नवरात्रौत्सव ५
ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!
रजनी ते रझिया प्रवास करणाऱ्या व दोन्ही धर्मांचा अभ्यास व जगणे अनुभवलेल्या व त्यात सुधारणा व जनजागरण धाडसीपणे व निर्भीडपणे करणाऱ्या रझिया सुलताना या आधुनिक नवदुर्गेला मानाचा मुजरा.!!
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244
रझिया सुलताना.. पुरोगामी व सत्यशोधक चळवळीतील एक मोठे नाव. कामानिमित्त थायलंड, सौदी अरब, दुबई असे दौरे करायची संधी. विविध समित्यांची सदस्य, अनेक पुरस्कारांची मानकरी. विविध वाहिन्यांवर मुलाखती. तसं पाहाता रझियाताईंचे काम हे गेल्या ३० वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे. तसाच त्यांचा स्वतःच्या आयुष्याशी संघर्ष सुध्दा..! आणि संघर्षातूनच त्या घडत तर गेल्याच पण कणखरसुध्दा बनत गेल्या..!
रजनी ते रझिया हा त्यांचा आयुष्याचा प्रवास ..! त्यांचे आत्मकथन प्रसिध्द आहे. यात त्यांचे केवळ कौटुंबिक आत्मकथन नव्हे तर हा त्यांचा प्रवास आहे, लढा आहे अस्तित्व व अस्मितेचा..! नावावरूनच आपल्या लक्षात येते की हिंदू ते मुस्लीम जगणे व वागणे हा प्रवास तसा सोपा नाही. दोन्ही धर्माचे जगणे, वागणे व भोगणे हे अतिशय वेगळे व क्लेशदायी आहे.
अमरावती सारख्या शहरात ५० माणसांच्या मुस्लीम कुटुंबात ही रजनी वयाच्या २० व्या वर्षी मोबीनशी प्रेमविवाह करून घरातून पळून गेली. लग्न करतानाच तिला धर्म बदलावा लागला. त्यानुसार दिवसात पाचवेळा नमाज पडणे, घरातील इतर सर्व रूढी परंपरांचे पालन करणे, वारंवार नमाज पडून व रोज अंघोळीची मुभा नसल्याने ती आजारी पडत असे. तेव्हा फक्त पतीपत्नीत शरीरसंबंध आला तरच अंघोळीची मुभा असे. त्यानंतर काही दिवसांनी तिला वारंवार नमाज न पडण्याची सासऱ्यांकडून परवानगी मिळाली. परंतु कुटुंबात काही चुकीचे घडले किंवा त्यांच्या घरचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असल्याने अगदी गाडी बंद पडली तरीही ही धर्माचे काही करत नाही तेव्हा असे वाईट घडणारच या समजुतीने वाईट घडणाऱ्या गोष्टीचे खापर रझिया ताईंवर फोडले जात असे.
घरात वारंवार होणारे वाद व भांडणे यामुळे त्यांच्या प्रेमाची नवलाई लग्नानंतर कमी होत गेली. आणि त्यांना कुठेतरी व्यक्त व्हावेसे वाटू लागले. आणि त्यांची लेखणी सक्रिय झाली. रजनी ने केलेला लेखन व वाचनासाठीचा चोरून केलेला संघर्ष, काही काळ टोपण नावाने लिहिलेले लेखन, त्यामुळे झालेले कौतुक यातून ताईंची पावले कायमच पुढे जात राहिली. लेखन करत असताना त्यातून उभारलेले सामाजिक काम हे प्रचंड संघर्षमय व वेदनादायी आहे.
स्वतःच्या वेदना, दुःख व प्रश्नांवर मात करत आज रझिया ही न्यायासाठी लढतेय तेही कैदी, सेक्स वर्कर, किन्नर व समलैंगिक लोकांसाठी..! समजून घेतेय त्यांचे प्रश्न व समस्या. महिलांच्या व बालकांच्या मानवी हक्कांवर कसा मार्ग काढायचा त्यातून हे त्यांना शिकवतेय. सरकार बरोबर यांच्या न्याय व हक्कासाठी भांडतेय. त्यांच्या म्हातारपणाच्या सोयीसाठी त्यांना बचतीचे महत्व समजावतेय. सामान्य लोक त्यांना दूर ठेवतात पण रझिया ‘मानव संवाद केंद्रातून’ त्यांना एकत्र करून येथे या व मोकळे व्हा..! असे सांगत त्यांना विशेष मॅारल सपोर्ट देतात.
इतकेच नव्हे तर आंतरधर्मीय विवाह केल्याने मुस्लीम धर्मातील रूढी-परंपरा, अंधश्रध्दा लक्षात आल्याने यासाठी संघर्ष करत निर्भीडपणे त्या गेल्या ३३ वर्ष लढत आहेत. मुस्लीम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून खऱ्या धर्माचा अभ्यास करून तो मांडायचा प्रयत्न त्या करत आहेत. त्यांचा रजनी ते रझिया हा प्रवास सोपा आजिबात नाही पण प्रेरणादायी नक्कीच आहे.
ताईंची प्रचंड साहित्य संपदा पाहिली तर महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रे, मासिकातून स्तंभलेखन, ५ काव्यसंग्रह, १० कथासंग्रह, २ प्रवास वर्णन, लैंगिक अधिकार व सामाजिक विषयावर अशी एकूण ३५ पुस्तके आणि अनुभवकथन प्रकाशित आहे. विशेष म्हणजे बेजुबा तलाक, तीन तलाक, निकाहे हलाल, फतवे यांच्या विरूध्द वृत्तपत्रात व मासिकांमधे त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या प्रचंड अशा सामाजिक व साहित्यिक कामावर बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगांव येथे काही विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पी.एच. डी. करत आहेत.
मुस्लीम समाजात जनजागृती आणण्यासाठी त्यांनी जुबानी तलाक, फतवा, निकाहे हलाल याविरूघ्द आंदोलन उभारली आहेत. आकाशवाणीवर याविषयी कार्यक्रम प्रसारित केले आहेत. याविषयी शाळा व महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात जगजागृती करत आहेत. विशेष म्हणजे संत वाड्.मयाच्या महिलावादी दृष्टिकोनातून अभ्यास करताना ग्रामगीता, कुराण, हदिस, ज्ञानेश्वरी, दासबोध, रामायण, महाभारत अशा ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्याचा प्रचार प्रसार त्या संपूर्ण देशभर करत आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्यासाठी त्यांना आजवर ११ सन्मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत.
हे सारं पाहून ग्रेट रझिया सलाम..!! हे प्रत्येक जण नक्कीच म्हणेल याची मला खात्री आहे.. ! अशा या रजनी ते रझिया प्रवास करणाऱ्या व दोन्ही धर्मांचा अभ्यास व जगणे अनुभवलेल्या व त्यात सुधारणा व जनजागरण धाडसीपणे व निर्भीडपणे करणाऱ्या या आधुनिक नवदुर्गेला मानाचा मुजरा.!!
संपर्क –रझिया सुलताना- 95273 99866