June 19, 2024
Prof Dilip Pardeshi my teacher article by Ramesh Salunkhe
Home » पडिले दूर देशी…
मुक्त संवाद

पडिले दूर देशी…

‘प्रतिभा ही एखाद्या विजेच्या लाेळासारखी असते, तिला धरू जाणारे शंभरातील नव्याण्णव हाेरपळून मात्र घेतात. एखाद्याच्या हाती ही वीज गवसते.’ हे असं सर काही बाेलत राहिले; की आम्ही भान हरपून ऐकत असू. सरांच्या बाेलण्याला अभ्यासाचं, व्यासंगाचं, अनुभवाचं विलक्षण काेंदण असायचं. ते मृदु पण स्वच्छ, स्पष्ट, आवाजात बाेलत रहायचे. तास संपूच नये असं वाटत रहायचं.

-रमेश साळुंखे

मोबाईल – 94035725219

राहून गेलेल्या ज्या अनेक गाेष्टी आहेत; त्यातील ही एक खूप अस्वस्थ करणारी आणि हूरहूर लावून गेलेली गाेष्ट!‘‘….परदेशीसर कायमचे निघून गेले; तेव्हा मी त्यांच्याजवळ नव्हताे…..!’’

काही गाेष्टी कशा आपसूक जुळून येतात. काही ओळखदेखील नसताना माणसं आयुष्यात येतात, जिवाभावाची हाेतात; आणि कायमचीच आपली हाेऊन जातात. विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधी प्रा. दिलीप परदेशी हे नाव मला ठाऊकही नव्हतं. ठाऊक असण्याचं तसं काेणतं कारणही नव्हतं. मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा नाटककार विलिंग्डनमध्ये मराठी विषय शिकविताे आहे. इतकं दूरूनच ठाऊक हाेतं; पण त्यांची आणि माझी ओळख हाेईल. स्नेह जुळेल असं काही माझ्या गावीही नव्हतं. पण हे सारं नकळत घडलं आणि जणूकाही त्या आठवणी म्हणजे मर्मबंधातील ठेवच हाेऊन राहिल्या. अगदी कायमच्या ! मी त्यांना भेटलाे तेव्हा त्यांच्या आयुष्याचा उत्तररंग सुरू झालेला. अखेरच्या पर्वाचा प्रारंभ !

माणसांपासून एकूणच जगापासून काहीसा फटकून राहणारा; कलंदर स्वभावाचा हा कलावंत माणूस. त्यांच्या पहिल्या तासाला बसलाे. भान हरपून ऐकत राहिलाे. आणि तेव्हाच ठरवून टाकले; की आपले जे काही भलेबुरे व्हायचे असेल; ते मराठी साहित्यातच हाेऊ द्यायचे. सरांनी मराठी भाषेला आणि साहित्याला मनाेमन आपले मानले हाेते; आणि मी सरांना आपले मानले हाेते. सर निघून गेले. त्यालाही आता बरेच दिवस हाेऊन गेलेत. नदीखालून खूप पाणी वाहून गेले आहे.

प्रेम, माया, आपुलकीचे दुर्भीक्ष आणि माणसांच्या संवेदना बाेथट करण्याच्या उद्याेगाकडे कसाेसीने डाेळेझाक करण्याचा प्रयत्न करत; मराठी साेबत आतड्याचे नाते जपत जपत माझा भलाबुरा प्रवास सुरू आहे. एकाचवेळी सरांच्या आठवणी सुखावतात, दिलासाही देतात आणि आतून आतून व्याकूळही करतात. ‘पडिले दूर देशी मज आठवे मानसी…!’ हे असं काहूरतेचं धुकं पसरवितात. या धुक्याची चादर पुन:पुन्हा पांघरावी-लपेटून घ्यावी असं वाटतं. नीटनेटकी-अम्लान ठेवावी असं वाटतं.

सर वर्गात आल्या चार सहा मुलांच्या समाेर उभं राहून थेट मलाच विचारायचे, ‘‘काय काय रमेश; काल कुठपर्यंत आलाे हाेताे आपण ?’’ मी तनामनातून प्रसन्न हसायचो. आनंदून जायचो. कालचा पाढा न चुकता सरांपुढे वाचायचो. मग सर पुढे ताे धागा पकडून बाेलत रहायचे. खूप दिलासा देणारा, प्रेमळ आणि आश्वासक आवाज हाेता ताे. त्यानंतर आजपावेताे कुणी अशी आस्थेनं विचारपूस केल्याचं स्मरत नाही. तेव्हा आधारासाठी, कुणीतरी आपलं म्हणावं यासाठी मी अक्षरश: एखाद्या कफल्लक याचकाच्या डाेळांनी भिरभिरत रहायचो.

‘माझीया जातीचा मज भेटाे काेणी’ असं आर्त आळवत आपुलकीच्या माणसांचा शाेध घेत फिरायचो. घरात, गल्लीबाेळात, मित्रांत, नाटक आणि सिनेमात, सहलींमध्ये आणि कशा कशात पण सर्वत्र भिंगुळवाणे एकटे एकटे वाटायचे विलक्षण. हे सारे एकत्रित हाेऊन माझ्या थाेबाडावर प्रतिबिंबित हाेत असावे; नव्हे ते तसे झालेलेच हाेते. लपवताच येत नव्हते काही. नेमके कशामुळे आपले हे असे हाेते आहे; याचा अदमासच बांधता येत नव्हता मला. परदेशीसर नाटककार-संवेदनशील कलावंत हाेते. त्यांच्या नजरेतून कदाचित हे सुटले नसावे. म्हणून ते मला कदाचित हे असे जवळ करीत असावेत. आस्थेनं विचारपूस करत असावेत. आणि ते तरी कुठे कुटुंबाचे, घरचे आणि अवतीभवतीच्या गर्दीतील माणसांचे हाेते? एकटे एकाकीच हाेते की ते सुद्धा !

अर्थातच थाेडेसे धाडसाने आणि आत्मप्राैढीचा दाेष पत्करून म्हणायाे झाले तर असे म्हणता येईल की, कदाचित त्यामुळेच त्यांची आणि माझी नाळ उत्तराेत्तर जुळत गेली असावी.

सर वर्गात एकदा म्हणाले हाेते, प्रत्येक माणसाचा त्याच्या आयुष्यात कधी न कधी कुरूक्षेत्रावरील संभ्रमित अर्जुन हाेत असताे. तेव्हा त्याला याेग्य ताे मार्ग दाखविण्यासाठी एखाद्या श्रीकृष्णाची आवश्यकता भासत असते. अतिशयाेक्ती हाेईल कदाचित पण हे खरे आहे की, सर मला आणि माझ्यासारख्या अनेक विद्यार्थांना कृष्णच वाटायचे. आम्हाला यत्किंचितही न जाणवू देता ते आम्हाला सांभाळताहेत, पाठीशी आहेत ते; असा दिलासा वाटायचा-आधार मिळायचा. माझ्यासारखेच इतर अनेकजणांनाही सर आपले, आपल्या कुटुंबातले वाटायचे. सरांचे अनेक विद्यार्थी सरांबद्दल विलक्षण आदर आणि आब राखून असायचे. स्टाफरूमच्या बाहेर अभ्यासिकेबाहेर आमच्यापेक्षा सिनियर असलेल्या विद्यार्थ्यांना ते बराच वेळ गंभीरपणे काही सांगत असलेले दिसायचे. सर अत्यंत महत्त्वाचे आयुष्यभर उपयाेगी पडेल असे काहीतरी सांगत असावेत असे एकूणच ते चित्र असायचे.

भरतेश्वर हे त्यातले एक नशीबवान विद्यार्थी. उजव्या हाताची पाचही बाेटं एकत्रित करून सर त्यांना काही महत्त्वाचे सांगत आहेत, समजावीत आहेत असे दिसायचे. भरतेश्वरही आदबीने, नम्रतेनं सरांचे ऐकत राहिलेले दिसायचे. सर त्याला काय सांगत असतील ? हे पाहून भरतेश्वरांप्रती आमच्या मनात तेव्हा नकळत असुया जागी हाेत असे. आपल्यालाही सरांनी हे असे जवळ करावे; काही सांगावे – बाेलावे असे वाटत असे. पण सरांच्या जवळ जाण्याचा, काही बाेलण्याचा धीर हाेत नसे.

अत्यंत देखणं आणि रूबाबदार व्यक्तीमत्व हाेतं ते. त्यांचं चालणं, बाेलणं, आवाजाचा पाेत, खर्ज, बाेलताना नाट्यात्म विराम घेणं, पाहणं, कपडे, साऱ्या अ‍ॅक्सेसरीज-खिशाला अडकविलेल्या पेन पासून गाॅगलपर्यत सारंच श्रीमंत हाेतं. खानदानी हाेतं. विद्वत्तेचं आणि खूप काही साेसल्याचं-साहिल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं. खदखदून हसायचे नाहीत कधी. हसले तर त्या हसण्यातही ह्दयातली वेदना लपायची नाही. पाच सव्वापाच फुटांची उंची असलेले सर विरळ हाेत चाललेल्या केसांवरून हात फिरवत वेगात वर्गात यायचो. बारीक डाेळ्यांनी सारा वर्ग न्हाहाळायचो. थाेडेसे ढगळपणाकडे झुकलेल्या शर्टाच्या काॅलरचं बटण डाव्या हाताने हलकेच साेडवायचे. मग दाेनही मनगटांवरील फुल्लशर्टाचे हातुपेही माेकळे करून वर नीट दुमडून घ्यायचे. आणि मग नेहमीचेच वाक्य, ‘काय काय रमेश; काल कुठपर्यंत आलाे हाेताे आपण ?’ फावल्या वेळात मित्र सरांची ही अशी नक्कल करायचो ‘काय काय रमेश; काल कुठपर्यंत आलाे हाेताे आपण ?’ मी मात्र प्रचंड आनंदून जायचो. नंतर त्यांची नाटके वाचताना ध्यानात आले; त्यांच्या एका मामाचे नाव रमेश असे हाेते. पुण्यात रहात असत ते. एका नाटकाच्या अर्पणपत्रिकेत त्यांनी आपले ते नाटक बहुधा ‘कहाणी’ असावे; श्री. रमेशचंद्र के. बायस, पुणे यांना म्हणजेच ‘रमेशमामांस अर्पण’ केलेले हाेते. साहजिकच ते त्यांचे आवडते मामा असावेत. माेठ्या आत्मियतेनं लिहिलेली हाेती ती अर्पणपत्रिका. त्यामुळेही असेल; माझे नाव सरांना हे असे जवळचे वाटत असावे.

सरांना दुय्यम दर्जाचे काहीच चालयचे नाही. सारेकाही राजेशाही थाटाला साजेसे असेच त्यांना हवे असायचे. सायन्स बारावीच्या वर्गातून उत्तीर्ण हाेऊन त्यांनी कला शाखा निवडली हाेती. इंग्रजी वाचनही त्यांचे चांगले हाेते. त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या सुरूवातीला विशेषत: शेक्सपिअरच्या नाटकांमधील काेटेशन त्यांनी जाणीवपूर्वक वापरल्याचे दिसते. नटसम्राट शिकवताना ते शेक्सपिअरच्या नाटकांमधील अनेक संदर्भ आवर्जून सांगायचे. मराठी हा विषय घेऊन ते एम. ए. झाले; आणि विलिंग्डन महाविद्यालयात तासिका तत्त्वावर रूजू झाले. नंतर ते तिथेच कायमही झाले. विद्यार्थ्यांना मराठी हा विषय शिकवू लागले.

विलिंग्डनमध्ये तात्पुरते शिक्षक म्हणून जरी सरांनी नाेकरीला सुरूवात केलेली असली, तरी प्रसंगी वडिलांकडून पैसे घेऊन ते घरापासून काॅलेजपर्यंत रिक्षाने यायचे आणि परत रिक्षानेच जायचे. ‘‘तासिका तत्त्वावर असलाे म्हणून काय झाले? विलिंग्डनमध्ये नाेकरी लागली हाेती. माझाही स्वाभीमान हाेता, काही प्रतिष्ठा हाेती नं. आणि रीतसर पगार सुरू झाल्यावर बापाचे सारे पैसे व्याजासहित परत केले…’’ असं हसत हसत सांगायचे.

खालचा ओठ दातांमध्ये रूतवून डाेळे बाऽऽऽरीक किलकिले करून दूरवर पहात रहायचे. आम्हाला त्यांच्या या अशा स्वभावाचे विलक्षण कुतूहल वाटायचे. काेणत्याही गाेष्टीतले दुय्यमत्त्व त्यांना खपायचे नाही. मी एकदा अत्यंत निराश हाेऊन म्हटले हाेते, सर मला एखाद्या नाेकरीची खूप गरज आहे. लवकरात लवकर मन कुठेतरी गुंतवावेसे वाटते आहे. अगदी बालवाडीत देखील शिक्षकाची नाेकरी मिळाली तरीही खूप झाले. तेव्हा सरांनी समजावत मला म्हटल्याचे आठवते, ‘‘अरे, माणसाने कधीही छाेटी स्वप्ने पाहू नयेत. बालवाडीत शिक्षकाची नाेकरी करणे कमीपणाचे नाही. पण इतकी अल्पसंतुष्ठता बरी नव्हे. अगदीच काही लागले तर सांग !’’ सर साऱ्याच विद्यार्थांना असे बाेलून माेठी स्वप्ने पहावयास लावत असत.

वर्गात येताना सरांच्या हातात कागद, पुस्तक, नाेट्स, डस्टर असं काहीही नसायचं. आवश्यकता भासली तर एखादं पुस्तक घेऊन ते वर्गात येत असत. पण शिकवणं सुरू झालं; की भान हरपून शिकवायचे. ‘मराठीचा तास कधीही कंटाळवाणा झाला नाही पाहिजे.’ असं ते स्वत:च म्हणायचे आणि ते तसं सार्थही करून दाखवायचे. त्यांच्या व्यापामुळे – घरगुती काैटुंबिक अडचणींमुळे त्यांना सगळेच तास घेता यायचे नाहीत. रजेवर जायचे खूपदा. पण जे शिकवायचे घ्यायचे ते इतके अभिरूची संपन्न, अनेक संदर्भसूचक असायते की आम्हाला अभ्यासासाठी इतर कशाची गरजच भासायची नाही. साहित्यसमीक्षा, प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, नटसम्राट, केशवसुतांच्या कवितांचं संपादन ‘हरपले श्रेय’ हे असं सरांनी शिकविल्याचं लख्ख स्मरणात आहे.

काहीशी अलंकाराची झाक असलेलं, लयबद्ध, काव्यात्मक विद्यार्थांना आवडेल, विषयाची गाेडी लागेल असं शिकविण्याची सरांची विलक्षण हाताेटी हाेती. ‘‘महानुभाव पंथ म्हणजे महातेजाने युक्त असा पंथ आणि महानुभावीय साहित्य म्हणजे मराठी सारस्वताच्या उगमाला लागलेला निर्मळ रूचिरांचा झराच हाेय…’’,

‘‘संत ज्ञानेश्वरांचे व्यक्तिमत्त्व हे क्रांतदर्शी तत्त्वज्ञ, आत्मानुभवीय याेगी, भूतदयावादी संत आणि अलाैकिक प्रतिभासंपन्न कवी अशा चतुर्विध भूमिकांनी संपन्न हाेते…’’, ‘‘नटसम्राट ही शाेकांतिका एका नटाची नाही आणि एका वृद्धाचीही नाही तर ती वृद्ध झालेल्या एका नटाची आहे.’’, ‘तथापि’ या शब्दामधील पी नेहमी पहिली.’, ‘जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमधून नियतीच्या निष्ठूर आघातानं काेसळणारं अस्मानी दु:ख सदैव साद घालताना दिसतं.’, ‘‘शरश्चंद्र चटर्जी यांचे सारेच नायक आयुष्याच्या अखेरीस आजारीच का असतात ? एकदा विचारलं पाहिजे त्यांना…’’, ‘प्रतिभा ही एखाद्या विजेच्या लाेळासारखी असते, तिला धरू जाणारे शंभरातील नव्याण्णव हाेरपळून मात्र घेतात. एखाद्याच्या हाती ही वीज गवसते.’ हे असं सर काही बाेलत राहिले; की आम्ही भान हरपून ऐकत असू. सरांच्या बाेलण्याला अभ्यासाचं, व्यासंगाचं, अनुभवाचं विलक्षण काेंदण असायचं. ते मृदु पण स्वच्छ, स्पष्ट, आवाजात बाेलत रहायचे. तास संपूच नये असं वाटत रहायचं.

शिकवण्याच्या ओघात ते नाटक, सिनेमा या विषयांवर खूप काही सांगत रहायचे. इंग्रजी, मराठी, हिंदी पुस्तकांचे खूप सारे संदर्भही द्यायचे. वाचायला प्रवृत्त करायचे. ‘सत्याचे प्रयाेग’, ‘गणुराया आणि चानी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘देवदास’, ‘अमृतवेल’, ‘बालकवींच्या कविता’, ‘ऋतुचक्र’, ‘सावित्री’, ‘रणांगण’, ‘काजळमाया’, ‘काेसला’, ‘पार्टनर, ‘कर्मचारी’, ‘बस नं. 12’, ‘ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी’, ‘चर्चबेल’, ‘सायंकाळच्या कविता’, ‘डाेह’, ‘साेन्याचा पिंपळ’ असं बरच काही ते बाेलण्याच्या ओघात सांगत रहायचे. आणि आम्ही ती पुस्तके कुठून कुठून मिळवून वाचून काढायचो. वाचनाची आवड लागली ती या अशा पुस्तकांमुळे. ‘रणांगण’ वाचल्यावर विश्राम बेडेकरांचे तसे सारेच साहित्य-‘एक झाड दाेन पक्षी’, ‘सिसिलबर्गची पत्रे’, ‘टिळक आगरकर’ हे सारे वाचून काढले. तसेच पु. शि. रेगे यांची ‘सावित्री’ वाचल्यावर पुढे ‘मनवा’, ‘पुष्कळा’, ‘अवलाेकिता’, ‘रंगपांचालिक’ हे सारे वाचल्याचे आठवते.

सरांनी आम्हाला हे असे सातत्याने वाचायला लावले असले; तरी आपल्या स्वत:च्या नाटकांबद्दल सर अवारक्षरही बाेलयचे नाहीत. माझे हे नाटक वाचा. ते नाटक वाचा असे सरांच्या बाेलण्यातून आलेले कधीच आठवूनही आठवत नाही. पण आम्ही सरांची नाटके मिळतील तशी वाचून काढायचो. सरांनीही तशी खूप नाटके लिहिली हाेती. जवळपास बावीस नाटके सरांच्या नावावर आहेत. पण मी हे केले आहे, ते लिहिले आहे, त्याचे इथे तिथे इतके प्रयाेग झाले आहेत, इतके पुरस्कार मिळालेले आहेत, माझी ही नाटके आपल्या लायब्ररीत आहेत ती तुम्ही वाचलीत का ? अशी भाषा अथवा आत्मप्राैढी सरांनी कधी मिरवल्याचे दिसले नाही. आपल्या आयुष्याबद्दल आणि आपल्या लेखनाबद्दल सर कमालीचे अलिप्त हाेते. मी पाहिलेले पहिले प्रसिद्धिपराङ्मुख व्यक्तिमत्व हाेते ते.

‘पथेर पांचाली’, ‘तीसरी कसम’, ‘उंबरठा’, ‘सामना’, ‘अंकुर’, ‘बाजार’, ‘गाॅडफादर’, ‘राेमन हाॅलिडे’, ‘डाॅ. झिवॅगाे’, ‘बायसिकल थिव्हज्’, ‘सायकाे’ असे अनेक चित्रपट आम्ही आवर्जून पाहिले पाहिजेत; असा सरांचा आग्रह असायचा. शिवाय कबीर, गालिब, गुलजार, जावेद अख्तर असंही बरच काही. मग आमची उत्सुकता जागी हाेत असे. इंटरनेट वगैरे बाबी खूप दूरवरच्या त्यामुळे आमची शाेध माेहीम संपता संपायची नाही. पण खिशातल्या कागदाच्या चिटाेऱ्यावर चित्रपटांची ही नावं दिवसेंदिवस तशीच असायची. नंतर पाठही हाेऊन जायची. यातील बरेच चित्रपट तेव्हा उपलब्ध हाेऊ शकले नाहीत; तरी पुढे हे सारे काही आम्ही मुद्याम मिळवून पाहून घेतले. सर सांगताहेत म्हणजे ते ग्रेटच असणार यात शंकाच नसायची आणि ते खरेही असायचे. खूप अर्थपूर्ण, आशयगर्भ आणि वेगळ्याच विश्वात घेऊन जात असत ते चित्रपट. समांतर धारेतले चित्रपट पाहण्याचा नाद हा असा तेव्हापासूनचा.

सरांचे व्यक्तिमत्व-अगदी थेटच बाेलायचे तर त्यांचे वैवाहिक आयुष्य त्यातील चढउतार आम्हाला ठाऊक असण्याचे तसे काेणतेच कारण नव्हते. इतरांना तर ते तपशीलवारपणे आणि खरेखुरे कितपत माहित हाेते कुणास ठाऊक. पण त्यांच्या माघारी-अपराेक्षपणे त्यांच्या दुभंगलेल्या वैवाहिक आयुष्यावर खूप बाेलले जायचे. बऱ्याचदा ते पायरी साेडून असायचे. त्यातले काही आमच्याही कानांवर यायचे. सरांचे लग्न, त्यांचा लहानगा मुलगा, नवरा बायकाेंमधील विकाेपाला गेलेली भांडणं, मुलाला घेऊन सरांच्या पत्नीचे मुंबईला रहायला जाणे, काेर्ट कचेऱ्या, सरांचा काेर्टातल्या तारखेला हजर राहण्यासाठी मुंबईच्या वाऱ्या, मुलाच्या-प्रियदर्शनच्या ताब्यासाठीची तडफड हे सारे काही कुजबुजीच्या स्वरूपात कानावर यायचे. सरांच्या बाेलण्यातून हे अर्थातच कधी मुखर व्हायचे नाही. पण आतून ते प्रचंड उदास, एकटे, एकाकी, उद्ध्वस्थ हाेताहेत हे जाणवत रहायचे. निराधार-माेडून पडताहेत असं वाटायचं. तथापि या साऱ्यांचं सावट त्यांनी आपल्या अध्यापनावर पडू दिलं नाही. मन लावून शिकवायचे.

चारचाैघांमध्ये वावरताना त्यांचा तटस्थ अलिप्तपणा जाणवायाा. सदा असे एकटे एकाकीच असायचे ते. कधी ते आपल्या सहकार्यांसाेबत चारचाैघात हसत मजेत बाेलत उभे आहेत; चहा पिण्याच्या निमित्ताने कुणाबराेबर काॅलेज कॅन्टिनला निघाले आहेत; असे चित्र अभावानेही कधी पाहिल्याचे आठवत नाही. मधल्यासुट्टीत स्टाफरूममध्ये सहकार्यांसाेबत बसलेले ते क्वचितच दिसत. स्टाफरूमला लागूनच असलेल्या अडगळीवजा खाेलीत सिगारेटचे दीर्घ झुरके घेत एकटेच बसलेले दिसायचे. एकटे, एकाकी विमनस्कतेत बुडून जाऊन शून्यात नजरराेखून घुरात हरवून गेलेल्या सरांना हे असे बसलेले पाहून गलबलून यायचे. सरांचे हे असे अखेरचे पर्व सुरू झाले हाेते.

तास संपले; की सर महाविद्यालयात रेंगाळत नसत. आपले कृश हाेत चाललेले शरीर सावरीत मुलांच्या, शिक्षकांच्या गर्दीतून गडबडीने ते एकटेच महाविद्यालयातून बाहेर पडायचे. खांदे किंचित पुढे झुकवून सर जरी चालत जात असले तरी त्यांच्या चालण्यालाही मग्नतेचा, मग्नतेतील दु:खाच्या वैभवाचा दिमाख असायचा. एकटेपणातलं सारं बळ एकवटून तेच त्यांना साेबत करतं आहे असं वाटायचं. अलिप्तपणे आपल्या आसपास भरकटत राहिलेल्या ताेंडदेखल्या भवतालाला पुसत-वजा करत; ते आपल्या स्कूटरवरून भरकन् निघून जायचे.

सरांशी काही बाेलावे भेटावे असे खूप वाटायचे पण धाडस व्हायचे नाही. आदरयुक्त भीती वाटायची त्यांची. मला त्यांचे डिक्टेशन लिहून घेण्याच्या संदर्भात मनापासून विचारायचे हाेते. एकदा सारे बळ एकवटून संधी साधून त्यांना अभ्यासिकेजवळच गाठले. अगदी ठरवूनच विचारले, ‘सर, मी काही मदत करू का तुम्हाला ?’ त्यांचा मूड ठीक नसावा. डाेक्यात काहीतरी भिरभिरत असावे. दाेनतीन दिवसांच्या रजेवरून ते परतले हाेते. बहुधा नेहमीचेच काेर्ट कचेरीचे काम असावे. तर क्षणाचीही उसंत न घेता जवळपास झिडकारल्यासारखे करत ते म्हणाले, ‘‘मदत, हं ! आणि तू माझी काय मदत करणार?’’ ते कुठल्यातरी वेगळ्याच तंद्रीत हाेते. मीच त्यांना हे असे विचारायला नकाे हाेते. पण उशीर झाला हाेता. मीच माझ्या पायावर धाेंडा मारून घेतला हाेता. रक्त साकळले हाेते आणि मुकामारही जबर लागला हाेता. सांगताे काेणाला? पण भावना प्रामाणिक हाेती. इतर काही यावर बाेलून-समर्थन करून अधिकची शाेभा नकाे म्हणून मी गप्पच बसलाे. सरांना हे असे विचारून आपण नकळत त्यांना दुखावले तर नाही न असं वाटून प्रचंड खजील व्हायला झाले हाेते. सरांच्या या अवताराचा धक्काच बसला हाेता. पुन्हा म्हणून सरांच्या वाटेला कदापि जायचे नाही अशी मनाेमन शपथच घेतली हाेती मी. सरांच्या ह्या अशा स्वभावामुळे तर लाेक त्यांना त्यांच्यामागे बाेल लावत नसतील नां ? अशी शंकाही यायची.

सरांबद्दल बाहेर काही बरे बाेलले जायचे नाही. त्यांच्या मस्तमाैला माेकळे ढाकळे जगण्याचे, लेखक म्हणून असण्याचे काैतुक असण्यापेक्षा सूक्ष्म असूया लाेकांच्या बाेलण्यातून सरळसरळ जाणवायची. माणसाचे व्यक्तिगत आयुष्य हे त्याचे स्वत:चे असते. ते नेमके कशामुळे तसे झाले आहे हे पूर्णत: ठाऊक नसल्यामुळे आपण इतरांच्या व्यक्तिगत आयुष्यात डाेकावू नये. इत:पर अशा व्यक्तिगत आयुष्याला भर बाजारात उभे करू नये; इतकीही समज शहाण्या समजल्या जाणाऱ्या माणसांना का नसावी हे पाहून किळसवाणे वाटायचे. खऱ्याखाेट्याची शाहनिशा न करताच सरांची चंगळवादाकडे अधिक झुकणारी जीवनशैली, आर्थिक व्यवहार फारशा गांभिर्याने न घेणं या साऱ्यांचा पाढा भरचाैकात वाचला जायचा. एक कुटुंबवत्सल माणूस आपल्या वृद्ध वडिलांना आणि बहिणीला अंतर न देता सांभाळत एकटा एकाकी जगताे आहे. आपले अध्ययन अध्यापनाचे काम निष्ठेनं करताे आहे. सर्जनशील लेखनात आपले दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करताे आहे. अशा अनेक गाेष्टींचा साधा उल्लेखही कुठे व्हायचा नाही. ही प्रतारणा की आणखी काही? म्हणूनच असेल सरांनीही अशा कुणा समाेर स्वत:चे समर्थन केले नाही; की सहानुभूतीसाठी कुणाचे दार ठाेठावले नाही. करुणेचा कटाेरा हातात घेण्याची तर बातच साेडा ! ते आपले जगणे, आपले दु:ख याच्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले.

एका प्रसन्न सकाळी सरांनीच मला बाेलावून घेऊन, ‘‘माझे डिक्टेशन घ्यायला येताेस का?’’ असे विचारले. मी त्यांना पुन्हा विचारण्याचा प्रश्नच नव्हता. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर? साेसण्याचे बळ अर्थातच माझ्यापाशी नव्हते. शिवाय सरांविषयीचा आदर, धाक हेच आम्हाला पुरेसे हाेते. त्यात असा काही लिहिण्याबिहिण्याचा अनुभव अर्थातच गाठीला नव्हताच. त्यात आमचे अक्षर म्हणजे साक्षात आदरणीय महात्मा गांधी यांच्या अक्षरांशीच स्पर्धा करणारे ! तेव्हा हे असले धाडस आम्ही स्वप्नातही करू शकत नव्हताे. मराठी आणि विज्ञान या विषयात आम्ही दहावीच्या वर्गात कसेतरी काठावर डुंबून ओले झालेलाे. बाकीच्या साऱ्या विषयांच्या तीर्थाचे चारदाेन थेंबही बाेर्डाने आमच्यावर उडविण्याचे साैजन्य दाखविलेले नव्हते. चांगले काही वाचल्याच्या-पाहिल्याच्या नावानेही आनंदच हाेता. तेव्हा इतका प्रचंड अनुभव गाठीला असताना सरांच्या वाट्याला जाणे म्हणजे आपली प्रकांड पंडितताच जगजाहीर करून पुन्हा एकदा मुक्कामार खाण्यासारखे हाेते. त्यामुळे महाविद्यालयीन काळात एकच व्रत आम्ही निष्ठेने पाळत असू. माैनव्रत ! त्यामुळे सरांनी मला लिखाणासाठी विचारणे हे खरेच खरे आहे की थट्टा? हेच न उमजून सरच सांगायचे तसा चारपाच दिवस माझा कुरूक्षेत्रावरील संभ्रमित अर्जुन झालेला हाेता. पण सर ही असली थिल्लर टिंगलटवाळी करण्याऱ्यातले कधीच नव्हते. त्यांचे वाचन, व्यासंग, नाटककार म्हणून बाहेर असलेली मान्यता, लाेकप्रियता हे सारे आम्ही जवळून अनुभवत हाेताे. शिवाय सरांविषयीचे प्रवाद, बरेवाईटही कानांवर येतच हाेते. काय करावे समजत नव्हते. एकदा सर हे असे बाेलून गेले. नंतर विषय नाही. इतके सारे विद्यार्थी, ओळखीचे लाेक असताना सरांनी मलाच विचारले हाेते; त्यामुळे मी मनातून आनंदित झालाे हाेताे; आणि सरांच्या कसाेटीला आपण उतरू शकू का? या प्रश्नाने हादरूनही गेलाे हाेताे. चारसहा दिवसांनी सरांना भेटून मीच लिखाणासंदर्भात त्यांना विचारले. ‘बरं ठीक आहे! मग ये घरी आज दुपारी दाेन वाजता.’ असे बाेलून सर निघनूही गेले.

बराेब्बर दाेन वाजता सायकल घेऊन मी सरांच्या ‘आशियाना’ समाेर उभा. सायकल गेट समाेर लावून फाटक उघडून बेल वाजवली. सरांच्या वडिलांनी दार उघडले. आतून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत हाेता. ‘शेरा’ हे त्या कुत्र्याचे नाव, हे नंतर कळले. आवाजावरून कुत्रं माेठ असावं हे सहज समजत हाेतं. सरांविषयीचा धाक, कुत्र्याचे हे असे दणदणीत भुंकणे आणि अस्मादिकांची विद्वत्ता, पाचवीला पुजलेला प्रचंड भिडस्तपणा यासर्वांमुळे मी सरांच्या दारात कशा अवस्थेत उभा हाेताे; याची कल्पनाच न केलेली बरी. असाे! सरांच्या वडिलांनी सांगितले ‘सर घरात नाहीत. कधी येणार आहेत माहित नाही. काम हाेतं का काही…’ ‘नाही सरांनीच यायला सांगितलं हाेतं’ असं काहीतरी बाेलून मी थांबलाेच नाही तिथे. मग लगेच अबाऊट टर्न, फाटकाजवळ, पुन्हा फाटक बंद, सायकलीचे कुलूप, न वाजणारी घंटी आणि चाैकापर्यंत हळूहळू कमी कमी हाेत जाणारा सरांच्या कुत्र्याचा दमदार आवाज. बापरे! सरांना लिखाणाच्या कामाकरिता हाेकार देऊन आपण चूक तर नाही न केली? असा साळसूद विचारही मनात अधूनमधून येत हाेता. असे दाेन दाेनतीनदा झाले असावे.

सर कदाचित मला जाेखत असावेत. मीही त्यांच्याच विद्यार्थी असल्यामुळे आणि करण्यासारखे दुसरे काहीच काम नसल्यामुळे नेटाने सरांच्या घरी नित्यनेमाने जात असे; हजेरी लावत असे आणि कुत्र्याचा आवाज ऐकून परत येत असे. नंतर ‘हे पाेरगं भलतच चिवट दिसतं आहे; आणि विशेष म्हणजे आमच्या कुत्र्यालाही ते भीक घालत नाही’ हे सरांच्या कदाचित लक्षात आले असावे. मग मात्र सरांच्या घरी येण्याजाण्याचा सिलसिला अखंडपणे सुरू राहिला ताे जवळपास चारवर्षे. सरांना कुठे बाहेर गावी जायचे असले की ते मला तसे सांगत असत. घरी यायला उशीर झाला तर वडिलांकडे माझ्यासाठी तसा निराेप ते ठेवत असत. ताेपर्यंत मी सरांच्या वडिलांसाेबत बाेलत बसत असे. थंकलेले हाेते ते. पांढरा शर्ट आणि पांढरा लेंगा नेसून ते सावकाश चालत आतल्या खाेलीतून बाहेर दिवाणखाण्यात यायचे. काेचावर बसून जाड भिंगांच्या चष्म्यातून माझ्याकडे पाहत संथपणे बाेलत बसायचे.

शेराही एव्हाना माझ्या ओळखीचा झाला हाेता. स्वारी भरदुपारी थंडगार फरशीवरच पहूडलेली असायची निवांत. माझी चाहूल लागली एक डाेळा उघडून माझ्याकडे तिरकं पहायचा आणि पुन्हा समाधीत जायचा. जर्मन शेफर्ड धिप्पाड हाेता शेरा. सर डिक्टेशन देऊ लागले की ताे शांतपणे सरांच्या जवळ यायचा. त्याच्या डाेक्यावरून, कानांवरून, मानेभाेवतालच्या भरगच्च केसांवरून, पाठीवरून सर मायेने हात फिरवत डिक्टेशन देत रहायचे. शेरा मग सरांच्या पायापाशी शांतपणे तासंतास बसून रहायचा. मग उजवा पाय त्याच्या भरदार छाताडावर ठेवून पायाच्या अंगठ्याने सर त्याला गाेंजारत रहायचे. ताेही मग डाेळे मिटून निर्धास्तपणे पडून रहायचा.

सरांच्या घरच्या अंगणात उभं राहिलं की समाेरच आमराई दिसायची. सायंकाळच्या सावल्या आमराईला शांत गहिरं करायच्या. कवट, चिंचा आणि बाभळीचं बन भली थाेरली झाडं तनामनाला सुखद गारवा द्यायची. सर या आमराईत शेराला सायंकाळी फिरायला नेत असत. गळ्यात त्याच्या साखळी अडकवून तिचे एक टाेक सरांनी हातात घट्ट पकडलेले असायचे. मफलर गळ्यात बांधून शेरा साेबत चालणारे सर विलक्षण सुंदर दिसायचे. शेराला त्यांनी खूप माया लावल्याचे दिसत हाेते. वडील, बहिण, सर आणि हा शेरा हे असे चाैकाेनी कुंटुबच हाेते ते.

दुपारचे सलग दाेन अडीच तास सर एकसारखे डिक्टेशन देत असत. मी सुंदर अक्षरात ते टिपून घेत असे. शांत हळूवारपणे संथ लयीत सर बाेलत रहायचे. बाेलण्यातली लय आणि विचारातली तंद्री
खंडित हाेऊ नये; याची मीही काळजी घेत असे. एखादा शब्द नीट समजला नाही अथवा ऐकू आला नाही तर ताे मी सरांना पुन्हा सांगा असेही म्हणत नसे. मध्यल्या वेळेत एकतर त्यांना त्यासंबंधी विचारत असे किंवा मीच मागचा पुढचा संदर्भ पाहून शक्य तितका नेमका शब्द रिकाम्या जागी भरत असे. सांगण्याच्या ओघात एखादा चमकदार शब्द, वाक्य अथवा संवाद सरांच्या ताेंडून बाहेर पडला तर थक्क व्हायला व्हायचे. सरांना हे सारे कसे सुचत असेल? काल जिथे आम्ही लिहायचे थांबविले हाेते. दुसऱ्या दिवशी तेथून पुढे सांगताना सगळे बारीकसारीक तपशील सरांना कसे आठवत असतील? याचाही अचंबा वाटायचा. बराच वेळ लिखाण करून बाेटे दुखायला लागली आणि थाेडेसे थकायला झाले; की आम्ही लिखाणाचे काम थाेडेसे थांबवत असू. मग सर चहाचे आधण ठेवण्यासाठी उठून आतल्या खाेलीत जात. मी मग झालेल्या लिखाणावर शिराेरेषा मारत बसे. खाेलीभर नजर फिरवत बसे.

सरांचे घर म्हणजे एक जुनी पण शांत प्रशस्त वास्तू हाेती. घरासमाेर छाेटेसे अंगण. अंगणातून घरापर्यंत दाेन माणसे सहज बाेलत येऊ शकतील एवढाच रस्ता साेडला तर अंगणभर फुलांची राेपं, नाजूक वेली कंपाउंडवरून बाहेर रस्त्याकडे ताेंड करून साेडलेल्या. पांढरी, पिवळी, जांभळ्या रंगांची फुलं वेलींवर. दहाबाय पाचचा असा आयताकृती हिरवागार गवताचा लाॅन. खूप साऱ्या कुंड्या. त्यात कसली कसली राेपं. चारसहा रंगांचे गुलाब. सरांची सारी रसिकता या अंगणात दिसायची. घरही तसच पडदानशीन – खानदानी – घरंदाज. माेठ्या भिंती आणि दुमजली असल्याने हाॅलमध्ये कायम थंड निरव शांतता पसरलेली असायची. इतकी शांतता की बऱ्याचदा ती अंगावर चाल करून आल्यागत वाटायची. काहीतरी विलक्षण वेगानं बिनसत चाललेली न सांधता येऊ शकणारी अनामिक स्तब्धता घरभर पसरून राहिल्याचे भासमान हाेत रहायचे.

बैठकीच्या खाेलीतला श्रीधर स्वामींचा मान किंचित एकाबाजूस झुकविलेला आणि आर्शीवादाचा एक हात अलगत वर उचललेला फाेटाे लक्ष वेधून घ्यायचा. अत्यंत कमी पण नीटनेटके फर्नीचर हाेते खाेलीत. खाेलीला दाेन खिडक्या हाेत्या. पूर्वेची सदैव उघडी आणि पश्चिमेची सदैव बंद. दाेन दारे एका हाॅलमध्ये उघडत असतं आणि दुसरे आतल्या खाेलीकडे-कीचनकडे. खूप छान वाटायचे. बराच वेळ लिहून झाले की सर उठून आतल्या खाेलीत जात. थाेडा वेळ गेला की आतून चहाचा वास घमघमत माझ्यापर्यंत यायचा. चहाचा तसा विशिष्ठ वास मला आज अखेर कुठे आल्याचे आठवत नाही. तशी माझी गंधाची संवेदना बाेथटच आहे. म्हणजे माझ्यासारख्याला त्या गंधाची जाणीव व्हावी यातच सारे काही आले. अजूनही कधीकधी चक्क ताे गंध जशाचा तसा आल्याचा भास हाेताे. गंधासाेबतच सर इथेच आपल्या आसपास कुठेतरी असावेत असे वाटते.

सर आतल्या खाेलीत असायचे तेव्हा मी लिहून घेतलेल्या मजकूरावर-शब्दांवर रेषा ओढत बसत असे. मग स्वच्छ विसळलेल्या काचेच्या कपातून आणि काचेच्याच बशीतून सर त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही चहा घेऊन यायचे. मला कसेतरीच हाेत असे. सर आपल्याला स्वत: चहा आणून देतायत. हे रूचत नसे. सर, तुम्ही बसा. मी आणून देईन चहा असे दाेन तीनदा म्हणूनही पाहिले त्यांना. पण सरांनी दुर्लक्षच केले त्याकडे. मग मीही सरांनी दिलेला चहा निमूटपणे घेत असे. दाेघांचा चहा संपेपर्यंत सर महाविद्यालयतल्या, माझ्या घरच्या संदर्भातल्या, थिएटरला लागलेल्या सिनेमांबद्दलच्या अशा इकडच्या तिकडच्या गप्पा गाेष्टी करीत असायचे.

विक्रम गाेखले, सविता प्रभुणे आणि अश्विनी भावे यांनी अप्रतिम अभिनय केलेला ‘कळत नकळत’ हा सिनेमा मला तेव्हा खूप आवडलेला हाेता. सरांनाही कदाचित ताे आवडला असावा. सरांच्याच व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेला असावा असे कथानक हाेते. कळत नकळत या चित्रपटावर आम्ही खूप बाेलल्याचे अजूनही लख्ख आठवते. मीच थाेडे अधिक बाेलत हाेताे. सर एखाद दुसरे वाक्य बाेलायचे आणि कुठेतरी हरवून जायचे. मग पुन्हा लिखाण सुरू…

राज्य नाट्य स्पर्धेत अपवादाने चुकत असेल पण दरवर्षी सरांचे एखादे नवे नाटक असायचे. त्यांच्या नाटकाच्या दिवशी नीटनेटके सर गळ्यात रंगीत मफलर व्यवस्थित गुंडाळून स्वत:चा आब राखत पण नम्रतेने यायचे. साेबत त्यांची बहीण बिंदिया या देखील असायच्या. सर बुर्जंगांना खाली वाकून नमस्कार करायचे. साऱ्यांसमाेर स्मितहास्य करीत हळू आवाजत बाेलत असायचे. माणसांच्या गर्दीतही सर एकटे, उदास, मनातून दुभंगलेले दिसायचे. एका अनामिक दु:खाचे श्वापद त्यांच्या मानेवर घट्ट रूतून बसले असल्याचे जाणवत राहायचे. ते काही केल्या उतरायचे नाव घ्यायचे नाही. पहिल्या रांगेत बसून सर स्वत:चे नाटक पहायचे. मध्यतरांत की कधीतरी ते कधी उठून जायचे ते कळायचे नाही. नाटक संपल्यावर अभिनंदन करायला नट, दिग्दर्शक सगळे दिसायचे; पण सर मात्र या गर्दीत अपवाद वगळता कधी दिसयाचे नाहीत. आपल्या नाटकांबद्दल ते कमालीचे तटस्थ असायचे. आपल्या नाटकांबद्दल भरभरून तर साेडाच पण एखादे वाक्यही ते कधी उच्चारायचे नाहीत.

एका स्पर्धेत त्यांनी लिहिलेल्या तीन नाटकांना वेगवेगळी पारिताेषिके मिळाली हाेती. वर्तमानपत्रात या साऱ्या बातम्या छापल्या गेल्या हाेत्या. खूप काैतुकाने पत्रकारांनी लिहिले हाेते. दुपारी त्यांच्या घरी त्यांनी सांगितलेले मी लिहून घेत हाेताे. सर शांतपणे डिक्टेशन देत हाेते. त्या पारिताेषिकांचा आणि वर्तमानपत्री काैतुकाचा काेणताच परिणाम सरांवर दिसत नव्हता. मग मीच दबकत दबकत मधल्या वेळेत त्यांना म्हटले, ‘सर तुमच्या तीन नाटकांना आज चांगली पारिताेषिके मिळालेली आहेत. अभिनंदन सर !’ सर किंचित हसले पुढे लगेच म्हणाले, ‘हं!!!’ क्षण दाेन क्षण विराम घेऊन पुन्हा पुढे म्हणाले, ‘पुढचं लिहून घे.’ मग शांतपणे पुन्हा सांगू लागले. मी लिहून घेऊ लागलाे. हिरव्या पिवळ्या चाैकड्यांची लुंगी आणि वर अंगात दंडापर्यंत बाह्यांचा बनियन अशा वेशात सर पिवळ्या रंगाच्या काेचाच्या एका टाेकाला रेलून डाव्या पायावर उजवा पाय ठेऊन बाेलत असायचे. पिवळा रंग सरांना कदाचित खूप आवडत असावा. त्यांच्या बहुतेक फाईल्स, घरांच्या भिंत्तींचा रंग, पडदे ह्या साऱ्यांमधून पिवळा रंग सातत्याने आवृत्त हाेत असायचा. शांत खर्जातल्या आवाजात सर प्रत्येक दृश्य, दृश्यातील बारीकसारीक तपशील, कंसातील वाक्ये, संवाद सांगत रहायचे. त्यांना विलक्षण प्रवाही लय असायची. एकदा सांगितलेले पक्के असायचे. शब्द, वाक्य, संवाद पुन्हा लिही अथवा खाेडून टाक, हे पान बाजूला ठेव अथवा फाडून टाक ! असे ते कधी बाेलल्याचे अथवा सांगितल्याचे आठवत नाही.

एका पावसाळ्यातल्या दिवसात भिजल्यामुळे की कशामुळे तरी मी आजारी हाेताे. कणकण हाेती अंगात, सर्दीनेही हैराण केलेले. तशाच अवस्थेत मी सरांच्या घरी पाेहाेचलाे हाेताे. सर सांगतील तसे डिक्टेशन पानांवर लिहून घेत हाेताे. सर्दी शक्य तितकी सरांना न जाणवेल याची दक्षता घेत हाेताे. पण ‘इश्क और मुश्क कभी छिपायें नहीं जातें।’ असं कधीतरी वर्गात गडकऱ्यांची ‘प्रेम आणि मरण’ ही कविता शिकवताना सर बाेलून गेले हाेते. त्याचा साक्षात प्रत्यय इथे येत हाेता. काय करावं समजत नव्हतं. माझी चुळबुळ सरांच्या लक्षात आली असावी. अर्ध्या एक तासात सर उठून आतल्या खाेलीत गेले आणि परत आले ते दीड दाेन इंचाची निलगिरीच्या तेलाची काचेची निमूळती छाेटी बाटली घेऊन. बाटलीचं टाेपण फिरवत माझ्या समाेरच उभे राहिले. मला खिशातून रूमाल बाहेर काढायला सांगितलं. जवळपास निम्मी बाटली त्यांनी माझ्या रूमालावर उपडी केली. ‘आता जाेर जाेरात नाकाने रूमालाचा वास घे.’ असं म्हणून निलगिरीच्या तेलाची बाटली पुन्हा आत ठेवायला ते निघून गेले. परत आले काेचावर बसत म्हणाले, ‘‘अरे, तब्बेत बरी नव्हती तर आज आला नसतास तर चालले असते. आता रात्री झाेपताना आईला किंवा बहिणीला छातीला आणि पायाला हे तेल चाेळायला सांग.’’ यावर काय बाेलावं ते मला कळेनाच झालं. ‘हाे सर!’ असं काहीबाही म्हणून मी पुन्हा सर सांगतील ते लिहून घ्यायला लागलाे. अधूनमधून रूमालाचा वास घेत दाेन अडीच तास कसं लिहून झालं ते कळलच नाही.

नाव आठवत नाही पण एका मराठी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद, हे सारं काही सर सांगतील तसं डिक्टेशन घेतलेलं आठवतं. हा सिनेमा नंतर पडद्यावर आला की नाही कळलेच नाही. पण सिनेमाचा शेवट आपण असा असा केला तर बरे हाेईल; असे मी चहाच्या वेळात मी सुचविल्याचेही आठवते. ‘हाेय काय, बरं तसच करूयात आपण!’ असं म्हणून त्यांनी तसाच शेवट केला हाेता. आणि मी त्यांना तसे लिहून दिले हाेते. ‘रामा ओ रामा’ या दूरदर्शनकरिता लिहिलेल्या सिरियलचे दहाबारा भाग, ‘सीमांत’ हे नाटक असे खूप काही सरांसाेबत लिहिल्याचे आठवते. सर त्यांच्या काही नाटकांमधील प्रवेशही क्वचित लिखाणासाठी वापरत असत. नाटकांच्या पुस्तकांवर खुणा करून ते मला देत असत आणि ‘घरी जाऊन वेळ मिळेल तसे हे जसेच्या तसे लिहून काढ!’ असे म्हणत असत. घरी जाताना न विसरता खूप सारे काेरे कागद माझ्याकडे देत असत. घरी पत्र्याचा डबा माझी खुर्ची आणि लाेखंडी काॅट माझे टेबल बनत असे. अभ्यास साेडून आपला पाल्य हे काहीतरी भलतेच करताे आहे; आधीच आपल्या मुलाचे अभ्यासातील असामान्य कर्तृत्त्व आणि नेत्रदीपक प्रगती घरी आणि नात्यागाेत्यातही जगजाहीर झालेली हाेती. पण घरी कधी कुणी मला टाेकले नाही; की सरांनाही बाेल लावला नाही. एकदाच वडील म्हणाले हाेते, ‘हे इतकं सारखं लिहीत बसताेस याचे पैसे वगैरे काही देतात का सर?’ मी तेव्हा काहीच बाेललाे नाही. पण त्यांनाही मी हे असं कशातरी चांगल्या गाेष्टीत लक्ष गुंतवून बसलाे आहे; हे पाहून बरचं वाटलं असणार. नंतर मात्र त्यांनी यासंदर्भात कधीच विचारणा केली नाही. पैशासाठी अर्थातच मी हे सारे करत नव्हताे. सरांच्या सहवासात मनाला आलेली मरगळ दूर हाेईल, काही नवे शिकता येईल असे मनापासून वाटायचे, म्हणून मी लिखाणाच्या हेतूने सरांच्या घरी जायचो. याचा परिणामही माझ्यावर खूप चांगला झाला. अवांतर वाचनासाेबत अभ्यासातही लक्ष लागू लागले.

अक्षरेही नाही म्हटले तरी आधीपेक्षा वळणदार येऊ लागली. सरांचे अक्षर मात्र अत्यंत नीटनेटके, वळणदार पहात रहावे असे अगदी दृष्ट लागण्यासारखे हाेते. एकदा मी त्यांना तसे बाेलूनही दाखवले हाेते. ‘तुमच्यासमाेर बसून हे अशा अक्षरात लिहिताना मला अक्षरश: स्व:तची लाज वाटते सर!’ असे धडधडीत म्हणालाे हाेताे. यावर ‘सराव कर हाेईल चांगले. आणि समाेरच्याला वाचता येते ना ? मग खूप झाले. चिंता करू नकाेस.’ असे म्हणाले हाेते सर. मी अजूनही नीटनेटके अक्षर काढण्याचा सराव करताेच आहे. प्रचंड आशावादी आहे मी.

सरांनी लिहिलेली नाटके नीट पाहिली की त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना प्रसंग, त्यांची तगमग हे सारे काही त्यांच्या नाटकांमधून आविष्कृत झालेले दिसते. ‘मन धुवांधार’ या नाटकात सुरूवातीला सरांनी जे मागणं मागितलं आहे; ते वाचलं की सरांची घराच्या संदर्भातली, पत्नीच्या संदर्भातली अपेक्षा सहज ध्यानी येते. त्यांनी लिहून ठेवलं आहे; ‘‘घर, माझं स्वप्नातलं घर… रामायण, महाभारत, बायबल, कुराण अशा चार भिंती माझ्या घराला. शेक्सपीअर आणि कालिदासाच्या नाटकाचे दरवाजे घरात प्रवेश करायला. बडे गुलाम नि बेगम अख्तरच्या गझल-ठुमऱ्यांचं मुलायम छत माझ्या घरावर. आणि सात्त्विक, निष्ठावंत पण करारी, अशी शरश्चंद्रांच्या कादंबरीतील नायिका पत्नी म्हणून यावी माझ्या सुखी घरात…’’ सरांचा व्यासंग, रसिकता आणि कुटुंबवत्सलपणा हा असा जवळपास सर्वच नाटकांमधून ठिबकत राहताे. ‘निष्पाप’, ‘अस्त’, ‘नकाे स्वातंत्र्य स्त्रीला’, ‘सीमांत’, ‘कहाणी’ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या आयुष्यातील घटना प्रसंगांना नाट्यात्म रूप दिल्याचे दिसते.

सरांची नाटके पाहताना आणि वाचतानाही असे जाणवायचे की त्यांच्या नाटकांमध्ये विषयांची विविधता अगदी अभावानेच दिसून येते. त्यांची बहुतेक नाटके व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेली आहेत. आपल्या नाटकांमधून सर क्वचित आपल्या वागण्याबाेलण्याचा, केलेल्या चुकांचा कबुलीजवाब देत आहेत की काय असेही वाटत राहते. एका नाटकात बहुतेक ‘कहाणी’ या नाटकात असेल, त्यांनी चिमणी कावळ्याच्या सर्वांना ठाऊक असलेल्या कथेचा अतिशय सुंदर वापर केलेला आहे. भिजलेला, दमलेला, आसऱ्यासाठी, आधारासाठी कावळा चिमणीच्या बंद दारासमाेर उभा आहे. करूणार्तने बाेलताे आहे; आर्जव करताे आहे. हा प्रसंग वाचकांनी आवर्जून वाचावा असा आहे. सरांचे संवाद काैशल्य किती भावनाेत्कट, परिणामकारक हाेते हे सहजच या संवादावरून कळून येते. सरांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल थाेडीफार कल्पना असणाऱ्यांना या प्रसंगातील चिमणी काेण व कावळा काेण आणि अशा निष्पाप जीवांची नियती नावाची गाेष्ट माणसाचे काय करून ठेवते; हे सारे काही लख्ख जाणवते. हे असे विखरून पडलेले नातेसंबंध सरांच्या नाटकांमधून खूप सारे भेटत राहतात. सामाजिक जाणिवांचे चित्रण करण्यापेक्षा सरांचा ओढा माणसांमधील नातेसंबंधांवर अधिकांशाने केंद्रित झाला असल्याचे दिसून येते.

सरांची नाटके पाहताना वाचताना त्यातील काही गाेष्टी सारख्या खटकत रहायच्या. पण बाेलून दाखविण्याचे धाडस व्हायचे नाही. सरांचा मूड पाहून थेटपणे एकदा बाेलावे असे वाटायचे पण नंतर सरांनी सांगली साेडली कायमची. भेटीगाठीही जवळपास बंदच झाल्या. त्यामुळे सरांच्या नाटकांबद्दल त्यांच्याशी बाेलणे झाले नाही ते नाहीच.

‘थेंब थेंब आभाळ’, ‘महाराज मेल्ये’ अशा अगदी अपवादाने दाखवता येतील अशा नाटकांमधून सामाजिक जीवन जाणिवांवर सरांनी काही लिहिलेले आहे. त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न ते करताहेत हे जाणवते. तथापि माणूस त्याच्या वाट्याला आपसूक किंवा त्याच्या लहरी- बेफिकीर स्वभावाने त्यानेच ओढवून घेतलेले दु:ख, संशयी स्वभावामुळे माणसांमध्ये विशेषत पती पत्नींमधील संघर्ष, कुटुंबाची लहानग्यांची हाेणारी फरफट हा आशय सातत्याने आविष्कृत हाेताना दिसत राहताे. सरांचे ‘कहाणी’ नाटक तर जवळपास सरांच्या आयुष्याचीच ‘कहाणी’ वाटावी इतके साम्य घेऊन आले आहे असे सतत जाणवत राहते. या नाटकात सरांनी स्वत: भूमिका केलेली हाेती आणि उत्कृष्ट अभिनयाचे पारिताेषिकही मिळविलेले हाेते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सरांच्या मुलाचा-प्रियदर्शनचा हातात टेडीबेअर घेतलेला फाेटाे आहे. कहाणीच्या सुरूवातीलाच सरांनी मुलाविषयी आत्मियतेने लिहिलेले आहे, ‘‘चि. प्रियदर्शन ‘पिया’, जेमतेम दहा वर्षांच्या आयुष्यात तू दाेन वेळा मरणाच्या वाटेवरून माझ्यासाठी परतलास. आता माझं उरलं आयुष्य घे; पण ती वाट तु या नशिबी नकाे.’’

सरांच्या मनात त्यांच्या मुलाविषयी किती आत्मियता हाेती हे मीदेखील जवळून पाहिले अनुभवले हाेते. ताे असेल सात आठ वर्षांचा. नुकतेच त्याचे काेणते तरी जाेखमीचे ऑपरेशनही झालेले हाेते. चारदाेन दिवस वडिलांकडे आलेल्या प्रियदर्शनला परत मुंबईला साेडण्यासाठी सर रेल्वे स्टेशनवर मलाही साेबत घेऊन गेलेले हाेते. सरांना आणि प्रियदर्शनला महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसवून देण्यासाठी या दाेघांसाेबत मी स्टेशनवर गेल्याचे आठवते.

थंडीचे दिवस हाेते. प्रियदर्शनने स्वेटर घातला हाेता अंगात. सरांनीही गळ्याभाेवती काळ्यापांढऱ्या रंगाचा मफलर गुंडाळलेला हाेता. प्रियदर्शनबद्दल सरांच्या मनात एक हळूवार रिकामा काेपरा हाेता. ताे अखेरपर्यंत तसाच रिकामा राहिला. खूप जपत हाेते ते प्रियदर्शनला. गप्प गप्पच हाेते सर. पण आतली अस्वस्थता त्यांच्या एकूणच हालचालीतून-चालण्याबाेलण्यातून स्पष्ट दिसत हाेती. खूप हळू आणि कातर स्वरात सर बाेलत हाेते. मुलाचा कायमचा ताबा आपल्याला मिळावा, ताे आपल्यापाशी सदैव रहावा यासाठी सर प्रचंड धडपडत हाेते. ताे मात्र सरांशी काहीसे अंतर ठेवूनच वागत हाेता. साेबत असूनही नसल्यासारखा. त्याच्याही नजरेत बावरलेपण दिसायचा. त्याला आवडते म्हणून सरांनी त्याला नवे स्केटिंग घेऊन दिले हाेते. ते स्केटिंग प्रियदर्शनने आपल्या छातीशी बिलगून धरले हाेते. ही अशी या तिघांची फरफट नेमकी कशाने झाली आहे? ती सांधता नाही का येणार? कारणे काेणती का असेनात पण सरांच्या आणि या दाेघांच्याही आयुष्याचे हे असे व्हायला नकाे हाेते असे सारखे वाटत रहायचे.

सरांनी आपली सारी व्यक्तिगत दु:खे आपल्या नाटकांना सांगितली; असे म्हटले तरी काही वावगे ठरू नये. तसे पाहिले तर प्रत्येक माणसाची काही सुखदु:खे असतात. अडचणी-समस्या असतात. ती मुखर हाेतातच असे नाही. त्यामुळे सरांनी आपली सुखदु:खे जरी नाटकांमधून अविष्कृत केलेली असली तरी त्यांना प्रातिनिधिकता लाभलेली आहे. सरांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर विलक्षण चालली. ‘निष्पाप’ सारख्या नाटकांचे पाचशेच्यावर प्रयाेग झालेले आहेत. त्यांची नाटके प्रयाेगमूल्य आणि वाङ्मयीन मूल्यांच्या आधारावर टिकून राहिलेली आहेत. सरांच्या नाटकांचे मूल्यमापन करण्याचे हे ठिकाण नाही. तथापि नरहर कुरंदकर, माधव मनाेहर, यशवंत केळकर यांच्यासारख्या मातब्बर समीक्षकांनी त्यांच्या नाटकांची दखल घेतलेली आहे; यावरून नाटककार म्हणून सरांचे याेगदान किती महत्त्वपूर्ण हाेते हे सहज कळून येते. महाराष्ट्रभर त्यांच्या नाटकांचे हाैशी रंगभूमीवर खूप प्रयाेग हाेत असत. आजही कुठेकुठे सरांची नाटके रंगभूमीवर सादर केली जातात. सरांच्या नाटकांमधून काम केलेले अनेक कलावंत नंतर पुण्या मुंबईच्या व्यावसायिक रंगभूमीवर, टीव्ही आणि सिनेमात स्थिरावले. इतके असूनही सर वर्गात एकदाच आपल्या नाटकांविषयी ओझरते बाेलल्याचे आठवते. भल्या माेठ्या वर्गाच्या समाेरील एका भिंत्तीच्या काेपऱ्यात डाेळे बारीक करून सर बाेलून गेले हाेते. ‘मला धड व्यावसायिक नाटककार हाेता आले नाही आणि धड प्रायाेगिकही हाेता आले नाही.’ ‘अस्त’, हे नाटके आणि त्यांच्या ‘महाद्वार’ सारखी एकांकिका प्रायाेगिकतेची काही चांगली उदाहरणे ठरावीत.

‘काजळ कुबड्या एकांताला’ ही एकांकिका सरांना न सांगता आम्हीही अकलूज येथे सादर केली हाेती. सरांसाेबत त्यांच्या ‘सीमांत’ या नाटकात बॅक स्टेजवर काम करताना प्रयाेगातले दिलीप परदेशी कसे असायचे; हे देखील एकदा जवळून पाहिल्याचे लख्ख आठवते. ‘सीमांत’ या नाटकाचा सांगलीत पहिला प्रयाेग हाेता. विष्णुदास भावे नाट्यगृहात. माझ्याकडे प्रोपरॉयरचे काम देण्यात आले हाेते. नाटकाची स्क्रीप्ट हातात घेऊन मी विंगेत बसून राहिलाे हाेताे. माझ्या माहितीप्रमाणे सरांनी सांगलीत असताना लिहिलेले हे शेवटचे नाटक असावे. त्यानंतर त्यांनी नाटक लिहिल्याचे ठाऊक नाही. या नाटकाबद्दल सरांच्या खूप अपेक्षा असाव्यात. व्यावयायिक रंगभूमीवर हे नाटक चांगले चालेल; असे सरांना वाटत असावे. ते खरेही हाेते. व्यावसायिक नाटकांची सारी गणितं सरांनी या नाटकात जाणीवपूर्वक जुळविलेली दिसत हाेती. त्यामुळे या नाटकाच्या पहिल्या प्रयाेगाला प्रेक्षक कशी दाद देतायत याचा अंदाज सर नाटक सुरू असताना घेत हाेते. सरांचे लक्ष रंगभूमीवरील प्रयाेगापेक्षा प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच अधिक हाेते. पडद्याशेजारील एक खिडकीतून सर प्रेक्षागृहातील प्रेक्षकांकडेच अधिक पहात हाेते. प्रेक्षकांमधून हशा केव्हा येताे. ते काेणता प्रसंग पाहताना गंभीर हाेतात. काेणत्या प्रसंगाला, संवादाला टाळ्या पडताहेत हे सारे काही ते उत्सुकतेने पहात हाेते. आणि मी माझ्याकामाकडे दुर्लक्ष करून सरांकडे पहात हाेताे. नाटकभर त्यांची अस्वस्थ येरझार सुरू हाेती. ‘सीमांत’चे पुढे काय झाले ते कळलेच नाही.

सरांचे वडील आणि त्यांच्या पाठाेपाठ काही दिवसांनी त्यांची बहीणही कायमचे निघून गेले आणि सर अधिकच एकटे पडले. मग फार दिवस ते सांगलीत राहिलेच नाहीत. सांगलीतले सारेच त्यांनी मनातून पुसून टाकले हाेते की काय कुणास ठाऊक? ते पुन्हा सांगलीत कधी आल्याचे आठवत नाही. नाेकरीच्या निमित्ताने मुलाखत देण्यासाठी मी एकदा पुण्यास गेलाे हाेताे. सर बीएमसीसी महाविद्यालयात असतात; असे समजले हाेते. सरांची भेट हाेईल; असे मनातून फार वाटत हाेते. खूप दिवस काेणताच संपर्क नव्हता त्यांचा.

मुलाखतीनंतर बीएमसीसी शाेधून काढले. दुपारचे चार वाजले असतील. गेटवर पाेहाेचलाे. वाॅचमन हाेता. सरांना भेटायचे आहे. सांगलीहून आलेलाे आहे. असे सांगितले. पण सर आधीच घरी निघून गेल्याचे समजले. आता सर पुण्यात कुठे राहतात; हे शाेधायचे कसे? हे असे काही न कळवता अचानक आलेले सरांना आवडेल का? घरी तरी ते असतील? भेटतील? हे प्रश्न मनात हाेतेच. शिवाय मुक्कामाचा विचारही मी केलेला नव्हता. जवळ पैसेही जेमतेमच हाेते. पुन्हा आलाे की भेटता येईल; अशी स्व:तचीच समजूत घातली आणि चुटपुटतच मी परत फिरलाे.

सरांची भेट जरी हाेत नव्हती. तरी अधूनमधून त्यांच्याविषयी कानांवर बरेवाईट ऐकायला मिळत असे. पुण्याला गेल्यावर सरांना नाट्यक्षेत्रात माेठा स्काेप मिळेल; असे वाटत हाेते. पण नाटकांनी त्यांच्याकडे आणि त्यांनी नाटकाकडे पाठच फिरवली हाेती. पुण्यात त्यांच्याकडून काहीच लिहून झाले नाही. ‘मला ‘महाराणा प्रताप’ यांच्या आयुष्यावर माेठी कादंबरी लिहायची आहे.’ असं सर एकदा म्हणाले हाेते. तेही तसेच राहून गेले. पुण्यापासून त्यांच्या आर्थिक पडझडीला अधिकच सुरूवात झाली हाेती.

एका सिनेमाकरिता त्यांनी खूप पैसे गुंतवले हाेते; तिथेही त्यांची घाेर निराशा झालेली हाेती. पुन्हा एकदा कळले सर बीएमसीसीमध्ये देखील नाहीत. कुणी म्हणायचे त्यांना तिथून काढून टाकलेले आहे. कुणी म्हणायचे सरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. हे सारं ऐकून प्रचंड अस्वस्थ व्हायला व्हायचं. कुणाचं खरं कुणाचं खाेटं? नंतर त्यांनी पुणंही साेडलं. नंतर खूप दिवस सरांविषयी काहीच कळेनासं झालं. ते नेमके कुठे राहतात? काय करतात? काहीच समजेनासं झालं. मग खूप दिवसांनी एकदा जया फाेनवर बाेलत हाेती, ‘‘अरे, परदेशीसर तुला चांगलं ओळखतात. पनवेलला असतात ते. भविष्य चांगलं सांगतात. गुण येताे. म्हणून आम्ही वारंवार जाताे त्यांच्याकडे. पण ‘माझ्याविषयी तू रमेशला काहीच सांगू नकाेस!’’ असं सरांनी मला बजावलं आहे, तुला सहज म्हणून सांगितलं आहे हे. हे तू सरांना मात्र सांगू नकाेस.’ हे असं सर माझ्याविषयी का बाेलले असतील? स्वत:ला हे असं ते का लपवीत असावेत? मग मीही मुद्दाम त्यांना भेटण्याचा वा फाेन करण्याचा प्रयत्न केला नाही. सर अजूनही मला ओळखतात हे ऐकून खूप समाधान वाटत हाेतं. मला त्याच क्षणी सरांचे हे असे काय हाेऊन बसले आहे? या विचाराने मनात कालवाकालवही हाेत हाेती खूप. पनवेलमध्ये सर एका विद्यार्थ्याच्या रिकाम्या फ्लॅटवर रहात हाेते. आधीच अशक्त असलेले सर आता खूप खचले हाेते. ‘राजासारखा रूबाब असलेल्या सरांना आता तुम्ही ओळखूही शकणार नाही.’ असेही कुणीतरी म्हटल्याचे ऐकले हाेते. सरांना या अशा अवस्थेत पुन्हा सांगलीत आणता येईल का? त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची आयुष्यभराची साेय आपणास करता येईल का? सरांसाठी कुठंही शब्द टाकला तर ताे रिकामा जाणार नाही. याचीही खात्री हाेती. माणसांची एवढी वैभवी श्रीमंती सरांनी नक्कीच सांभाळलेली हाेती. मी तसे सुचवूनही पाहिले; पण सर्वांनाच ठाऊक हाेते; असल्या तडजाेडीला सर राजी हाेणार नाहीत. मग तेही तसेच राहून गेले. सर आता कसे दिसत असतील, चालत-बाेलत असतील? हा माणूस आठ दहा वर्षांपूर्वी काय हाेता आणि त्याची ही अशी गत हाेऊन बसली आहे? अशा विचाराने तिथे कुणाला अस्वस्थ केले असेल का? असे मन विदीर्ण करणारे चित्र डाेळ्यासमाेरून हलता हलत नव्हते.

अगदी न राहवून कुठून तरी त्यांचा फाेन नंबर मिळविला. अस्वस्थपणे सायंकाळी सहाच्या सुमारास फाेन केला. खूपवेळ रिंग हाेऊन मग सरांनी फाेन उचलला. आवाज खूप खाेल गेल्याचे जाणवत हाेते. ‘‘अरे, कसा आहेस तू?’’ वगैरे इकडचे तिकडचे थाेडेसे बाेलूनही झाले. ‘मी भेटायला येणार आहे सर तुम्हाला.’ असे म्हणताच ‘जरूर ये ! मी तुला महानुभाव पंथाच्या संदर्भात काही टिप्स देईन. तुला आयुष्यभर उपयाेगी पडतील त्या…’ असं काहीबाही बाेलून सरांनी एक दीर्घ विराम घेतला. यानंतर सरांनी जे काही एक वाक्य उच्चारले आणि टचकन् डाेळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. सर प्रचंड थकलेल्या आवाजात फाेनवर बाेलत हाेते; ‘‘येताना साेबत थाेडे पैसे आणता आले तर बघ. मला खूप गरज आहे त्याची.’’ मराठी विषयाचा नामवंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा नाटककार की ज्याची नाटके अनुवादित हाेऊन परराज्यात दिमाखात सादर हाेत हाेती. ज्याने आपल्या उमेदीच्या काळात श्रीमंती जगण्याची स्वाभीमानी चैन केली हाेती. वसंत कानेटकर यांच्या सारख्या नाटककारांसाेबत ज्याची उठबैस हाेती. देवानंद यांच्या सारख्या सुपरस्टार नायकांसाेबत ज्याचा दाेस्ताना हाेता. ताे माणूस हा असा असहाय्य हाेऊन बसला असेल, हे पटत नव्हते; पण ते दूर सारता न येणारे सत्य हाेते. कठाेर वास्तव हाेते ते. आपल्या ज्ञानानं, उमदेपणानं ज्यानं आम्हाला आयुष्याची श्रीमंती बहाल केली; त्याला आम्ही काय आणि कसे देऊ शकत हाेताे?

पंधरा एक दिवसांच्या अंतरावर केवळ सरांची भेट घ्यावी म्हणून पनवेलला गेलाे. साेबत थाेडे पैसेही घेतलेले हाेते. साेबत मुंबईत राहणारा अमर हाेता. भर दुपारचे दाेन वाजले असतील. खांदा काॅलनी, एका फ्लॅटमध्ये, पायल ज्वेलरीनजीक सर राहतात. असा त्राेटक पत्ता मिळाला हाेता. थाेडेसे शाेधल्यावर नेमका पत्ता मिळाला. फ्लॅटच्याखाली सरांविषयी चाैकशी केली. नाव सांगितले. सांगलीहून आल्याचेही सांगितले. समारेच्या माणसाला वाटले बहुतेक आम्ही भविष्यवगैरे पहायला आलेलाे आहाेत. त्याने जे सांगितले ते ऐकून पुन्हा धक्का बसला. ‘काही नाही हाे. सारे थाेतांड आहे. फसवाफसवी. उगाच पैसे घालवू नका. आज चारपाच दिवस झाले कुलूपच आहे घराला. कुठे गेले आहेत कुणास ठाऊक. हवं तर वर जाऊन पहा.’ इथेही ही अशी हेटाळणी. कुत्सितपणा. न राहवून वर गेलाे तर फ्लॅटला कुलूप. मिनीटभर तसाच स्तब्ध उभा राहिलाे. इथेही सरांची भेट झाली नाहीच. अस्वस्थ मनाने मान खाली घालून जिन्याच्या पायऱ्या उतरून कधी रस्त्याला लागलाे ते समजलेच नाही.

त्यानंतर पाचसहा महिन्यानी दिलीपचा फाेन आला. त्यालाही असेच कुठूनतरी कळले हाेते. हे केव्हा तरी व्हायचेच हाेते. सर, कायमचेच निघून गेल्याची बातमी फाेनवर ऐकू येत हाेती. सरांकरिता आपल्या हातून काहीच करणे झाले नाही; या विचाराने मन एकसारखे आतून जळत हाेते. अजूनही जळतेच आहे !

सगळे अगदी वेगात घडत गेले हाेते. अ‍ॅब्सर्ड पेंटिगच्या फटकाऱ्यांसारखे. सरांविषयी काहीबाही कानांवर पडत गेले. जयाही सांगत हाेती… शेवटचे दाेन महिने सरांनी स्वत:चे अत्यंत हाल करून घेतले. काही लिहू म्हणले तर हातांना कंप सुटायचा. थरथरायचे ते. तरीही अक्षर टपाेरं, वळणदार यायचे. नंतर त्यांनी लिहिणं थांबवलच. कायमचेच. खरंतर ‘अस्त’च्या अखेरीस त्यांनीच आपलं भरतवाक्य लिहून ठेवलं हाेतं; साक्ष दिली हाेती, ‘‘हाे, नाहीतरी ते मेल्यातच जमा हाेते-वर्तमानपत्रात वगैरे बातमी नाही येणार, कारण वार्ता दिलेलीच नाही-मी बालमित्र त्यांचा, अगदी जिवलग. आता इथं असताे.’’ सरांना भेटावयास गेलेल्यांचीही असंच काही सांगून-बाेलून त्यांनी पुन्हा डाेळ्यांनी अशीच बाेळवण केली असेल का?

सरांनी व्हरांड्यात खूप साऱ्या राेपांच्या-फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या हाेत्या. त्यांची निगाही त्यांनी छानच ठेवलेली हाेती. बाहेर एका माेठ्या पिंजऱ्यात लव्हबर्डही पाळलेले हाेते. सर अनेकदा या पक्षांबराेबर एकटेच बाेलत बसलेले दिसायचे. त्यांना हिंदी आणि इंग्रजी कविता आणि गाणी ते ऐकवत असायचे. सरांच्या आवाजाला साद देत ते रंगीत पक्षी डाेलू लागत. विशिष्ट आवाज करून ते सरांना प्रतिसाद द्यायचे. माणसांच्या जगातून सरांनी स्वत:ला बाहेर काढून हा असे झाडांना आणि चिमण्यांना जीव लावलेला हाेता. आपले एकटेपण हे असे निशब्द पण टाेकाची संवेदनशीलता असणाऱ्यांच्या ओंजळीत टाकलेले हाेते. सरांनी हाॅलमध्ये त्यांच्या बहिणीच्या लहान माेठ्या आकाराच्या खूप साऱ्या तसबिरी लावलेल्या हाेत्या. कुणास ठाऊक या मूक, निशब्द तसबिरींमधूनही सर दिलासा शाेधत असावेत.

शेवटच्या दाेनएक महिन्यांमध्ये सर त्याच वस्तीत कुठेतरी दुसरीकडे रहायला गेले हाेते. अत्यंत लहान आतबाहेर दाेन खाेल्या. बाहेरची काही विचारणाऱ्या आल्यागेल्या लाेकांसाठी. आणि आतली त्याहून छाेटी त्यांची खासगी; अपेयपानाची सामग्री असलेली. या दिवसात सरांचे तेही वाढले हाेते खूप. पण इथेही सरांनी आपला डामडाैल कष्टपूर्वक का हाेईना पण निगूतीने सांभाळला हाेता. आपल्या ऐटीत जगण्यात आपल्या वेदनेचे शल्य जगापासून लपविताना किती अविश्रांत यातायात करावी लागली असणार त्यांना? ते सहसा मेसमध्ये जेवण करून यायचे. थाेडंफार घरीही बनवत असत. या घरी त्यांना त्या कुंड्यांना नाही आणता आले; आणि त्या चिमण्यांनाही. या सर्वांचे काय झाले असेल त्यांच्या माघारी? भिंत्तींवर लावलेल्या बहिणीच्या तसबिरी? शेराला त्यांनी कुणाच्या हवाली केले; की स्वत:साेबत ठेवले अखेरपर्यंत? काय झाले त्याचे?… सरांचे अखेरचे अप्रकाशित नाटक ‘सीमांत’ त्याचं हस्तलिखित कुठे सापडेल का?

एक एक करत सगळेच निखळून पडत गेले असणार. ‘जग वाईट नसेल, पण माझा स्वभाव वाईट आहे. आणि मला मा या स्वभावाबराेबरच जन्म काढायचाय’ त्यांनी हा असा प्रांजळ कबुलीजबाबही दिलदारपणेच देऊन ठेवलेला हाेता. सरांना अखेर साथसाेबत केली ती निमाेनियासारख्या आजाराने. या आजाराने त्यांचे जगणे पुरते संपवून टाकले हळूहळू. शेवटच्या आठवड्यात पाय पाेटाशी दुमडून ते ग्लानीतच झाेपलेले हाेते. मरणगार. किती दिवस कुणास ठाऊक. शेजारचे कुणीतरी औषध देण्याकरिता येऊन जात असत. जयाने जेव्हा त्यांना शेवटचे पाहिले तेव्हा अंगात प्रचंड ताप हाेता सरांच्या. डाेळे उघडण्याचा प्रयत्नही माेठ्या कष्टाने करावा लागत हाेता त्यांना. त्यानंतर दिलीपने सांगितलेली सरांची अखेरची बातमी…

सर, तुम्ही एकदा वर्गात म्हणाला हाेतात; ‘‘शरदबाबुंना – शरदचंद्र चटर्जींना एकदा भेटून विचारले पाहिजे, तुमचे बहुतेक सर्वच नायक शेवटी दीर्घ आजाराने त्रस्त हाेऊनच का संपून जातात हाे…..?’’ सर, आता झाले का बाेलणे शरदबाबुंशी तुमचे? लाभली का आत्मशुद्धी? झाले का पुरते समाधान?… संपले का सारे यमभाेग ? झाला का शब्दसंग ? सर, फसवून गेलात तुम्ही आम्हाला ! चुकलातच तुम्ही !! स्व:तची ही अशी सुटका करून घेतलीत ? खूप शिकवल सर तुम्ही आम्हाला; सत्य, शिव आणि सुंदराचं भान, आशावादाचा बळकट धागा, स्वाभिमानाची मिरासदारी असं खूप काही. सर, खूप काही अवतीभवती भाेवंडून टाकणारं पसरून राहिलं आहे अजस्त्रपणे. एकटं, एकाकीपण सरता सरत नाही. एकट्याने लढता लढता हतबल व्हायला हाेते आहे. याचकाचे डाेळे तहानलेलेच आहेत. आणि तुम्ही…? आयुष्याची लढाई अखेरपर्यंत धीराेधात्तपणे कशी लढावी याच्या टिप्स ना तुम्ही आम्हाला दिल्यात न त्याबरहुकूम तुम्ही चाललात ! कसली ही यातायात; कसली ही आटाआटी ? का जगण्याच्या अशा टिप्स केवळ कल्पवृक्ष असतात ? कामधेनू असतात ? बऱ्याचदा वाटते सर, तुम्ही शरदबाबुंच्या कादंबरीतील नायकांचे जगणेच जगला नाहीत का ? आपल्या हृद्यसंगम दु:खाच्या वाऱ्याची एखादीही झुळूक आम्हाला जाणवू दिली नाहीत ? ही नियती ? प्रायश्चित्त ? की आणखी काही…? हे सारं आपसूक घडत गेलं; की अत्यंत सुनियाेजित पद्धतीने आपल्या आयुष्याचं तुम्हीच हे असलं कथानक रचलत ? शाेकात्म नायकही तुम्हीच झालात ? आणि हा असा जिव्हारी लागणारा स्वत:चा शेवटही तुम्हीच करून घेतलात ? कसलं हे मरण ?… की ठरवून केलेला आत्मघात ?… की तुम्हाला न आवडलेल्या जगाचा, माणसांचा तुम्ही तुमच्या पद्धतीने घेतलेला सूड ???…

…आता तर ज्ञानाेबांच्या विर्नत अवतरणाचे आवर्तनही पाठशिवणीचा खेळ; हे असे जिवाच्या आकांताने खेळू लागले आहे, ‘पडिले दूर देशी । मज आठवे मानसी ।। नकाे नकाे हा वियाेग । कष्ट हाेताती जिवासी।।…’
‘‘…माझं हे सगळं लेखनाचं साहित्य कुलपात टाकून दे-आणि हे रायटिंग टेबलही आता अडगळीच्या खाेलीत जाऊ दे (खिडकीशी जात) ब्यूटिफुल ! सूर्यास्ताच्या वेळी पश्चिमेचं आकाश किती सुंदर दिसतं, नाही ?’’ श्रावणातलं मावळतीचं गहिरं आभाळ पाहताना; तुमची ही अस्ताचलीची विश्रब्ध प्रसन्नता अधिकच कातर करते आहे!!!

Related posts

जगभरातील संसदांमध्ये महिला अल्पसंख्यच !

आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे जतन, संवर्धन करण्यासाठी मंचाची स्थापना

खपली गव्हाची लागवड करायची आहे, मग हे वाचाच…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406