नवी दिल्ली – पाण्याच्या विद्युत अपघटनाच्या माध्यमातून हायड्रोजनचे अधिक कार्यक्षम पद्धतीने उत्पादन करण्यासाठी मिश्रधातू आधारित एक उत्प्रेरक विकसित करण्यात आला आहे. यामुळे स्वच्छ ऊर्जा उत्पादनासाठी एक तोडगा निघण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकेल.
हाय-एन्ट्रोपी मिश्रधातूचा(एचईए) वापर करून स्वच्छ ऊर्जा निर्मिती होणार असल्याने प्लॅटिनमसारख्या महागड्या धातूच्या वापरावरील अवलंबित्व कमी होईल.
मिश्रधातू म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्यांपासून बनलेल्या वस्तू असतात. प्राथमिक धातूमध्ये दुय्यम मूलद्रव्याचे तुलनेने कमी प्रमाण मिसळून हे मिश्रधातू तयार केले जातात. दुसरीकडे हाय एन्ट्रोपी मिश्रधातू म्हणजे जवळपास समप्रमाणात वेगवेगळी(सामान्यतः पाच किंवा जास्त) मूलद्रव्ये असलेल्या आधुनिक घटकांपासून बनलेले पदार्थ असतात.
बंगळूरुच्या नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस(CeNS) या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हा PtPdCoNiMn नावाचा हाय-एन्ट्रोपी मिश्रधातू ( प्लॅटिनम, पॅलॅडियम, कोबाल्ट, निकेल आणि मँगनीज) उत्प्रेरक विकसित केला आहे. या उत्प्रेरकातील घटकांसाठीची निवड अमेरिकेच्या एएमईएस नॅशनल लॅबोरेटरी या संस्थेचे स्टाफ सायंटिस्ट डॉ. प्रशांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या रचना आणि विकासानुसार करण्यात आली आहे.
व्यावसायिक उत्प्रेरकापेक्षा या उत्प्रेरकात सात पटीने कमी प्लॅटिनमचा वापर होत असल्याने आणि शुद्ध प्लॅटिनमपेक्षा अधिक चांगली उत्प्रेरक कार्यक्षमता मिळत असल्याने पारंपरिक उत्प्रेरकाला हा एक व्यवहार्य पर्याय ठरू शकणार आहे. अल्कलाईन सागरी जलासह प्रात्यक्षिक वापरामध्ये एचईएजनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे आणि कोणत्याही अवनतीशिवाय 100 तासांहून जास्त काळ स्थिरता आणि कार्यक्षमता टिकवून ठेवली आहे.
या शोधामुळे अधिक स्वच्छ, परवडण्याजोगे हायड्रोजन उत्पादन शक्य झाल्यामुळे त्याचा फायदा उद्योगांना आणि नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञानाला मिळणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा प्रशासकीय विभाग असलेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाऊंडेशनने देखील या प्रकल्पाला अर्थसाहाय्य केले आहे. या संशोधनाबद्दल दोन निबंध ऍडव्हान्स्ड फंक्शनल मटेरियल अँड स्मॉल या पत्रिकेत प्रकाशित झाले आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.