May 23, 2024
Book Review of Taranhar Tanaji Aasabe
मुक्त संवाद

ग्रामजीवन आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारा कथासंग्रह-तारणहार

तारणहार मधील बहुसंख्य कथा या एकाच शब्दाच्या शीर्षकाच्या आहेत. चिमणीचं घर आणि मनाचा फुलोरा या दोन कथा त्याला अपवाद आहेत. संग्रहातील १५ ही कथा वाचत असताना ग्रामीण जीवनाबरोबर कृषी जीवन व लोकांच्या परिस्थितीचा असाहाय्यतेचा आणि नियती शरणतेचा अनुभव येथे लेखक वाचकाला देतो.

डॉ. श्रीकांत पाटील

कथा हा आबालवृद्धांच्या मनावर मोहिनी घालणारा ललित साहित्यप्रकार आहे. साठोत्तरी मराठी ग्रामीण कथा लेखकांची वाट अनुसरून २१व्या शतकामध्ये नवलेखांची पिढी ताकतीने कथालेखन करते आहे. जीवनातील प्रथा, परंपरा,रूढी ,चालीरीती, माणसांची मने आणि नमुने यांचे चित्र आज नवी पिढी आपल्या साहित्यातून करीत आहे. तर कथाकथनाच्या माध्यमातून थेट रसिकांच्या हृदयाला भिडण्याचे कामही ह काही कथाकथनकार करीत आहेत.

आप्पासाहेब खोत, बाबासाहेब परीट, हरिश्चंद्र पाटील ,जयवंत आवटे ,हिम्मत पाटील यांनी कथासाहित्य प्रकाराला आज कथाकथन आणि कथा लेखनातून वैभव प्राप्त करून दिलेले आहे. यामध्ये आपणास तानाजी आसबे यांचा उल्लेख करावा लागेल. कथालेखन क्षेत्रात त्यांनी दमदार पाऊल टाकले असून ग्रामजीवनाचा आणि ग्राम संस्कृतीचा वेध आपल्या तारणहार कथासंग्रहातील कथांमधून घेतलेला आहे.

आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराचा तेथील निसर्गाचा, माणसांच्या जीवनपद्धतीचा, चालीरीती, प्रथा ,परंपरा आणि रितीबातींचा परिणाम माणसाच्या राहणीमानावर आणि जडणघडणीवर होत असतो. कवी लेखकही त्याला अपवाद नाही. आपल्याच भवतालच्या सामाजिक पर्यावरणातील घटना घडामोडी, प्रसंग आणि मानवी वृत्ती प्रवृत्तीवर भाष्य करीत पात्र प्रसंगातून तानाजी आसबे यांची कथा तारणहार मध्ये फुलत जाताना आपणास दिसून येते. लेखक ज्या परिसरात लहानाचा मोठा होतो त्या परिसरातील मातीचा, तिथल्या बोलीचा प्रभाव हा त्याच्या साहित्यात प्रतिबिंबित होत असतो. तारणहार मध्ये दूधगंगा नदी परिसरातील पात्रे, बोली यांचे चित्रण आपणास दिसून येते. वाळवे खुर्द आणि परिसरातील गाव शिवारातील घटना घडामोडींचा, पात्र प्रसंगांचा, ‘आंखो देखा’ तारणहार मधील विविध कथांमधून आपणास पहावयास व आस्वादावयास मिळतो.

तारणहार मधील बहुसंख्य कथा या एकाच शब्दाच्या शीर्षकाच्या आहेत. चिमणीचं घर आणि मनाचा फुलोरा या दोन कथा त्याला अपवाद आहेत. संग्रहातील १५ ही कथा वाचत असताना ग्रामीण जीवनाबरोबर कृषी जीवन व लोकांच्या परिस्थितीचा असाहाय्यतेचा आणि नियती शरणतेचा अनुभव येथे लेखक वाचकाला देतो. वाचकांना अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य या कथांमध्ये आहे भयाण समाजवास्तव आणि रूढीप्रियता वाचकाला विचार करायला भाग पाडते. एकंदरीत समाज जागृतीचे काम तारणहार मधील विविध कथातून लेखकाने केलेले आहे

शेतात राब राब राबणारा बळीराजा आणि त्याचे कष्टप्रद जीवन कधी आनंद तर कधी दुःख रेखाटण्याचा हा वेडा प्रयत्न मी केला आहे. शेतकरी आणि त्याला पावलोपावली मदत करणारी पाळीव जनावरे यांचे चित्रण या कथासंग्रहात आहे. अशी लेखनामागील भूमिका तानाजी आसबे आपल्या मनोगतात व्यक्त करतात. तारणहार ही शीर्षक कथा ग्रामीण जीवनातील वास्तवता प्रतिबिंबित करते. जीव वाचविण्यासाठी जीवघेणी धडपड आपणास यामध्ये पहावयास मिळते. भूतदया, संवेदनशीलता या मूल्यांचा आविष्कार करणारी ही कथा वाड्मय मूल्यांनेही श्रेष्ठ असल्याचे दिसून येते.

आज बळीराजा हालाखीचे जीवन जगत आहे. शेतात जनावरांच्या बरोबर राब- राब राबून सुद्धा दोन वेळच्या भाकरीसाठी त्याचा संघर्ष चालू आहे. ऊन- पावसाची तमा न बाळगता तो राबतो पण त्याच्या घामाचे योग्य दाम त्याला मिळत नाही. अठरा विश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या शेतकऱ्याला आज अंधश्रद्धेचे ग्रहण लागलेले आहे. तंत्र- मंत्र, जादूटोणा, देवदेवस्की अशा कटकारस्थानात आज गाव गाडा अडकत चाललेला आहे. योग्य- अयोग्य, नीती-अनिती आणि न्याय-अन्याय यातला फरक ओळखण्याचे विवेकीपण आज गावात राहिलेले नाही. याचे सुस्पष्ट चित्रण आसबे यांच्या कथा करतात.

सामाजिक समस्यांचा आविष्कार हे यातील कथांचे वेगळेपण आहे. अंधश्रद्धा या सामाजिक समस्येचा वाड्मयीन आविष्कार आपणास करणी या कथेत पाहायला मिळतो. तर पालवी ही कथा ग्राम भागातील हळुवार प्रेमाची साक्ष देते. तारणहार प्रमाणे इज या कथेतही जगण्यासाठीची अगतिकता अ आविष्कृत झालेली आहे. दुराचार, अनाचार, व्यभिचार, भ्रष्टाचार अशा समाजातील दुष्ट प्रवृत्तीवरही लेखकाने आपल्या कथांमधून बोट ठेवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली मनाचा फुलोरा ही कथा शेतकऱ्याचा धीरोदत्तपणा स्पष्ट करते.

विषय वैविध्य हे या कथासंग्रहाचे ठळक वैशिष्ट्य आहे. भिरभिर, धुळवड, श्रावणसर, वळणावर, चिमणीच घर ,सपान या कथां मधून लेखकाने ग्राम संस्कृतीतील विविध विषयांचा आढावा घेतला असून ग्रामीण संस्कार आणि संस्कृतीचे प्रतिबिंब छान असे रेखाटलेले आहे. दूधगंगा नदी खोऱ्यातील अस्सल ग्रामीण शब्दांचा भरणा आसबेंच्या कथेत दिसून येतो. एकंदरीत विषय वैविध्याने नटलेला सामाजिक समस्यांचा आविष्कार करणारा आणि बोलीचा साज असणारा तारणहार हा वैशिष्ट्यपूर्ण असा कथासंग्रह आहे.

लक्षवेधक शीर्षके अस्सल, ग्रामीण बोलीचा आविष्कार, नग आणि नमुने, वृत्ती आणि प्रवृत्ती, विविध सामाजिक प्रश्न घेऊन तारणहार मधील सर्व कथा वाचनीय बनलेल्या आहेत. निवेदनातील प्रमाणभाषा, संवादातील बोलीभाषा यांची उत्कृष्ट सांगड घालण्यात लेखक यशस्वी झालेला असून, ओघवती शैली, रांगडी पात्रे, निसर्ग वर्णने यामुळे हा कथासंग्रह लक्षणीय असाच आहे.
आपल्या कथांमधून विविध सामाजिक प्रश्नांच्यावर भाष्य करून समाजाच्या डोळ्यांमध्ये अंजन घालण्याचे काम लेखकाने या कथासंग्रहात केलेले आहे.

पुस्तकाचे नावः तारणहार
लेखकः तानाजी आसबे, वाळवे खुर्द, कोल्हापूर मोबाईल – 7719874371, 9421101214
प्रकाशकः शिवारबा प्रकाशन, बामणे
किंमतः १५० रुपयेRelated posts

मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमीच्या पुरस्कारांचे वितरण

भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगाराचे बदलते स्वरूप

माझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406