये घेऊन गेल्या. अनेक प्रसंग हे मनाला अंतर्मुख करणारे होते.

नारायण बांगर
पुणे

कथा वाचताना आपल्याच माणसाबद्दल वाचतोय असे वाटते
ऊसतोड, कामगार, कष्टकरी, मजुर अशा आर्थिक परिस्थितीने गांजलेल्यांच्या आहेत या कथांची मांडणी व संवादासाठी वापरलेली ग्रामीण भाषा, कथेचा गाभा, कथेतील प्रसंग वर्णन या सर्वच गोष्टींनी कथा परिणामकारक झालेल्या आहेत. या कथांमधील पात्र सर्पदंश मधील सर्जा,अफवेच पिक मधील अंक्या, शिक्षा कथेतील धुरी, आळ मधील संपत कथा वाचुन संपली तरी आपल्या मनावर, सद्सदविवेक बुद्धीवर घणाघाती घाव घालत असतात या कथांमधली वातावरण निर्मिती, संवाद, भाषा, मतीतार्थ सारेच सखोल, सहज व सुंदर तसेच समजण्यास सोपे प्रसंग उभारणी अगदी परिणामकारक आहे. या संग्रहातील कथांचे विषय ही सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत आहेत. त्यामुळे या कथा वाचताना आपण आपल्याच माणसाबद्दल वाचतोय ही भावना बळावत जाते आणि वाचक कथानकाशी एकरूप होत जातो. लेखन करत असताना आपल्या आसपास काय घडल ते सक्षमपणे मांडण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत.

राजेश टी. भापकर, मु.अंबड
सावित्रीबाई फुले विद्यालय पारनेर
ता.अंबड जि. जालना..

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading