September 7, 2024
Book review of Krupavant author sunilkumar sarnaik
Home » कृपावंत : एक प्रबोधनात्मक पुस्तक
मुक्त संवाद

कृपावंत : एक प्रबोधनात्मक पुस्तक

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी ही मराठी माणसांची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख आहे. वारी म्हणजे प्रतिवर्षी अगदी प्रत्येक महिन्यास नियमितपणे पवित्र स्थळाच्या यात्रेस जाण्याची प्रथा असा देखील शब्द रुढ झालेला आहे.

सौ. माधवी पोफळे

संत महती, विठ्ठल महती, वारकरी संप्रदाय यांना अखिल महाराष्ट्रात फार मोठी परंपरा प्राप्त झालेली आहे. या परंपरेचा सखोल अभ्यास करून सुनीलकुमार सरनाईक यांनी ‘कृपावंत’ या पुस्तकात संतांच्या प्रबोधनात्मक विचारांचा वेध घेतलेला आहे. ’पुंडलिका भेटी’ या पहिल्या लेखात विठ्ठल म्हणजे भगवान श्रीकृष्ण, श्रीकृष्णाची उपासना करणारा तो भागवत धर्म. विठ्ठलाला प्रिय तुळशीमाळा, म्हणून वारकरी संप्रदायातील प्रत्येक जण ती भक्तीभावाने धारण करतो, तसेच महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाचे मंदिर कसे उभारले गेले हे संत तुकोबारायांच्या अभंगातून वाचकापर्यंत पोहचवले आहे.

ह्यात जनाबाई म्हणतात, ‘भक्तामांजी अग्रणी। पुंडलिक महामुनी| त्यांच्या प्रसादे तरले। साधुसंत उद्धारिले॥ पुंडलिक आणि वैकुंठाचा अधिपती पांडुरंग यांचे महत्त्व ’पुंडलिका भेटी’ यातून सुनीलकुमार सरनाईक यांनी भक्तांपर्यंत पोहचविले आहे.

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी ही मराठी माणसांची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख आहे. वारी म्हणजे प्रतिवर्षी अगदी प्रत्येक महिन्यास नियमितपणे पवित्र स्थळाच्या यात्रेस जाण्याची प्रथा असा देखील शब्द रुढ झालेला आहे. ह्या व्याख्येप्रमाणेच वारकर्‍यांच्या बाबतीत पवित्र स्थळ म्हणजे पांडुरंग किंवा विठ्ठल या वारकर्‍याच्या दैवताचे निवासस्थान म्हणजे भूवैकुंठ ’पंढरपूर’ होय. वारी संप्रदायात वारी करणार्‍याला वारकरी म्हणतात. ’वारी’ आणि ’वारकरी’ या प्रकरणात सरनाईक यांनी वारी आणि वारकर्‍यांचे सांप्रदायिक महत्त्व स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर त्याचा अर्थ स्पष्ट करतांना ज्ञानेश्वरीमध्ये घेतलेला संदर्भ नमूद केलेला आहे.

ऐसे वैराग्य हे करी। तरी संकल्पाची सरे वारी। सुखे घृतींचा घावकरी | बुद्धी नांदे॥ ज्ञानेश्वरीतील अभंगांमध्ये वारी हा बहुधा फेरा किंवा खेप या अर्थाने घेतलेला दिसून येतो. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातून वारी आणि वारकरी स्पष्ट करतांना ज्ञानेश्वरीतील अनेक ओव्यांची ओळख वाचक भक्तांना करुन दिलेली आहे. संत म्हणजे देवाचे दूत, संत म्हणजे मानवाला घडविणारा शिल्पकार. संत सहवासाने मानवाचे शिल्पात रुपांतर कसे होते. संत म्हणजे सदगुणांचे आगार असते. वात्सल्याचे ते माहेर असते. संत सहवास हा सुखकर, लाभदायक असतो. हे एकरुपतेचे नाते पटवून देतांना संत जनाबाई म्हणतात संत तेचि देव | देव तेची संत। म्हणे जनी मात। गोष्टी भिन्न॥ धरतीचे अंबराशी, नदीचे सागराशी, पाण्याचे मेघाशी जसे अतूट नाते तेच संत आणि देव यांच्यात नाते असते. म्हणजेच संत हे देवांचे दूत असे जनाबाई म्हणतात.‘संत : मानवाला घडविणारा शिल्पकार’ या लेखात सरनाईक यांनी उदाहरणाद्वारे सार सांगितले आहे.

संतांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालू शकलो तरच, आपण प्रगती करु शकतो. संत चरणी लीन होणे, संतांच्या उपदेशाप्रमाणे चाललो तर संतांच्या या महान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे होईल. ईश्वराचे नामस्मरण अखंड व्हावे हीच संताच्या अभंगातून प्रेरणा मिळते. ती स्वीकारुन जीवन धन्य होते. संत चालते बोलते ईश्वर आहेत. त्यांनी रचलेले अभंग हे मनुष्याच्या दैनंदिन जीवनासाठी सांगितले आहे. हरीपाठाची ओळख सरनाईक यांनी करून देऊन भक्तांबरोबर वाचकांना देखील तल्लीन केले आहे. गुरु परमात्मा परेशू, गुरुशिवाय तरणोपाय नाही, शिष्यांच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याच परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात, ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरुचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर. गुरु हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु आणि महेश आहेत. ते साक्षात परब्रह्मच आहेत. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय गुरुंबद्दल काय म्हणतात हे यातून सांगितले आहे.

’लोह परिसाची न सादे उपमा सद्गुरूंचा महिमा आगाध’ संत तुकोबाराय सदगुरुना परिसाची उपमा देत नाहीत कारण परिस लोखंडाचे सोने करतो पण सद्गुरु आपणास स्वत:सारखे तात्काळ बनवितात व परमात्म्याशी एकरुपता साधतात. गुरु हा मूर्तिमंत दिव्य आनंद आहे. गुरु मार्गदर्शक आहे. ज्ञान देणारा आहे. अनेक थोर व्यक्तीचे गुरुविषयी तेजोमय वाक्य ‘गुरु साक्षात परब्रह्म’ भक्तांपर्यंत पोहचवून सरनाईक यांनी गुरुमहिमा मनामनात जागवला आहे. ’ज्ञानराज माझी योग्याची माउली। जेणे निगमवल्ली प्रकट केली’ असे संत नामदेव महाराज म्हणतात ज्ञानदेवांनी सामान्यांना न कळणारे संस्कृतमधील अध्यात्मज्ञान मराठी प्राकृत भाषेत आणले.

ज्ञानाचा ईश्वर तो ज्ञानेश्वर, महाराष्ट्रातील साधना संप्रदायाच्या इतिहासाचे सुवर्णाचे पान म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीत ज्ञान, कर्म, भक्तीचे परमरहस्य दाखवले आहे. त्याचे ज्ञान वाचकांना दिले आहे, ते ‘अमृताची पाउलवाट’ मधूनच. माणसाने सुखात हुरळून जाऊ नये व दुःखात खचून जाऊ नये कारण दोन्ही अवस्था बदलणार्‍या आहेत, सुख असो, वा दुख ते टिकणारे नाही.

अर्थात संत ज्ञानेश्वर यांनी म्हटलेलेच आहे… सुखी संतोषा न यावे। दु:खी विशादा न भजावे। तसेच जीवनसृष्टीच्या संबंधी विश्वकवी रविंद्रनाथ टागोर आयुष्याविषयी आणि सुखाविषयी काय म्हणतात ते वाचा ‘आनंदोत्सवात.’अनेक संतांच्या सहवासाचे उत्तम उदाहरण देऊन वाचकांना संतांची जवळून ओळख करून देण्याचा सुखद प्रयत्न लेखकाने करून दिला आहे. लेखक सुनीलकुमार सरनाईक यांनी ‘कृपावंत’ पुस्तकाच्या निमित्ताने अक्षरगंध लेखून सकल साहित्याची वाट सुगंधी केली आहे. कृपावंतांच्या सहाय्याने वाचकाच्या, वारकर्‍यांच्या वाटेवरचा नंदादीप प्रकाशमय झाला आहे. यात संदेह नाही.

पुस्तकाचे नाव : कृपावंत
लेखकाचे नाव : सुनीलकुमार सरनाईक
प्रकाशक : जीवन जोशी, अथर्व प्रकाशन, कोल्हापूर.
पृष्ठे : 144, मूल्य : 170 रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

स्पर्धा परीक्षा आपण आणि काळ

मराठीमध्ये विश्वाची भाषा बनण्याचे गुण

देवरुखच्या सावित्रीबाई… एका कर्तृत्ववान स्त्रीची प्रेरक गाथा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading