May 30, 2024
bakulgandh-memories-of-poet-shanta-shelke
Home » बकुळगंध : एक संस्मरणीय दस्तावेज
मुक्त संवाद

बकुळगंध : एक संस्मरणीय दस्तावेज

प्रख्यात कवयित्री शांता शेळके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. शांताबाई यांची जन्मशताब्दी अभिनव रीतीने कृतिशील स्वरूपात साजरी करण्याची कल्पना महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध कवी राजन लाखे यांच्या नेतृत्वाने अमलात आणली. तिचे मूर्त स्वरूप म्हणजे ‘बकुळगंध’ हा १०० लेखांचा शतगुणी ग्रंथ.

डॉ. न. म. जोशी, (ज्येष्ठ साहित्यिक)

शांताबाईंची कविता म्हणजे शब्द- स्पर्श- रूप- रस – गंध या पंचतत्त्वांचा जीवनानुभव देणारी साहित्यकृती. चित्रपट आणि नाटके यामधून त्यांच्या कविता घरोघरी पोहचत होत्याच; पण भावविभोर भावगीतांनाही रसिकहृदये सुस्नात होत गेली. तो ‘बकुळगंध’ साडेतीनशे पृष्ठांच्या सुंदर ग्रंथाद्वारे रसिकांच्या ओंजळीत कायमचा दरवळणार आहे.

हा ‘बकुळगंध’ ग्रंथ म्हणजे एक साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमाची ग्रंथरूप सांगता होय. हा उपक्रम असा की, शांताबाईंच्या कवितांपैकी त्यांच्या स्वतःच्या आवडीच्या एका कवितेचे वाचनरूप सादरीकरण. राजन लाखे पुरस्कृत ही कल्पना अभिनव आहे. या निमित्ताने महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील १०० साहित्यिक, रसिक, समीक्षक, गायक, संगीतकार या ग्रंथात एकत्र सापडतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या सर्व आठवणी दर आठवड्याला यू-ट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यावरून प्रसारित होत असत आणि लक्षावधी रसिकांपर्यंत या आठवणी पोचत असत.

हे पुस्तक जे वाचतील त्यांना शांताबाईंच्या आठवणींचा आणि कवितांचा लाभ होईल. उल्हासदादा पवार यांनी शांताबाईंच्या आठवणी तर लिहिल्या आहेतच; पण त्यांच्या आवडीची ‘पुतळा’ ही कविता त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील राजकीय विचारवंत कसा आहे याची साक्ष देते. श्रीमती बकुळ पंडित या प्रख्यात गायिकेने स्वतःच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वास साजेशी कविता निवडली आहे. डॉ. राजा दीक्षित या स्वतः कवी असलेल्या इतिहास संशोधकाने शांताबाईंच्या एका अशा कवितेची निवड केली आहे की, ती कविता काव्य म्हणून उत्कृष्ट असूनही फारशी प्रसिद्ध नाही. डॉ. पी. डी. पाटील हे शिक्षणक्षेत्रातील दिग्गज ते अध्यात्म साधनाही करतात. तोच भाव शांताबाईंच्या ‘कशाला’ या कवितेत आहे. पी. डी. यांचे चिंतन शांताबाईंच्या या कवितेत सार रूपाने उतरले आहे. भूतपूर्व राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना ‘तटस्थ’ ही शांताबाईंची कविता आवडली. अनुराधा मराठे वाचकाला ‘स्वप्नामधील गावा’ घेऊन जातात.

या प्रकल्पाचे मार्गदर्शक होते रसिकवर खासदार श्रीनिवास पाटील. संपादक राजन लाखे यांचे संपादन साक्षेपी आहे. मुखपृष्ठ रविमुकुल यांचे आहे. या ग्रंथातील शांता शेळके स्मरण शतक अत्यंत वाचनीय आहे. कै. शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू यातून उलगडत गेले आहेत. उत्कर्ष प्रकाशनाचे सुधाकर जोशी यांनी सांगितलेली आठवण शांताबाईंच्या इंग्रजी साहित्य वाचनाची ओळख करून देते. ॲगाथा ख्रिस्ती, पेरी मॅसन या लेखकांची पुस्तके शांताबाई आवर्जून मागवून घेत आणि त्या वाचत. ग्रंथातील शंभर लेखकांच्या आठवणींचा आढावा घ्यायचा, तर स्थळाभावी तो शक्य नाही. म्हणून रसिक वाचकांनी तो मुळातूनच ग्रंथातून वाचावा.

कविता हा साहित्य प्रकार सर्व साहित्य प्रकारात श्रेष्ठ समजला जातो. प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यशास्त्राने तर साहित्य या संज्ञेऐवजी काव्य हिच संज्ञा सर्व साहित्याला योजिली आहे. अशा या श्रेष्ठ साहित्य प्रकारासंबंधी एका श्रेष्ठ कवयित्रीचे हे सुंदर आशयसंपन्न पुस्तक प्रकाशित झाले आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कवितेची आवड नसलेल्यांना कवितेची आवड लागेल आणि कवितेची आवड असलेल्या काव्यरसिकांना पुनः प्रत्ययाचा अपूर्व आणि असीम आनंद मिळेल हे नि:संशय ! म्हणून संग्रही असायला हवा अशा मोजक्या ग्रंथामध्ये ‘बकुळगंध’ ला मान मिळाला आहे हे निश्चित. ‘बकुळगंध’ मुळे रसिकमने गंधित होतील आणि त्यांना निरामय आनंद मिळेल.

ग्रंथ : बकुळगंध (१०० मान्यवरांच्या आठवणी, कविता )
ग्रंथनिर्मिती : महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड
प्रकाशक : प्रतिमा पब्लिकेशन पृष्ठे : ३५२.
किंमत : ४०० रुपये

‘बकुळगंध’ ग्रंथास विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार जाहीर

नागपूर येथील साहित्य संघाच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त साहित्य पुरस्कार दिले जातात. विदर्भ साहित्य संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असून, शताब्दी वर्षानिमित्त काही विशेष पुरस्कार जाहीर झाले असून, राजन लाखे यांच्या शांता शेळके जन्मशताब्दी ग्रंथ ‘बकुळगंध’ याची निवड होऊन सदर ग्रंथास विशेष साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ निर्मित, प्रतिमा प्रकाशन प्रकाशित या ग्रंथांमध्ये महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतील निवडक मान्यवरांच्या शांता शेळके यांच्या दुर्मीळ आठवणींचा ठेवा असून, त्यांना मानवंदना म्हणून समर्पित केलेल्या त्यांच्या १०० कवितांचा ऐवज आहे.मराठी साहित्य क्षेत्राच्या इतिहासात १०० मान्यवर, १०० आठवणी, १०० कविता अशा प्रकारचा ग्रंथ झालेला नाही, असे जाणकारांचे मत आहे. राजन लाखे हे लेखक, कवी असून, त्यांनी शांता शेळके यांची जन्मशताब्दी साजरी करण्याच्या उद्देशाने केलेल्या अभिनव उपक्रमातून या ग्रंथाची निर्मिती झाली आहे.

Related posts

चावट भुंगा

संत चोखामेळा यांच्या जीवनचरित्राची नव्याने मांडणी करणारा ग्रंथ

संत ज्ञानेश्वरांनी अर्जुनाची अशी केली आहे प्रशंसा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406