अज्ञानावर ज्ञानानेच मात करता येते. यासाठी ज्ञानाच्या मार्गाच्या प्रबोधन करत राहाणे. ज्ञानप्राप्तीसाठी जप किती माळा केला यापेक्षा केलेली साधना योग्य प्रकारे करणे कधीही फायदेशीर ठरू शकते. केलेल्या जपाचा डांगोरा न पिटता जे केले ते योग्यप्रकारे आहे का हे तपासून त्यानुसार बदल करणे निश्चितच हिताचे आहे. एका माळेने सुद्धा ज्ञानप्राप्ती होऊ शकते. मात्र ती माळ कशी जपायची याचे तंत्र महत्त्वाचे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
घाली विद्येचा पसारा । सूये सुकृताचा डांगोरा ।
करी तेतुले मोहरा । स्फीतीचिया ।। 659 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – विद्येचा पसारा घालतो, केलेल्या पुण्यकर्मांची दवंडी पिटतो, आणि जेवढे म्हणून काही करतो, तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो.
संत ज्ञानेश्वरांनी अज्ञानी पुरुषाची लक्षणे परखडपणे मांडली आहेत. त्यांचा हेतू प्रबोधनाचा आहे. अज्ञानी व्यक्तीला थोडेसे ज्ञान जरी भेटले तरी त्याचा गावभर डांगोरा पिटतो. थोडेजरी पुण्यकर्म केले तरी त्याची दवंडी गावभर पिटतो. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. अशा काळात टिकायचे तर आपले ज्ञान आणि पुण्यकर्म झाकुण ठेऊन कसे चालेल. आता नव्या पिढीला तर या गोष्टींची निश्चितच गरज वाटते आहे. राजकर्त्यांना तर याशिवाय जमतही नाही. कारण राजकारणात काम कमी आणि केलेल्या कर्माचे डिजिटलच जास्त झळकवावे लागतात. त्यामुळे हे अज्ञान लक्षण असो किंवा अन्य काही असो हे त्यांना तर निश्चित पटणारे नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो. काम कमी आणि दवंडी जास्त हा तर त्यांचा अजेंडा असतो.
धर्माच्या गप्पा मारणारे राजकत्येही हेच करतात. उलट तेच सागणार राजकारणात तग धरायचे तर अध्यात्माची पुराणी गाठोडी गाठोड्यातच ठेऊन काम करावे लागते. विरोधक कामाचे श्रेय लाटणार मग आम्ही गप्प बसून कसे चालेल. त्यामुळे गरज म्हणून हे सर्व करावेच लागते. अशा या राजकिय विचारसरणीमुळे सध्या देशाची अवस्था काय झाली आहे याचा विचार आता करण्याची खरी गरज आहे. सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे पर्याय कोणता उभा करायचा हा मोठा प्रश्नच आहे. समस्या सुटत नसेल तर ती सोडून देणेच हिताचे राहाते, अशाने परिस्थिती सुधारण्याची काहीच लक्षणे दिसणार नाहीत. यासाठी असणाऱ्या परिस्थितीबाबत जन प्रबोधन हा मार्ग उत्तम राहू शकतो.
जनतेचे प्रबोधन करूनच यावर मात करता येऊ शकते. पण तो मार्गही आता खडतर झाला आहे. चार चांगल्या गोष्टी बोलणे, त्याबाबत प्रबोधन करणेही रुजणारे नाही. पण म्हणून प्रबोधनाचा मार्ग सोडून देणे योग्य नाही. वाळूचे कणही रगडता तेल गळे. या प्रमाणे कर्म करत राहायचे पाझर कधी-ना-कधी तरी फुटणार यावर विश्वास ठेवायला हवा. असे म्हणतात शहाण्याने राजकारणाच्या मार्गावर जाऊ नये. राजकारण्यांच्या भुलथापांना बळी न पडता. ज्ञानी माणसाने जनप्रबोधनाचा मार्ग स्वीकारावा. यासाठी अज्ञान लक्षणे जाणून घेऊन ज्ञानी होणे तितकेच गरजेचे आहे. कामाचे आकडे सांगणाऱ्यांकडून थोडेच पण चांगले काम करून कसे घेता येईल यावर भर द्यायला हवा. यासाठीच जनप्रबोधनाची गरज आहे.
अज्ञानावर ज्ञानानेच मात करता येते. यासाठी ज्ञानाच्या मार्गाच्या प्रबोधन करत राहाणे. ज्ञानप्राप्तीसाठी जप किती माळा केला यापेक्षा केलेली साधना योग्य प्रकारे करणे कधीही फायदेशीर ठरू शकते. केलेल्या जपाचा डांगोरा न पिटता जे केले ते योग्यप्रकारे आहे का हे तपासून त्यानुसार बदल करणे निश्चितच हिताचे आहे. एका माळेने सुद्धा ज्ञानप्राप्ती होऊ शकते. मात्र ती माळ कशी जपायची याचे तंत्र महत्त्वाचे आहे. यासाठी अज्ञान लक्षणे समजून घेण्याची गरज आहे. चुका काय होतात हे चुक समजल्याशिवाय लक्षात येत नाही. यासाठी अज्ञान लक्षणे काय आहेत हे समजून घेतल्यासच ज्ञानाचा मार्ग सुकर होतो. हे विचारात घेणे गरजेचे आहे. पारायणाचे आकडे, जपाचे आकडे सांगण्यापेक्षा सदैव सुरु असणाऱ्या सोहमच्या नादाला समजून घेऊन ज्ञानप्राप्ती करून घेणे महत्त्वाचे आहे.