सर्व जीवातील तत्त्व हे एकच आहे. आपण दुध पिल्यानंतर त्यापासून शरीराला तेजी येते. अन् सापाने दुध पिले तर त्यापासून विष उत्पन्न होते. मानवाचे शरीर अन् सापाचे शरीर हे वेगळे आहे. दोघांचाही देह वेगळा आहे. त्यामुळे कार्यही वेगळे आहे. पण त्यांच्यात असणारे तत्त्व, त्यांच्याठायी असणारा आत्मा हा एकच आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तेवीं जालेनि सुखलेशें । जीवु भाविलिया अभ्यासें ।
जीवपणाचें नासे । दुःख जेथे ।। ७७६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेल्या सुखलेशाने (गोडी लावून) जीवाला अभ्यासानें त्या सुखलेशांची पुटें दिली असतां, या आत्मसुखाच्या ठिकाणी जीवपणाचें दुःख नाश पावते.
आत्मा आणि जीव यांची भेट, जीवा-शिवाची भेट एक सुखद अनुभुती देते. पण आपण यासाठी प्रथम जीव आणि आत्मा यांची ओळख करून घ्यायला हवी. जीव आणि आत्मा यांना जाणायला हवे. पंचमहाभूताच्या या देहात जीव असतो. पृथ्वीतलावरील सर्व जीव हे एकाच तत्त्वाची अनेक अंगे आहेत. ही जैवविविधता समजून घ्यायला हवी. आपणाला भूक लागते. इंद्रियांसाठीचे हे विषय आहेत. भूक लागली म्हणून आपण काही तरी खातो. यातून आपणास तृप्ती मिळते. आनंद मिळतो. भूक लागली म्हणून आपण काहीही खाले तर त्याचा परिणाम हा उलट होतो. यातून सुख मिळण्याऐवजी आपणास दुःख, यातना होतात. यासाठी योग्य तेच खायला हवे. इतकेच नव्हेतर योग्य प्रमाणातही खायला हवे. तरच यातून सुख मिळते. अन्यथा दुःख मिळते. हाव सुद्धा मर्यादेत असायला हवी. म्हणजेच इंद्रियांना नियंत्रित ठेवायला हवे.
इंद्रियांना आपण कोंडून ठेवले तरी आपणास सुख मिळते असे नाही. इंद्रियांतील वासनांना कोंडल्यास भडका उडण्याचाही धोका असतो. म्हणजेच शरीराला त्रास देऊन सुख मिळत नाही. मग या शरीराच्या समाधानासाठी आपले हे सर्व व्यवहार सुरु असतात. पण शरीरात असणारे तत्त्व मात्र यापासून अलिप्त असते. सर्व जीवातील तत्त्व हे एकच आहे. आपण दुध पिल्यानंतर त्यापासून शरीराला तेजी येते. अन् सापाने दुध पिले तर त्यापासून विष उत्पन्न होते. मानवाचे शरीर अन् सापाचे शरीर हे वेगळे आहे. दोघांचाही देह वेगळा आहे. त्यामुळे कार्यही वेगळे आहे. पण त्यांच्यात असणारे तत्त्व, त्यांच्याठायी असणारा आत्मा हा एकच आहे. सर्व जीवांमधील हे तत्त्व एकच आहे. देहाचे, इंद्रियांचे कार्य वेगळे असते. यापासून हे तत्त्व स्वतंत्र आहे.
बुद्धीने हे जाणायला हवे. यासाठी बुद्धीत आत्म्याचा निश्चय हा करायला हवा. देहातील जीवाला अर्थातच आत्म्याला ओळखून त्याचे वेगळेपण जाणणे गरजेचे आहे. इंद्रियांना दुःख होते. देहाला याची जाणीव होते. पण आपण आपले लक्ष इंद्रियांकडे दिले तर त्याचा त्रास आपणाला अधिकच जाणवतो. पण आपण आत्मबुद्धीने त्याकडे पाहीले तर त्याचा त्रास आपणास होत नाही. आपण देहाकडे न पाहाता देहातील जीवाकडे, आत्मबुद्धीने पाहायला हवे. त्याच्यावर मन केंद्रिय करायला हवे. आत्मा आणि जीवाची ही भेट आपणाला दुःखापासून दूर नेते. त्यावर आपले मन, बुद्धी केंद्रित झाल्यास आपणास केवळ सुख अन् सुखच प्राप्त होते. कारण या साधनेत आपल्या शरीरात उत्पन्न होणारे रस हे आपले तेज वाढवतात. आपला उत्साह वाढवतात. या रसाने शरीरातील व्याधी दूर होतात. यासाठीच साधनेने आत्मा, जीव जाणायला हवा. सोहम साधना ही आत्म्याची अनुभुती देणारी साधना आहे. यातून मिळणारे सुख हे आपणास आनंदी आनंद देत राहाते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.